ऋग्वेदातील तत्त्वज्ञान - १

वेद-उपनिषदे-पुराणे ही आपल्या संस्कृतीची ओळख करून देतात. जगभर या वाङ्मयाचा अभ्यास करणारे आहेत. पण आम्ही मात्र या ठेव्याबाबत अनभिज्ञ राहतो. क्वचित याबाबत काहीश्या हेटाळणीच्या सुरात बोलणारेही भेटतात.
टिटवाळ्यातील जोशीकट्टा (ज्येष्ठ-राज-सिनियर सिटीझन्स कल्चरल ग्रुप) ने २००७ सालापासून एक उपक्रम हाती घेतलाय. आळंदी-पंढरपूर वारी ही सामाजिक समरसता, भागवत-धर्म-प्रसार, स्वतःचीच शिस्त स्वतः पाळणारे वारकरी आदी कारणांमुळे जगद्विख्यात झाली आहे. किंबहुना ही वारी म्हणजे महाराष्ट्राची एक विशेष ओळख आहे. तर, या महाराष्ट्रधर्माचा प्रसार उत्तर भारतातही व्हावा, या उद्देशाने उत्तर पंढरी वारीची सुरुवात जोशीकट्ट्याने २००७च्या कार्तिक महिन्यात केली. मुंबईहून हरिद्वारला रेल्वेने जायचे. हरिद्वार ते हृषिकेश हे अंतर पायी चालायचे. हृषिकेशला श्रीविठ्ठलाश्रम या मराठी संस्थेचे सुंदर विठ्ठलमंदीर आहे. त्या मंदिरात कार्तिक शुद्ध एकादशी (प्रबोधिनी एकादशी) दिवशी महापूजा, कीर्तन, प्रवचनादी कार्यक्रम करायचे. द्वादशीला तुलसी-विवाह करून रेल्वेने परतायचे, असा हा उपक्रम आहे. कार्तिक २००९ मध्ये सलग तिसरी उत्तर पंढरी वारी मोठ्या उत्साहात पार पडली.

२००९च्या तिसऱ्या उ. पं. वारीचे वैशिष्ट्य सांगतो... महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील वयाच्या विशीतील शे-सव्वाशे विद्यार्थी केवळ वेद -उपनिषदादींचा अभ्यास करण्याकरिता हृषिकेशमध्ये राहत आहेत. अनेक अडचणींना तोंड देत ते तिथे राहत आहेत. (पुण्याचे आद. दिनकर शास्त्री भिकुले आणि हृषिकेशचे श्री. अशोकजी पांचाळ यांचा या मुलांना काहीसा आधार आहे. ) ब्रह्म. राहुल तळेकर (खेड शिवापूर) याच्या पुढाकाराने ही मुले विठ्ठल-महोत्सवात उत्साहाने सामील झाली. आम्हा ४९ जणांचे खाणे-चहापाणीही त्यांनीच सांभाळले. तीन मुलांनी कीर्तने रंगविली. असो.

२००७च्या प्रथम उत्तर पंढरी वारीच्या वेळी मंदिरात महापूजा चालू असताना एक व्यक्ती आली. उजळ वर्ण, भक्कम शरीरयष्टी, वय तिशीच्या आसपासचे, पांढरे शुभ्र धोतर आणि अंगावर तसेच पांढरे धोतर पांघरलेले. मुखावर वेगळेच तेज. पूजा होईपर्यंत ते थांबले. मी पुढे होऊन त्यांच्याशी हिंदीमधून बोलण्याचा प्रयत्न केला. त्या व्यक्तीने शुद्ध मराठीत माझ्याशी बोलावयास सुरुवात केली. (त्या व्यक्तीचे नांव बहुधा मांडके असावे. ते सांगलीचे राहणारे होते, सुविद्य होते, केवळ वेद-उपनिषदांचा अभ्यास करण्यासाठी हृषिकेशच्या एका आश्रमात ते राहत होते. ) त्यांना प्रवचन करण्याची विनंती केली. त्यांनी ती मान्य केली. मांडूक्य उपनिषदासंबंधी ते बोलले. बरेचसे आम्हा बावीस जणांच्या डोक्यावरून ते बोलणे गेले, पण त्यांनी केलेली एक सूचना मात्र लक्षात राहिली. त्यांनी जे सुचवले होते, त्याचा सारांश असा : 'आपण हिंदू आहोत म्हणजे नक्की काय आहोत, याचा विचार करा. हिंदू हा शब्द भारतीय आहे का, शोधा. तुम्ही खरे भारतीय आहात का, पाहा. आम्ही आमचीच वंचना करतो आहोत का, याविषयी आत्मशोधन करा. तुम्हाला या भारतात जो जन्म लाभला आहे, तो नियतीचा निर्णय आहे हे निर्विवाद मान्य केले, तर तुम्हाला लाभलेला वारसा जाणून घ्या. ज्या ज्या वेळेला चार-चौघे जण एकत्र याल, तेव्हा कोणतेही एखादे उपनिषद घ्या. आता सार्थ ग्रंथ मिळतात. तो अर्थ वाचा. तुम्ही त्यावर चर्चा करा. तुम्हाला तुमच्या विचार-वारशाची ओळख होईल. लक्षात घ्या, एखाद्या गोष्टीला नांवे ठेवायची असतील, तर त्या गोष्टीची यथार्थ माहिती आपणास हवी असणे आवश्यक असते. आता विज्ञान प्रगत झाले आहे, असा दावा केला जातो, त्यावर सनातन वाङ्मयातील शिकवण पडताळून पाहणे आपणाला शक्य आहे. सत्य ज्ञानप्राप्तीसाठी तो एक चांगला मार्ग आहे. एकच की, आपण भारतीय होऊन राहायचा प्रयत्न करू. त्यात वावगे काही नाही. किंबहुना, भारतीय आचार-विचार आज जगात आकर्षणाचा विषय बनत आहे. '

त्या व्यक्तीचे विचार मात्र मनात घर करून राहिले आहेत. आजच्या परिस्थितीकडे पाहिले तर दिसते काय, तर आपला समाज, देश एकात्मतेऐवजी तुकडेबाजीच्या मागे लागला आहे. दलित व सवर्णांकडून दलितांची हेवाहेटाळणी, दलितांच्या मनात इतर समाजाविषयीचा आकस, एकाच समाजातील विविध गटातील वैमनस्य, वाढती भोगवृत्ती व त्यातून मानसिक, शारीरिक यातना... यातून दुःखेच आपण कमावीत आहोत. मानसिक, वैचारिक पातळीवर आपण अशक्त होत चालले आहोत. असे विचार मनात येत असताना आठवते ते समर्थ रामदासांचे वचन - तुझा तू वाढवी राजा! गीताही सांगतेच - उद्धरेत आत्मनात्मानम. मनात जेव्हा विधायक विचार येतात, तेव्हा नियतीच मदत करते. तुमच्यासाठी पोषक परिस्थिती आपोआप तयार होत जाते, तुम्ही मार्गी लागता. हृषिकेशला त्या व्यक्तीची (मांडके यांची) गाठ होणे, त्यातीलच भाग असावा, असे आज वाटते.

'मनोगतीं'शी याविषयी संवाद साधण्याविषयी मनात आले आहे. कुणाला किती आवडेल, माहीत नाही, पण समविचारातून चांगलेच निष्पन्न होईल, असा विश्वास वाटतो. ज्यांना जे भावेल, ते आपण वाटू यात.

संकल्प अमुचा एक असो । हृदयभावना एक असो ।

मन समविचार करो । भारत विश्ववंदिता असो॥

(क्रमशः)