काही नोंदी, अशातशाच...

शहाद्याहून धडगावच्या दिशेने एस.टी. निघाली. अंतर साधारण पासष्ठ किलोमीटरचे. त्यापैकी सुमारे चाळीस किलोमीटरचा रस्ता घाटाचाच. सातपुड्याचं पहिलं पूड चढून गेल्यानंतर काही काळात मोबाईलची रेंज जाते. त्यामुळं अगदी न कळतच माझी नजर मोबाईलच्या स्क्रीनवर गेली. बॅटरी पूर्ण होती. म्हणजे मोबाईल चालू-बंद असा करीत वापरला तर तीन दिवस त्याची साथ-सोबत होण्यास हरकत नव्हती. निश्चिंत होऊन मी बाहेर नजर वळवली.
बसनं घाटाचा मध्य गाठला तेव्हा पुन्हा एकदा माझं लक्ष मोबाईलवर गेलं आणि चमकलो. मोबाईलची रेंज आली होती. अर्थातच, माझ्या सेवादात्याची नव्हे तर दुसऱ्याच सेवादात्याची. दोघंही खासगी क्षेत्रातीलच. सामान्यपणे, धडगावात पोचेपर्यंत मधल्या या घाटरस्त्यात कोणाचाही रेंज नसते. तिथं पोचल्यानंतरही बीएसएनएल सोडली तर इतर कोणतीही सेवा मोबाईलवर उपलब्ध होत नाही. गेल्या सहा महिन्यात हा विकास झाला असावा. काकरदा येथे गाडीचा चहाचा थांबा आहे. तिथं चहा घेत असतानाच एक कॉल आला आणि रेंजमध्ये असूनही कट झाला. विकास अद्याप पूर्ण व्हावयाचा असावा.
पण येत्या काही काळात हा विकास इथं पूर्ण होणार हे मात्र आता निश्चित झालं आहे. म्हणजे आता धडगावात पोचल्यावरही बाहेरच्या जगाशी संपर्क ठेवता येईल.
त्या भागात मोबाईलची रेंज मिळणे ही म्हटलं तर सुखाची, म्हटलं तर नकोशी गोष्ट.
---
बिलगावात याआधी मी गेलो होतो त्याला आता सहा महिने होत आले आहेत. त्यावेळी जीपनं जाताना रस्त्यातील प्रत्येक खड्डा तिथल्या विकासाची अडथळ्याची शर्यत कशा स्वरूपाची आहे हे अंगांगांना सांगून जात होता. आधीच सगळा रस्ता डोंगरांतून. त्यामुळं वळणांचा हिशेब नाही. चढ-उतार हाच रस्त्याचा स्थायीभाव. त्यात खड्डे, मध्येच खडी टाकून ठेवलेले पॅचेस. काही बोलायची सोय नव्हती त्यावेळी. आम्ही बिलगावच्याही पुढे भुशाला गेलो होतो. बिलगावपर्यंतचा रस्ता बरा म्हणायची वेळ पुढच्या रस्त्यानं आणली होती.
गेल्या सहा महिन्यात रस्त्याच्या आघाडीवर थोडा बदल झालेला दिसला. यावेळी बिलगापर्यंतच गेलो होतो. तिथंपर्यंतच्या रस्त्यावर तरी डांबराचा एक थर देण्यात आला असावा. अनेक 'चाळण्या-गाळण्या'तून जात 'कायद्या(य)चे' अवलंबन करीत तो थर पडला असावा हे नक्की. तरीही बिलगावपर्यंतचा प्रवास बराच सुखाचा झाला. जीपनं धडगाव ते बिलगाव हे साधारण वीस किलोमीटरचं अंतर पाऊण तासात कापलं गेलं. कुतहूल हेच होतं की भुशापर्यंतचा रस्ता आता कसा असेल आणि आणखी सहा महिन्यांनी कसा असेल? सहा महिन्यांनी पुन्हा त्या रस्त्यावरून जावं लागणार आहेच...
रस्ता गरजेचीच गोष्ट. मोबाईलपेक्षाही महत्त्वाची. पण सगळीकडं ती असेलच असं नाही. किंबहुना ती नसतेच. त्याचेच हे काही दाखले.
