काही नोंदी अशातशाच... ६

(खरं तर या नोंदी याआधीच्या काही नोंदी अशातशाच... ५ चाच एक भाग आहेत. फरक इतकाच की इथे राजकीय चाली, खुब्या यांची नोंद असेल. आणखी एक फरक - मागील नोंदी वाचताना सुलभ जात नव्हत्या असे काही वाचकांचे मत पडले. त्यामुळे या नोंदींत दोन आभासी नावे दिली आहेत - उमेदवार-मित्र म्हणजे दादा. प्रतिस्पर्धी म्हणजे अण्णा. माजी आमदारांचे चिरंजीव म्हणजे भाई. त्याव्यतिरिक्त असतील प्रत्येकी एकेका व्यक्तीची पदनामे - माजी आमदार, माजी मंत्री, माजी मुख्यमंत्री.)

सकाळी साडेआठला दादा आला तेव्हाच लोड शेडींगला सुरवात झाली होती. त्यामुळे लॉजवर थांबणं शक्य नव्हतं. आम्ही बाहेर पडलो. लॉजच्या प्रवेशद्वारापाशीच रस्त्यातच उभे राहिलो. शेजारीच दादाच्या पक्षाचं कार्यालय होतं. त्यामुळं प्रचाराच्या गाड्यांवरचे स्पीकर ठणाणा करीत होते. किमान तीन गाड्या तिथं होत्या. मतदार संघातील मंडळी हळुहळू जमा होऊ लागली होती. रस्त्यावरून जाणाऱ्याऱ्येणाऱ्यांचे नमस्कार सुरू होते. एक वयस्कर गृहस्थ समोर आले. दादा त्यांच्या पाया पडला.

"तात्या, कसं चाललंय?" दादाचा प्रश्न.

"चांगलं आहे वातावरण. एक काम करा. आज भाईंचा वाढदिवस आहे. जाऊन भेटून या..." तात्यांचा सल्ला.

हे भाई म्हणजे माजी आमदारांचे चिरंजीव. तेही निवडणुकीच्या रिंगणात होते. पण त्यांनी ऐनवेळी माघार घेतली. अंदाज असा होता की, ते उभे राहिले असते तर दादाचे प्रतिस्पर्धी अण्णा यांचीच मते त्यांनी खाल्ली असती आणि ही निवडणूक दादाला सोपी गेली असती. त्यांच्या माघारीचे कारण काही त्या क्षणापर्यंत कळले नव्हते.

"तात्या, सकाळी सहा वाजता जाऊन आलो. हार घातला. आजच्या सभेपूर्वी त्यांनी पक्षात प्रवेश केला पाहिजे..." दादा.

हे सांगत असतानाच दादाचा फोन वाजला. मला अर्थातच इकडून हा काय बोलतोय तेवढंच कळलं.

"हो... हो... सकाळीच जाऊन आलो. मी होतो, सभापती होते... संध्याकाळपर्यंत त्यांना पक्षाच्या दिशेनं आणायचं आहे. माणसं पाठवा. फक्त आपला पट्टा गेला पाहिजे तिथं. सगळ्या मंडळींची रांग लागली पाहिजे त्यांच्या घरासमोर... ते करतो मी. रिक्षा तिकडच्याच भागात आज वळवा. ते करताना भाईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा हीही एक घोषणा अधून-मधून होऊद्या..." दादाच्या सूचना.

इतक्यात समोरून प्रौढ वयाकडं झुकणारा एक गृहस्थ आला. अंगावर फाटका शर्ट. पँट गुडघ्याच्या खाली गुंडाळलेली. पायात काही नाही. दादाला नमस्कार करून म्हणाला, "दादा, गावाकडं सभा कराय लागेल."

"प्रत्येक गावात सभा करायची म्हटलं तर कसं चालेल. मला जमणार नाही." दादाचं उत्तर.

मी अवाक्. त्याला कोपरानं ढोसलं, पण ते दादाला कळलंच नाही.

मग दादा त्याच्या खास शैलीत बोलू लागला, "नुसत्या सभा काय कामाच्या. तुम्ही काम करा. फिरा. दारोदारी जा..."

