तांदळाची ह्या घरा चाहूल जेव्हा लागली

प्रेरणा : मानस६ ह्यांची सुंदर गझल "वादळाची ह्या जगा चाहूल जेंव्हा लागली"

तांदळाची ह्या घरा चाहूल जेव्हा लागली
भात सार्‍या रांधती, मी खीर, चकली रांधली!

शेवटी आलास सगळ्यांच्या वसंता, Hi, पण;
आज माझी डायरी आहे फुल्यांनी झाकली!

जावयाच्या चाचणीला पास झाली शेवटी
चप्पला झिजल्या खर्‍या, पण घोडनवरी चालली!

चालतो मी पावसातुन एवढ्यासाठीच की,
ना कुणालाही दिसावी पँट ही ओलावली!

वर्ग ह्याचा कोणता, काढा बरे घनही जरा;
कॅल्क्युलेटरची कशाला गरज भासू लागली?

स्वाद तोंडाला हवा लावण्यगीताचा, सखे!
भावगीती गुळमटाची सवय मागे सांडली

दूरदेशी वाहते माझी प्रिया माझ्यापुनी
गावली मज नाय, हिरव्या कार्डवाल्या गावली!

अंग उघडे.. कापडाने व्यापले होते कमी!
विघ्नसंतोषी कुणी पण शाल त्यावर टाकली!
                                              -खोडसाळ