जाई

जाई! जाई व जुई मधली एक! जुईला तसे मी खूप वेळा पाहिलेले नाही. क्वचित एक दोनदा पाहिले असेल आणि ती खूप नाजुक आहे इतकेच माझ्या लक्षात राहिले आहे. जाई मात्र डोळ्यात, मनात, आठवणीत अगदी तुडुंबपणे भरून राहिली आहे.

जाईचा वेल माझ्या बाबांनी अंगणात मोठ्या उत्साहाने लावला असेल त्यावेळेला, म्हणजे चाळीस एक वर्षापूर्वी. माझ्या बहिणीचा जन्म व जाई अगदी बरोबरीच्या म्हणले तरी चालेल. जाईने आमच्या कुटुंबाला अगदी भरभरून दिले आहे. आम्ही दोघी बहिणी लहान होतो तेव्हापासून आठवत आहे आई आम्हाला जाईचे गजरे करून द्यायची. लहानपणी बॉबकट असल्याने आई आमच्या डोक्यावर हा जाईचा गजरा एखाद्या चक्राप्रमाणे बांधायची.

जाईचा विस्तार खूप मोठा होता. आमच्या घराचे छप्पर पत्र्याचे होते त्यामुळे अर्धा वेल पत्र्यावरच पसरलेला होता आणि अर्धा वेल अंगणातील मंडपावर होता. पावसाळ्यात जाईला खूप बहर यायचा, इतका की अंगणात पांढऱ्या शुभ्र फुलांचा सडा! शेजारच्या पाजारच्या बायका व मुली आमच्या अंगणात सडा वेचायला यायच्या. सर्व फुले वेचून झाली तरी काही वेळाने बघावे तर थोडीफार फुले पडलेलीच असायची. कधी जोराच्या वाऱ्याने पडायची तर कधी आपोआप गळून पडायची. सकाळी अभ्यास करताना एखादी नजर बाहेरच्या अंगणात गेली की अगदी त्याच वेळेला डोळ्यादेखत एखादे फूल पडलेले पाहिलेले आहे. आम्हा दोघी बहिणींना जाईच्या फांद्या हालवण्याचा नाद लागला होता, कारण फांद्या हालल्या की फुले पडायची आणि ती वेचायला खूपच मजा यायची.

शाळाकॉलेजात जाताना रोज जाईच्या टपोऱ्या फुलांचा गजरा! लांब केस असल्याने आई आमच्या दोघींची घट्ट पेडीच्या दोन वेण्या घालायची. एका वेणीवर खूप मोठा गजरा. त्याचे एक टोक वेणीच्या वरच्या पेडाला बांधायचे व एक टोक सर्वात खालच्या पेडाला. कधी उजव्या वेणीवर तर कधी डाव्या! त्यावेळेला डाव्या वेणीवर गजरा बांधायची फॅशन होती. काही वेळेला गजरा वेटोळा करून त्यात क्लिप अडकवून कानाच्या बाजूच्या केसांमध्ये ती क्लिप लावायचो तर कधी गजऱ्याचे दोन एकसारखे भाग करून मध्ये क्लिप लावून! शाळेला खूप उशीर होत असेल तर सेफ्टी पीनेमध्ये फुले ओवायची व ती वेणीच्या पेडात बांधायची.

दुपारचे शाळाकॉलेज असेल तर सकाळचा अभ्यास झाल्यावर स्टुलावर  चढून फुले काढायचो. जी फुले काढेल तिने दुसरीला विचारायचे की तू घालणार आहेस का गजरा म्हणजे तुझी पण फुले काढते. शाळाकॉलेजातून संध्याकाळी घरी येईपर्यंत गजऱ्यातील काही फुले सुकून ती चॉकलेटी रंगाची दिसू लागायची. शनिवारचे सकाळी शाळाकॉलेज असायचे तेव्हा मात्र शुक्रवारी संध्याकाळीच कळ्यांचा गजरा करून तो ओल्या फडक्यात गुंडाळून ठेवायचा, म्हणजे मग सकाळी उठल्यावर उमललेल्या फुलांचा गजरा तयार! आम्ही जसे आमच्यासाठी गजरे करायचो त्यात अजून एक गजरा प्लॅस्टिकच्या पिशवीत घेऊन जायचो, कधी आमच्या मैत्रिणींकरता तर कधी शाळेतल्या बाईंकरता.

