काही नोंदी अशातशाच... ५

निघतानाच मी ठरवलं होतं, की काही झालं तरी आपलं काम सोडून बाकी काही करायचं नाही. एकूणच निवडणुकीच्या त्या धामधुमीत न पडता, थेट माझाच मित्र असणाऱ्या उमेदवाराच्या वर्तुळातूनच निवडणुकीकडं पाहता आलं तर उत्तम. माझ्याबरोबर राज्यशास्त्राचे एक अभ्यासकही होते. त्यांना उमेदवाराचं नियोजन, त्यामागील विचार वगैरे समजावून घ्यायचं होतं. त्यामुळं ते प्रत्यक्ष उमेदवारासोबत फिरणार होते. मी माझ्या कामात गुंतून राहणार होतो.
पुण्याहून निघालो तेव्हा रात्र झाली होती. प्रवास एसटीचा. बुकींग नव्हतंच. गर्दी नसेल हा अंदाज चुकला. अर्थात, इतर मार्गाच्या गाड्या असल्यानं फारसा प्रश्न पडला नाही.
प्रवास सुरू होण्याच्या आधी या अभ्यासकांसमवेत बोलणं झालं. महाराष्ट्राचं चित्र काय असेल आणि पुण्याचं काय असेल या दोनच प्रश्नांभोवती ती चर्चा फिरत होती. विनय नातूंचं काय होईल, पुण्यात गिरीश बापटांना खरोखरच घाम फुटणार आहे का हे त्यातले दोन पोटप्रश्न. एकूण दोघांचं एका स्थूल अंदाजावर एकमत होतं. आघाडीच पुढे असेल, युती मागे. मनसेचं खातं उघडणार आणि अपक्षांची चांदी असेल.
बोलता-बोलता आम्ही आमच्या या उमेदवाराच्या विषयावर येतो.
"संधी आहे, हे मी ऐकलं आहे. पण होईल सांगता येत नाही." मी बोलून मोकळा होतो.
"प्रचाराचं नियोजन कसं करतो तो?"
"नियोजन? तू पहाच आता. असं काही असेल असं मला वाटत नाही." माझे हे शब्द चोवीस तासांतच खरे ठरणार असतात हे त्यावेळी मला ठाऊक नव्हतं. एक खात्री होती आमच्या या उमेदवाराविषयी. सामाजिक काम करण्यासाठी तो अत्यंत लायक. पण राजकारण आणि नेतृत्त्व यात तद्दन नालायक. कसं ते पुढं येईलच.
---
प्रचार म्हटला की, बाकीच्या गोष्टी आल्याच. ज्या उमेदवारासाठी हा प्रवास सुरू केला आहे, तो माझा जुना मित्र. त्या मैत्रीपोटीच हा प्रवास. काम साधंच – त्यानं केलेल्या कामाचा अहवाल दरवेळी निवडणुकीनिमित्त आणि त्याआधी एरवीही वर्षा-दोन वर्षाने तयार केला जातो. तेव्हापासून त्याच्या त्या कामाशी परिघावरून संबंध. आम्ही दोघं-तिघं मिळून ते काम करतो. काम करायचं असलं तरी, त्याचं काहीही नियोजन नसतंच. त्याला अंतिम स्वरूप देण्याचं काम. या क्षेत्राशी संबंध नसणाऱ्या आमच्या काही मित्रांच्या मते, या आम्ही भाजत असलेल्या लष्कराच्या भाकऱ्या. तेही बाकीचे सारे खर्च स्वतःच करून. इलाज नाही. वीस वर्षांची मैत्री जमते तेव्हा हे असं थोडंफार होतंच, असं म्हणून आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो.
