सगळेच हुशार !

गिरीश नुकताच फर्स्टक्लासमध्ये बीकॉम झाला होता. ज्याप्रमाणे एक सर्वसाधारण विद्यार्थी म्हणून तो त्याच्या अभ्यासात कुठेही फार कमी पडला नव्हता त्याचप्रमाणे रोज बारा ते चौदा तास अभ्यास करणेही त्याला फारसे कधी आवडले नव्हते. तरी सुद्धा ग्रॅज्युएशनला आपल्याला फर्स्ट क्लास मिळाला याचे इतरांना फारसे नसले तरी त्याचे त्याला स्वतःला कौतुक होते. खरे तर फर्स्टक्लासदेखील अगदी काठावरच मिळाला होता आणि नेमके त्याच वर्षी त्याच्या कॉलेजमध्ये पंचेचाळीस विद्यार्थी फर्स्टक्लासात होते. त्यामुळे कॉलेजमध्ये कोणी कौतुक करण्याचा प्रश्नच नव्हता. घरी तर काय, कौतुक राहिले बाजूलाच पण आता पुढे काय याचा विचार आई (मॅट्रिक पास), बाबा (बीकॉम पास क्लास), आईची आई - आजी (नक्की शिक्षण सांगता येत नाही), मामा (गुड फॉर नथिंग) हे सगळे अतिशय गंभीरपणे करीत बसले होते. गिरीश नुसताच बसून होता. थोडा आनंदात होता. पण थोड्याच वेळात समोर काय डिस्कशन होणार आहे याची त्याला कल्पना नव्हती. 

पहिल्यांदा आजीने सुरुवात केली, 'अग नमू (गिरिशची आई) त्या शकुचा मुलगा नाही का? अग तो शेंबड्या, याच वर्षी मेकॅनिकल इंजिनिअर झाला. अगदी तोंडावरची माशीसुद्धा मरत नव्हती त्याच्या. काय अवतार असायचा त्याचा पण इंजिनिअर झाला. तसा तो लहानपणापासून हुशारच होता. कधी नव्वद टक्क्याच्या खाली आला नाही. बारावीची मेरिटसुद्धा अगदी दोन मार्कानी हुकली होती त्याची. इंजिनिअर झाल्यावर लगेचच त्याला ऑफर आली आहे. सहा लाखाचे पॅकेज आहे सुरुवातीलाच. शकू आता अगदी खूश असणार. मुलाने अगदी नाव काढले हो तिच्या'. गिरीशच्या डोक्यात विचारांचे चक्र सुरू झाले. 'च्यायला या आजीला इंजिनिअर, मेकॅनिकल, सॅलरी पॅकेज या गोष्टी कशाशी खातात हे तरी माहिती आहे का? कोणीतरी काहीतरी सांगितले असेल आणि हिची झाली सुरुवात रंगवून सांगायला. ही म्हातारी माणसे म्हणजे डोक्याला ताप आहे. भजन कीर्तन करीत स्वस्थ बसा की आता. एवढे वय झाले तरी अजून कुठे काय बोलावे हे कळत नाही आणि वर याना मोठे म्हणा हा आग्रह आहेच. कोण काय करतो, किती कमावतो, किती शिकलाय ही बडबड करून काय मिळणार आहे? कोण च्यायला ही शकू का टकू कधी आलीसुद्धा नाही आपल्याकडे. मावशी आहे म्हणे माझी. आधीच डोक्याला ताप देणारे नातेवाईक काय कमी आहेत? या शकूचा मुलगा त्याच्या सहा लाखाच्या पॅकेजमधला एक छदाम तरी आपल्याकडे आणून देणार आहे का? उगाच त्याच्या इंजिनीअरिंगचे आणि पैशाचे कौतुक आपल्याकडे कशासाठी'? अर्थात हे सगळे गिरीशच्या मनात आलेले फक्त विचारच. प्रत्यक्ष बोलण्याचा प्रश्नच नाही आणि तेवढी हिंमतही नाही.
