जे का रंजले गांजले भाग ५ (अंतिम)

या सर्व वाटचालीतील त्यानंतरची घटना म्हणजे शाखांचे मूल्यमापन करणे, त्यांच्या दर्जानुसार त्यांची वर्गवारी करणे.   पण कुठली शाखा चांगली आहे व कुठली एवढी चांगली नाही हे तुम्ही ठरविणार कसे?   येथे आम्ही तारांकित हॉटेलांच्या वर्गवारीमागे जी कल्पना आहे त्या कल्पनेचा अंगीकार केला.   ही पद्धत आम्ही सुरू केली कारण आम्हाला असे वाटले की ह्या प्रकारे त्यांना कुठल्याही शाखेचा दर्जा झटकन कळू शकेल.   जर एखाद्या शाखेची कर्जवसूली १०० टक्के असेल (१०० टक्के म्हणजे १०० टक्के.   ९९ टक्केही नाही किंवा ९९. ९९ टक्केही नाही. ) व हे प्रमाण संपूर्ण वर्षभर त्या शाखेने टिकवलेले असेल तर तुम्हाला एक तारा मिळणार.   हा असतो निळ्या रंगाचा तारा!   या तारांकित पद्धतीमध्ये प्रत्येक ताऱ्याला रंग असतो व प्रत्येक रंगाला अर्थ असतो.   त्यामुळे जेव्हा तुम्ही तो तारा पाहता तेव्हा त्या ताऱ्याच्या रंगावरून तुम्हाला हा तारा का मिळालेला आहे हे त्याक्षणीच कळते.   आणि जर ती शाखा नफाही मिळवत असेल; खरे म्हणजे प्रत्येक शाखेने १२ महिन्यांच्या आत नफा मिळवायला सुरवात केली पाहिजे अशी अपेक्षा असते, तर तुम्हाला आणखी एक तारा मिळणार, तपकिरी रंगाचा तारा.   म्हणजे तुमच्याकडे निळ्या रंगाचा व तपकिरी रंगाचा असे दोन तारे असतील तर त्याचा अर्थ तुम्ही नफ्यातही आहात व तुमची वर्षभरातील कर्जवसुलीही १०० टक्के आहे असा होतो.   जर एखाद्या शाखेने जास्त ठेवी गोळ्या केल्या आणि त्या ठेवींच्या पैशांची त्यांना जरूरी नसल्यामुळे ते पैसे त्यांनी मुख्य कार्यालयाकडे पाठविले तर त्यांना आणखी एका रंगाचा तारा मिळतो.   साधारणत: एखादी चांगल्या प्रकारे चालणारी शाखा असेल तर त्या शाखेचे अंदाजे ४५०० ते ५००० कर्जदार असतात.   तर सांगायचे म्हणजे त्या शाखेने जोडलेले जे काही कर्जदार असतील त्या सर्व कर्जदारांच्या कुटुंबातील सर्व मुले जर शाळेत जात असतील, अगदी एखादे मूल सुद्धा याला अपवाद नसेल, तर त्या शाखेला आणखी एक तारा मिळतो.   आता त्या शाखेचे उद्दिष्ट असते गरीब लोकांना गरिबीतून वर आणणे.   ह्या लोकांना गरिबीतून वर यायला ज्याच्यामुळे मदत होईल अशा सर्व कारणांसाठी कर्ज द्यायला अशी शाखा नेहमीच प्रयत्नशील असते.   त्यानंतर अशी एक वेळ येते की, सर्वच्या सर्व ४५०० कर्जदार गरिबीतून बाहेर येतात.   बाहेरच्या हिशोबतपासणीसांकडून या लोकांची अगदी कसून तपासणी होते व त्या तपासणी अंती त्यांनी जर असे प्रमाणपत्र दिले की "हो.   सर्वच्या सर्व कर्जदारांनी दारिद्र्यरेषा ओलांडली आहे. "  तर त्या शाखेने हेही उद्दिष्ट साध्य केल्याने ती शाखा अगदी आदर्श बनते.   त्या शाखेला आणखी एक तारा मिळतो.   आणखी एक रंग प्राप्त होतो.