पुस्तिकेच्या कामासाठी मी आधीच सूचना देऊन ठेवली होती. कुठल्याही परिस्थितीत तिथं डीटीपीची व्यवस्था सज्ज हवी. आवश्यक ती सारी सामग्रीही आधीच तयार करून ठेवायची होती. त्या कामावर दोन प्राध्यापक (असंच म्हणतात म्हणून, प्रत्यक्षात कनिष्ठ महाविद्यालयातील व्याख्यातेच, हे एकटेच नव्हेत तर आमचा हा उमेदवार-मित्रदेखील – आहे व्याख्याताच, म्हणवतो प्राध्यापक. त्यावरून आमच्यात नेहमीच टोलेबाजी होत असतेच) स्वतः लक्ष देणार आहेत वगैरे उमेदवार-मित्रानं मला सांगितलं होतं. सकाळी तयार होऊन बाहेर पडलो तर पहिला धक्का. या धक्क्यांचीही त्या मित्राकडून सवयच झालेली आहे म्हणा. ज्या प्राध्यापकांच्या घरी सारी सामग्री, ते अचानक काम आल्याने परगावी निघून गेले आणि जाताना घराची चावी द्यायची विसरून गेले. नियोजन! मी माझ्यासमवेतच्या अभ्यासकांकडं पाहण्याचीही गरज नव्हतीच. ते शांतपणे सारं काही पाहणार आणि अनुभवणार होतेच. माझ्या कामाचा मुहूर्त लागणार नाही हे स्पष्ट झालं. तरीही हाती असेल त्या आधारावर किमान काही डमी तरी आखून घ्यावी असं मी ठरवून टाकलं. आणि कामाला लागलो.
आमच्या गटातील एका मित्राचं ऑफिस गाठलं. तिथं बसून डमी केली आणि मजकूर पूर्ण करून दिला. डीटीपी करा, मग मला लेआऊटसाठी बोलवा असं सांगितलं तेव्हा दुपारचे तीन वाजले होते. एव्हाना त्या कार्यालयात जमणाऱ्या अनेकांमध्ये रंगलेल्या गप्पांतून एकेक गोष्ट समोर येत होती.
"भाऊ, यावेळी काही झालं तरी ... पडला पाहिजे. त्याचा माज उतरणं आवश्यक आहे." एकाची टिप्पणी आमच्या उमेदवार-मित्राच्या प्रतिस्पर्ध्याला उल्लेखून. हा प्रतिस्पर्धी गेली चाळीस वर्षे राजकारणात आहे. सलग आमदार आहे. मंत्रीही होता. मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत, निदान मुंबईतील काही पत्रकारांच्या लेखी तरी, तो असतोच. त्याचा पराभव सोपा नाही आणि म्हणूनच या गटात तो पडला पाहिजे एवढी तीव्र इच्छाच व्यक्त होऊ शकते.
"तो जर पडला आणि यांची सत्ता आली तर आपल्या उमेदवाराचं मंत्रीपद पक्कं." आणखी एकाचं म्हणणं.
सगळी चर्चा या आणि अशाच मुद्यांची. त्यातून या उमेदवार-मित्राभोवती असणारी तरूण कार्यकर्त्यांची फौज कशी आहे याचा अंदाज येतो. अलीकडेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत या उमेदवार-मित्राच्या पक्षानं बाजी मारली आहे, त्यातून आलेला एक आशावादही डोकावत असतोच.
या सगळ्या वरवरच्या चर्चेतून बाहेर येऊन निवडणूक समजून घ्यायची झाली तर थोडं खोलात जावं लागतंच. सरळ लढत आहे. मी त्यापैकी कोणाही पक्षाचा समर्थक नाही. एकाचा तर विरोधीच आणि हा उमेदवार-मित्र त्याच पक्षाचा नेमका. हा उमेदवार-मित्र चांगला सामाजिक कार्यकर्ता म्हणून परिचित आहे. त्याच्या प्रतिस्पर्ध्याच्या संदर्भात राजकीय नेतृत्त्व म्हणून असलेल्या कार्यक्षमतेविषयी, त्याच्याकडील गुणवत्तेविषयी मला आदर आहे. म्हणजे तटस्थपणा बऱ्यापैकी टिकवता येऊ शकतो.
उमेदवार-मित्राविषयीची एक आठवण. आमचा परिचय घनिष्ट होण्याआधीची.
दिवस वर्षान्ताचा. माझ्या खोलीवर मैफल होती. तीन-चार प्रकारची, प्रत्येकाच्या आवडीची मद्यं, मटण होतं. सोबतीला टेप होताच. आम्ही चौघंही वेगवेगळ्या क्षेत्रातले. ओळख तशी नवीनच. मुळात मी त्या गावातही नवाच होतो. त्यामुळं स्वभाविकच किश्शांची, माहितीची देवाणघेवाण सुरू होती. स्वाभाविकच मैफल रंगत गेली उत्तरोत्तर. मध्यरात्रीनंतर साधारण दीडेक तास झाला असावा आणि खोलीच्या दारावर थाप आली. मी उठून पाहिलं, हा उमेदवार-मित्र आला होता. मी त्याच्याकडं पाहिलं प्रश्नार्थक.