बोलणं सुरू होतं तेव्हा पुन्हा फोन. हे असंच नंतर पंधरा-वीस मिनिटं सुरू राहिलं. मघाचे तात्या केव्हा निघून गेले हे कळलंदेखील नाही. त्यांच्याशी औपचारिक नमस्कारही झाला नाही. हा कार्यकर्ता निघाला तेव्हा दादानं खिशातून शंभर रुपयाची नोट काढून दिली, जाताना भत्ता नेण्यासाठी. आणि हिरमुसल्या चेहऱ्यानं तो निघून गेला.

थोडा वेळ गेला. एका गावाचे पोक्त कार्यकर्ते येतात. दादा त्यांची ओळख करून देतात. "... चे चिरंजीव." मला लक्षात येतं. काही वर्षांपूर्वीची गोष्ट. त्यावेळी त्या गावात एक हत्याकांडं झालं. मोठी दंगल झाली. त्यातील प्रमुख सूत्रधार म्हणून ज्यांचं नाव आलं पुढं त्यांचे हे चिरंजीव. त्यावेळी ते अण्णांच्या गटात होते. आता इकडं आलेले दिसतात...

"गावातील एकही मत अण्णांकडं जाणार नाही..." ते सांगत असतात. मी ऐकून घेतो. हत्याकांडाच्या त्यावेळी यांच्याविरोधात असणारा गटही इकडं आला की काय? अर्थातच नाही. मग एक गठ्ठा मत कसं इकडं येईल? तो गट आता अण्णांकडं गेला असणारच. आणि ते थोड्या वेळातच हा कार्यकर्ता गेल्यानंतर कन्फर्म होतं. दादाच्याच राजकीय प्रतिनिधींकडून. "अहो, त्यांची कसली एक गठ्ठा मतं? मतं आम्हाला मिळतील ती त्यांच्या विरोधी गटातीलच. यांच्या गटातूनही मिळतील. कारण त्या काळात दादांनी घेतलेली भूमिका. भांडणं नको गावात ही भूमिका..."

आम्ही तिथंच उभे आहोत. दादाही निघत नाहीये, प्रचारासाठी. कारण मी विचारत बसत नाही. काही तरी असणार हे नक्की. आणि थोड्याच वेळात ते समोर येतं.

अण्णांच्या प्रभावाखालील चार-पाच गावातील मागासवर्गीय समाजाचे काही प्रतिनिधी तिथं येतात.

"दादा, अण्णांना गावात शिरू देणार नाही. आडवं जातोय आम्ही..." एक जण ठामपणे सांगतो.

दादा विचारांत. माझ्याकडं पाहून म्हणतो, "काय करावं? घुसू देणार नाहीत म्हणजे नाही हे नक्की. पण..."

"तुला कार्यकर्ते मोकळे हवेत की नकोत?" माझा प्रश्न.

दादाच्या ध्यानी येतं. तो शांतपणे समोरच्यांना समजावू लागतो. "भावड्या, तू मला निवडणुकीपुरता नको आहेस. पूर्ण काळ माझ्यासोबत रहायला हवा आहेस. त्यांना अडवू नको. उगाच केस नको आहेत आपल्याला आत्ता. बाकीच्या गोष्टी आपण २२ नंतर पाहून घेऊ..." दादा इतरही काही सांगतो अर्थातच.

त्यांच्यापैकीच आणखी एक जण तोंड उघडतो, "नोटांचं काय? आमचे लोक म्हणतात, मागल्या खेपेसारखं करायचं. घ्यायच्या नोटा. मतं इकडं हे नक्की... काय करू?"

इथं येणारं उत्तर लोकशाहीत बसतं का? खचितच नाही. मला तरी पटत नाहीच. माझा विरोध कायम. पण दादाचं उत्तर ठरलेलं.

"नोटा घ्या. दारू पिऊ नका. बायकांच्या हाती द्या. त्या त्याचं सोनं करतील..."

मग माझ्याकडं पाहून खुलासा, "इतक्या वर्षांत अण्णांनी यांच्यासाठी काहाही दिलेलं नाहीये. जे केलं ते आपल्याच समाजासाठी. ही माणसं आजदेखील महिना पाचशे हजारात घर चालवतात. निवडणुकीत त्यांच्याकडं या मार्गानं पैसा येतो, आपण नाही म्हटलं तरी, त्यावर त्यांची चार वेळची पोटं भरतात..."