मामाने मध्येच तोंड घातले, 'ताई आजकाल तसा कॉमर्सला काही स्कोप नाही गं. सॉफ्टवेअरला जास्त डिमांड आहे. तो तुमचा शेजारी नाही का हितेश गोखले, आताच तर गेला अमेरिकेला. कुठली कंपनी ती? हो इंफोसिस. तो सुद्धा मेकॅनिकल इंजिनिअरच झाला पण जॉब सॉफ्टवेअरमध्ये करतोय. हल्ली आता बीकॉमला वगैरे फारसे कोणी विचारीत नाहीत. आपला जमाना गेला आता ताई. गिरीशनि कॉमर्सला जायच्या आधी थोडा विचार करायला हवा होता'. आजीचे लगेचच उतर आले, 'विचार वगैरे सगळे ठीक आहे, पण जमायला हवे ना. अरे इंजिनिअर म्हणजे काही खायचे काम नाही बाबा. फार मेहनत आहे त्यात. शकूचा मुलगा सतत बिझी असायचा'. पुन्हा गिरीशचे डोके तापले ते फक्त विचार करण्यापुरते. 'च्या मारी या मामाच्या, हा साधा ग्रॅज्युएटही नाही, धड नोकरी नाही याच्याकडे तरी बडबड बघा. अख्ख्या जगाचे तत्त्वज्ञान सांगण्याची अथॉरिटी आहे जशी काय याच्याकडे. अजून लग्नही झालेले नाही नोकरी धंदा नसल्यामुळे. इंजिनीअरिंगलाच काय तो अभ्यास आम्हाला नाही का? आमच्यासारख्या मुलांचे सोडा पण बीकॉमला सुद्धा डिस्टिंक्शन मिळवणारी मुले भरपूर अभ्यास करतात. त्यांना काय कोणी असेच मार्क्स वाटत नाही. या बिनडोक लोकांना काय कळणार म्हणा. जाऊ दे च्यायला'. वर कितीही जाऊ दे चा आव आणला तरी आतून गिरीश अस्वस्थ होता. सगळ्याच गोष्टी जाऊ द्यायला तो काही संत महंत नव्हता.
मग आईने सुरुवात केली. 'मी आणि ह्यांनी गिरीशला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. पण तो ऐकेल तर ना. काय तर म्हणे मला फ्लूटमध्ये करिअर करायचे आहे. आता बासऱ्या वाजवून कोणी विचारणार आहे? मुलगी देणार आहे? का हरीप्रसाद चौरसिया दत्तक घेणार आहेत साहेबांना? नंतर एकदा तो म्हणाला की हॉटेल मॅनेजमेंटला जायचा विचार आहे. आपल्या घराण्यात कोणाला माहिती तरी आहे का हा कोर्स? नसते उद्योग सुचतातच कसे याला कोणास ठाऊक? शेवटी बीकॉम झाले आणि आता बसले विचार करीत पुढे काय होणार याचा'. 
गिरीशला निदान आईने तरी दुसऱ्यांच्या देखत असे बोलू नये असे वाटत होते. पण काय करणार? आई असे बोलण्याची ही काही पहिली वेळ नव्हती. त्याने मनाशी विचार केला. 'फ्लुट वाजवणारे सगळे होपलेस आहेत का? मि फक्त फ्ल्यूट वाजवणे डेव्हलप करणार आहे असे म्हटले होते. त्यात फ्लूटमध्ये करिअर करण्याचा प्रश्न कुठे येतो? वास्तविक त्या शकू मावशीचा मुलगादेखील पेटी वाजवायचा. म्हणजे वाजवण्याचा नुसता प्रयत्न करायचा. त्याचे किती कौतुक व्हायचे? होणारच. तो इंजिनिअर आहे ना? आमचा मधू अभ्यास सांभाळून छंद कसे छान जोपासतो असे सारखे शकू मावशी सगळीकडे सांगायची. तिने तर त्याला पेटीच्या क्लासला पण घातला होता. इथे मी कुठलाही क्लास न लावता इतकी छान फ्लूट वाजवतो त्याची साधी दखल सुद्धा कोणी घेतली नाही कधी आमच्याकडे. एखादा माणूस इंजिनिअर, डॉक्टर झाला की त्याच्या सगळ्या गोष्टींना एकदम एवढे असाधारण महत्त्व प्राप्त होते की बाकीचे सगळे कस्पटासमान वाटायला लागतात'.        
