तात्या

''काय रे ए कुत्रीच्या? मस्ती आली का रे? ये इकडे ये. हाणतो बघ एकेकाला धरून. अरे ए, आईबापाला जाऊन दाखवा मस्ती. माजलेत रा**चे.'' एक म्हातारा जीवाच्या आकांताने ओरडत होता. 
''हे.. हे...हे...हे, ए मुंगळ्या, तात्या पिसाटला बघ. ए तात्या तुझ्या आईला.... जा घरी जा..'' टारगट पोरांना म्हाताऱ्याचा आरडाओरडा ऐकून जास्त मस्ती येत होती. 
मिलिंदा चाळीचा जिना चढणार इतक्यात त्याला हा आरडाओरडा ऐकू आला. 'तात्या' नाव ऐकल्यावर त्याच्या लक्षात आलं की चाळीतली टारगट पोरं तात्यांची मस्करी करताहेत. चाळीच्या व्हरांड्यातील बाकावर अंग चोरून बसलेले, रागानं लाल झालेले आणि पोरांची गॅंग बघून घाबरलेले, चट्ट्यापट्ट्याचा लेंगा आणि अंगात मलमलचा शर्ट घालून दात ओठ खाणारे तात्या  बघून मिलिंदाला भरून आलं. तो हळूच तात्यांकडे जाऊन म्हणाला, ''नमस्कार करतो तात्या. कालच आलो. म्हटलं चाळीत जाऊन यावं.'' तात्यांनी डोळे किलकिले करून पाहिलं आणि खेकसलेच, ''काय रे? एकदा सांगितलेलं कळत नाही का तुला? ***च्या जा इथून नाहीतर थोतरीत मारीन. यूसलेस.'' तात्या अजूनही रागातच आहेत हे पाहून मिलिंदा आणखी खालच्या आवाजात म्हणाला, ''अहो तात्या मी आहे मिलिंदा. ओळखलं नाहीत का?'' मिलिंदा नाव घेतल्यावर तात्या वरमले आणि म्हणाले, ''जोश्या का? अरे अरे. तुला नाही रे बाबा बोललो. ही नव्या भाडेकरूंची पोरं म्हणजे डुकराची पिलावळ आहे नुसती. जरा शिस्त नाही नालायकांना. मला वेडा तात्या म्हणतात. व्हरांड्यात बसून समोरच्या चाळीतल्या म्हातारीला तात्या डोळा मारतो म्हणतात. तात्याची माल कोण, गोळे आजीशिवाय आहेच कोण, असं म्हणतात रे. ते जाऊ दे. कसा आहेस बाबा? लगेच परतणार आहेस का सिंगापोरला? बरेच दिवसात गुलाबजाम काही खाल्ले नाहीत हो तुझ्या घरचे.'' 
मिलिंदाला काही सुचेना. त्याच्या डोळ्यासमोर त्यानं लहानपणी पाहिलेले तात्या तरळत होते. 
नुकतेच बी एम सी मधून रिटायर झालेले तात्या. पण काय तडफ अंगात. मिलिंदा सातवी आठवीत असेल. तेव्हापासून तो तात्यांबरोबर संघाच्या शाखेत जायचा. तात्यांचा एकुलता एक मुलगा बंडू आणि चाळीतली इतर मुलंही असायची. शाखेचं काम तात्या अगदी मनापासून करीत असत. सकाळी साडेपाच सहाच्या सुमारास बिऱ्हाडकरूंच्या थेट घरी जाऊन मुलांना उठवण्यापासून शाखा आटोपल्यावर त्यांना व्यवस्थित घरी आणून सोडणे हे काम नं कंटाळता तात्या करायचे. खाकी रंगाची हाफ चड्डी, त्यात खोचलेला पांढरा बुश शर्ट आणि डोक्यावर संघाची टिपीकल टोपी असा त्यांचा पेहराव असायचा. शिस्तही एकदम कडक. लहानग्या पोरापासून ते जख्खड म्हाताऱ्यांपर्यंत सगळे तात्यांना वचकून असायचे. कधी कुठलं व्यसन नाही, वाईट सवयी नाहीत आणि कोणाला त्रास देणं नाही. स्वतःचे कपडे स्वतः धुवायचे. आठवड्यातून तीन वेळा चाळीचा व्हरांडा स्वतः साफ करायचे. हे पाहून शेजारच्या गुप्ते काकू जाम हसायच्या आणि मिलिंदाच्या आईला म्हणायच्या, ''काय खुळचट आहे हो म्हातारा. अरे एव्हढी हौस आहे तर घंटागाडी चालव म्हणावं जाऊन. एक सांगते जोशी काकू रागावू नका पण तुम्हा ब्राम्हण लोकांना म्हातारपणी ही असली खुळं भारी चिकटतात. घरी स्वस्थ बसणार नाही तुम्ही लोक. अरे उद्या झाडताना चक्कर येऊन म्हातारा आटोपला म्हणजे आली का पंचाईत. तस्सा झाडूसकट उचलावा लागेल म्हाताऱ्याला.'' 