---
तुम्हा-मला मोबाईल हवा असो वा नसो. दळणवळणाच्या अशा साधनाचं महत्त्व दुर्गम भागांत वेगळेच. आमच्या या गटामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी आहेत. मुक्काम जिथं आहे त्यांच्याकडे तरंग सेवेचा दूरध्वनी आहे. तीच गोष्ट गावातील आणखी एका प्रमुखाच्या घराची. तिथंही तसा दूरध्वनी आहे.
आम्हा बाहेरून आलेल्या मंडळींपैकी काहींना तेथे कॉल आले दोन-चार, तेव्हा उडालेली धावपळ - दोन्ही अर्थानं, दूरध्वनी गाठण्यासाठीही आणि आपल्याला दूरध्वनी आला आहे या आनंदातून झालेलीही - पाहिली तर या साधनाचं त्या भागातील महत्त्व कळावं. पण...
गावातून आदल्या काही दिवसातच धुळ्याच्या जिल्हा सरकारी रुग्णालयात एक रुग्ण रवाना करण्यात आला आहे. त्याची चिंता असणारे पालक बिलगावात भेटतात. बिलगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रेवती जोशी यांच्या म्हणण्यानुसार हा साडेचार वर्षाचा मुलगा. चारेक दिवसांपूर्वी सावऱ्या दिगर या आपल्या गावातच त्याला लाकडी दरवाजा लागून जखम झाली. आरंभी बुडव्याकडून (भगत, वैदू) उपचार करण्यात आले. हे उपचार काय असू शकतील हे सांगण्याची गरजच नाही, कारण पुढे मुलाला धनुर्वात झाला. उचलून आधी ग्रामीण रुग्णालयाला आणि तिथून धुळ्याला पाठवावं लागलं. एकटाच मुलगा धुळ्याला गेला. पालक जाऊ शकले नाहीत. कारणं नेहमीचीच. पुरेशा साधनस्रोतांअभावी वंचित जिण्याचा परिणाम तो. आता गावी जाऊन सोय करून घेऊन ते परत आले आहेत मुलाकडं जाण्यासाठी. मधल्या काळात काय घडलं असावं हे रेवतींच्या मोबाईलमुळेच कळू शकलं. मुलगा आयसोलेशन वॉर्डमध्ये आहे, काळजी नको असे म्हणत रेवती त्यांना धीर देताहेत. 
"मुलगा अंगावरच्या कपड्यांनिशी गेला आहे. एकटाच आहे तेथे," त्या प्रा. शाम पाटलांना सांगत असतात. शाम धुळ्याचे. त्यांच्याच गाडीतून पालकांना रवाना करावं का याचा विचार सुरू असतो. पण शाम यांना पोचण्यास मध्यरात्र होणार आहे हे ध्यानी येताच तो विचार थांबतो. एव्हाना धुळ्याकडं जाण्यासाठी बस उपलब्ध नाही हे स्पष्ट होतं, पालकांचं जाणं दुसऱ्या दिवसावर जातं. दरम्यानच्या काळात मुलासाठी मी कपडे नेऊन देईन, असं शाम यांनी त्यांना आश्वस्त केलं हाच दिलासा.
---
संध्याकाळी समोरच घडलेली ही घटना आहे. लांब उडीच्या स्पर्धेत उडी मारताना ही चिमुरडी हातावर पडली. मनगटाच्या किंचित वरच्या बाजूला हात तुटला. रेवती तिथंच कुठं तरी होत्या. पण शोधायचं कुठं? अर्थातच, इतक्या मोठ्या कार्यक्रमासाठी आणलेल्या माईकचा उपयोग होतो. रेवती येतात, दरम्यान मुलीला उचलून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दिशेनं कार्यकर्त्यांनी नेलं. केंद्रात मोठ्या सोयी नाहीत. त्यामुळं हात बांधून त्या मुलीला आधी धडगाव आणि तिथून शहाद्याला पाठवलं जातं. दुसऱ्या दिवशी धडगावात गेल्यानंतर कळतं की शहाद्यातही तिच्या हाताला अद्याप प्लॅस्टर घातलं गेलं नाहीये. ते त्या दिवशी संध्याकाळी घातलं जाईल... दरम्यान त्या मुलीची अवस्था काय झाली असावी? प्रश्न टोचून जातो. पण तेवढंच, त्यापलीकडं हातात काहीही नसल्यासारखी हतबल स्थिती.
