ऋग्वेदातील तत्त्वज्ञान - ४

रत्न ७०वे : अनच्छये तुरगातु जीवमेजद् ध्रुवं मध्य आ पस्त्यानाम् ।

जीवो मृतस्य चरति स्वधाभिरमर्त्यो मर्त्येना सयोनिः ॥१-१६४-३०॥

- श्वसन करणारी, जिवंत व हालचाल करणारी जी वस्तू आहे, ती या देहरूपी घरामध्ये खांबाप्रमाणे स्थिर होऊन राहिली आहे. शरीरगत जीवात्मा व मरणधर्मी देह या दोघांचे उत्पत्तीस्थान समानच असून तो जीव स्वधान्नावर राहणारा आहे.

अपश्यं गोपामनिपद्यमानमा च परा च पथिभिश्चरन्तम् ।

स सध्रीचीः स विषूचीर्वसान आ वरीवर्ति भुवनेष्वन्तः ॥१-१६४-३१॥

- जगाचा रक्षक व कधीही न थकणारा असा जो आदित्य त्यास मी पाहिला आहे. तो अंतरिक्षातील मार्गांनी उदयास्त करीत फिरत असतो. तो या जगामध्ये पुनः पुनः येत जात असतो.

य ईं चकार न सो अस्य वेद य ईं ददर्श हिरुगिन्नु तस्मात् ।

स मातुर्योना परिवीतो अन्तर्बहुप्रजा çÆvç$ç&ÝçÆlçcçç विवेश ॥१-१६४-३२॥

- ह्याला ज्याने उत्पन्न केले त्याला हा ओळखीत नाही. ज्याने याला पाहिला आहे तो याच्यापासून गुप्त राहिला आहे (याचा पिता अज्ञात आहे). हा जीवात्मा मातेच्या उदरात गुरफटून गेलेला असून त्याला अनेक जन्म आहेत आणि तो संसारदुःखात बुडून गेला आहे.

‍द्यौर्मे पिता जनिता नाभिरत्र बन्धुर्मे माता पृथिवी महीयम् ।

उत्तानयोश्चम्वो३'र्थोनिरन्तरत्रा पिता दुहितुर्गर्भमाधात् ॥१-१६४-३३॥

- अंतरिक्ष हा माझा बाप, तोच माझा जनक, पृथ्वीची नाभी हा माझा बंधू व ही थोर पृथ्वी माझी माता होय. उताण्या असलेल्या दोन  सोमपात्रांच्या मध्यभागी सर्व जगाचे जन्मस्थान असून तेथेच आपल्या कन्येच्या ठिकाणी पित्याने गर्भ ठेवून दिला आहे.

रत्न ७१वे : पृच्छामि त्वा परमन्तं पृथिव्याः पृच्छामि यत्र भुवनस्य नाभिः ।

पृच्छामि त्वा वृष्णो अश्वस्य रेतः पृच्छामि वाचः परमं व्योम ॥१-१६४-३४॥

- हे ऋत्विजा, मी तुला विचारतो की, या पृथ्वीची अंतिम मर्यादा कोणती ? जगाचा मध्य तो कोणता ? वळू घोड्याचे रेत कोणते आणि  वाणीचे श्रेष्ठस्थान कोणते ? हे सर्व मी तुला विचारतो.

(क्रमशः)