"थोडा त्रास जास्तच झाला यावर्षी...?"
माझ्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्हच होतं. आधीपासून मैफिलीत असणाऱ्या एका मित्रानं सांगितलं, "दरवर्षी ३१ डिसेंबरला रात्री याचं रक्तदान शिबिर असतं. न चुकता. तिथूनच आत्ता आलाय हा..."
"त्रास कसला?"
"थंडी असली की, रक्त पटकन निघत नाही शरिरातून. त्यामुळं त्रास होतो. रक्तदान करणाऱ्यांना हॉस्पिटलच्या आवारात पळून अंग गरम करावं लागतं. यंदा थंडी थोडी जास्तच. त्यामुळं चार-चार फेऱ्या माराव्या लागल्या पळण्याच्या." मित्राचा खुलासा.
३१ डिसेंबरला मध्यरात्री बहुतांश दुनिया ‘सेलेब्रेशन’ मूड़मध्ये असते तेव्हा जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी काही तरी वेगळं, सकारात्मक, विधायक होत असतं, त्यापैकी हा एक कार्यक्रम. किमान पंचवीसाहून अधिक वर्षं न चुकता सुरू असलेला. हा उमेदवार-मित्र अत्यंत निष्ठेनं ते करत आलाय.
हॉस्पिटल ड्यूटी हा शब्द आमच्या शब्दकोषात शिरला तो त्याच्यामुळंच. वेळी-अवेळी हा हॉस्पिटल ड्यूटीवर असतो. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी हा झटतो. त्यासाठीचे चमत्काराचे प्रयोग स्वतः करतो. या अशा कामांच्या भरात सुरवातीच्या काळात कर्जबाजारी झाला आहे. आजही कर्जं आहेतच. पण परिस्थितीत थोडा बदलही खचितच असावा. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा शाप त्याच्या मतदार संघालाही लागला आहे. तिथं गेली चार-पाच वर्षं हा त्या कुटुंबांना छोटा-मोठा आधार मिळवून देतोय हेही पाहिलं होतं. पण एकूण सारं कार्यकर्तागिरीच्या पलीकडं नाही. आम्ही त्याला नेहमी म्हणतोही, संस्थात्मक उभारणी नाही तर हे काम टिकणार नाही. ते वरवरचं ठरेल. पण फारसं काही घडत नाही.
निवडणूक आली की हे सारं अंगावर येतं. सुमारे साडेतीन लाख मतदार या मतदार संघात आहेत. पावणेदोनशेच्या घरात गावं आहेत. इथंपर्यंत नुसतं जाऊन पोचायचं म्हटलं तरी पैसा लागतो. त्यापलीकडं ओवाळणी वगैरे नावानं लागणारा पैसा वेगळा. प्रचाराच्या इतर बाबींसाठीचा पैसा वेगळा. आम्ही गेलो त्याच दिवशी याच्या पक्षाच्या नेत्याची सभा होती. त्याचं येणं-जाणं हेलिकॉप्टरमधून. मैदानाचं भाडं, लाऊड स्पीकर वगैरेचं भाडं, प्रचार सभेच्या प्रचारासाठी येणारा खर्च वेगळाच. जाहिराती (हल्ली त्या नसतात, पेड न्यूजच असतात) वेगळ्याच. कार्यकर्त्यांसाठी चहा-पाण्याची, जेवणाची आणि ‘इतर’ही व्यवस्था करावयाची म्हटली की खर्च वाढत गेलाच.
भेटलो त्याचवेळी सकाळी मी याला विचारलं, "पैशांचं काय?" हा प्रश्न मी थोड्या अधिकारानं, दादागिरी केल्यासारखाही विचारू शकतो. पण मी ते टाळलं चारचौघांमध्ये.
"लोकच आपल्यासाठी पैसे देताहेत." त्याचं उत्तर. मी फक्त छद्मी हसलो. याला फारसा अर्थ नसतो. लोकांकडून अशा रीतीने गोळा होणारा पैसा कसाबसा सात-आकडी घरात जातो. त्यापलीकडे नाही. त्यापलीकडे तो गेला तर समजून घ्यावं लोकांच्या नावे इथंही बिलं फाडली गेली आहेत.