मी पुढचं ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो. लोकशाही आहे ही!
***
दादा सकाळीच एका स्वामींच्या दर्शनार्थ जाऊन आला आहे. मतदार संघात एका विशिष्ट समाज गटाची सुमारे वीस हजार मते आहेत. त्या मतांवर या स्वामींचा प्रभाव. त्यामुळं हे दर्शन.

"हे कसं मॅनेज होतं?" माझ्यासोबतच्या अभ्यासकांचा प्रश्न.

"वेल उघड काही होत नसावं. हे काम तसं सटली चालतं. संदेश जात असतात. त्यातून तो प्रभाव होतो. एखादी व्यक्ती ठसवत जाणं असं त्याला म्हणता येईल..." माझं तोडक्या ज्ञानातून आलेलं उत्तर.

पण या प्रश्नानं डोक्यात घर केलं होतं.

दुपारी मी त्याच समाजातील एका नेत्याचा उजवा हात मानल्या जाणाऱ्या मित्राला फोन करतो. नेहमीच्या बाकीच्या गोष्टी झाल्यावर विचारतो, "स्वामींचा खरोखर प्रभाव पडेल? आणि ते दादासाठी शब्द टाकतील?"

"हो. दादाची प्रतिमा त्यांच्याकडं चांगली आहे. ते बोलतील हे नक्की. प्रभाव पडतोच. आमचा सगळा समाज त्यांचा भक्त आहे. अगदी एक गठ्ठा नसलं तरी त्यांच्या शब्दामुळं निम्मी-पाऊण मतं फिरतात. आम्हाला तेच तर मदत करत असतात."

"हे कसं होतं?"

"काही नाही. समाजातील काही प्रभावी व्यक्ती त्यांच्या मार्गदर्शनाखालीच असतात. त्यांच्याकडे यांचा शब्द जातो. 'आपल्याला यावेळी यांना मदत करायची आहे. ते आपल्यासाठी सारी मदत करण्यास तयार आहेत.' अशा आशयाचा. त्या मंडळींच्या प्रभावाखाली बाकी समाज असतो. तिथं आर्थिक हितसंबंध असतात. व्यवसायाशी संबंधित. एकमेकांना साथ देणं असं म्हणायचं त्याला. त्यातून पुढचं काम होतं."

"अण्णांना का नाही ते मदत करत यावेळेस?" माझा प्रश्न.

"मधल्या काळात त्यांच्या काही मंडळींनी आमच्या लोकांना बराच त्रास दिलाय. आम्ही व्यापारातील माणसं. व्यापार म्हटलं की होतात त्या चार गोष्टी होतात. त्यावरून. गुन्हे नव्हेत. पण कायदा पाळला जाईलच असं नाही. त्यातून छळवाद झालाय. त्याचा परिणाम..."

इतर मतदार संघाकडं आमची चर्चा वळते. चर्चा संपते तेव्हा कळतं की, राज्यातील सत्तेची धुरा पुन्हा सध्याच्याच सत्ताधाऱ्यांकडं कशी जाणार आहे ते.
***
पुस्तिकेचं काम सुरू असतानाच सभापतींचा फोन आला मला. कामाची चौकशी करण्यासाठीच. ते पहिल्यांदाच निवडून आले होते. त्यामुळं अभिनंदन केलं. त्याचवेळी समोर दादाचाच एक कार्यकर्ता आमच्या मदतीसाठी आला. तो थोडा मुरलेला त्या भागांत. त्यामुळं माहितीचा एक चांगला सोर्स.

"काय आहे वातावरण?"

"वातावरण चांगलंच आहे. दादांनी केवळ तोंडात थोडी साखर ठेवली पाहिजे. म्हणजे काम होतं. कार्यकर्ते करतात, दादा कसंही बोलले तरी करतात. पण त्यांचा हिरमोड होऊ नये याची काळजी आपणच घेतली पाहिजे."

"मग हे तुम्ही सांगता की नाही दादाला?"

"सांगतो. ते ऐकतात का आमचं? तेच तुम्हाला सांगायला आलोय, तुम्ही काही सांगितलं पाहिजे. ते ऐकतील तर तुमचंच."

मी त्याकडं दुर्लक्ष करतो. "भाईंचं काय?"

"अजून काही कळत नाही..."

"अरे माघार घेतली कशासाठी मग त्यांनी? एक तर अण्णांकडं गेलं पाहिजे किंवा इकडं आलं पाहिजे..."