अतिशय डिस्टर्ब झाल्यामुळे शेवटी न राहवून गिरीशने संभाषणात भाग घेतला. तो म्हणाला, 'काय गं आई, मुलगा कॉमर्सला गेला म्हणजे फुकट गेला असा अर्थ होतो का? एकदा कॉमर्सला गेला म्हणजे आता त्या मुलाच्या आयुष्यात काहीच उरत नाही का? तू, मामा आणि आजी कुठल्या जगात राहता हेच मला कळत नाही. मला ग्रॅज्युएट झाल्याबद्दल शुभेच्छा द्यायच्या तर सोडाच, उलट मी सोडून बाकीचे सगळे कसे हुशार, तल्लख, गुणी आहेत यावर तुम्ही वाद घालता? तुम्ही सगळे माझ्यापेक्षा वयाने, अनुभवाने, मानाने मोठे आहात नाही का? मग एका ग्रॅज्युएट झालेल्या मुलाशी कसे बोलावे ही साधी गोष्ट तुम्हाला कळू नये'? 'आता तुम्ही शिकवा आम्हाला कसे वागायचे चार चौघात ते' भडकून आजी म्हणाली. गिरीश संतापलाच, 'शिकवायलाच पाहिजे तुमच्यासारख्यांना. वेळीच उलट बोललो असतो तर आज हे असे बोलण्याची हिंमत नसती झाली तुम्हा लोकांची. काय माहिती आहे तुम्हाला शिक्षण, नोकऱ्या, पगार, सॉफ्टवेअर, इंजिनीअरिंग याबद्दल? काय चांगले काय वाईट तुम्ही घरात बसून ठरवता काय? सारखी तुलना करीत बसायची माझी इतर मुलांबरोबर. एखाद्याचा नर्वस ब्रेकडाउन झाला या बोलण्यामुळे तर कोण जवाबदार? तुम्ही येणार आहात त्या वेळी दुखणी निस्तरायला? मी काय शिकायला हवे, कुठल्या स्ट्रीमला जायला हवे हे सगळे तुम्ही ठरवणार का? मी इंटरेस्ट कशात घ्यायचा हे पण माझ्या शिक्षणावर अवलंबून असणार आहे का? जगात काय सगळ्यांनी इंजिनिअरच व्हायला हवे का? भारतच्या बाहेरच नोकरीकरता जायला पाहिजे का? भारतात नोकरी करणारा मूर्ख आहे का? च्यायला अमका इंजिनिअर आहे, तमका अमेरिकेत गेला, हा काय नुसता बारावी असून सुद्धा दुबईत एक लाख रुपये महिना कमावतो, अमका फार श्रीमंत आहे, तमका एम बी ए करतोय, लहानपणापासून प्रचंड हुशारच आहे अरे काय चाल्लय काय? दुसरे विषय नाहीत तुम्हाला बोलायला? ज्याच्याबद्दल ऐका साला तो हुशार, एकदम तल्लख, अगदी पाहिल्यापासून शेवटपर्यंत पंचाण्णव टक्क्याच्या खाली कधी आलाच नाही. शेवटचा बिनडोक बहुतेक मीच आलो जन्माला. एक सुद्धा आई किंवा बाप असे म्हणताना दिसत नाही की, ' नाही हो काही लक्ष नाही या कार्ट्याचे अभ्यासात. नुसता टीवी बघत बसतो. आत्ता चाचणी परीक्षेत कार्टा नापास झाला. ' जो बघावा तो आपला गणितात एक्स्पर्ट, सायन्समध्ये एक्स्पर्ट. पैकीच्या पैकी मार्क तिच्यायला. 'आमच्या मुलाला मराठीची फार आवड आहे. इतिहास, भूगोल त्याचे अगदी फेवरेट विषय आहेत', असे म्हणणारे आई बाप गेले कित्येक वर्षात पाहिलेच नाहीत. उलट 'आमच्या प्रियाला अजिबात मराठीत बोलता येत नाही. खूप त्रास होतो मराठीत बोलताना', असे अभिमानाने सांगणारे आई बापच जास्त बघायला मिळतात. इतका संताप होतो तेव्हा. आम्ही मराठीत बोलणारे मूर्ख, मागासलेले आहोत असे वाटते का? आत्ता परवा त्या बेंद्रे काकू सांगत होत्या. काय तर म्हणे आमचा नातू सगळ्या गाड्या अगदी बरोबर ओळखतो. रस्त्यावरून एखादी गाडी गेली की लगेच सांगतो, लुक ग्रॅंडमा बी एम डब्ल्यू, मर्सिडिज इ क्लास. अगदी हुशार आहे म्हणे पहिल्यापासून. म्हणजे उद्या आता मला गाडीची नावे सांगता आली नाहीत तर तुम्ही नक्की म्हणाल, 'नुसती झक मारली कॉलेजात जाऊन गिरीशनी'.
