अमिताभचे न-आवाज

 
सुदेश भोसलेच्या अवतारापूर्वी किशोर कुमारचाच आवाज अमिताभला शोभतो, असं सर्वजण मानत होते. अमिताभच्या यशात किशोरकुमारचा वाटा बराच आहे. महंमद रफी, अमित कुमार व बप्पी लाहिरी यांचेही आवाज अमिताभला वापरले गेले. अगदी कुमार सानूही गायला आहे. रफीची तर खूप उदाहरणे आहेत. अमितकुमार 'नास्तिक'मध्ये गायला आहे. बप्पी लाहिरी 'गिरफ्तार' मध्ये अमिताभसाठी गायला होता. गाणे होतेः आना जाना लगा रहेगा..सुख आयेगा, दुख जायेगा. कुमार सानू 'जादूगर'मध्ये गायला होता. गाणे होतेः मैं जादूगर, मेरा नाम गोगा..मुझसा नही कोई होगा. त्या त्या प्रसंगानुरुप ते आवाज अमिताभच्या गळ्यात चालून गेले. अन्नू मलिकही 'तूफान'मध्ये अमिताभसाठी गाऊन जातो. अगदी 'त्रिशूल' मध्ये येशूदासला ऐकतानाही काही वाटत नाही.
  पण दोन आवाज असे आहेत की, जे अमिताभला अजिबात शोभले नाहीत. शब्बीर कुमार व महंमद अजीज.
  रफीच्या निधनानंतर, १९८० च्या नंतरच्या दोन वर्षांत आपली चित्रपटसृष्टी त्याची जागा भरून काढणाऱ्या गायकाच्या शोधात होती. ८३ साली कुली बनत होता, त्यावेळी मनमोहन देसाईंनी शब्बीरचा आवाज ऐकला आणि त्याचे नाव लक्ष्मी-प्यारेंना सुचवले. त्यांना तो पसंत पडला आणि कुलीची तब्बल सहा गाणी शब्बीरच्या झोळीत पडली. ज्याच्या तोंडी शब्बीरचेच नाव खेळू लागले. 'दोनो जवानीकी मस्तीमें चूर...'हे गाणे तर सगळीकडे वाजत होते. 'कुली' गाजल्यामुळे देसाईंचा ८७ सालचा मर्द शब्बीरला मिळाला. 'मर्द टांगेवाला'ने शब्बीरला हात दिला आणि 'आज का अर्जुन'ही त्यालाच मिळाला. 'गोरी है कलाईया...'हेही तो अमिताभसाठी गाऊन गेला.
  शब्बीरकुमार ज्यांना पसंत नव्हता त्यांच्यासाठी  महंमद अजीज होता. त्याने ९२ सालच्या 'खुदा गवाह' मध्ये अमिताभला आवाज दिला. 'तू मुझे कबूल, मैं तुझे कबूल' हे ते गाणे. २००० साली आलेल्या 'एक रिश्ता .. ' या चित्रपटात अजीजने अमिताभला आवाज दिला आहे. हेही गाणे रसिकांनी स्वीकारले. त्या आधीच्या अमिताभच्याच 'अकेला' मध्येही अजीज गाऊन जातो. महंमद अजीजने एका मुलाखतीत सांगितलं आहे की, खास अमिताभसाठी मी 'तू मुझे कबूल...' या गाण्यात 'क' चा उच्चार वेगळा केला आहे. मनात आलं "राजा, तुझा आवाज मुळातच त्याला शोभत नाही. तू 'क' चा उच्चार कितीही वेगळा केलास तरी काय फायदा? 'शहेनशहा' मध्येही 'जाने दो जाने दो' साठी अजीजचीच निवड झाली.
  अमिताभचा आवाज खूप वजनदार आहे. या दोघांचे आवाज त्याच्या पूर्ण उलट आहेत. शब्बीरकुमारला कायम सर्दी झालेली आहे तर महंमद चिरकलेला घसा घेऊन वावरतो. बाकीचे सर्व गायक अमिताभसाठी गाताना 'हरकत नाही', अशी भावना होते. पण या दोघांची गाणी ऐकली की, 'अरेरे' असं वाटतं. हे अमिताभचे न-आवाज आहेत.
  १९८० च्या आधी अमिताभचा आवाज तितकासा वजनदार नव्हता. त्यावेळी या दोघांनी त्याला आवाज दिला असता तर ते कदाचित् चालून गेलं असतं पण ८० नंतरच्या चित्रपटात ते गायल्यामुळे समीकरण किंचित फसल्यासारखं वाटतं. समीकरण फसलं, असं तरी कसं म्हणणार
....कारण ही गाणी गाजली. शेवटी, माय-बाप पब्लिक आहे !