जे का रंजले गांजले भाग ३

मला वाटले की हे सगळे अगदी सोपे असेल.   मी फक्त स्त्रियांना ग्रामीण बँकेत सामील व्हायचे आवाहन करावयाचे आणि त्या ग्रामीण बँकेत सामील झाल्या की त्यांना कर्जवाटप करायचे.   बस्स झाले माझे काम!   पण मी स्त्रियांबाबतचे अवलंबिलेले हे ५० टक्यांचे धोरण म्हणजे मीच माझ्यावर ओढवून घेतलेली सर्वात मोठी आपत्ती ठरली.   आम्ही जेव्हा ग्रामीण बँकेच्या संदर्भात स्त्रियांशी बोलायला जात असू तेव्हा त्या म्हणत,
"नको. नको. तुम्ही मला काही देऊ नका.   मला पैसे बाळगायची फार भीती वाटते हो. "
"अगदी खरं सांगते हो तुम्हाला, मला पैसे देऊ नका.   पैसे पाहून मला इतकी भीती वाटते की मी मरूनच जाईन. "
"अहो मी माझ्या संपूर्ण आयुष्यात पैशाला कधी हातसुद्धा लावलेला नाही हो.   खरंच, तुम्ही मला तो देऊ नका. " 
तर कोणी म्हणे, "अहो ते पैसे तुम्ही माझ्या नवऱ्याला का देत नाही?   त्याला द्या ना.   कारण पैशाचे व्यवहार सगळे तोच तर बघतो.   मला काय त्यातले कळतंय.   मी तर कधीच पैशाचे व्यवहार केलेले नाहीत. " 
कोणी म्हणे, "माझी आई मरणाच्या दारात असताना मला काय म्हणाली माहितेय? "  ती म्हणाली, "माझ्या लेकरा,   आयुष्यात कसलाही प्रसंग येऊ दे पण तू काही झाले तरी चुकूनसुद्धा कोणाकडून पैसे कर्जाऊ घेऊ नकोस. "
ग्रामीण बँकेत पुरुष व स्त्रिया यांचा सहभाग ५०:५० असा असावा, यासाठी स्त्रियांचे प्रमाण ५० टक्के करण्याची धडपड मी जेव्हां करत होतो तेव्हा पैशासंबंधात स्त्रियांवर झालेले पूर्वीचे संस्कार हे असे होते.   त्या सर्व स्त्रिया एकमुखाने म्हणत होत्या की, आम्ही पैसे घेऊ इच्छीत नाही!   पण प्रयत्न करायचे सोडून कसे चालेल?   प्रयत्न चालूच ठेवले पाहिजेत असे वाटून मी त्या बाईला म्हणावे, "तुमची आई आज जर जिवंत असती आणि ग्रामीण बँक काय आहे हे तिला मी नीट समजावून सांगितले असते तर तिने नक्कीच तुम्हाला ग्रामीण बँकेत सहभागी होण्याचा सल्ला दिला असता.   कारण तुमची आई नक्कीच खूप शहाणी होती.   पैसे कधीही उसने घेऊ नकोस असे तिने तुम्हाला सांगितले तेव्हा त्यामागे तसेच कारण होते.   तिच्या काळात उसने पैसे फक्त सावकाराकडूनच मिळत असत आणि जेव्हा तुम्ही सावकाराकडून पैसे उसने घेता तेव्हाच तुम्ही संपून जाता.   त्यावेळेस थोडीच ग्रामीण बँक अस्तित्वात होती.   त्यामुळेच तिला सावकार व ग्रामीण बँक या दोन्हीतला फरक नक्कीच कळला असता व तिने नक्कीच तुम्हाला ग्रामीण बँकेत जायला सांगितले असते. "  तर तात्पर्य सांगायचे म्हणजे जो मार्ग मिळेल त्या प्रत्येक मार्गाने आम्ही प्रयत्न करत राहिलो आणि तब्बल ६ वर्षांनी आमच्या एकूण कर्जदारांपैकी ५० टक्के कर्जदार ह्या स्त्रिया होत्या.   आम्हाला खूप आनंद झाला.   आम्ही तो साजराही केला.   जे अजिबात शक्य नाही असे सर्वजण म्हणत होते ते शेवटी आम्ही शक्य करून दाखविले होते.   बाकीच्या इतर लोकांचे जाऊदे.   आमचे कर्मचारी देखील मला म्हणायचे, "हा ५० टक्के स्त्रिया असण्याचा विचार आपण सोडून देऊ.   