ऋग्वेदातील तत्त्वज्ञान - ५

इयं वेदिः परो अन्तः पृथिव्या अयं यज्ञो भुवनस्य नाभिः ।

अयं सोमो वृष्णो अश्वस्य रेतो ब्रह्मायं वाचः परमं व्योम ॥१-१६४-३५॥

- ही वेदी तीच पृथ्वीची अंतिम सीमा होय. आणि हा जो यज्ञ तोच जगाचा मध्य. हा सोमरस तेच वर्षाव करणार्‍या घोड्याचे रेत आणि हा जो ब्रह्मा तेच वाणीचे परम श्रेष्ठ स्थान होय.

रत्न ७२वे : अपाङ् प्राङेति स्वधया गृभीतोऽमर्त्यो मर्त्येना सयोनिः ।

त शश्वन्ता विषूचीनां वियन्ता न्यं१' चिक्युर्न नि चिक्युरन्यम् ॥१-१६४-३८॥

- आत्मा (? -जीव) हा या मर्त्य देहाबरोबरच जन्म पावतो. तो सुखोपभोगाच्या इच्छेने केव्हा खाली या लोकी तर केव्हा वर स्वर्गलोकी जातो. हे दोन्ही, जीव व देह, नित्य एकत्र राहत असून, ते इहलोकी व परलोकी मिळूनच संचार करीत असतात. हे खरे असले तरी मनुष्य फक्त देह तेवढाच जाणतो आणि देहाव्यतिरिक्त आत्मा मात्र जाणत नाही.

रत्न ७३वे : ऋचो अक्षरे परमे व्योमन्यस्मिन्देवा अधि विश्वे निषेदुः ।

यस्तन्न वेद किमृचा करिष्यति य इत्तद्विदुस्त इमे समासते ॥१-१६४-३९॥

- अत्युच्च अशा स्वर्लोकी वास करणार्‍यांप्रमाणेच वेदांतील ऋचांच्या अक्षरात सर्व देवांनी वास केला, तर असे जे ऋचेचे अक्षर ते ज्याला अर्थरूपाने समजत नाही, त्याला नुसता वेद तोंडाने  पाठ म्हणून काय लाभावयाचे आहे? ज्यांनी ते अक्षरगत तत्त्व अर्थतः ओळखिले ते ज्ञानीच पूर्ण सुखी होतात.

रत्न ७४वे : गौरीर्मिमाय सलिलानि तक्षत्येकपदी द्विपदी सा चतुष्पदी ।

अष्टापदी नवपदी बभूवषी सहस्त्राक्षरा परमे व्योमन् ॥१-१६४-४१॥

- ही तेजस्वी (मेघाची) वाणी उदक निर्माण करीत असताना निनादत असते. तिला एक पाय, किंवा दोन, अथवा चार, अथवा आठ किंवा नऊ देखील असतात, किंवा तिला अनंत अक्षरे असून ती अति उच्च अशा स्वर्गात राहणारी आहे.

रत्न ७५वे : चत्वारि वाक्परिमिता पदानि तानि विदुर्ब्राह्मणा ये मनीषिण: ।

गुहा त्रीणि निहिता नेङ्गयन्ति तुरीयं वाचोमनुष्यां वदन्ति ॥१-१६४-४५॥

- वाणीचे एकंदर चार प्रकार गणले आहेत. ते सर्व प्रकार जे ब्राह्मण ज्ञानसंपन्न आहेत, त्यांना  मात्र अवगत असतात. त्यांपैकी तीन प्रकार गुप्त असल्यामुळे ते आकलन करण्यात येत नाहीत.  पण जो चौथा एक प्रकार आहे, तो मात्र लोक तोंडाने बोलत असतात.

रत्न ७६वे : इन्द्रं मित्रं वरुणमग्निमाहुरथो दिव्यः स सुपर्णो गरुत्मान् ।

एकं सद्विप्रा बहुधा वदन्त्यग्निं यमं मातरिश्वानमाहुः ॥१-१६४-४६॥

- त्या आदित्यालाच कोणी इंद्र, कोणी मित्र, कोणी वरुण, कोणी अग्नि असे म्हणतात. देवलोकी राहणारा सुंदर पंखांचा पक्षी म्हणजे तो हाच. तो वस्तुतः एकच आहे, तरी ज्ञानीजन त्याला अनेक नांवांनी आळवितात. त्याला अग्नि, यम, मातरिश्वा असे म्हणतात.

या रत्नानंतर दुसरा विषय सुरू केला गेला आहे. त्यामुळे वरवर पाहता हे प्रकरण अर्धवट वाटते. पण, यानंतर वरील १-१६४-६ ऋचा जोडून वाचली तर संगती लागते - 'याविषयी मी अगदीच नेणता आहे. या विषयांचे ज्ञान करून घ्यावे, म्हणून मी ज्ञानवंतांना या विषयासंबंधाने विचारीत आहे, की ज्याने हे सहाही लोक धारण केले आहेत अशा त्या जन्मरहित आदित्यमंडळातील एकमेवाद्वितीय असे ते परम तत्त्व तरी कोणते? '

(इतिः)