तात्या आटोपणाऱ्यातले नक्कीच नव्हते. चाळीतल्या बऱ्याच लोकांना पोचवल्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी होता. एकंदरीत तात्यांचा बराच रुबाब होता चाळीत. त्यांना खंत होती ती फक्त बंडूची. बंडू म्हणावं इतका किंवा तात्यांना अपेक्षित होता तितका काही शिकला नाही. जेमतेम आणि कसाबसा ग्रॅज्युएट झाला. एखादा कंप्युटर कोर्स कर म्हणून तात्या मागे लागून लागून थकले पण त्याचा काही उपयोग झाला नाही. तात्यांची खूप इच्छा होती की बंडूनं इंजिनिअर व्हावं आणि कसही करून अमेरिकेला जावं. म्हणूनच त्यानं त्याला जबरदस्तीनं सायन्सला ऍडमिशन घ्यायला लावली होती. तसा बंडू अभ्यासात हुशार होता. जबरदस्तीमुळे असेल किंवा वाईट संगतीमुळे असेल पण बंडूनं मॅट्रिकनंतर अभ्यास करायचा जवळजवळ सोडलाच होता. मुळात हुशार असल्यामुळे तो फेल वगैरे झाला नाही पण विशेष वेगळं असं त्याला काही जमलं नाही हे नक्की. 
सदासर्वकाळ बंडू नाक्यावर पडीक असायचा. हळू हळू सिगारेट ओढू लागला. सुरुवातीला लपून छपून ओढायचा पण मग मात्र चाळीच्या व्हरांड्यात अगदी तात्यांसमोरही ओढायला लागला. आता चिरंजीव समजावण्याच्या किंवा मारण्याच्या पलीकडे गेलेले आहेत हे लक्षात येऊन तात्यांनी त्याच्याशी बोलणं टाकलं. 
एक दिवस बंडूला टॅक्सीत कोणा एका मुलीच्या गळ्यात गळे घालून बसलेला तात्यांनी पाहिला आणि मग मात्र त्यांचा तोल सुटला. बंडूनं घरात पाय ठेवताच तात्यांनी त्याला फैलावर घेतला. ''काय बंडोपंत, टॅक्सीत जिच्याशी  आपण लगट करीत होतात ती सुंदरी कोण? आम्हाला निदान कळू तरी द्या. बाहेरून काही कळण्याआधी आपण सांगितलंत तर बरं होईल.'' बंडूनं जरा वेळ विचार केला आणि म्हणाला, ''तात्या उगाच जास्त त्रागा करू नका. आमचं प्रेम आहे एकमेकांवर आणि लवकरच आम्ही लग्न करणार आहोत. मी सांगणारच होतो तुम्हाला.'' तात्या उखडले आणि चढ्या आवाजात म्हणाले, ''कधी सांगणार होतास आम्ही दोघे आटोपल्यावर? अरे मूर्खा दमडी तरी कमवायची तुला अक्कल आहे का? त्या मुलीला खायला कुठून घालणार? धड नोकरी नाही. काही तरी धंदा कर म्हटलं तर 'मराठी माणूस धंदा काय करणार' असं म्हणतोस. प्रेम करायला बरं सुचलं तुला. कोण आहे कोण ही मुलगी? तिनी पण अक्कल गहाण टाकलेली दिसते तुझ्यासारखी. युसलेस. काय नाव काय तिचं?'' 