तुम्ही काही तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही.   जर त्या महिलांना पैसे नको असतील तर जाऊ दे ना.   तुम्ही कशासाठी त्यांच्या मागे लागताय? "  मी त्यांना म्हणायचो, "त्या जरी पैशाला नाही म्हणत असल्या तरी एका वेगळ्या अर्थाने ते खरे नाहीये.   त्यांचा आत्मविश्वास पूर्णपणे नाहीसा होईल असेच त्यांना आपण वागविलेले आहे.   आपला इतिहासच त्याला साक्ष आहे व तोच ह्या स्त्रियांच्या तोंडून तसे वदवतोय.   त्या स्त्रियांचे ते बोल नव्हेत.   या सर्वाला आपण त्यांच्याशी जे वागलो तेच कारणीभूत आहे आणि म्हणूनच त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे आपले कर्तव्य आहे.   कधीतरी एखाद्या दिवशी त्यांच्या भोवतीचे भीतीचे वरचे कडक आवरण व त्यानंतर त्याच्याही आत असलेले भीतीचे थरामागून थर काढायला लागणारच आहेत व हे काम दुसऱ्या कोणी नाही तर आपल्यालाच करायला लागणार आहे कारण हे भीतीचे थर आपणच तर त्यांच्याभोवती गुंडाळलेले आहेत.   मग असा एखादा दिवस उगवेल की जेव्हा आपण हे सगळे भीतीचे थर नाहीसे करू शकू व त्यावर ती स्त्री म्हणेल, ’ठीक आहे.   मी प्रयत्न करून बघते. ’  आणि तेव्हाच आपल्याला यश मिळाले असे म्हणता येईल.   एखादी जरी तयार झाली तरी चालेल.   दोघीजणी जर मिळाल्या तर फारच उत्तम.   त्यांना लागलीच सामावून घ्या कारण त्यामुळेच इतर जणींची भीड चेपेल.   आणि मग त्या एका मागोमाग एक येत जातील. "  तर थोडक्यात सांगायचे म्हणजे हे सगळे घडायला तब्बल सहा वर्षे लागली!

मग आम्हाला काही गोष्टी प्रकर्षाने जाणवायला लागल्या.   स्त्रियांच्या मार्फत कुटुंबात येणारा पैसा त्या कुटुंबाची खूपच मोठ्या प्रमाणावर उन्नती करतो असे आढळून यायला लागले.   मात्र तेवढाच पैसा जर पुरुषांच्या मार्फत कुटुंबात आला तर तसे दिसून येत नसे.   जर आई कर्जदार असेल तर मुलांना त्याचा सर्वप्रथम फायदा होई.   महिला पैसा जास्त चांगल्यारितीने सांभाळू शकतात.   तसेच आगामी काळाचा अंदाज बांधणे त्यांना चांगले जमते.   त्या जरी स्पष्टपणे बोलू किंवा सांगू शकल्या नाहीत तरीही पुढे काय घडायची शक्यता आहे ह्याबाबत त्या विचार करताना किंवा त्याबाबत काहीतरी अडाखे बांधताना दिसतात.   याच्या उलट पुरुषांच्या हातात जर पैसे पडले तर त्यांना धीर धरणे फार अवघड जाते.   जे काय पैसे हातात असतील त्या पैशाचा ताबडतोब उपभोग घेण्याची त्यांची प्रवृत्ती असते.   कुटुंबातील सदस्यांच्या गरजांपेक्षा त्यांची स्वत:ची गरज ही त्यांना सर्वात महत्त्वाची वाटते त्यामुळे त्यांच्या गरजांवर ते सर्वप्रथम पैसे खर्च करण्याची शक्यता असते.   विशेषकरून मुलांकडे पुरुषांचे दुर्लक्ष होते.   मी म्हणालो, "असे जर असेल तर स्त्री-पुरुषांची संख्या निम्मी-निम्मी ठेवण्यात काय हशील आहे? "  म्हणून हे प्रमाण आम्ही बदलले.   स्त्रियांचे प्रमाण आम्ही ५० टक्केपेक्षा जास्त ठेवावयाचे ठरविले.   आम्ही स्त्रियांना जास्त महत्त्व देऊ लागलो.

