जे का रंजले गांजले भाग २

या लोकांना कोणत्या प्रकारे मदत करावी जेणेकरून त्यांना कर्जफेड करणे जमू शकेल यावर मी विचार करायला लागलो.   बँका कर्जवसूलीसाठी नक्की काय करतात याबाबत मला काहीच माहीत नव्हते.   मी बांगलादेशातील सहकारी बँकांवर कडक टीका करणारा होतो.   मोठमोठाली कर्जे किंवा सरकारी पैसा संस्थाना देणे आणि काहीतरी भव्य-दिव्य उभे करण्याचा खटाटोप करणे हा प्रकार बांगलादेशातील सहकारी बँकांना अपयश येण्यास कारणीभूत आहे असे मी सांगत असे. आणि म्हणून मला असले भव्य-दिव्य प्रकार या नवीन प्रयोगात टाळायचे होते.   यासाठी मी कर्जफेड खूप सोपी केली पाहिजे असा विचार करत होतो.   या लोकांना एकरकमी कर्जफेड करायला सांगण्यापेक्षा कर्जफेडीचा हप्ताच असा ठेवायचा की, हप्ता भरणाऱ्याला तो अगदीच क्षुल्लक रकमेचा वाटेल व त्यामुळे त्याला तो भरणे अगदी सोपे जाईल असा काहीसा तो विचार होता.   बँकेचे दैनंदिन कामकाज कसे चालते हे ज्याला अजिबात माहीत नाही असा माणूस जसा विचार करेल अगदी तसा विचार मी करायला लागलो.   मला असे वाटू लागले की या लोकांनी जर दररोज काही एक रक्कम कर्जफेडीचा हप्ता म्हणून दिली तर काय हरकत आहे?   प्रत्येक दिवशी ते अगदी छोटीशी रक्कम परत करतील व अशी रक्कम अगदीच छोटी असल्यामुळे त्यांना त्याचा त्रास तर होणार नाहीच उलट हप्ता भरणे आपल्याला सहज शक्य आहे असे वाटू लागेल.   या सगळ्या विचारातून मी दैनिक हप्ता वसुलीची पद्धत सुरू केली.   ही कल्पना खरोखरच फार चांगली होती.   फक्त कोणी पैसे दिले व कोणी दिले नाहीत हे कळायला काहीच मार्ग नव्हता.   कारण ह्या सर्व नोंदी करायला कुठलीच कार्यालयीन व्यवस्था अस्तित्वात नव्हती.

त्या गावात रस्त्याच्या कोपऱ्यावरच एक दुकान होते.   मी त्या दुकानदाराला म्हटले की तू तुझ्या दुकानात लोकांचे हप्ते गोळा करण्यासाठी एक खोके ठेव म्हणजे ज्याला दैनंदिन हप्त्याचे पैसे भरावयाचे असतील तो दिवसभरात कधीही जेव्हा त्या खोक्याजवळून जाईल तेव्हा त्या खोक्यात पैसे टाकेल.   दुकानदाराने त्या प्रमाणे त्याच्या दुकानात खोके ठेवायला सुरवात केली पण त्याबरोबर त्यातूनच अडचणी निर्माण व्हायला लागल्या.   अगदी भांडणेसुद्धा व्हायला लागली.   कोणी म्हणावे, "मी पैसे दिले. "  दुकानदाराने म्हणावे, "नाही नाही.   याने अजिबात पैसे दिलेले नाहीत. "  असे सर्व प्रकारचे प्रश्नच प्रश्न उभे राहायला लागले.   त्यामुळे दैनिक कर्जहप्ता वसुली ही जरा गुंतागुंतीची आहे असे आम्ही म्हणायला लागलो.   