या निवडणुकीसाठी येणारा खर्च किमान पन्नास लाखांच्या घरात आहे. कमाल करावा तेवढा. एकच फरक नोंदवतो. याचा प्रतिस्पर्धी उमेदवार दारोदारी प्रचारार्थ जातो तेव्हा ओवाळणी म्हणून पाचशे रुपयांची नोट टाकतो. त्या नोटांचा गठ्ठा असतोच त्याच्या खिशात. सकाळी आमच्या चहा-नाश्त्याकरता आमच्या उमेदवार-मित्रानं पाकिट काढलं तेव्हा त्यात मला शंभराच्या दहा-बारा नोटा दिसल्या. नंतर खिशातून गठ्ठा निघाला दहाच्या नोटांचा. या नोटांतून निवडणुकीचा खर्च भागतच नाही हे सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ आहे. पैसे येतात कुठून? माझं डोकं या प्रश्नातच गुंतलेलं. दोन दिवसांच्या दौऱ्याअंती त्याचं काहीसं सूचक उत्तर मिळतं. पैसा येतोय. या निवडणुकीत उमेदवार-मित्रावर होणारा खर्च किमान पन्नास ते साठ सत्तर लाखाच्या घरात असेल हे नक्की. प्रतिस्पर्ध्याचा खर्च आजच दोन कोटींच्या घरात गेला आहे, हीही पक्की माहिती.
आमचा मित्र निवडून येईल का? माझ्यापुरतं प्रश्नाचं उत्तर मला या आकड्यातूनच कळालेलं असतं.
---
दिवसभर त्याच्या कार्यकर्त्यांपैकी कोणी – ना – कोणी भेटत होतं. माझे इतरही मित्र भेटत होते. काहींशी फोनवर बोलणं झालं. काही पत्रकारही भेटले. त्यांच्याकडूनही निवडणूक अंदाज घेतला. एकूण साऱ्यांचं म्हणणं होतं, "वातावरण छान आहे... जोर धरला तर चित्र बदलेल." २००४ च्या निवडणुकीवेळी हेच होतं. चित्र अगदी असंच. तेव्हा याचा प्रतिस्पर्धी याच्या दुप्पट मतं घेऊन विजयी झाला होता. मी त्याची आठवण करून दिली काही निवडक मंडळींना तेव्हा ते हसायचे. आमची दोघांची, म्हणजेच माझी आणि या उमेदवाराची, मैत्री ठाऊक असल्यानं ते कदाचित पुढं फारसं बोलत नसावेत असं वाटून मी त्यांना प्रतिस्पर्धी उमेदवाराची बलस्थानं सांगायचो. मुख्य म्हणजे प्रतिस्पर्ध्याचा पक्ष रुजलेला, याचा पक्ष या मतदार संघात रुजेल असं मला तरी वाटत नाही. याच्या पक्षामागं येणारी सारी ताकद ही प्रामुख्यानं व्यक्तींचीच आणि त्यामुळंच ती मुळात त्या प्रतिस्पर्ध्याच्या संदर्भात नकारात्मक. अशा निव्वळ ताकदीवर एखादी निवडणूक कदाचित पार पडू शकते, पण कायमस्वरूपी कामाला ते उपयुक्त नाही.
मग आणखी काही लोकांशी चर्चा सुरू केली. ही मंडळी तशी तटस्थ, किमान माझ्याशी बोलताना तरी नेमका अंदाज देतील याची वैयक्तिक खात्री. या चर्चेतून काही मुद्दे समोर येत गेले. उमेदवार-मित्राच्या बाजूनं त्याचं असं काहीही नियोजन नसताना, त्याच्याकडे ती राजकीय नेतृत्त्वात आवश्यक हुशारी नसताना इतका जनाधार येतो त्याचं कारण मुळातच प्रतिस्पर्धी नको अशी भावना आहे. पण होतं काय की, शेवटच्या घडीला ‘कामाचा कोण’ याचा विचार मतदार वैयक्तिक स्तरावर करतो तेव्हा तो प्रतिस्पर्धीच भारी ठरतो. त्याच्यातील माज, उद्दामपणा ठाऊक असूनही. कारण त्याच्याकडं असणारी संस्थात्मक शक्ती. एक सूत गिरणी, बाजार समिती, वैद्यकीय महाविद्यालय चालवणारी संस्था, अभियांत्रिकी ते अगदी कला-वाणिज्य महाविद्यालये चालवणारी दुसरी संस्था अशी त्याची बलस्थानं. नोकरी ते शाळाप्रवेश हा एक नातेसंबंध. शेतमालाशी संबंधित दुसरा. शिवाय सरकार दरबारी असणारं वजन, त्यातून महामंडळं, समित्या यावरील नेमणुका; पुरस्कारांमधला वाटा... एकूण अशी डिलिव्हर करण्याची त्याची ताकद. त्यात जोडीला प्रचंड पैसा. शेवटच्या खेळींत तर तो माहीरच मानला जातो. शिक्षणानं अभियंता, त्यामुळं ती आधुनिक स्वरूपाची एक जोड या राजकीय व्यवस्थापनाला मिळालेली आहेच. एकंदर विचार केला तर दिसतं असं की माणसांपासून दूर असूनही तो माणसांसाठी बरंच काही देऊ शकतो. आमचा उमेदवार-मित्र माणसांमधला असूनही किती देऊ शकेल याची खात्री नाही.