ज्या शाखेने या सर्व गोष्टी साध्य केल्या आहेत अशी पंचतारांकित शाखा डोळ्यासमोर आणायचा प्रयत्न करा.   सर्व सामाजिक उद्दिष्टे पूर्ण केलेली अशी शाखा तुम्हाला नक्कीच आवडेल.   मी तर त्यांना म्हणतो, "जर मी सरकारातील मुख्य माणूस असतो तर तुम्हाला मी राष्ट्रीय पारितोषिकच दिले असते.   जे साध्य करण्यासाठी सर्व देश धडपडतोय ते तुम्ही  साध्य करून दाखविले आहे आणि ते सुद्धा स्वबळावर!   विशेष म्हणजे यासाठी कोणावरही कोणताही बोजा पडलेला नाही.   लोकांना तुम्ही गरिबीतून वरती आणले आहे मात्र त्यासाठी कोणालाही दु:ख द्यायला लागलेले नाही, कोणाकडून काही हिरावून घ्यायला लागलेले नाही.   सर्वच सुखी आहेत. "  एखाद्या कुटुंबाने दारिद्र्यरेषा ओलांडली आहे हे कसे ठरवायचे ह्यासाठी आम्ही एक पडताळणी यादी बनवली.   गरिबीतून बाहेर पडण्याच्या ह्या मार्गावर एखाद्या कुटुंबाने कितपत प्रगती साधली आहे हे आम्ही दरवर्षी या यादीच्या आधारे पडताळू शकतो.   जर तुम्ही पक्क्या छपराच्या घरात राहत असाल तर तुमच्या पडताळणी यादीत त्या बाबी पुढे बरोबरची खूण केली जाते कारण, तुम्ही ही बाब पूर्ण केली आहे.   जर तुमच्या घरामध्ये प्रसाधन गृहाची सोय असेल तर तुम्हाला आणखी एक गुण मिळतो कारण, ही गोष्टपण तुमच्याकडे आहे.   जर तुमच्याकडे शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय असेल व ती बाब तुमच्या पूर्णपणे अखत्यारीतील असेल तर आणखी एक गुण मिळतो.   जर तुमच्या बचत खात्यात ५००० टका शिल्लक असतील व बराच काळ तुम्ही त्याला हात लावलेला नसेल तर तुम्हाला आणखी एक गुण मिळतो कारण अचानक जर एखादी समस्या उद्भवली तर ज्याचा तुम्हाला आधार  घेता येईल असे काहीतरी तुमच्याकडे आहे.   जर तुमच्या कुटुंबातील प्रत्येकाकडे थंडीसाठी उबदार कपडे असतील तर आणखी एक बरोबरची खूण तुम्ही प्राप्त करता.   जर तुमच्या कुटुंबातील प्रत्येक जण बिछान्यावर झोपत असेल आणि नाईलाज झाल्याने त्यांच्यावर उघड्या जमिनीवर झोपण्याची वेळ येत नसेल तर तुम्हाला आणखी एक गुण मिळतो.   तर अशा एकूण १० गोष्टी आहेत.   जर पाच गोष्टी साध्य झाल्या असतील तर त्याचा अर्थ पाच गोष्टी अजून करायच्या राहिल्या आहेत असा होतो.   मग आम्ही या पाच गोष्टींपैकी या वर्षी किंवा या महिन्यात तुम्हाला काय साधता येईल व त्यासाठी तुम्हाला कशी मदत करता येईल याचा विचार करतो व त्याप्रमाणे पावले उचलायला सुरवात करतो.   हेच तर आमचे काम आहे.   आणि जर एखाद्या कुटुंबाच्या बाबतीत यापैकी ९ गोष्टी पूर्ण झाल्या असतील व आता फक्त एकच गोष्ट साध्य करावयाची राहिली असेल तर संपूर्ण शाखा संघटित होऊन ती १० वी गोष्ट साध्य कशी होईल याच्या मागे लागते कारण ही जर एक बाब पूर्ण झाली तर एक कुटुंब दारिद्र्यरेषेच्या वर येणार असते.   