ऋग्वेदातील तत्त्वज्ञान - ३

इह ब्रवीतु य ईमङ्ग वेदास्य वामस्य निहितं पदं वेः ।

शीर्ष्णः क्षीरं दु‌ह्रते गावो अस्य वव्रिं वसाना उदकं पदापुः ॥१-१६४-७॥

- ज्या कोणाला हे अवगत असेल, त्याने हे मला लवकर सांगावे. समोर दिसणार्‍या, नित्य गमनशील अशा या सूर्यदेवाचे स्वरूप मोठे गूढ आहे ! त्या आदित्याचे शिराप्रमाणे उच्चभागी असणारे काही किरण उदकांच्या धारा खाली सोडतात व काही तप्त किरण ते पाणी सोडलेल्या मार्गानेच पुनः वर शोषून घेतात.

रत्न ६९वे: द्वा सुपर्णा सयुजा सखाया समानं वृक्षं परि षस्वजाते ।

तयोरन्यः पिप्पलं स्वाद्वत्त्यनश्नन्नन्यो अभि चाकशीति ॥१-१६४-२०॥

- एकमेकांजवळ राहणारे व एकमेकांचे मित्र असे दोन पक्षी (-आत्मा व जीव) एकाच वृक्षाचा (शरीराचा) आश्रय करून राहते झाले. त्यांपैकी एक त्या वृक्षाच्या मधुर फळांचा (सुखादींचा) उपभोग घेतो आणि दुसरा त्याचा उपभोग न घेता फक्त आपल्या सवंगड्याचे ते खाणे पाहत असतो.

यत्रा सुपर्णा अमृतस्य भागमनिअभेषं विदथाभिस्वरन्ति ।

इनो विश्वस्य भुवनस्य गोपाः स मा धीरः पाकमत्रा विवेश ॥१-१६४-२१॥

- ज्याच्याजवळ सुगमनशील असे किरण स्वकर्तव्य जाणून उदकाचा सारभूत अंश नित्य पोहोचवीत असतात, आणि जो सर्व जगाचा स्वामी व रक्षणकर्ता आहे, असा तो ज्ञानमय परमेश्वर या माझ्या अज्ञ अंतःकरणात प्रवेश करून राहिला आहे.

यस्मिन्वृक्षे मध्वदः सुपर्णा निविशन्ते सुवते चाधि विश्वे ।

तस्येदाहुः पिप्पलं स्वाद्वग्रे तन्नोन्नशद्यः पितरं न वेद ॥१-१६४-२२॥

- ज्या आदित्यरूप वृक्षावर हे जे किरणरूप पक्षी उदकातील मधुर रसाचा आस्वाद घेत राहत असतात, ते रात्री त्या वृक्षामध्ये जाऊन प्रवेश करतात आणि उदयकाळी पुन्हा सर्व जगावर प्रकाश पाडतात. त्या वृक्षाचे फळ गोड असते असे तत्त्वज्ञानी सांगत आले आहेत, पण जे त्या जगत्पालन- कर्त्याला उपासनेद्वारा जाणून घेत नाहीत, त्यांस या फळाचा रसास्वाद मिळू शकत नाही. (मग तो आस्वाद मला तरी कसा मिळेल?)

यद्नायत्रे अधि गायत्रमाहितं त्रेष्टुभाद्वा त्रेष्टुभं निरतक्षत ।

यद्वा जगज्ज्गत्याहितं पदं य इत्तद्विदुस्ते अमृतत्वमानशुः ॥१-१६४-२३॥

- पृथ्वीवर अग्नि स्थापन केला आहे ते स्थान कोणते, आकाशापासून निर्माण केलेल्या वायूचे स्थान कोणते, आणि आकाशातील गमनशील सूर्याचे स्थान कोणते, हे सर्व जे जाणतात, तेच ज्ञानी भक्त अमरत्व पावतात. (म्हणून मला हे ज्ञान कृपा करून द्यावे.)

(क्रमशः)