ही सगळी पार्श्वभूमी ध्यानी घेऊन आमच्याच गटातील एका मित्राला विचारलं, "बाकी सगळं बाजूला जाऊदे. प्रामाणिकपणे सांग, किती मतांचा फरक असेल?"
"पंचवीस तरी कव्हर करावी लागतील..." एकदाचं तो बोलला.
"होतील कव्हर?"
"मी सांगितलं पाहिजे? काल सभेच्या निमित्तानं हा गृहस्थ शहरात बसून राहिला. मतदार संघाची एक फेरी सकाळपासून करायला नको?"
या विधानातून मला बरीच उत्तरं मिळतात. निवडणुका फिरतात त्या अशाच आधारांवर हे इतक्या वर्षांच्या जगण्यातून शिकलो होतोच. त्याचा हा जिता-जागता अनुभव.
शांतपणे मी एसएमस कंपोझ करतो, "निवडणूक हरावी कशी हे तुझ्याकडून शिकावं." पाठवतो. संध्याकाळी नाराजीची एक वावटळ माझ्या दिशेनं निघालेली असते. अर्थात, मला फरक पडत नाही.
---
पुस्तिकेचं डीटीपीचं काम दुसऱ्या दिवशी सकाळीही झालेलं नाहीये. मला तर तिथं गुंतून पडायचं नाही. कारण किमान चार मतदार संघ परिसरात असे आहेत जिथं वैयक्तिक स्तरावर मित्र असणारी मंडळी उभी आहेत. आपण इथं आहोत हे त्यांना समजलं तर त्यांचीही नाराजी ओढवून घ्यावी लागेल. ही नाराजी व्यावसायीक नाहीच, कारण माझा त्यांचा तसा काहीही व्यावसायीक संबंध नाही. गंमत म्हणजे ज्यांच्याशी भविष्यात माझ्या दुसऱ्या एका व्यवसायानिमित्ताने तसा संबंध होऊ शकतो ती व्यक्ती या माझ्या मित्राची प्रतिस्पर्धीच.
प्रत्येक निवडणुकीच्या निमित्तानं येणारे हे काही प्रश्न असतात. पत्रकाराच्या भूमिकेत असलो तर सगळ्यांनाच समान अंतरावर ठेवणं मला सोपं जातं. तसं मी आत्तापर्यंतही करत आलोच. थेट नोकरीत असेन तेव्हा कुणासाठीही राजकीय स्वरूपाचं काम करत नव्हतो. पुस्तिकेचा प्रश्न आला तेव्हा मात्र पुन्हा एक पेच आलाच.
ही पुस्तिका छापण्याचं काम ज्यांच्याकडून होणार आहे ती व्यक्ती म्हणजे याच्याच पक्षाचे शेजारच्या मतदार संघातील उमेदवार. त्यांच्याकडं त्यासाठी शब्द टाकणं गरजेचं होतं. तो मी टाकायचा नाहीये. मी फक्त हे काम करतोय हे या पक्षाच्या मुंबईतील नेत्यांच्या कानी जाणं आणि त्यासाठी, ते गावातच असल्यानं, मी त्यांना भेटणं इतकं "सोपं" आहे सारं. मी जिथं उतरलोय, तिथून जिन्यावरून खाली उतरायचं, दहा पावलं चालायचं आणि त्यांना भेटायचं. हे सांगण्यासाठी, माझा अशा बाबीतला स्वभाव ठाऊक असूनही, माझ्याकडं आलाय तो याच पक्षाचा एक कार्यकर्ता. माझा आधीपासूनचा मित्र. त्या गावातील पहिला सर्वात तरुण नगरसेवक. वीस वर्षांपूर्वीचा.