आणि हे जर जमले तर आम्हाला असे वाटते की, आपण एका कुटुंबाला दारिद्र्याच्या खाईतून वरती ओढले.   हा सगळाच अनुभव अगदी मुळापासून चित्तथरारक असतो.   अनेक चांगल्या गोष्टींसाठी हे सर्वजण ह्या तारांकित पद्धतीकडे फारच गांभीर्याने पाहतात.   मी किंवा बँकेचे इतर कोणी वरिष्ठ अधिकारी जर त्यांच्या भागाला भेट देणार असू तर सर्व शाखा व्यवस्थापक किंवा त्या सभेला उपस्थित राहणारे सर्व कर्मचारी त्यांना मिळालेले तारे लेऊनच येतात.   आणि बैठक व्यवस्थाही ठरलेली असते.   पाच तारे असलेले सर्वात पुढे, त्यामागे चार तारे वाले, त्यानंतर तीन, दोन, एक व त्यानंतर बिगर तारे वाले बसतात.   त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारची शेरेबाजी हमखास ऐकायला मिळते.   पुढे बसलेल्यांचा हेवा करत मागे बसलेला कोणीतरी,   पुढे बसलेल्या कोणाला तरी म्हणत असतो, "माझी एवढी काळजी करायची तुला काही एक कारण नाहीये.   बघच तू मी तिथे येतोय की नाही ते.   पुढच्या वर्षी जर मी तिथे आलो नाही ना तर बापाचे नाव लावणार नाही. " वगैरे वगैरे.   हे सर्व तो म्हणत असतो कारण त्याला सर्वात पुढे बसायचे असते व ते सुद्धा पाच तारे लावून.   ती त्याच्या दृष्टीने खूपच अभिमानास्पद हवीहवीशी वाटणारी बाब असते.   त्यांच्याकडे असलेल्या प्रत्येक ताऱ्याबाबत खूप मोठा अभिमान ते बाळगत असतात.  

 दरवर्षी आम्ही स्पर्धा भरवतो.   आमच्या बँकेच्या कार्यक्षेत्राचे एकूण ३६ विभाग केलेले आहेत.   या ३६ विभागांचे त्यांच्या कामगिरीनुसार मूल्यमापन करणे हा ह्या स्पर्धेचा निकष असतो.   ही मूल्यमापन करण्याची पद्धत अतिशय तपशीलवार व योजनाबद्ध असते.   तसेच हे मूल्यमापन प्रत्येक पातळीवर एकामागोमाग एक असे केले जाते.   या मूल्यमापनाच्या पद्धतीनुसार ज्या विभागाच्या खात्यात सर्वात जास्त गुण जमा होतात त्या विभागाला सुवर्ण चषक बहाल केला जातो.   हा सगळाच एक मोठा सोहोळा असतो.   आणि ज्यांना हा चषक मिळतो ना ते तो अशा पद्धतीने साजरा करतात की, पाहणाऱ्याला वाटावे की, यांनी जणू फुटबॉलच्या मॅचमध्येच हा मिळवला आहे.   संपूर्ण शहरात हा उत्सव खूप मोठ्याप्रमाणावर साजरा केला जातो.    ग्रामीण बँकेचा सुवर्णचषक मिळविल्याबद्दल सगळे गाव आनंदाने बेहोष होऊन नाचत असते.   ही स्पर्धा हे सगळेजण इतक्या गांभीर्याने घेतात की, अगदी थोडे गुण कमी पडल्यामुळे ज्यांना हा मिळत नाही व त्यामुळे दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागते त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात.  