खोक्याची पद्धत वापरून दररोज हप्तावसूली करणे शक्य नसेल तर आपण दररोज एका ठरलेल्या ठिकाणी ठरलेल्या वेळी एकत्र जमूया व तेव्हा सगळ्यांनी एकदमच पैसे जमा करावयाचे असे काहीसे आम्ही ठरवू लागलो.   पण त्यानंतर आमच्या लक्षात आले की, दररोज सर्वांनी एकदा एकत्र येणे हे जरा जास्तच गुंतागुंतीचे होते आहे.   सगळ्यांनाच प्रत्येक दिवशी ठराविक वेळेस एकत्र येणे फारच अवघड जाते आहे हे लक्षात आल्यावर त्यावर उपाय म्हणून आम्ही आठवड्यातून एकदा एकत्र येण्याचे ठरविले.   अशा रितीने साप्ताहिक सभेच्या पद्धतीला सुरवात झाली जी आपण आजही पाळत आहोत.   आठवड्यातून एकदा एकत्र येणे हे सहज शक्य असल्यामुळे साप्ताहिक सभेला जास्त जास्त लोक उपस्थित राहू लागले आणि साप्ताहिक सभेची व्याप्ती वाढता वाढता इतकी वाढली की त्यामुळे सभेचे नियंत्रण करणे अवघड बनून गोंधळ माजायला लागला.   त्यावर उपाय म्हणून आम्ही सगळ्याच बाबी दोन गटात विभागायचे ठरवले व एक सभा रविवारी व दुसरी सभा सोमवारी भरवावयाचे ठरविले.   अशा रितीने रविवारचा एक गट व सोमवारचा एक गट असे दोन गट तयार झाले व गट व्यवस्था अस्तित्वात येऊ लागली.   हळूहळू या गट पद्धतीला नीट स्वरूप प्राप्त होत जाऊन गटातील सभासदांच्या संख्येला महत्त्व आले व कालांतराने गटातील सभासदांची ही संख्या ५ ते १० च्या दरम्यान नक्की झाली.

हे सगळे जसे घडत गेले, अगदी तसेच मी सांगत आहे.   प्रत्येक वेळेस जे करणे योग्य होईल असे मला वाटे ते मी करत असे.   जे घडलं त्यामागे एखादी विचारसरणी अथवा तत्त्वज्ञान वगैरे काहीही नव्हतं.   मला वाटायचं की अमुक एखादी गोष्ट केल्याने कोणाचा तरी फायदा होईल आणि म्हणून ती गोष्ट मी करत असे.   बँकेच्या दैनंदिन व्यवहाराबद्दल काहीच माहिती नसल्यामुळे योग्य काय? व अयोग्य काय? याची मला कल्पनाही नव्हती.   आजही मला बँकेच्या दैनंदिन व्यवहारांबद्दल काहीही माहिती नाही; तरीही मी आज माझ्या पद्धतीवर आधारित एक बँक पद्धती बनवत आहे.   मागे वळून पाहता मला असे वाटते की, त्यावेळेस मला बँकेच्या दैनंदिन व्यवहाराबद्दल काहीच माहिती नव्हती हे फार चांगले झाले.   अन्यथा बँकेच्या परंपरागत पद्धतींचा माझ्याकडून वापर केला जाऊन मीही इतरांसारखाच त्या जुन्या व मळलेल्या वाटेवरून चालत राहिलो असतो.   केवळ ही मळलेली वाट माहीत नसल्यामुळेच मी माझी नवी वेगळी वाट चोखाळू शकलो.   अशा रितीने बँकेच्या परंपरागत पद्धतींबद्दलचे अज्ञान हे शाप न ठरता वरदानच ठरले.   इतकेच नव्हे तर ह्या अज्ञानाचाच मी फायदा उठवत राहिलो.   अशारितीने ही नवीन व्यवस्था जन्माला आली.  