"सर, चला प्लीज. तुमच्यामुळं माझी उंची थोडी वाढेल. ते कामही होईल."
मी हसतो, "तुझी उंची मी वाढवायची हे म्हणजे भारीच की..."
तो एकदम माझ्या पाया पडतो. "असं नाही, आम्ही तुमच्याकडून किमान काही शिकलोय." मला माझाच प्रचंड राग येतो. ज्याला आपण विरोध करत असतो ते असं अंगावर का येतं? अशा स्वरूपाचं काम करूच नये? केवळ वैताग!
मी जातो. त्या नेत्यांना भेटतो. आमची दीडेक तास तिथं मैफल रंगते. या गावाचं राजकारण, महाराष्ट्र काय म्हणतोय वगैरे बोलत असताना आपल्या पक्षाला कुठं धोका होतोय हेही ते मला मोकळेपणानं सांगून टाकतात. त्यांनी जे सांगितलं ते त्यांच्या नावे छापलं तर स्फोट होईल इतकं नक्की. निघताना पुस्तिकेचा विषय निघतो आणि आमच्या या मित्राची आणखी एक ‘राजकीय अपात्रता’ जाहीर होते.
"अहो, या अशा कामांची व्यवस्था त्यांनी केली पाहिजे आता. निवडणूक लढवतोय आपण..." ते बोलू लागतात. क्षणात सावरतात, "पण हा तुमचा प्रश्न नाही. हा आमचा अंतर्गत मामला आहे. मी सोडवतो तो. तुम्हाला द्यावेत तेवढे धन्यवाद कमीच."
हुश्श, असं म्हणत मी तिथून बाहेर पडतो. जेवायला यायचा आग्रह होतोच. मी ते टाळतो. पुस्तिकेचंच कारण पुढं करून.
---
गेल्या दोन दिवसांत एक गोष्ट जाणवलेली असते. तिथल्या वृत्तपत्रांमध्ये एक-दोन अपवाद सोडले तर आमच्या या मित्राची एकही बातमी आलेली नसते. एका स्थानिक संपादकांशी बोलताना तो मुद्दा पुढे येतो.
"कशा येतील बातम्या? संपादक म्हणतात, बाकीचे दहा पैसे देतात. तुम्ही दोन तरी द्या. आणि एवीतेवी आम्ही चार वर्षं तुमच्या बातम्या छापतोच. तुमच्या प्रत्येक सामाजिक कामाचं छापतो, तुमच्या आंदोलनांचंही छापतोच की..." संपादकांचं हे म्हणणं थोडं आणखी सविस्तर जातंच.
"अच्छा..." मी धूर्तपणे काहीही मतप्रदर्शन न करता एवढंच बोलतो.
मला आठवतो तो एक वेगळाच प्रसंग. सहा महिन्यांपूर्वीची गोष्ट. या गावातील एका व्यक्तीच्या विरोधात न्यायालयाचा एक निकाल आला कसल्याशा भ्रष्टाचार प्रकरणात. दुपारी बाराच्या वगैरे सुमारास. मी मुंबईत होतो त्यादिवशी. काही वेळातच मला या गावातून दुसऱ्या एका संपादकांचा फोन. न्यायालयीन निकालाची बातमी खरी आहे का याची विचारणा करणारा. निकाल परगावात लागलेला असल्यानं त्यांना ती खातरजमा माझ्याकडून करून घ्यायची होती. मी कन्फर्मेशन देतो. पण अचानक माझ्यासमोर प्रश्न येतो, हे गृहस्थ ही चौकशी का करताहेत? असेल निकाल तर संध्याकाळी कळेलच. मी चौकशी करतो तेव्हा कळतं ते मलाही धक्का देणारं होतं. ही आरोपी व्यक्ती या निवडणुकीत उमेदवार आहे. ती उमेदवार असणार हे त्यांच्या प्रतिस्पर्ध्यानं पक्कं हेरलेलं होतं. सहा महिन्यांपूर्वी तो निकाल आल्यानंतर या प्रतिस्पर्ध्यानं गावातील वृत्तपत्रांना ऑफर दिली.