 ह्या सगळ्या प्रकारांमुळे अशी काही वातावरण निर्मिती होते की ते जे काही करतात त्याचा त्यांना एकीकडे अभिमानही वाटत असतो तर दुसरीकडे ते त्याची मजाही लुटत असतात आणि त्यासाठी ते कठोर मेहनतही घेतात.   अगदी कठोर मेहेनत.   ग्रामीण बँकेचे काम हे सोपे काम नाही.   ते फारच परिश्रमाचे काम आहे.   जे काम आमच्याशिवाय कोणी करूच शकणार नाही असे काम आम्ही करत आहोत असे त्यांना वाटावे किंवा अशी भावना ते करत असलेल्या कामाशी जोडली जावी असा आमचा प्रयत्न असतो.   आज आमच्या कर्मचाऱ्यांची संख्या २१, ००० आहे, आणि ज्यांच्यासाठी ते काम करतात त्यांच्यापेक्षा ते फार काही वेगळे नाहीत.   ते सर्वजण निम्नस्तरीय मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेले आहेत.   जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला वैद्यकीय शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज मंजूर होते, तेव्हा तिचा वैद्यकीय कॉलेजमधला प्रवेश व त्यानंतर तिला शैक्षणिक कर्ज मंजूर करण्यासाठी केलेली धडपड वगैरे सगळेच एक एक करून आठवायला लागून त्या शाखेच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू जमा होतात.   हे अश्रू सांगत असतात, "केवढीशी होती हो ही.   अगदी आमच्या डोळ्यासमोर आता किती मोठी झालीय.   आम्ही तिला शाळेत जायला मदत केली.   आणि आज तर तिला शैक्षणिक कर्ज आम्ही मंजूर करू शकलोय.   आता ती वैद्यकीय कॉलेजमध्ये जाईल.   अहो, ती लवकरच डॉक्टर बनणार आहे.   नुसती डॉक्टर नव्हे तर या भागातली पहिली वहिली डॉक्टर.   या भागात या अगोदर डॉक्टर होताच कुढे?   असे काहीतरी करायची संधी या अगोदर इतर शाखांना मिळाली असेलही कदाचित.   पण आज आमची पाळी आहे हे सगळे करण्याची.   एका कुटुंबाला इथपर्यंत वर खेचण्याची.   त्यांच्यातील एक मुलीला तर आम्ही चक्क डॉक्टर बनायला मदत करणार आहोत.   हे सर्व करण्याची संधी कोण बरे गमवेल?   आम्ही तर नक्कीच नाही. "  अशा प्रकारच्या विचारांनी त्यांची मनोवृत्तीच अशी बनून जाते की, ते जे काही करत असतात किंवा त्यांनी जे काही साध्य केलेले असते त्याबाबत ते अगदी सजग असतात.   हा त्यांचा सजगपणा लक्षात घेतला तरच, त्यांना नोबेल प्राइज मिळाल्याचे जेव्हां कळले तेव्हा त्यांची काय प्रतिक्रिया उमटली असेल याची कल्पना तुम्ही करू शकाल.   तुम्ही काहीतरी विशेष करून दाखविले आहे आणि त्याच्याकडे दुर्लक्ष तर झालेले नाहीच उलट सर्व जग टाळ्या वाजवून तुमचे अभिनंदन करतेय.   तुम्ही केलेल्या कामाची दखल घेतली गेली आहे.

 पैसे कर्जाऊ द्यायचे, त्यावर व्याज लावायचे, मिळाली तर लोकप्रियता मिळवायची इतपतच छोटे ध्येय ठेवून या लोकांना मदत केली जात असलेली मी पाहत आलोय.   पण मला वाटते ही काही फार मोठी गोष्ट नाही.   बांगलादेशातील वर्तमानपत्रातून आमच्यावर टीका केली जाते की, आम्ही कर्जावर खूपच चढ्या भावाने व्याज आकारतो व अशा रितीने आम्ही गरीब लोकांना मारत आहोत.   अतिशय सामान्य व नेहमी केला जाणारा आरोप.   पण आमच्यावर हा आरोप करणाऱ्याला जर मी विचारले की, ग्रामीण बँकेत व्याजाचे दर काय आहेत? तर त्याला ते ठाऊक नसते!   तरीपण आम्ही जास्त व्याजदर लावतो किंवा असेच काहीतरी आरोप आमच्यावर करण्याचे ते थांबवत नाहीत.   तर अशा प्रकारच्या गोष्टी चालूच असतात.   दारिद्र्यातून बाहेर पडण्यासाठी लोक पहिली पायरी मग दुसरी पायरी मग तिसरी पायरी या पद्धतीने हळूहळू आपली प्रगती साधत असतात.   आज आमच्या अंतर्गत पाहणीनुसार ग्रामीण बँकेचे ५८ टक्के कर्जदार हे दारिद्र्यातून बाहेर पडले आहेत.   आणि प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक दिवशी जास्ती जास्ती कुटुंबे दारिद्र्यातून बाहेर पडत आहेत.