---
रेवती यांच्यशी बोलणं होतं. अर्थातच त्यांच्या कामाविषयी. बिलगाव आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावात महिन्याला एक तरी फेरी करावी ही साधी अपेक्षा. रेवती ती पूर्ण करतात हे विशेष. काही गावं अशी आहेत की जिथं जाण्यासाठी २० ते २२ किलोमीटर अंतराची पायपीट करावी लागते. डोंगर चढायचे, उतरायचे. सर्वाधिक लांब गाव इतक्या अंतरावर आहे. रेवती ही पायपीट करत असतात.
आमच्या चर्चेत सहज विचार येतो, हे कष्ट उपसणाऱ्या रेवती यांना असे कष्ट उपसावे न लागणाऱ्या, पण तिच्यासारखीच नोकरी करणाऱ्या इतरांपेक्षा वेगळं काय मिळत असावं? पण त्याहीपलीकडं विचार येऊन थांबतो तो वेगळ्याच मुद्यावर. असं मोठं अंतर कापून रेवती एखाद्या गावात जातात तेव्हा तिथं एखादी 'इमर्जन्सी' असेल तर नेमकं काय करत असतील? मग सुमारे अठरा वर्षांपूर्वी गोळा झालेली माहिती आठवते, झोळी करून माणसाला त्यात टाकायचं आणि दोघा-तिघांनी मिळून डोंगरांची चढ-उतार करत, धावत-चालत आरोग्य केंद्र गाठायचं. आजही तोच मार्ग तिथे अवलंबला जातो. अर्थात, विकासाची हीच गती तिथं आहे.
---
जीवनशाळाच्या मुलांचा मेळावा असा हा कार्यक्रम आहे. १३ जीवनशाळांची मुलं एकत्र आली आहेत. सहजच काही सांख्यिकी गोळा होते. एकूण १३ जीवनशाळांत मिळून १७०० मुलं शिक्षण घेताहेत. ७० गावांना या शाळा जोडल्या आहेत. शाळांमध्ये ४२ शिक्षक आणि ४० इतर मंडळी. या मंडळींना कर्मचारी म्हणणं हा त्यांचा अवमान असेल. आठशे आणि हजार रुपये महिना मानधनावर ही मंडळी हे काम करतात. काही कामाठी आहेत, काही इतर. मुलांसाठी स्वैपाक, त्यांची व्यवस्था अशी यांची कामं. शिक्षक शब्दात तसा थोडा मान-आदर आहे म्हणून इथं तो शब्द वापरायचा. हे शिक्षकही महिना दीड हजार ते दोन हजार रुपयांच्या मानधनावर काम करतात. एकूण साडेतीन लाख लोकसंख्येला जीवनशाळांचा फायदा मिळू शकतो असा कामाचा व्याप. मी योगिनीला विचारतो, या क्षेत्रात सरकारी शाळांची संख्या किती? आठ! एका क्षणात उत्तर येतं. या आठही शाळा आणि त्यातील शिक्षक-कर्मचारी कागदावर आहेत. सुखेनैव नांदताहेत. पगार मिळतो, अनुदानं निघतात, सारं काही होतं. मुलांना शिकवण्याचं काम हाच काय तो अपवाद. म्हणूनच तर या स्वयंसेवी जीवनशाळा चालवाव्या लागतात आणि दरवर्षी परीक्षांना बसण्याची परवानगी शासनाकडून मिळावी म्हणून याच विद्यार्थ्यांना संघर्ष करावा लागतो, लडाई-पढाई साथ-साथ ही घोषणा अगदी नकोशा रीतीने सार्थ ठरवत.
कागदावरच्या या सरकारी शाळा राज्याच्या, देशाच्या विकासविषयक निर्देशांकात भर टाकत असतात हे मात्र नक्की.