दहा वर्षांनी म्हणजे १९८६ मध्ये, आमच्या कार्यालयाच्या बरोबर समोर असलेल्या बांगला देश इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंट यांनी ग्रामीण बँकेला १० वर्ष पुरी झाल्याचे निमित्ताने बँकांचा एक परिसंवाद आयोजित करण्याचे ठरविले.   मला माहिती होते की मी मांडत असलेल्या विचारांवर हल्ला चढवायच्या निमित्ताने ते सर्व एकत्र आले आहेत.   मी म्हणालो, "ठीक आहे.   जर त्यांना चर्चाच करायची असेल तर आपणही जाऊ व चर्चा करू. "  म्हणून मी त्या परिसंवादाला उपस्थित राहिलो.   ग्रामीण बँकेबद्दल बोलायला अनेक बँकेतील मान्यवर आले होते.   त्यांनी अनेक गोष्टींवरून आमच्यावर टीका केली.   त्यापैकी एका मुद्द्यावरून मात्र आमच्यावर वारंवार टीका होऊ लागली.   आमच्या बँकेच्या एकूण सभासदांपैकी ७० टक्के सभासद ह्या स्त्रिया असल्यामुळे आम्हाला प्रेक्षागृहातून असे सुचवले गेले की, "प्रो. युनुस, तुम्ही तुमच्या बँकेचे नाव बदलायला पाहिजे.   तुम्ही तुमच्या बँकेला ग्रामीण महिलांची बँक असे संबोधले पाहिजे.   कारण तुमच्या कर्जदारांमध्ये महिला बहुसंख्य आहेत. "  गंमत म्हणजे प्रेक्षागृहातून आलेल्या ह्या सूचनेला अनेक मान्यवरांनी त्यांच्या भाषणात पाठिंबा दर्शविला.   उत्तराच्या भाषणात मी म्हणालो, "हो.   तुमची सूचना अमलांत आणायला मी पूर्णपणे तयार आहे.   ग्रामीण बँकेचे नाव बदलायला मलाही आवडेल.   पण त्याअगोदर तुम्हालापण काही पावले उचलायला लागतील.   तुम्हालाही तुमच्या बँकांची नावे बदलायला लागतील.   जसे, जनता पुरुषांची बँक, रुपाली पुरुषांची बँक, सोनाली पुरुषांची बँक वगैरे.   कारण तुमच्या बँकेत ९९. ९९ टक्के पुरुष कर्जदार आहेत.   तुम्हीच ही कारणमीमांसा प्रथम मांडली आहे तेव्हा तुमच्या बँकांची नावे बदलायची पाळी प्रथम तुमची आहे.   तुम्ही जेव्हां तुमचे हे काम पूर्ण कराल तेव्हा मी पण तुमचे अनुकरण करीन. "  अर्थातच ही सूचना घेऊन ते परत कधीही माझ्याकडे आले नाहीत.   हे मी सगळे सांगतोय त्यामागे माझा हे सांगायचा उद्देश आहे की, जेव्हां तुम्ही स्त्रियांच्या संदर्भात एखादी गोष्ट करायला सुरवात करता तेव्हा लोकांना असे वाटते की तुम्ही काहीतरी वेगळे करताय जे निश्चितपणे चांगले नसणारेय.   प्रत्येक जण तुमच्यावर पाळत ठेवून असतो.   मला एक प्रश्न नेहमी विचारला जातो.   "अगदी आजही तुमच्या बँकेत इतक्या महिला का आहेत? "  अगदी खात्री बाळगा.   तुम्ही कुठेही गेलात ना, तरी कमीत कमी हा प्रश्न तरी लोकं तुम्हाला विचारणारच.   आणि मग मी त्यांना विचारतो, "इतके पुरुष काय म्हणून त्यांच्या बँकेत आहेत?   जणूकाही मी काहीतरी भयंकर किंवा काहीतरी चाकोरीबाहेरचे करतोय किंवा मी एखादी अगदी अयोग्य गोष्ट करतोय अशा प्रकारे तुम्ही मला हा प्रश्न का म्हणून विचारताय की, तुमच्या बँकेत इतक्या बायका का? "  थोडक्यात समाजाची सद्यपरिस्थितीतील मनोधारणा ही अशी आहे व अशा परिस्थितीत तुम्ही काम करत असता.   मुस्लिम समाजात तर स्त्रियांसाठी काम करणे फारच अवघड बनते.   कारण स्त्रियांनी घरकामा व्यतिरिक्त इतर कुठल्याही कारणासाठी घराचा उंबरठा ओलांडता कामा नये तसेच अशाप्रकारच्या कुठल्याही कामात स्त्रियांना सहभागी करून घेऊ नये असा विचार गावातील धार्मिक नेते येन केन प्रकारे लोकांच्या गळी उतरवत असतात.   स्त्रियांना पैसे बाळगायला देणे हे तर फारच चुकीचे आहे असे तर ते खूपच ठामपणे सांगतात.   या सगळ्या परिस्थितीतून आम्ही गेलो आहोत व त्यातून तावून सुलाखून बाहेर पडलो आहोत.   ग्रामीण बँक ही संपूर्ण देशभर पसरलेली आहे.   बांगलादेशातील प्रत्येक खेड्यामध्ये ती अस्तित्वात आहे.   आणि आता आमचे असे प्रयत्न चालू आहेत की, बांगलादेशातील प्रत्येक गरीबाच्या घरी ती पोहोचेल.   आजमितीला बांगलादेशांतील ८० टक्के गरीबांच्या घरांत ती पोहोचलेली आहेच.   पण २०१० सालापर्यंत १०० टक्के गरीब कुटुंबे ही ग्रामीण बँकेला जोडली गेली पाहिजेत हे आमचे उद्दिष्ट आहे.