जे का रंजले गांजले भाग १

नोबेल विजेते प्रोफेसर मुहमद युनुस स्वतः: सांगत आहेत, त्यांच्या ग्रामीण बँकेच्या यशस्वी प्रयोगाबद्दल

बँकेच्या कामकाजाबाबत अनभिज्ञ असलेल्या एका माणसाने कुठल्यातरी अनाकलनीय पद्धतीने काहीतरी प्रयोग करावा व त्या प्रयोगाबद्दल काहीतरी ऐकायला मिळेल म्हणून रिझर्व बँकेचे गव्हर्नर, नाबार्डचे अध्यक्ष, कार्यकारी संचालक तसेच रिझर्व बँकेची संचालक मंडळी व निरनिराळ्या बँकेतील तज्ज्ञ मंडळी आज येथे उपस्थित राहिली आहेत हा खरोखरच एक सन्मान आहे. खरे म्हणजे हा प्रयोग करत असताना त्यावेळेस आम्ही नक्की काय करत होतो हे आमचे आम्हालाच कळत नव्हते

आम्ही जे काही केले त्यातील काही पैलूंवर प्रकाश टाकायची संधी मला मिळते आहे याचा मला खूपच आनंद होतोय.

 डॉ. थोरातांनी ग्रामीण बँकेबद्दल जे प्रास्ताविक केले ते खूपच प्रभावी होते.  त्यांनी वापरलेले शब्द हे खरे आहेत आणि त्यांनी वर्णन केल्याप्रमाणे त्यात परिणामकारकता व ठामपणाही आहे.  परंतू हे मात्र नक्की की या कामातूनच आम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर स्फूर्ती मिळत गेली.  आम्ही जी वाट चोखाळत होतो, ती वाट नक्की कशी आहे व ती आम्हाला कोठे पोहोचवणार आहे ह्याबाबत सुरवातीला आम्हाला काहीच कल्पना नव्हती.  असे नेहमी म्हटले जाते की दुष्काळामुळे मी इकडे ओढला गेलो. (डॉ. थोरातांनी आत्ताच यासाठी परिस्थिती असा शब्द वापरला.)  तेव्हा मी जवळच्याच एका विद्यापीठात अर्थशास्त्र विभागातील एक साधा शिक्षक होतो.  जवळच्याच एखाद्या गावात पडणारा दुष्काळ व त्याने घातलेले थैमान मी हतबल होऊन पाहत असे.  या दुष्काळाला तोंड द्यायला पाहिजे असे मला वाटत असले तरी माझ्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारे मला या दुष्काळाला तोंड द्यायचे नव्हते. ( कारण त्या ज्ञानाच्या जोरावर मी दुष्काळाला सामोरा जाऊ शकणार नाही असे मला वाटे.)  मला असे वाटे की, मानवतेच्या भूमिकेतून या दुष्काळग्रस्त लोकांच्या बाजूने उभे राहून त्यांच्या दु:खात सहभागी होण्याची पात्रता माझ्यात नक्कीच आहे.

अशारितीने या सगळ्याची सुरवात होऊन मी यात गुंतत गेलो.   पण मी नक्की काय केले पाहिजे हे मात्र मला कळत नव्हते.   प्रत्येक नवीन दिवस काहीतरी नवीन परिस्थिती घेऊन उगवायचा आणि त्यासाठी जे करायला पाहिजे असे मला वाटे ते मी करत असे.   सरतेशेवटी त्या गावातील लोकांना सावकारी पाशातून मुक्त करण्याचा प्रयत्न मी सुरू केला.   कारण लोकांभोवती पडलेला सावकारी पाश व त्याचे ओंगळवाणे स्वरूप मला वेळोवेळी लक्षात येत होते.   पैसे कर्जाऊ देण्यातून निर्माण होणारे ओंगळवाणे प्रकार मला फार जवळून पाहायला मिळाले.   निव्वळ पुस्तके वाचून मला हे कळले नव्हते तर प्रत्यक्ष भरडल्या जाणाऱ्या माणसांची जिवंत कहाणी मी ऐकत होतो.   पाहत होतो.   याबाबत जास्त माहिती जमा करण्यासाठी, ज्यांनी सावकाराकडून कर्जाऊ पैसे घेतले आहेत अशा माणसांची नावे व त्यांनी घेतलेल्या कर्जाची रक्कम याची एक यादी मी बनवली.  त्याबरोबर माझ्या लक्षात आले की, हा सर्व प्रकार ओंगळवाणा असला तरी त्यातून ह्या सर्वांना सोडवणे अगदी सोपे आहे व माझा हुरूप एकदम वाढला.   एकूण कर्जरक्कम इतकी क्षुल्लक होती की मला एक जबरदस्त धक्काच बसला.   एकूण ४२ लोकांनी सगळे मिळून २७ डॉलरचे कर्ज घेतले होते.
कर्जाची इतकी छोटीशी रक्कम या ४२ कुटुंबात एवढा मोठा उत्पात घडवून आणू शकेल यावर माझा विश्वासच बसेना.   कर्जाची रक्कम इतकी छोटी असल्यामुळे मला असे वाटू लागले की यांचा हा प्रश्न मी सोडवू शकेन.   फक्त मी माझ्या खिशातून २७ डॉलर दिले की काम होणार होते.   मी तसे केले व हा प्रश्न सुटला.   मला वाटले की अशा प्रकारचे प्रश्न असेच सोडवायचे असतात व पुढेही अशा छोट्या छोट्या गोष्टी करत राहणे आपल्याला जमू शकेल.   पण या एका घटनेमुळे या ४२ कुटुंबांमध्ये जो आनंदोत्सव पसरला त्यामुळे ही पद्धत मला इतक्या छोट्या पद्धतीने पुढे चालू ठेवणे शक्य झाले नाही.