"माघार घेतली त्याचं कारण वेगळंच. या डिलिमिटेशननं मतदार संघ बदलला. त्यांच्या मूळच्या कब्जातील काही गावं इकडं आली. पण संख्या कमी. त्यांना वाटलं होतं अण्णांचे मूळचे विरोधक मदत करतील, पण त्यांची ती तयारी नव्हती. मग पराभवाचा बट्टा नको म्हणून माघार."

"ते ठीक, पण त्या गावांतील मतदार काय करणार? त्यांना ते थोडंच वाऱ्यावर सोडतील. भूमिका घ्यावीच लागेल की."

"घेतील. आज घेतील असं वाटतंय."

नेत्यांची त्या दिवशी सभा असल्यानं ही भूमिका निश्चिती होईल असं वाटलं होतं, पण तसं काही झालं नाही. कारण त्या नेत्यांना त्यांच्यापर्यंत जाणं शक्यच झालं नाही. म्हणजे, त्यासाठी योग्य मध्यस्थ मिळालाच नाही. भाई स्वतः येण्यास तयार नाहीत. नेत्यापर्यंत त्यांना आणायचं तर मध्यस्थ असा हवा की जो त्यांच्यासाठी काही ठोस आश्वासन देऊ शकेल. दादाच्या पक्षाचे त्यावेळी तेथे असलेले एक म्होरके ते काम करू शकत नाहीत. दुपारपर्यंत हीच घालमेल सुरू होती आणि शेवटी संध्याकाळी असा कोणताही पक्षप्रवेश न होता सभा पार पडली.
***
या मतदार संघात अण्णांचे दोन खमके विरोधक पूर्वीपासून होते. पण त्यांचं फारसं चिन्ह एकूण या चर्चेत दिसत नव्हतं. कुतूहलापोटी मी तिथल्याच एका पत्रकाराला गाठलं.

"दोघा जींचं काय?" या दोघांचीही नावं ग या अक्षरावरून सुरू होत असल्यानं आम्ही पूर्वी त्यांना जी असं संबोधायचो.

"आता दोघांचा तितकासा जोर राहिलेला नाही. उटपटांगगिरी कामी येत नाहीच. त्यात अण्णा मुरलेले. मतदार संघातील प्रत्येक गावात त्यांची अशी खास घरं आहेत. त्या घरातून प्रत्येकी एकाची कायमस्वरूपी रोजगाराची सोय त्यांनी केली आहे. या मंडळींशी बोललं की कळतं..."

"काय?"

"ही माणसं सांगतात, अण्णांच्या संस्थेत एक पैसाही न देता नोकरी मिळाली म्हणून..." यावर किती विश्वास ठेवायचा हा प्रश्नच आहे. पण हीच गोष्ट मी तिथं जाण्याआधी पुण्यातही एकाकडून ऐकली होती. हा तरूण अभियंता आहे. आता माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करतोय. त्याला सुशिक्षीत मानायचं झालं तर तो म्हणतो त्यात तथ्य आहे असं म्हटलं पाहिजे. पण हा तरूण शाळकरी मुलगा असतानापासूनच्या माहितीशी ताळमेळ घालायचा ठरवला तर अण्णा काही धुतल्या तांदळासारखे नाहीत. त्यांच्या संस्थांमध्ये काय चालतं हे तेव्हापासून अनेकांना ठाऊक आहे. मग प्रश्न येतोच, ते असं काय करतात की निवडून येतात?

"एरवी अण्णा काहीही करोत, उद्दाम बोलोत किंवा आणखी काहीही. निवडणुकीच्या काळात त्यांच्यात फक्त गोडवा असतो. सगळ्यांशीच. एक तर हा माणूस 'सॉफिस्टिकेटेड' आहे..." सॉफिस्टिकेटेड शब्दावर विशेष जोर देत हा पत्रकार मित्र सांगत होता. "गावोगावी जातील, मायमाऊलींना नमस्कार करून गोड बोलतील. हात सढळ असतो. ओवाळणी पाचशेच्या खाली नाही... मतं विकली जातात असं म्हणणंही धाडसाचं ठरावं. तसं असेल तर गेल्या निवडणुकीतील मतांचीच किंमत साडेचार कोटी रुपये होईल. यंदा नोट पाचशेचीच असेल असं नाही. हजाराचीही असू शकते."

"दोघा जींची जागा कोणी घेतलीये?"