---
गेल्या पाचेक वर्षातील तीन मेळाव्यांचा अनुभव घेतला तेव्हा असं स्पष्ट जाणवायचं की, अद्याप कच्चेपणा आहे. मुलं खेळाच्या स्पर्धात पुढं असतात. नाटक आणि गाणी यात तो कच्चेपणा दिसायचा. नाटक लिहिलेलं असायचं ते शिक्षकानीच. सादर मुलांनी करायचं. कल्पकतेला वाव खूप. तुलनात्मक कल्पकता दिसायची मात्र कमी. यंदा मात्र तसं नव्हतं. गाण्याच्या स्पर्धेत नदीच्या देवत्त्वाविषयीची एक प्रार्थना होती. त्यात जगण्याच्या प्रत्येक क्षेत्राचं भान दाखवून दिलं रचनाकारानं. एक नाटक तर अगदी सफाईदार वाटावं असं होतं. ही मुलं पुनर्वसन वसाहतीतील. शिक्षकानं लिहिलेल्या नाटकात मूळ गाव आणि पुनर्वसीत गाव यांची तुलना केली होती. पुनर्वसीत गावात पैसा आला, पैशाच्या रूपानं इतर गोष्टी आयुष्यात शिरल्या; समाधान हिरावलं गेलं अशी काहीशी मांडणी. त्यात एक प्रसंग होता मोटरसायकलवरून फिरण्याचा. स्टेजवर एका मुलानं वाकून आपल्या अंगाचीच मोटरसायकल केली. तोंडातून तिचा व्यवस्थित आवाज. ती सुरू करतानाचं फायरिंग, ती धावताना गियर बदलतानाचं वेगळं फायरिंग असं सारं काही. मुलांनी त्यातून आपली निरिक्षणक्षमताच सिद्ध केली एक प्रकारे. सादरीकरणातील कच्चेपणा जाऊन पक्केपणा येणं ही त्यांची प्रगती. गेल्या पाचेक वर्षांत अशी इतरही प्रगती झाली असणारच.
---
एरवी बिलगाव किंवा त्यापुढं गेलं की, तितका काळा टीव्ही आयुष्यातून हद्दपार झाल्यासारखा असतो. यावेळी तसं नव्हतं. बिलगावात जिथं मुक्काम होता तिथं टीव्ही होता. तरंगसारखीच डिश. त्यामुळे काही इतर वाहिन्याही. संध्याकाळी बातम्या बघण्याची संधी मिळाली आणि आपण "आपल्याच" जगात आहोत याची खात्री झाली. सगळं राजकारण समोर येत होतं. म्हणजे आता परतल्यावर एकदम चार दिवसांची वृत्तपत्रं समोर घेऊन बसण्याची गरज नाही तर... मनाशीच म्हटलं.
या टीव्हीवरून सुरू झालेली चर्चा. मला आठवलेला एक किस्सा मी सांगितला बरोबरच्या दोघांना तेव्हा ते अचंबितच झाले. "वडछील या शहाद्याजवळच्या खेड्यात मी रिकी पॉण्टिंगला भेटलो आहे," असं मी म्हणालो. त्या दोघांना काही कळेनासंच झालं. मग खुलासा केला, त्या वसाहतीतील एका मुलाचं नाव रिकिपॉण्टिंग आहे. अवघ्या दशकभरापूर्वीपर्यंत ज्यांचा क्रिकेटशी संबंध नव्हता, टीव्ही ज्यांना ठाऊक नव्हता, वर्ल्ड कप वगैरे तर लांबच, अशांच्या आयुष्यात झालेला हा बदल होता. गेल्या वर्ल्ड कपवेळी वडछीलमधल्या एका घरात तरुण आणि लहान मुलांनी क्रिकेटचे सारे सामने पहात दिवस काढले होते. त्याच काळात जन्माला आलेल्या एका मुलाचं नाव रिकीपॉण्टिंग ठेवलं गेलं होतं. नट्यांची नावं वगैरे तर अगदी सामान्य गोष्ट झाल्यासारखी आहे.
टीव्हीचाच आणखी एक परिणाम. उकाडा असल्याने रात्री आम्ही पांघरुणं न घेताच पडलो होतो. माझ्यासमवेत होते माधव गुरव. कलाकार माणूस. गाणं वगैरे. ज्या घरी मुक्कामाला होतो तिथल्या घरधनिणीनं आमच्या अंगावर पांघरुणं घातली. माधवरावांच्या तोंडून अभावितपणे निघून गेलं, "थँक्यू भाभी..."
मराठी तशी दूरच, इतर भाषांचा प्रश्न नाही असं ते घर. आम्ही बोलायचंच तर पावरी शिकून बोलावं. पण तोंडून निघून गेलं थँक्यू.