त्या लोकांना असे वाटू लागले की मी कोणी संत महंत आहे किंवा स्वर्गातून आलेला एखादा देवदूत किंवा असाच कोणीतरी आहे.   मी विचार करू लागलो की, या साऱ्या लोकांच्या जीवनात एवढा आनंद पसरवायला इतकी छोटी रक्कम कारणीभूत ठरत असेल तर हीच गोष्ट आपण मोठ्या प्रमाणावर का करू नये?   खरोखरच अगदी साधा विचार.   पण मी चोखाळत असलेल्या मार्गावर या विचारानेच मला आणखी पुढे ढकलले.   सावकारी पाशातून लोकांची मुक्तता करत राहाण्याचे कार्य पुढेही चालू ठेवावे असे वाटू लागले.   माझ्या मनात एक विचार सतत घोळू लागला की, जर या लोकांना मी बँकेकडून कर्ज मिळवून देऊ शकलो तर या सर्व प्रकारावर अगदी कायमस्वरूपाचा तोडगा निघू शकेल.   आता मला बँकेकडून या लोकांना कर्ज मिळवून देण्याव्यतिरिक्त वेगळे काहीच करावयाचे नव्हते.   म्हणून मी बँकेत गेलो व एक वेगळाच इतिहास लिहिला जाऊ लागला.   बँकेने चक्क नकार दिला.   पण या बाबतीत यश येण्याच्या दृष्टिकोनातून नवनवीन शक्यता अजमावत राहणे व सातत्याने त्याचा पाठपुरावा करण्याचे मी सोडले नाही व त्यामुळे मला शेवटी यावर उपाय सापडला.   बँकेच्या व्यवस्थापनातील सर्व उतरंडीतील सर्व ठिकाणी काही महिने निरनिराळे प्रयत्न करत राहिल्यानंतर मला असा एक उपाय सापडला जो साधा सोपा होता व तो मी अवलंबू शकत होतो.   मध्यंतरीच्या काळात मला बँकेच्या काही नियमांची माहिती झाली होती व त्यातील एका नियमाचा वापर करावयाचे मी ठरविले.   मी त्यांना म्हणालो, "या लोकांचा जामिनदार म्हणून तुम्ही मलाच का घेत नाही? त्यामुळे तुमचे सर्वच प्रश्न सुटतील.   मी या लोकांना जामीन राहातो. तुमच्या सर्व कागदपत्रांवर सह्या करतो आणि तुम्ही या लोकांना कर्ज द्या. "  यावेळेस मी त्यांच्याच भाषेत बोलत होतो त्यामुळे त्यांना मला हाकलून देणे शक्यच नव्हते.   पण माझे म्हणणे मान्य होऊन त्याप्रमाणे सर्व कागदपत्रांची पूर्तता करणे व त्यानंतर त्यावर बँकेची कार्यवाही यात पुढचे २ महिने निघून गेले.   अशारितीने शेवटी माझे म्हणणे मान्य झाले.   मी कागदपत्रांवर सह्या करायला सुरवात केली व बँकेकडून कर्ज घेऊन ते मी या लोकांना देऊ लागलो.

बँकेचे व्यवस्थापक मला म्हणाले, "या लोकांचे आता काम झाले असल्याने ही मंडळी तुम्हाला पुन्हा कधीच भेटण्याची शक्यता नाही.   तेव्हा तुम्ही तुमच्या पैशावर आता पाणी सोडलेले बरे! "  मी म्हणालो, "पुढे काय घडणार आहे याबाबत मला काहीच कल्पना नाही.   या पद्धतीने प्रश्न सोडवता येऊ शकेल किंवा नाही ह्याची शक्यता फक्त मी अजमावत आहे. "