 आम्ही एक ध्येय निश्चित केले आहे.    इतके निश्चित की जणू काळ्या दगडावरची रेष.   या ध्येयानुसार २०१५ सालापर्यंत ग्रामीण बँकेशी जोडली गेलेली सर्व कुटुंबे दारिद्र्यातून बाहेर पडलेली असतील.   आणि तेव्हा उर्वरित देश किंवा उर्वरित जग गरिबी निम्म्याने कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याची भाषा करत असेल.   आम्ही मात्र गरिबी पूर्णपणे नाहीशी केलेली असेल व सर्वांना दाखवून दिलेले असेल की, इतरांपेक्षा कितीतरी अगोदर हे आम्ही साध्य केलेले आहे.   यातूनच इतर सर्वांना स्फूर्ती मिळेल.   हे असे काहीतरी असेल की, गरिबी हटवणे हे अशक्य नसून ती हटवता येते याबाबत आम्ही लोकांच्यात विश्वास निर्माण केलेला असेल.   काहीतरी विशेष करून दाखवायची ऊर्मी, भावनाशीलता व अत्युच्च दर्जाची सृजनशीलता हा त्रिवेणी संगम प्रत्येक माणसामध्ये वसत असतो म्हणून दारिद्र्य निर्मूलन हे शक्य आहे.   ते साध्य करता येऊ शकते.   आपल्या प्रत्येकामध्ये ही अतिप्रचंड सृजनशीलता लपलेली आहे.   आपल्यातील काही जण या सृजनशीलतेचा थोडाफार वापर करण्यात सुदैवी ठरतात.   तर काही जणांना ही संधीच मिळत नाही कारण आपण ती त्याला मिळवून देत नाही.   समाज त्यांना संधी नाकारतो.   समाजाचा एक घटक म्हणून आपल्या प्रत्येकाचे हे कर्तव्य आहे की, जर एखादा त्याच्यात दडलेल्या सृजनशीलतेला वापर करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला आपण तशी संधी मिळवून दिली पाहिजे.

 सामाजिक कार्याबद्दल आता मला शेवटचा मुद्दा मांडायचा आहे.   छोट्या प्रमाणावर पतपुरवठा करताना नफा मिळवणे किंवा हा नफा वाढविण्यासाठी निरनिराळ्या प्रकारचे प्रयत्न करणे ह्या सर्व गोष्टी आपल्याला माहीत आहेत.   त्याच्या पेक्षा मोठा आवाका ठेवून काही जास्तीच्या गोष्टी लोकांच्या भल्यासाठी आपल्याला करता येऊ शकतात.   काहीतरी फायदा व्हावा किंवा कुठलातरी वैयक्तिक स्वार्थ साधता यावा हा हेतू न ठेवता आपण आपल्यापरीने एक सामाजिक उद्दिष्ट निश्चित करू शकतो.   संपूर्णपणे त्या ध्येयासाठी वाहून घेऊ शकतो.   आणि हे सामाजिक ध्येय आपले आपल्यालाच ठरवता येऊ शकते.   लोकांना दारिद्र्यातून बाहेर काढणे अशा प्रकारचे कुठलेही सामाजिक उद्दिष्ट ठेवून आपण लोकांना मदत करू शकतो.