पण अस्तित्वात असलेल्या जुन्या बँकिंग व्यवस्थेबद्दल मी त्यावेळेस फारच कडक भाषेत टीका करत असे.   त्यामुळे या नवीन व्यवस्थेनुसार कार्य करायला मी सुरवात करणार, तोच एक दुसरीच समस्या उभी राहिली.   जेव्हां जेव्हां मला संधी मिळत असे तेव्हा तेव्हा मी एकूणच बँकिंग व्यवस्थेवर कडक भाषेत ताशेरे ओढत असे.   मी म्हणत असे की, बँकेच्या प्रचलित कार्यपद्धतीमुळे गरीब लोकांना बँकेच्या सुविधा नाकारल्या जात आहेत आणि म्हणून लोकांशी व्यवहार करताना प्रचलित बँकिंग व्यवस्था ही अन्यायकारक व अहितकारक ठरत आहे.   तसेच कुठलेही ठोस कारण नसताना या बँकांनी गरीब लोकांना का बरे बँक सुविधांपासून लांब ठेवावे? व फक्त श्रीमंत लोकांनाच या सुविधांचा लाभ घेऊ द्यावा?   अर्थात कुठल्याच बँकेला ह्यावर गंभीर होऊन विचार करावासा वाटला नाही; कारण विचार न केल्याने त्यांचे काही बिघडणार नव्हते किंवा त्यांना तसा काही फरक पडणार नव्हता.   त्यांनी त्यांच्या विचारसरणीत बदल करावा, कमीतकमी त्यांना त्याबाबत विचार तरी करायला प्रवृत्त करावे यासाठी त्यांना एक चांगला जोरदार चिमटा काढला पाहिजे असे वाटून ज्याचा त्यांना चांगलाच त्रास होईल असा एक वेगळाच मुद्दा घेऊन मी त्यांचेवर टीका करावयास सुरवात केली.   मी म्हणालो, "या बँका फक्त गरीब लोकांनाच डावलत आहेत असे नसून ते महिलांना देखील नाकारत आहेत. "  हा मुद्दा मात्र त्या बँकांना चांगलाच झोंबला असावा कारण त्यांचे मुद्दे मांडण्यासाठी त्यांनी एकदाचे तोंड उघडले.   त्यांनी सांगायला सुरवात केली की, ते महिलांना अगदी योग्य पद्धतीने वागवत असून पुरुषांप्रमाणे ते स्त्रियांना देखील कर्जे देतात.   आणि हा मुद्दा ठसावा म्हणून त्यांनी असेही सांगायला सुरवात केली की, निव्वळ त्यासाठीच त्यांनी "खास महिलांसाठी" म्हणून विशेष शाखा उघडल्या आहेत.   या त्यांच्या विधानांचा मला खूपच फायदा झाला.   मी त्यांना म्हणालो, "हो.   तुम्ही स्त्रियांसाठी म्हणून खास शाखा उघडल्या आहेत हे अगदी खरे आहे.   पण स्त्रियांना कर्जाऊ पैसे देता यावेत म्हणून तुम्ही त्या उघडलेल्या नाहीत तर ठेवीच्या रूपाने त्यांच्याकडून पैसे गोळा करता यावेत म्हणून त्या उघडल्या आहेत. "  माझ्या ह्या मुद्द्यावर जास्त भर देत मी पुढे म्हणालो, "तुम्ही स्त्रियांना नुसते नाकारत नाही तर त्यांना कर्जेही देत नाही.   तुमच्या संपूर्ण कारभाराचा विचार करता, एकूण मंजूर कर्जप्रकरणांपैकी १ टक्का सुद्धा कर्जे स्त्रियांना दिल्याचे तुम्ही दाखवू शकणार नाही.   कमीत कमी १ टक्क्याएवढी कर्जे तुम्ही स्त्रियांना देता हे जर तुम्ही सिद्ध करू शकलात तरच स्त्रियांना तुम्ही सापत्नभावाची वागणूक देता हा माझा आरोप मी मागे घ्यायला तयार आहे. "  अर्थातच ते तसे काही सिद्ध करू शकले नाहीत.   साधारणत: १९७०च्या मध्यावर मी व बँका यामध्ये हे वाक्युद्ध चालू होते.   आज २००७ साल चालू आहे.   पण शक्यता अशी आहे की मी त्या वेळेस केलेला आरोप तितक्याच जोरदारपणे आजही मला बँकांवर करता येईल.   "तुमच्या एकूण कर्जदारांपैकी निदान १ टक्का कर्जदार ह्या स्त्रिया आहेत का? "  म्हणून जेव्हां आम्ही सुरवात केली तेव्हाच हे ठरवून टाकले होते की, या प्रकारचा आरोप दूरान्वयाने सुद्धा आपल्यावर कोणाला करता आला नाही पाहिजे.   यासाठीच माझ्या प्रयोगात एकूण कर्जदारांपैकी निम्मे कर्जदार ह्या स्त्रिया असतील हे कायमस्वरूपाचे धोरणच मी ठरविले.