गिरीश जरा जास्तच बोलतोय असे वाटून आई म्हणाली, 'हे बघ गिरीश चार लोक समोर असतील तर चर्चा ही होणारच. आम्ही काय तुला डिवचायला म्हणून बोलत नाही. आता आजी काय परकी आहे का? घरातलीच आहे ना'? 'तेच तर वाईट आहे ना आई' गिरीश म्हणाला, 'घरचे बोलायला लागले की जास्त वाईट वाटते. बाहेरच्यांना मी कशाला बोलू जाऊन. आणखी एक सांगतो. तुम्ही मुलांकडून या अशा अवास्तव अपेक्षा ठेवता म्हणून त्यांना देश सोडून बाहेर राहावे लागते. काय गरज आहे प्रत्येक बाबतीत कंपेरिझन करण्याची? हा इंजिनिअर झाला म्हणून तुला व्हायलाच पाहिजे, हा देशाबाहेर जाऊन पैसे कमावतोय मग तुलाही गेलेच पाहिजे हा अट्टहास कशाला? तुम्हाला माहीत नसेल पण केवळ लोक हसतील म्हणून आज कित्येक मुले मराठी पुस्तके वाचायची टाळतात. बसमध्ये कित्येक लोक समजत नसूनही केवळ दाखवायला म्हणून टाइम्स ऑफ इंडिया चे एडिटोरिअल पेज वाचतात. इकॉनॉमिक टाईम्स वाचत बसतात. खरे तर लोकसत्ता किंवा मटा वाचावा असे त्यांनाही वाटत असते. पण ते तरी काय करणार त्यांनाही तुमच्यासारखीच माणसे भेटलेली असतात ना. लहानपणापासून मुलांना अक्षरशः सळो की पळो करून सोडतात तुमच्यासारखे लोक. मग मुलांनाही हळू हळू वाटायला लागते की आपण हुशार असलेच पाहिजे, नव्वदच्या वर मार्क्स मिळायलाच हवेत. जमत नसतानाही मग ही मुले मरमरून अभ्यास करतात. घोकंपट्टी करतात. थोडे मोठे झाल्यावर त्यांना वाटायला लागते की आता या देशात राहून काही फायदा नाही. अर्थात त्यांच्या या वागण्याचाही तुमच्यासारख्या आई बाबांना अभिमानच वाटत असतो. एकदा अशी मुले फॉरेनला गेली की परत येत नाहीत. मग बसतात आई बाप रडत आम्ही एकटे पडलो म्हणून. ते हा विचार करीत नाहीत की याना देशाच्या बाहेर जायला उद्युक्त करणारे आपणच आहोत'. भरपूर वाद घालून झाल्यावर गिरिशच्या लक्षात आले की आजीला झोप लागली आहे, मामा म्यूट करून टीवीवर मॅच पाहतोय आणि आईच एकटी ऐकत बसली आहे. शेवटी आईही उठली आणि स्वयंपाकाला लागली. 
