गझल - काय सोसले होते

गाव सोडले तेव्हा गाव लोटले होते
सांग त्या जमान्याचे नाव कोठले होते?

वाट पाहुनी मेला बाप आपला जेव्हा
वेगळ्याच खांद्यांनी भार ओढले होते

आजही चुलीपाशी पीठ शोधते आई
मी जिचे स्वतःसाठी दूध शोषले होते

झाड झाड गावाचे केवढे बहरलेले
मी न पोचलो, माझे पत्र पोचले होते

रूप देखणे होते, छान वागणे होते
पण तिनेच तिसऱ्यांदा लग्न मोडले होते

एक चिंच गाभुळली, एक पाडली कैरी
हे लहानपण, गावी हेच चोचले होते

यार दोस्त गावाचे आज भेटले तेव्हा
या हिडीस शहराचे रक्त पोळले होते

रोज सांज होताना एक शून्य जाणवते
काय लाभण्यासाठी काय सोसले होते