बंडू चिडला आणि त्यांनीही आवाज चढवला, ''हे बघा तात्या. आरडाओरडा करू नका. मी तुम्हाला तुमचं मत विचारलेलं नाही. मुलगी खूप चांगली आहे आणि मला आवडते. रिया फर्नांडिस नाव आहे तिचं.'' मुलीचं नाव ऐकून तात्यांची  इतका वेळ गप्प असलेली बायको रागानं लाल होऊन म्हणाली, ''अरे बेअकल्या, काय रे हे? चांगले दिवस दाखवलेस हो. काय कमी केलं रे आम्ही तुला? शिव शिव शिव... अहो आता काही खरं नाही आपलं. तोंड दाखवायला जागा ठेवली नाही नालायकांनी.'' तात्यांचा एकदम तोल गेला आणि ते म्हणाले, ''रा**च्या हे असलं काही मी जिवंत असेपर्यंत घरात चालणार नाही. बाहेर हो तू आधी. पुन्हा थोबाड दाखवू नकोस अजिबात. अरे निदान आपल्या घरी आपण कुळाचार पाळतो, देवधर्म पाळतो याची तरी लाज बाळगायची होतीस. आपलंच चुकलं ग शकू. ही असली कुळबुडवी औलाद आपल्याकडे जन्माला आली. ***च्या धर्म आणि नाव बदलून आलास की नाही चर्चात जाऊन. अरे बाटग्या कुठे फेडशील हे पाप?'' 
असं म्हण्टल्यावर बंडूला काय झालं कोणास ठाऊक. त्याच्या डोक्यात जोरदार सणक गेली आणि सरळ पुढे जाऊन त्यानं तात्यांच्या श्रीमुखात भडकावली. बाप रे हे काय झालं आपल्या हातून? रागाच्या भरात आपण हे काय केलं? असे विचार बंडूच्या मनात येत होते खरे, पण गोष्ट तर घडून गेली होती. महत्त्वाचं म्हणजे चाळीतल्या व्हरांड्यात लोकांच्या समोर ही गोष्ट घडली होती. आत्यंतिक रागानं तात्यांचं ब्लड प्रेशर वाढून त्यांना हाय बीपीचा ऍटॅक आला आणि ते कोसळले. शेजारी पाजारी आले आणि त्यानं तात्यांना उचलून ताबडतोब पुढच्या गल्लीतल्या डॉक्टरकडे नेले. झाला प्रकार पाहून तात्यांची बायको धाय मोकलून रडत होती. मध्येच बंडूकडे पाहून  रडणं थांबवून ती म्हणाली, ''मी नाही हं बाळा. कोणी केलं? बाबांनी. बाबांना आपण शिक्षा करू हं. बाबा वेडे. हो नं बाळ. शहाणा माझा बाळ तो......अरे खुन्या. मारलंन हो या माणसानं तात्यांना. बंडू, अरे धर याला धर. नीच माणसा. तुझ्या बाबांना मारलं रे बंड्या...'' बंडू आईला आधार द्यायला पुढे आला आणि आई त्याला काही बोलणारच इतक्यात भीतीनं तिची दातखीळ बसली. तोंडाला फेस आला. तात्यांच्या बायकोचं बोलणं ऐकून तिला वेडाचा झटका आला आहे हे चाळकऱ्यांच्या लक्षात आलं. 
झाल्या प्रकारानंतर तात्यांच्या बायकोची रवानगी येरवड्याच्या मेंटलला करावी लागली. दोनेक आठवड्यानंतर येरवड्याहून बायको निवर्तल्याची बातमी आली. तोपर्यंत तात्या दवाखान्यातच ऍडमिट होते. बायकोची बातमी कळल्यावर अत्यंत शोकाकुल झालेले तात्या दवाखान्यातून घरी आले पण ते पूर्वीचे तात्या राहिले नव्हते. जगण्यातला त्यांचा इंटरेस्ट संपल्यातच जमा होता. आई वारल्यावर आणि तात्या दवाखान्यातून घरी येण्याआधी बंडूनं स्वतःचे शुभमंगल उरकून घेतले. शेजाऱ्यांनी त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. अरे तात्यांना निदान घरी तरी येऊ दे. थोडा धीर धर. अजून आईचा बारावा तेरावासुद्धा झालेला नाही. बऱ्याच पद्धतींनी शेजाऱ्यांनी प्रयत्न केला. त्यावर बंडूनं उत्तर दिलं, ''अहो जाणारी गेली. तात्या आज नाही तर उद्या येणारच आहेत परत. मला तसाही बारावा तेरावा कशाचा विधिनिषेध नाही. माणूस गेल्यावर काय उरतं? काही नाही.'' असं म्हण्टल्यावर प्रश्नच मिटला. शेवटी रिया फर्नांडिस तात्यांची सून झाली. 