एक गोष्ट गिरिशच्या लक्षात आली की इतके बोलून देखील कोणावर फारसा काही परिणाम तर झाला नाहीच पण तो स्वतः खूपच डिस्टर्ब झाला आहे. ति रात्र त्याला बिनझोपेची गेली. सलग दोन तीन दिवस त्याने पुढे काय करायचे याचा विचार करण्यात घालवले. एक खूप धाडसी निर्णय तो घेणार होता. पण काही निश्चित होत नव्हते. त्याने त्याच्या जिवलग मित्राबरोबर खूप वेळ डिस्कशन केले आणि निर्णय घेतला. घरी आल्यावर त्याने सगळ्याना बोलावून सांगितले की तो सी.ए. करणार आहे. आई आणि बाबा तर कमालीचे खूश झाले. आपल्या मुलाने पहिल्यांदा काहीतरी मोठे करण्याचे ठरविले आहे या विचारानेच त्यांना प्रचंड आनंद झाला होता. गिरीश मात्र कमालीचा सीरियस दिसत होता. दुसऱ्या दिवसापासूनच त्याने खरोखरीच मेहनतीला सुरुवात केली. सुरुवातीच्या दोन्ही लेव्हल्स यशस्विरीत्या त्याने पूर्ण केल्या आणि आर्टिकलशिपला सुरुवात केली. खरे तर हा पराकोटीचा कठीण असा अभ्यास त्याला मनापासून आवडत नव्हता. पण त्याचा सी. ए. होण्याचा इरादा पक्का होता. आर्टिकलशिप झाल्यावर त्याने फायनल परीक्षा दिली. या परीक्षेसाठी त्याने मनापासून खूप मेहनत घेतली होती. त्या मेहनतीचे चीज झाले आणि तो पहिल्या फटक्यातच सी.ए. झाला. 
अतिशय आनंदाने तो ही बातमी सांगायला घरी आला. आई बाबा वाटच पाहत होते त्याच्या घरी येण्याची. दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद वाखाणण्यासारखा होता. आईने त्याला ओवाळले आणि बाबांनी आनंदाने मिठी मारली. त्याला एक टायटनचे नवे आणि महागडे घड्याळ आई बाबांनी बक्षीस म्हणून दिले. आज जेवणाचा बेतही आईने स्पेशल केला होता. तेवढ्यातच दारावरची बेल वाजली. दार उघडले तर आजी, मामा, शकु मावशी आणि तिची पुतणी त्याचे अभिनंदन करण्यासाठी आले होते.  
पुतणी दिसायला बरी होती त्यामुळे गिरीशला आनंद झाला. आपल्या सगळ्याच इच्छा एकाच दिवशी बहुतेक पूर्ण होणार त्यामुळे त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही.       
शकु मावशीने पुतणीची ओळख करून दिली. 'ही सुप्रिया माझी पुतणी. ही पण दोन वर्षापूर्वी सी.ए. झाली आहे बर का. ऑल इंडिया रॅंकिंग सेकंड. शिवाय लगेचच गॅप न घेता आय आय एम मधून हिने एम बी ए पण पूर्ण केलय याच वर्षी. त्यातही शी टॉप्प्ड बरं का. लहानपणापासून ही अशीच हुशार. दहावी आणि बारावी मेरिट रॅंकर. सतारदेखिल उत्तम वाजवते. शिवाय ग्रॅज्युएशन सगळे स्कॉलर्शिपवर पूर्ण केलेले आहे. आता चार्टर्ड फायनान्शियल अनालिस्ट व्हायला अमेरिकेला चालली आहे नेक्स्ट वीकला. सोलिड आहे एकदम. यु नो शी इज जस्ट ट्वेंटी फ़ोर. इतक्या लहान वयात इतकी अचिव्हमेंट'. 
सुप्रिया गिरिशला हाय म्हणत होती पण शकू मावशीची बडबड ऐकून गिरिशला हसू की रडू तेच कळत नव्हते. त्याच्या डोळ्यावर आता अंधारीच आली होती. दोन मिनिटापूर्वीचा ओसंडून वाहणारा आनंद आता कुठल्या कुठे गेला होता.