"बातमी तुम्ही देणार हे मला पक्कं ठाऊक आहे, बातमीच तशी आहे. माझी एक विनंती आहे – ही बातमी तुम्ही काहीही झालं तरी मेन फिचर करा. किमान आकार सहा कॉलम, दहा सेंटीमीटर ठेवा. मी जाहिरातीच्या दरानं पैसे देतो."
एका वृत्तपत्रात साडेतीन लाखाचा सौदा झाला. जाहिरातीच्या दरापेक्षा अधिक दरानं. बातमी आली. एरवी तीन-चार कॉलमी असती ती मेन फिचर म्हणून.
माझ्या या उमेदवार-मित्राच्या बातम्या येत नाहीत यात नवल नाही.
"माझं बाजूला राहूद्या. गेल्यावेळेप्रमाणेच याहीवेळी आपल्याला तो बोजा उचलावा लागणार आहे." हे संपादक मित्र मला सांगत होते. त्यांचा व्यवसाय भागीदारीत आहे. या उमेदवार-मित्राचं जे काही कव्हरेज असेल त्याचं सवलतीच्या दरानं मूल्यांकन करून तितका वाटा यांच्या भागीतून काढला जातो.
"हे कुणासाठी? जो नेहमी म्हणतो मी कर्जबाजारी आहे, त्याच्या नावे १२ लाखाचा एक फ्लॅट आहे हे मला त्याच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रावरून कळतं, त्याच्यासाठी..." ते बोलून दाखवतात. १२ लाखांच्या फ्लॅटची वेदना नाही. आपल्यापासून काही लपवलं जातंय का अशी शंका येण्याजोगी वर्तणूक ही वेदना. विधानसभा निवडणूक लढणाऱ्याचा २० लाखाच्या शहरात १२ लाखाचा फ्लॅट असावा याचं काहीही वाटू नये हीदेखील आमच्या संवेदनांची स्थिती आहे. दुःखं वैयक्तिकच.
---
मतदार संघातील प्रश्न कोणते? एक रेंगाळलेलं धरण. एकूण सिंचनाचा अभाव. बंद पडलेल्या काही सहकारी संस्था – ज्यात एक साखर कारखाना. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, म्हणजेच एकूण शेतीची हेळसांड. पुस्तिकेसाठी हे विषय असतातच. वर्षानुवर्षे निवडून येणाऱ्या व्यक्तीनं काहीही कसं केलेलं नाही या प्रश्नांबाबत हेच त्यात लिहिलेलं असतं. या भागासाठीच्या एका पॅकेजचीही चर्चा असते, त्यावरचं भाष्य. उमेदवाराच्या पक्षाचं महात्म्य गायलेलं असतं.
मुळात ही पुस्तिकेची कल्पना मला काही पटलेली नाही. गेल्या निवडणुकीत ती उपयोगी पडलेली नसते म्हणूनच. तरीही ती काढायचा आग्रह असतो. मग काढायचीच आहे तर जरा नीट करावी इतकाच आमचा त्यातील सहभाग.
मी मध्येच या उमेदवाराच्या एका प्रमुख राजकीय प्रतिनिधीला फोन करतो, "अहो, पुस्तिकेसाठी तरी किमान गेल्या पाच वर्षांतील ठोस कामं सांगा. जी केली ती खूप आहेत, पण पुन्हा वैयक्तिक स्तरावरची. बारसं ते बारावं निवडणूक जिंकता येत नसते..." मग दोन-चार प्रकल्पांचे अहवाल समोर येतात. ते कसे मार्गी लावले जाताहेत ते सांगण्याचा खटाटोप सुरू होतो.
"हा सुधारणार नाही. पाच वर्षं वाया घालवलीत यानं. काम उभं राहिलं नाही तर नुसत्या हवेवर निवडणूक थोडीच जिंकता येते?" माझा संताप. सोबत काम करणारे प्राध्यापक अशा संतापावर पाणी ओतण्यात पटाईत. "आपण चहा घेऊन पुन्हा सुरू करू..." इति ते. तिथून आम्ही बाहेर. त्या प्राध्यापकांनी साध्य केलं असतं ते हेच, हा उमेदवार-मित्र ज्याला मानतो, त्याच्या तोंडून होणारी ही हजेरी तिथं इतरांच्यात घुसायला नको!