"हाहाहाहा... आता दोन के आहेत." मित्रानं जुन्याच संकेताचा वापर केला. हे दोघंही तरूण. दादाच्या तुलनेत वयानं लहान. पण दोघं अण्णांच्या विरोधात भूमिका घेतात म्हटल्यावर या जिल्ह्यावर वर्चस्व गाजवू पाहणाऱ्या दुसऱ्या गटानं त्यांना रसद पुरवली होती. गेल्या निवडणुकीत त्यापैकी एक जण उभा होता. तिसऱ्या की चौथ्या क्रमांकावर फेकला गेला. यावेळी तोही नाही, दुसरा केही नाही. पत्रकार सांगत होता, "ही दोघंही यावेळी नाहीत. अजून त्यांनी त्यांचे पत्ते उघड केले नाहीत."

"काय मुद्दा असेल मग यावेळी?"

"माझ्या अंदाजाप्रमाणे काही झालं तरी कोणताही इश्यू असणार नाही. अजेंडा असेल तर एकच अण्णा नकोत. याच एका मुद्यावर दादा या विरोधकांना कसं एकत्र आणतो त्यावर सारं काही अवलंबून आहे. धरण, सिंचन, शेतकरी आत्महत्या यापैकी कोणताही मुद्दा तशा अर्थानं अण्णांच्या विरोधात जाणार नाही. धरणापुरतं बोलायचं तर लोकांच्या लेखी त्याला तितकं महत्त्वही राहिलेलं नाही. दर तीन घरांमागं एक शिक्षक, या तीनानंतरच्या दहा घरांमागं एक अभियंता आणि वकील आणि वीसेक घरांमागे एक डॉक्टर. शेतीत राहिलंय काय? असं म्हणणारी ही पिढी आहे. अण्णांच्या शिक्षण संस्थेत नोकरी असणाऱ्यांची संख्या पाच हजाराच्या घरात आहे..."

मतदार संघाचं इतकं सुरेख चित्र मलाही मांडता आलं नसतं. पण उद्योग नसलेल्या या भागातील उदरनिर्वाह शेतीकडून असा परिवर्तीत झाला असेल यावर विश्वास बसणं मुश्कील. पावसाळी शेती हे त्यावरचं उत्तर. पिकतं काय, तर कापूस, थोडा उस आणि बाकी वरकड.

"अण्णांच्या विरोधातले कोण-कोण दादाच्या मागं आहेत?" माझा प्रश्न.

"माजी मंत्री आहेत. जोडलेल्या काही भागांत त्यांचा प्रभाव आहे. पूर्वीचा. पण अजेंडा एकच. अण्णांना पाडणं. कार्यक्रम वगैरे तपासत बसू नकोस."

"मग दादा ही एवढी पुस्तिका, कार्यक्रम घेऊन जातोय त्याला काय अर्थ राहिला?"

"दादाला मागल्या खेपेला किती मतं मिळाली? ती आणि तेवढीच मतं या गोष्टीवर मिळू शकतील. त्याला आघाडीच्या दिशेनं जायचं असेल तर मात्र ही विरोधी ताकदच एकत्र आणावी लागेल."

पत्रकाराचं निर्वाणीचं वाक्य. माझ्यापुढं प्रश्न - दादा या मंडळींना एकत्र कसा आणू शकेल? अजेंडाच नसेल तर पंचाईतच. मग माझ्या लक्षात येतं, अजेंडा आहे - पदांचा. सत्तेच्या वाटपाचा. हे विरोधक अद्याप शांत आहेत, कारण त्यांना अण्णांना पाडायचं आहे. दादाला विजयी करायचं नाहीये. अण्णांना पाडतो, त्याबदल्यात काय मिळेल? त्यांचा हाच एक रोकडा सवाल असेल, हे नक्की.
***
अण्णांच्या एका समर्थकाशी पहिल्याच दिवशी संध्याकाळी गाठ पडली. त्यांचा सूर पहिल्यापासूनच चढा होता. गेल्या वेळेपेक्षा अधिक मतानं अण्णा विजयी होतील यावर भर. निवडणुकीच्या हंगामात प्रत्येक जण ते बोलतोच. मीही त्यावर खोदकाम करायचं नाही असं ठरवून टाकलं होतं. म्हणूनच विषय बदलवला.