 रस्त्यातून भीक मागत हिंडणाऱ्यांना प्रतिष्ठेने जीवन जगता यावे यासाठी त्यांना एखादी संधी मिळवून देणे व अशारितीने रस्त्यांमधून आढळणारे भिकारी नाहीसे करणे हे अशाप्रकारचे दुसरे ध्येय असू शकेल.   आम्ही असे एक सामाजिक उद्दिष्ट निश्चित करून भिकाऱ्यांना कर्ज द्यायला सुरवात करावयाचे ठरविले.   हा प्रयत्न आमच्यासाठी खूपच मनोवेधक अनुभव ठरला.   वस्तुस्थिती अशी आहे की, आज आमच्या या प्रयोगात ८५, ००० भिकारी सहभागी झाले आहेत.   आम्ही त्यांना इतकेच सांगितले की, "तुम्ही घराघरातून भीक मागत हिंडत असता.   तर असे हिंडत असताना सहज विकल्या जाऊ शकतील व लोकांनाही विकत घ्यायला आवडेल अशा वस्तू उदाहरणार्थ लहान मुलांची खेळणी, गोळ्या बिस्किटे अशा सारख्या वस्तू तुम्ही तुमच्या जवळ का ठेवत नाही?   ह्या वस्तू तुम्हाला सहज विकता येतील.   जर तुम्हाला असे काही करावयाचे असेल तर त्यासाठी आम्ही तुम्हाला कर्ज द्यायला तयार आहोत.   त्यावर आम्ही व्याजसुद्धा घेणार नाही.   दोन्ही गोष्टी करून बघा आणि तुम्हीच ठरवा कुठली गोष्ट तुमच्या फायद्याची आहे ते. "   भीक मागू नका असे खरेतर आम्ही कोणालाच सांगितले नाही.   तरीही कित्येकजण आता वस्तूच विकतात. भीक मागायचे त्यांनी पूर्णपणे बंद केले  आहे.   तर कित्येकांना असे आढळून आले की, काही भागात भीक मागणे फायद्याचे असते तर काही भागात वस्तू विकणे फायद्याचे असते.   शुक्रवार तर भीक मागण्यातच जास्त फायदा होतो.   त्यामुळे आता आमच्या या प्रयोगात दोन गट झाले आहेत.   वस्तू विकणाऱ्यांचा एक गट व भीक मागणाऱ्यांचा दुसरा गट.

 आपल्यातील प्रत्येकालाच असे वाटते की आव्हानांना तोंड देण्याच्या प्रयत्नांतूनच माणसाची प्रगती झपाट्याने होते.   मात्र ही आव्हाने आपल्याला नीट समजावून घेता आली पाहिजेत.   तरच त्यांच्यावर मात करण्यासाठी आपण योग्य पावले उचलू शकू.   आणि या प्रक्रियेतूनच आपण असा एक समाज, असा एक समूह तयार करू शकू, की जिथे औषधालासुद्धा गरिबी सापडणार नाही.   कोणालाही गरिबीपासून त्रास होता कामा नये.   कारण कोणालाच ती नको आहे.   माणसाच्या उन्नतीसाठी गरिबी असायलाच हवी अशी अट कोणीही घातलेली नाही तर गरिबी फक्त आपल्यावर लादलेली आहे.   गरिबी ही कृत्रिमपणे तयार करून आपल्यावर लादलेली असते आणि म्हणूनच ती आपण फेकून देऊ शकतो.   गरिबी, ही फक्त गरिबीच्या खुणा जतन करणाऱ्या संग्रहालयात असायला हवी.   अशा प्रकारची संग्रहालये संपूर्ण जगभर बांधण्यासाठी आपण तयारी करायला लागूया.   म्हणजे जो कुणी या संग्रहालयाला भेट देईल तो त्या गरिबीकडे पाहून म्हणेल, "ओहो!   गरिबी गरिबी म्हणतात ती अशी असते होय! "

(आधार : डॉ. मुहमद युनुस, २००६ सालचे शांततेचे नोबेल प्राईज विजेते आणि संस्थापक, ग्रामीण बँक, बांगलादेश यांनी २ फेब्रुवारी २००७ रोजी नाबार्डच्या मुख्यालयात केलेले भाषण - नाबार्ड न्यूजलेटर व्हॉल्यूम १७ क्रमांक १०)