रविवारी सुट्टीच्या दिवशी किंवा सणावारांच्या दिवशी जाईचे गजरे करण्याचा आम्हा दोघी बहिणींचा खूप मोठा कार्यक्रम असायचा. दुपारी जेवणे उरकली की आम्ही जाईच्या कळ्या काढायचो. टपोऱ्या गुलाबी रंगाच्या कळ्या मला अजूनही जशाच्या तश्या आठवत आहेत. आधी पत्र्यावर जाऊन कळ्या काढायचो. त्यात आमच्या मैत्रिणीपण असायच्या. आमच्याकडे काही ऍल्यूमिनियमच्या व काही स्टीलच्या चाळण्या होत्या, काही टोपल्या पण होत्या. त्यामध्ये सर्व कळ्या व फुले काढायचो. खूप खूप कळ्या!! टोपल्यांमध्ये साठलेल्या भरगच्च गुलाबी रंगांच्या कळ्यांकडे बघत बसावेसे वाटायचे! कळ्या काढताना आई नेहमी ओरडायची, कळ्या काढा पण मुक्या कळ्यांना हात लावू नका. मुक्या कळ्या म्हणजे खूप बारीक कळ्या की ज्यांना उमलायला अजून बराच काळ आहे.

पत्र्यावरच्या कळ्या काढून झाल्या की मंडपावर पसरलेल्या वेलीवरच्या काढायच्या. जाईच्या अवाढव्य व अगणित फांद्या सगळीकडे फोफावल्या होत्या. बऱ्याच फांद्या अंगणाकडे झुकल्या होत्या. सहज हाताने पण त्यावरील कळ्या काढता यायच्या. मंडपावरील वेलावरच्या कळ्या आम्ही स्टुलावर उभे राहून काढायचो. स्टुलावर उभे राहून सुद्धा आम्हाला आमची पावले उंच करायला लागायची, इतका उंच वेल होता! मातीचे अंगण खडबडीत असल्याने स्टुलावर उभे राहिले की ते डुगडुगायचे! त्यावर उभे राहून डुगडुगणारे स्टूल एका जागी स्थिर झाले की मग वेलाकडे बघून नजरेत येतील इतक्या कळ्या एका हाताने तोडून त्या मग चाळणीत टाकायच्या. एकीने कळ्या काढायच्या व त्याच वेळी दुसरीने चाळणी घेऊन  बाजूला उभे राहायचे, असे आलटून पालटून. त्यातही आमची भांडणे " ए काय गं, किती काढतेस गं कळ्या! मला काढू देत ना थोड्यातरी! "अगं होना काढ की मग! ह्या बाजूच्या मी काढते तू दुसऱ्या बाजूच्या काढ. " मग स्टूल एक्या जागेवरून दुसरीकडे न्यायचो. आमच्या शेजारच्या काही छोट्या मुली पण यायच्या, त्यांना पण स्टुलावर उभे राहून फुले काढायची इच्छा असायची. पण आम्ही त्यांना ओरडायचो, तुम्ही अजून लहान आहात ना, स्टुलावर उभे राहून पडलात म्हणजे! त्यापेक्षा तुम्ही खाली पडलेली फुले वेचा.

सर्व कळ्या व फुले काढून झाल्यावर मग आई प्रत्येकाचे वाटे करायची. आमच्या मैत्रिणी पण खूप खूश व्हायच्या! कळ्या फुले काढून झाल्यावर नंतरचा कार्यक्रम म्हणजे देवांच्या तसविरींना हार, आजीआजोबांच्या फोटोला हार, व आम्हाला गजरे. हार व गजरे करता करताच कळ्या हळूहळू उमलायला लागायच्या. अर्धवट उमललेल्या कळ्यांचे हार व गजरे तर इतके काही सुंदर दिसायचे ना!! गणपतीच्या दिवसात आमच्या घरच्या गणपतीला जाईच्या फुलांचा भरगच्च हार असायचा, त्यात अधुनमधुन जास्वंदीचे लालचुटुक फूलही असायचे. आमच्या घरामध्ये जाईच्या सुगंधाचा नुसता घमघमाट असायचा!! रात्रीच्या जेवणानंतर अंगणात गप्पा मारायला बसायचो तेव्हा जाईच्या वेलीवरती अगणित फुले, जणू काही पांढऱ्या शुभ्र चांदण्याच!

अजूनही जाई आमच्या अंगणात आहे. यावेळच्या भारतभेटीत जाईला डिजीकॅममध्ये साठवून घ्यायचे  ठरवले आहे.

शु. चि. वापरला आहे.