आणि दोनेक मिनिटात आमच्या पाठून एक छानशी खसखस सुरू झाली. त्या भाभी सांगत होत्या माधवरावांनी थँक्यू म्हटल्याचं. आणि त्यावरून सुरू असलेलं मनमोकळं हसणं. थँक्यूचा अर्थ त्यांना कळला होता याचा आनंद मानावा की, आपल्याला थँक्यू म्हटल्यानं त्यांना जे वेगळं वाटत होतं त्यातून येणारं हसणं एन्जॉय करावं? आम्हीही हसून घेतलं.
---
सकाळी फिरताना गावात एक-दोन सौरशेगड्यांचे सांगाडे दिसले. शाम पाटलांच्या प्रयोगाचा तो एक भाग. शाम आणि त्यांचे धुळ्यातील काही सहकारी मिळून या तेरा जीवनशाळांसाठी काही प्रयोग करताहेत. उर्जेशी संबंधित. या शाळातील मुलांसाठीचा स्वयंपाक हा एक मोठा व्याप असतो. त्यासाठी या शेगड्या. किमान भात शिजवता यावा अशी त्यामागची कल्पना. हा मजकूर प्रसिद्ध होईपर्यंत तिकडे एखाद्या शाळेत या शेगडीचा उपयोग सुरूदेखील झाला असावा. स्वयंपाकाच्या कामावर असणाऱ्या त्या मुलींच्या हातांना त्यातून थोडा दिलासा मिळाला असावाही.
याच भागात मिळणाऱ्या बायोमासचा वापर करून आणखी काही गोष्टी करण्याचा शाम आणि चमूचा विचार सुरू आहे. आज लाकूडफाट्यावर अवलंबून असणारी ही स्वयंपाकाची व्यवस्था त्यातून निर्धूर होण्याकडे वाटचाल करू लागेल हा त्यांचा आत्मविश्वास. त्या निर्धूर होण्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे अशा व्यवस्थेमुळे ऊरस्फोड कष्टातून त्या मुलींची होणारी मुक्तता.
---
रात्री नाटकांच्या वगैरे स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून काम करताना मोबाईलचा एक उपयोग कामी आला. नाटक, गाणं यासाठी मुदत असते. पाच मिनिटं, पंधरा मिनिटं अशी. मोबाईलमधील टायमर त्यावेळी उपयोगी पडला. विश्रांतीच्या वेळेत हाच मोबाईल बॅटरी म्हणूनही कामी आला. थोडं चालत गावाबाहेर पडलो त्या बॅटरीच्या प्रकाशात. चहुबाजूंनी सावलीसारखे डोंगर दिसत होते. दूरवर पश्चिमेला आणि उत्तरेला डोंगरातून मध्येच प्रकाश चमकायचा तेव्हा लक्षात यायचं, अंधारात बॅटरी घेऊन कोणीतरी पायपीट करीत चाललंय. कदाचित जिल्ह्याच्या गावी जाऊन परतत असेल, कदाचित तालुक्यालाच जाऊन येत असेल किंवा आणखी काही.
डोंगरातूनच एखाद्या गावातून प्रकाशाचे तीर आकाशात घुसलेले असायचे. त्या गावांमध्ये सौरदिवे पोचले आहेत असा त्याचा अर्थ. इथं बिलगावात मात्र पूर्ण अंधार आहे. दोन वर्षांपूर्वीपर्यंत हेच गाव प्रकाशमान होतं. केरळमधून आलेल्या काही उत्साही अभियंत्यांनी इथंच एक लघुजलविद्युत प्रकल्प केला होता. उदय नदीवर. नदीच्या नावाशी नातं जोडणारा प्रकल्प. 'स्वदेस'ची प्रेरणा ती हीच. या केंद्रातून तयार होणाऱ्या वीजेच्या जोरावर गाव प्रकाशमान झालं होतं. आश्रमशाळेतील मुलांना रात्रीही अभ्यास करता येऊ लागला होता. आणि हा खरा विकास आहे असं म्हणत असतानाच ते लघुजलविद्युत केंद्र सरदार सरोवर धरणाच्या पाण्यात बुडून गेलंदेखील. जिथं पाणी येणारच नव्हतं तिथंही ते आलं आणि केंद्र बुडालं, गावाला अंधारात लोटून...
आता गावाला अंधारच 'एन्जॉय' करावा लागतोय...!