पुस्तिका रखडलेलीच आहे. प्राध्यापक आता डीटीपी करून घेताहेत. माझ्याकडून पुस्तिकेची डमी त्यांनी घेतली आहे. त्यानुसार ती प्रसिद्ध होईल. प्रचार संपायला केवळ आठवडा आहे. पुस्तिका छापून हाती यायला दोन दिवस. राहिलेल्या पाच दिवसांसाठी हा लाखाच्या घरातील खर्च कशासाठी, हा प्रश्न मला पडला आहे.
---
एक अशीच घटना. मी दुपारी एके ठिकाणी एकटाच जेवायला गेलो. नेहमीप्रमाणे ओळखीचे दोनेक चेहरे दिसतातच. त्यापैकी एक जण धाडस करून पुढं येऊन नाव विचारून खात्री करून घेतो. मग आपली ओळख करून देतो. पंधरा-एक वर्षांनंतर आत्ता आम्ही भेटतोय, तेही त्यानं ओळख ठेवल्यानं. तो शेजारच्या तालुक्यातील मतदार, कार्यकर्ता – पण वेगळ्याच पक्षाचा. मला अचानक आठवतं तोही उमेदवारीच्या स्पर्धेत होता. मी विचारतो काय झालं, "खरं सांगू, मतदार संघ आमच्या वाट्याला आला नाही याचा आनंद झाला मला. निवडणुकीच्या रेसमध्ये मी होतो ते केवळ पक्षाच्या स्तरावर. जनरल नाही. कारण म्हणावं तसं कामच उभं राहिलेलं नाहीये. एक संस्था नाही आमची, कशी निवडणूक लढवणार?"
मी चकीत. "संस्था खरंच कामाला येते का रे? ती न उभारताच निवडणुका लढवल्या जाताहेत की..."
तो हसतो, "स्वबळावर निवडणूक लढवायची असेल ना तर संस्था हवी. संस्था नुसती नको, ती एफिशियंटली चालवली पाहिजे. फायद्यातच असली पाहिजे. तिथून जे डिलिव्हर करता येतं ते नीट कॅश केलं तर निवडणुका सोप्या..." यातल्या स्वबळावर या शब्दाचा अर्थ थोडा वेगळाही आहे. आपल्या निवडणुकीचा खर्च आपणच करण्याचं बळ असा तो अर्थ.
आता हसण्याची वेळ माझी. बऱ्याच वर्षांपूर्वी अशाच एका उगवत्या नेत्याकडून ऐकलेल्या या गोष्टी. त्याच्या ताब्यात आजही तीन साखर कारखाने आहेत. तो निवडून येतो. तिन्ही कारखाने सरकारी पॅकेजवर चालतात हे वास्तव असूनही.
---
मी परतीच्या प्रवासावर आहे. गेल्या दोन दिवसांतील या घडामोडी म्हटलं तर हलवून टाकणाऱ्या, म्हटलं तर तशाही नाहीत. २२ ऑक्टोबरला निकाल येईल. विजय कोणाचा होईल? माझ्यासमोरचा प्रश्न – राजकीय नेतृत्त्वगुणांचा की कार्यकर्त्याचा? पैशाचा की हॉस्पिटल ड्यूटी किंवा आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पत्नीसाठी काही करणाऱ्याचा? खिशातून पाचशेची लगड नेणाऱ्याचा की त्याला विरोध करत-करत आता स्वतः दहाची लगड नेणाऱ्याचा?
आकडे वेगळे; मूल्यं वेगळी असतात? मला नाही वाटत. माझ्यापुरता मी प्रश्न सोडवून टाकतो, "मित्र आहे. त्याच्यासाठी काम केलं. त्याचं राजकीय कौशल्य आणि तो पुढचं पाहतील."
मला वाटलं होतं, प्रश्न सुटला या विधानातून. पण नाही, तो तर वाढत चाललाय आता. असं म्हणत मीही बसलो तर हे बदलेल कसं? मी पुन्हा समाधानाचा एक तोडका-मोडका प्रयत्न करतो. पाच वर्षांनी एकदा आपण हे करतोय त्याचं इतकं डोक्यात घेण्याचं कारण नाही.
हे शेवटचं विधान पुढची पाच वर्षं मला आधार देत राहणार आहे! व्यवस्थेलाही, तशीच राहण्यासाठी!!!