"अण्णांनी मंत्री म्हणून केलेलं काम प्रभावी मानलं जातं. नोकरशाहीवर त्यांची मांड. मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत ते आहेत. पण इथं एक मतदार संघ नीट आणि एकहुकमी का ठेवता येत नाही?"

"म्हणजे?"

"या एका मतदार संघात त्यांचे पाच विरोधक ऑल्मोस्ट सारख्या ताकदीचे आहेत. प्रत्येकानं त्यांना या ना त्या निवडणुकीत घाम फोडला आहे... हे कसं?"

"अण्णा चुकतात. तोंड वाईट. सरकारी कामं जोरकसपणे करतात, पण वैयक्तिक असं एक नातं असावं लागतं. ते टिकत नाही..."

"मग निवडून कसे येतात?"

"अनेक घटक आहेत त्यात. गांधीजी आहेत. सरकारी स्तरावर केलेल्या कामाचा थोडा प्रभाव असतोच. मतदार संघ समजलेला आहे त्यांना. त्यामुळं ते एक करतात, त्यांची उंची कायम ठेवतात. आणि शेवटच्या टप्प्यात विरोधकांची उटपटांगगिरी त्यांच्याच कामी येते. मतदार संघ मागास असला तरी शिक्षणाच्या स्तरावर तसा नाही. लोकांची जाण आहे चांगल्यापैकी. लोकांना काम कोण करणार आहे, त्याबाबत सिरियस कोण हे कळतं आणि ते मतं देतात."

"मग दादाला गेल्यावेळी इतकी मतं कशी मिळाली?"

"तिथंही नीट तपासा साहेब तुम्ही. तोही कामं करतो. त्याचा आवाका कमी पडतो डिलिव्हरी करण्याबाबत. म्हणून कमी मतांवर थांबतो तो. नाही तर तोच अण्णांना टसल देऊ शकतो..."

"यावेळी काय आहे स्थिती?" आता मी या मुद्याकडं येतो. एव्हाना थोडा मोकळेपणा आलेला असतो. कारण समोरचं पेय...

"अण्णांचा जोर आहे, पण नातलग फजिती करणार..."

ओह्ह!!! हा एक फॅक्टर माझ्या ध्यानीच आलेला नव्हता. अण्णा कायम असतात मुंबईत. त्यांचं इथलं साम्राज्य चालवतात त्यांचे एक नातलग. या नातलगांशी त्यांचा काही खटका काही संस्थातील कारभारावरून उडालेला होता दोनेक वर्षांपूर्वी. तो फॅक्टरही इथं काम करतोय की काय?

"म्हणजे, मागलं मिटलं नाही?"

"असं कुठं मिटतं का? काहीही राव... त्यावेळी या नातलगांना साथ दिली विरोधी गटानं. ते आता बसलेत शांत. नीट पाहिलं तर कळतं. अर्ज भरणं आणि एक-दोन गावातील फेऱ्या सोडल्या तर ते दिसत नाहीत. त्यात त्यांना या गावावर हुकमत हवी होती, ती मिळवता आलेली नाही. सगळा भर ग्रामीण मतदार संघावर. दुखावलेले आहेत."

मला आत्ता कळतं, भाईंनी माघार घेतल्यानंतर या नातलगांनी म्हणे आपल्या गटातील चार लोकांमध्ये बोलताना त्यांच्या नावे एक सणसणीत शिवी दिली होती. "बघतो आता या भाईकडं आणि दादाकडंही. उभं राहू देणार नाही परत इथं..." ते म्हणाले होते. त्याचं कारण - भाईंमुळं अण्णांची मतं फुटतील, ते पडतील. दादा येईल. दादाचा अंदाज तोच. पण दादालाही खिंडीत गाठण्यासाठी भाईंची माघार. त्यातून होणारं सत्तेच्या पदांचे वाटप या नातलगांच्या विरोधात जाणारं, कारण त्यात पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्याबरोबरच जिल्हा बँकेचाही समावेश. ती त्यांना काहीही करून सोडायची नसते. त्यांना साथ शेजारच्या मतदार संघातील दुसऱ्याच पक्षाच्या आमदारांची. गणितं अशीही चुकतात हे ध्यानी आल्यानं त्यांचा संताप.

