गहाण

प्रारब्ध हे असे का सुजाण माणसांचे
भयभीत चेहरा का निशाण माणसांचे


स्पर्धेत जीवघेण्या बने विवेक धोंडा
पडले विचार सारे गहाण माणसांचे


वाऱ्यास पाठ आहे, प्रवाहशरण झालो
घटले स्वतंत्रमार्गी प्रमाण माणसांचे


बंदूक लेखणी अन् जहाल शब्द गोळी
खेळू शिकार, बांधा मचाण माणसांचे


गरजेविना न करती शिकार सावजाची
लागो जनावरांना न वाण माणसांचे


सोडून मंदिराला कधीच देव गेला
ऐके तरी किती तो पुराण माणसांचे


हरवून वाट गेली, गहाळ धृव तारा
नाही, मिलिंद, उरले ठिकाण माणसांचे