या सगळ्या प्रकाराचा तात्यांना मानसिक त्रास फार झाला. स्वभाव चिडचिडा होत चालला होता. येणाऱ्या जाणाऱ्याला उगाचच ते दम द्यायचे. लहान मुलं खेळायला, दंगा करायला लागली की सारखं थोतरीत मारीन, चामडी लोळवीन एकेकाची असं म्हणायचे. स्वाभाविकच त्यांच्या अशा वागण्याचा परिणाम शारीरिक स्वास्थ्यावर होऊ लागला. तब्येत खचत चालली होती. एका बसणीत मिलिंदाच्या आईनं केलेले (प्युअर खव्याचे) बारा पंधरा गुलाबजाम पैज मारून खाऊन दाखवणारे तात्या एखादी जिलबी खाल्ल्यावर दिवसातून तीन चार वेळा परसाकडे जाऊ लागले. त्यांचे वेळी अवेळी परसाकडे जाणे हा देखील चाळीत चेष्टेचा विषय झाला. सणासुदीला थोडं जास्त खाल्ल्यावर अपचनामुळे तात्या संडासाकडे जायला निघाले की लोक विचारायचे, ''काय तात्या, पुरणपोळ्या जास्त झाल्या ना? खायचं कशाला पचत नाही तर.'' 
सख्खे शेजारी असल्यामुळे मिलिंदाच्या घरी तात्यांचं येणं जाणं पहिल्यापासून होतं. मिलिंदा फारसा हुशार नसतानाही मेहनतीनं कसा मोठा झाला याचं तात्या भरभरून कौतुक करीत असत. बायको गेल्यावर तात्या एकदा मिलिंदाच्या वडिलांना म्हणाले होते, ''बाळू, तुमच्याकडे पाहून जिवंत आहे रे बाबा मी. तू आणि तुझ्या बायकोनं सख्खे करणार नाहीत इतकं केलंत माझ्यासाठी. पैशाची मला काळजी नाही रे. पेन्शन आहे चांगलं मला. फक्त मला एकटा सोडू नको रे बाळू. हे एकटेपण फार वाईट आहे. लोक मला वेडा म्हणतात पण मी वेडा नाही रे. हतबल आहे.'' मिलिंदा मोठा झाल्यावर जोशी कुटुंब नाईकवाडितल्या नव्या कॉंप्लेक्समध्ये शिफ्ट झाले. जोशी निरोप घ्यायला आल्यावर तात्यांना दु:ख आवरेना. एका डोळ्यात मोतीबिंदू झाल्यामुळे त्यांना नीट दिसायचं नाही. त्यांच्या किलकिल्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होतं. ''जोश्या, अरे तुझ्या बापानं खूप प्रेम केलं हो आमच्यावर. बाळू, आमच्या हिनं खूप प्रयत्न केला बरं का तुझ्या बायकोसारखे गुलाबजाम करायचा. एकदा केले होतेन बरं का प्रभे तुझ्यासारखे गुलाबजाम हिनं, आठवतंय ना? लक्षात ठेव बरं पोरी. विसरू नकोस. जोश्यांची सून तू. पण आम्ही आमची मुलगी मानली बरं तुला. खरंच एखादी मुलगी असायला हवी होती गं.'' तात्यांना अश्रू आवरेनात. कसेबसे डोळे पुसून तात्या म्हणाले, ''चला ठीक आहे. कोण कोणासाठी थांबत नाही आणि थांबूही नये. ही कुठे थांबली माझ्यासाठी? जे जवळ आहेत ते नसते तर बरं झालं असतं असं वाटतं. जाऊ दे. त्याला इलाज नाही. येत जा रे पण बाळू. एक गोष्ट लक्षात ठेव, मी मेल्यावर माझा बारावा तेरावा सगळं करा बरं का जमलं तर. कावळा शिवत नसेल तर प्रभीच्या हातचे दोन मोठे गुलाबजाम आणून ठेवा पानावर. नक्की शिवेल. हा.. हा...हा ... हा... सुखी व्हा. आनंदानं राहा.'' जोशी जायला म्हणून वळले होते पण मिलिंदाला तात्यांचे शब्द परत ऐकू आले. ते स्वतःशीच बोलत होते. 'मुलगी हवी होती हो. एक मुलगी खरंच हवी होती.....'