आणि मग कळत जातं, अण्णांच्याविरोधात दादा विजयी व्हायचा असेल तर एकूण किती गोष्टींचं भान ठेवावं लागणार आहे ते. या नातलगांची खप्पा मर्जी नकोय, अण्णांचे मूळचे विरोधक एकत्र आणायचे तर सत्तेच्या पदांचं नेमकं वाटप त्यांच्या हितार्थ हवं, ते करताना पुन्हा या नातलगांची मर्जी सांभाळावी लागणार आहेच.

एकूण हे राजकारण क्लीष्ट हे माझ्या लक्षात येतं.
***
निवडणुका खेळल्या जातात त्या अगदी शेवटच्या टप्प्यात. बाकी सुरवातीपासून जे चालतं ते म्हणजे वॉर्मिंग अपच असते एक प्रकारे या खेळात उतरलेल्यांच्या लेखी. या शेवटच्या टप्प्यात पैसा लागतो, सत्तेची सूत्रं मांडण्याची बुद्धीमत्ता लागते. ती नसली तर पंचाईत. हे काम फक्त आपल्या चाणक्य आणि कुबेरांचा योग्य वापर करू शकणाऱ्या उमेदवाराचं. त्याचं सारं कौशल्य इथं पणाला लागतं. प्रचार थांबल्यानंतर आणखी काही गोष्टी होतात. त्यातही हे दोन घटकच कामी येतात.

दादासाठी रसद हवी याकरीता मी तिथं असतानाच काही आखणी झाली होती. काही ठिकाणी दूत पाठवून पैशांची सोय करण्याचा प्रयत्न झाला, पण तो फसला. गाड्या रिकाम्याच परत आल्या. मतदार संघातून मिळणारी रसद शक्यतो टाळायचीच, कारण ती फक्त हितसंबंधांतूनच येते हे पक्कं. त्यांच्या आशांची पूर्तता करणं पुढं आपल्याला आपल्या भूमिकांमुळं शक्य नाही हे पक्कं. त्यामुळं रसद बाहेरून मिळवण्याचा हा प्रयत्न होता. तो फसल्यानं थोडी पंचाईत झाली होतीच. पण...

आता चित्र पुन्हा फिरलंय असं म्हणतात. कालचीच खबर आहे ही. दादाच्या समर्थकाचा फोन होता. "सायबा, चित्र बदलतंय."

मग तपशील येतात पुढं. दादाच्या एका सल्लागारानं ही परिस्थिती नेमकी जोखली होती. त्यानं त्याच्या पक्षात योग्य ठिकाणी ती पोचेल अशी व्यवस्था केली. आणि एका माजी मुख्यमंत्र्यांचा त्या भागात दौरा होता तेव्हा काय करायचं हे ठरलं. हे माजी मुख्यमंत्री या पक्षाचे चाणक्य. राजकारणच ते. नेमकं स्पष्ट कळेल ते निकालानंतरच. तूर्त कळतंय ते इतकंच. या माजी मुख्यमंत्र्यांनी आल्या-आल्या अण्णांच्या विरोधकांशी संवाद साधला. त्यांच्यात सूत्रं ठरली आहेत. बाजार समिती, जिल्हा बँक या लगेचच्याच निवडणुका आहेत. तिथं या विरोधकांना आता 'संधी' आहे. त्यासाठी दादाच्या पक्षानं काही त्याग करायचं मान्य केलं आहे. त्यामुळं भाई, दोन्ही जी, दोन्ही के आता स्वबळावरच अण्णांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. ते दादाचा प्रचार करू लागले आहेत. पैसाही त्यांचाच. इतर रसदही त्यांचीच. अजेंडा एकच - अण्णांना पाडायचं आहे. त्यासाठी दादाला मदत. दादा जिंको ना जिंको, त्यांच्यालेखी त्यांच्याही पुढच्या सत्तापदांची निवडणूक आत्ताच सुरू झाली आहे.

मघा लिहिलेला स्वामींचा संदेश आता मतदार संघात पोचू लागला आहे म्हणे.

मी या समर्थकाला विचारतो, "आता दादा कुठं कमी पडेल?"

"थोडं तोंड... तुम्ही येऊन गेल्यानंतर थोडा फरक आहे. पण..."

मी शांतपणे मोबाईलवरून एसएमएस पाठवतो, "तोंडात साखर ठेव. लोक तुला साथ देतील. खेकसणे बंद. 'तो' खूप पैसा सोडतोय. तिथं तुझं गोड बोलणं उपयोगी. हा मस्त चान्स आहे..."