बांधकामदारा(बिल्डर)बरोबरचे सहमतिपत्र(अग्रीमेंट) हरवले तर पुढे काय?

सुमारे ३०-३५ वर्षांपूर्वी केलेले तत्कालीन बांधकामदाराबरोबरचे सदनिकेचे अग्रीमेंट न सापडण्याजोगे(इर्रिट्रीवेब्ली) हरवले आहे. स्थळप्रत उपलध नाही. सदर सोसायटीच्या कचेरीतही नाही.त्याकाळी झेरॉक्स सार्वत्रिक नव्हते. बांधकाम संस्था बंद झाली आहे. बांधकामदार मृत्यू पावून २५ वर्षे झाली. त्यांचे वारस अमेरिकेत असतात असे कळले. संबंधित वॉर्डऑफिसमध्ये कसून चौकशी केली. पैसे देण्यासही तयार होतो. पण जुन्या दस्तावेजांचे संगणकीकरण झाले आहे सबब प्रत्यक्ष कागद नष्ट केले गेले आहेत. आणि नक्कल देणे तांत्रिक कारणामुळे शक्य नाही असे सांगण्यात आले‌. महाराष्ट्रातील सहकारी गार्हिक(हाउसिंग सोसायटी)संस्थांची मध्यवर्ती कचेरी पुणे येथे आहे. तिथे एक नक्कलप्रत ठेवलेली असते, असे म्हणतात. तिथेही प्रयत्न सुरू आहेत. पण  काम होणे कठीण दिसते. वर्तमानपत्रात जाहिरात वजा सूचना प्रसिद्ध केली होतीच. ह्या गोंधळामुळे सवलतीच्या दरातली स्टॅम्प्ड्यूटीसुद्धा भरता आली नाही.आता पुढे काय करावे? नक्कलप्रत मिळाली तरी काम भागण्यासारखे आहे.