सचिन भारतरत्न पुरस्कारासाठी योग्य आहे, पण..

सचिनला भारतरत्न मिळाला पाहिजे या मताचा मी आहे. तो पुरस्कार त्याला द्विशतकागोदर मिळाला असता तरी काहीच हरकत नव्हती पण सचिनला हा मानाचा पुरस्कार मिळालाच पाहिजे हे अगदी हिरीरीने मांडणारे अनेक राजकारणी, समाजकारणी, चित्रपट नामवंत आणि आम जनतेला हॉकीचा जादुगार ध्यान चंद, चेसचा चमत्कारिक विश्वनाथन आनंद, टेनिसमध्ये ऑलिंपीकपर्यंत झेंडा फडकवून आलेला लिअँडर पेस यांचा सोयीस्कर विसर कसा पडू शकतो याचे नवल वाटते. खेळाबाबत इतका संकुचित दृष्टिकोन भारताखेरीज कुठे असेल तर मला जाणून घ्यायला आवडेल.वरती सांगितल्याप्रमाणे ध्यान चंद, आनंद आणि पेस यांचे सुद्धा योगदान तेवढेच मोलाचे जेवढे सचिनचे आहे, पण कोण विचार करतो? खरं तर हॉकीचे सामने बघायला मी जाणार आहे, तुम्ही पण जा, तोंडाला रंग फासा आणि चिअर करा, हे जेव्हा हॉकीव्यतिरिक्त खेळाडूंनी जाहिरातीतून बोंबलून सांगावे लागते तेव्हाच या देशातील खेळाचे (क्रिकेट सोडून) दशावतार समोर येतात.