आज पुन्हा एकदा मिलिंदानं तात्यांना पाहिलं आणि अडवण्याचा खूप प्रयत्न करून देखील त्याच्या डोळ्यात पाणी आलंच. रडत रडतच तो तात्यांना म्हणाला, ''काय ही अवस्था तात्या. आज चांगला पाडव्याचा दिवस. नवीन कपडे नाहीत. दाढी झालेली नाही. मागे एकदा पाडव्याला मी दाढी वाढवली होती म्हणून काय दम दिला होतात तुम्ही मला. दाढी करून ये नाहीतर मीच करतो तुझी दाढी असं म्हणाला होतात. मग आता मी करून देऊ का दाढी तुमची?'' तात्यांचे डोळे भरून आले आणि ते म्हणाले, ''नको रे आता काय करू हजामत करून. आजवर कधी चुकवली नाही हजामत. पण आपल्याच माणसानं अशी काही हजामत केली की मरता मरण येत नाही आणि जगण्याची इच्छा तर मुळीच नाही.'' एकदम कसली तरी आठवण होऊन मिलिंदा म्हणाला, ''डबा पाहिलात का? ओळखा बरं काय आहे ते?'' ऐंशीव्या वर्षी सुद्धा तात्यांनी आनंदानं जोरदार टाळी वाजवली आणि म्हणाले, ''प्रभीनी गुलाबजाम पाठवलेत ना. उघड उघड. लगेच खाऊया. पैज लावतोस काय जोश्या?'' एकेक गुलाबजाम खायला तात्यांनी आणि मिलिंदानं सुरुवात केली. खोलीच्या बंद दरवाज्याकडे पाहून मिलिंदानं विचारलं, ''तात्या, घरी कोणी नाही वाटतं? दिवे तर दिसताहेत. थांबा मी बघतो.'' मिलिंदा उठून खोलीकडे जाऊ लागला. तात्यांच्या काळजात एकदम धस्स झालं. आता काही खरं नाही असं त्यांना वाटलं. ते मिलिंदाला अडवणार इतक्यात तो दारापाशीच थांबला. तात्या मागून थांब थांब ओरडत होते. मिलिंदा दारावर काहीतरी पाहून तसाच मागे फिरला. काय बोलावं त्याला कळेना. तात्यांच्या हातातला गुलाबजाम तसाच होता. मिलिंदानं धीर करून विचारलं, ''नक्की काय प्रकार आहे तात्या? कोणाच्या नावाची पाटी आहे दारावर? कोण हा गिलबर्ट फर्नांडिस? नवीन आहे का भाडेकरू कोणी? मग बंडू आणि त्याची बायको कुठे आहे?'' तात्यांनी गुलाबजाम डब्यात टाकला आणि रागानं लालेलाल होऊन थरथरत म्हणाले, ''अरे रा**चा, धर्मबुडव्या बंडूच आहे आतमध्ये त्याच्या किरिस्तांव बायको बरोबर.'' सगळ्या प्रकारांनी दम लागलेले तात्या एकदम खाली बसले. 
मिलिंदाच्या लक्षात आलं. 'गणेश  केशव करंदीकर ऊर्फ बंडूचा' चा 'गिलबर्ट फर्नांडिस' झाला होता. सुन्न होऊन मिलिंदा तात्यांकडे पाहत होता. तात्या कसेबसे उठून म्हणाले, ''असं आहे हे सगळं.  काय सांगणार आणि कसं सांगणार तुला. बंडू किरिस्तांव झाल्यावर त्याला नोकरी आणि छोकरी दोन्ही गोष्टी मिळाल्या. तेव्हापासून सगळे सण वार बंद. आमची आणि देवांची रवानगी व्हरांड्यात. काय करायचं? आता एक कर मिलिंदा, हे देव घेऊन जा तुझ्या घरी. माझ्याच्याने आता होत नाही रे. वरची वाट पाहत आणि स्वतःला वेडा म्हणवून घेण्यापलीकडे माझ्या हाती आता काहीही उरलेलं नाही.'' कडी असलेला डालडाचा डबा घेऊन लगबगीनं तात्या उठले आणि म्हणाले, ''जोश्या, दोन गुलाबजामच्या वर आता सोसत नाही. जाऊन आलो मी. '' असं म्हणून तात्या धडपडत परसाकडला निघून गेले. जाताना त्यांचा पाय गुलाबजामच्या डब्याला लागला आणि डबा आडवा झाला. 
गुलाबजामचा पाक जिन्यापर्यंत जाऊन पोहोचला होता.........      
(संपादित : प्रशासक)