ते दिवस...

दुडू दुडू चालणारं, बोबडं बोबडं बोलणारं कुणीतरी येणार याची चाहूल लागली आणि आम्ही उभयता आनंदाने हुरखून गेलो. आलेला प्रत्येक दिवस नवी नवी स्वप्ने पाहण्यात, रंगवण्यात जाऊ लागला. तो इवलासा जीव... त्याच्याशी गप्पा मारण सुरू झालं. आम्हा दोघांबरोबरच घरातले सगळेच नव्या पाहुण्याच्या स्वागताला सज्ज झाले. डॉक्टरांकडे नियमीत जाणं, खाण्या-पिण्यातलं पथ्यपाणी आणि महत्त्वाचं म्हणजे तृप्तीचे लाडं... अस सुरू झालं. दिवसागणिक होणारी पोटाची वाढ, त्यानुसार होणाऱ्या हालचाली, वात्सल्याच्या भावना या सर्वांनी तृप्ती खरोखरच तृप्त दिसू लागली. छान-छान सोनुल्यांच्या चित्रांनी घराच्या सर्व भिंती व्यापल्या. गरोदरपणात घ्यायच्या काळज्या याबद्दल एकलेल्या-वाचलेल्या सर्व गोष्टी आमचा दिनक्रम व्यापून टाकू लागल्या. पोटावर हात ठेवून आमच्या गोजिरवाण्याच्या हालचाली टिपण्याचा आणि प्रत्येक हालचालीत काहीतरी नवीन गवसण्याचा जणू काही छंदच आम्हाला जडला. बाळाच्या आगमनाची काय काय तयारी करायची, नाव काय ठेवायचे, गुटी द्यायची की नाही या व अशा असंख्य गोष्टींचा विचार कमी... चर्चाच जास्त सुरू झाल्या. दिवसांवर दिवस कसे चटकन पुढे सरकत होते. छान छान पदार्थ तृप्तीला आणि 'होणारा बाबा' म्हणून मलासुद्धा खायला मिळत होते. डॉक्टरांनी सांगितलेल्या सगळ्या चाचण्या व्यवस्थित पार पडत होत्या. सर्व चाचण्या बाळाची छान वाढ दर्शवत होत्या. बघता बघता हे आनंदाचे, उत्साहाचे सहा महिने पुर्ण झाले. सातव्या महिन्यात होणाऱ्या डोहाळजेवणाच्या तारखा ठरू लागल्या

नेहमीप्रमाणे ठरलेल्या दिवशी आम्ही डॉक्टरांकडे तपासणीला गेलो. तपासण्या झाल्या, सोनोग्राफी झाली. सोनोग्राफी दरम्यान बाळाची गर्भात होणारी वाढ पाहिली आणि कधी या चिमुकल्याला आपल्या हातात धरून हृदयाशी कवटाळतो असं झालं. पण...... कुठेतरी 'पक्वांनाच्या घासात मिठाचा खडा यावा' तसं झालं. डॉक्टरानीं सोनोग्राफीचा सारांश बघितला आणि सांगितलं की बाळाच्या पोटाची वाढ व्यवस्थित झालेली दिसत नाहीये. यामुळे जन्मल्याजन्मल्या अन्ननलिकेच्या काही समस्या असू शकतात. अन्ननलिका श्वासनलिकेला जोडलेली राहून खाल्लेले अन्न श्वासनलिकेत जावू शकते. श्वासावर तर सगळं जीवन अवलंबून... या समस्येमुळे बाळाल श्वासही नीट घेता येणार नाही. यासाठी जन्मल्याजन्मल्या लगेचच बाळावर शस्त्रक्रिया करावी लागू शकते. क्षणभर पायाखालची जमीनच सरकली. मन सुन्न, बधीर झालं. घसा कोरडा पडला, तोंडातून एक शब्दही बाहेर पडेना. त्या चिमुकल्या जिवावर शस्त्रक्रिया... तेही जन्मताच...? अरे तो जीव आजून या जगातही आलेला नाहीये आणि त्याआधीच त्याच्यावर शस्त्रक्रियेची गरज? मन सैरभैर झालं. तृप्तीचीही अवस्था माझ्याहून वेगळी नव्हती. दोघांनीही कसेबसे अश्रू आवरून धरले होते. डॉक्टर पुढे काय सांगतायत ते फक्त शब्द कानावर पडत होते. पण संवेदनाच गोठून गेल्याने अर्थ काहीच समजत नव्हता. पुन्हापुन्हा डॉक्टरांना विचारून खात्री करून घेत होतो. या सर्वात कुठेतरी एक आशेचा किरण म्हणजे ही 'शक्यता' होती कारण बाळाची गर्भात अजून तीन महिने वाढ व्हायची होती. पण जे ऐकल ते शहारून टाकणार नक्कीच होतं.

एकमेकांचा आधार घेत इस्पितळाच्या बाहेर पडलो. तेवढ्यात चुलत भावाचा फोन आला. 'कुठं आहात' चौकशीअंती समजले की तो जवळच होता आणि काकूने सुनेसाठी खास नाचणीचे लाडू पाठवले होते ते द्यायला तो भेटणार होता. जवळच असल्याने तेथेच भेटायचे ठरले. नुकत्याच बसलेल्या जबरदस्त धक्क्याने तो भेटला तरी त्याच्याशी नीट बोलता आलं नाही. तो काही बोलला नाही, पण त्यालाही आमचं वागणं विचित्रच वाटलं असणार. नेहमी हसतखेळत बोलणारे, मस्त गप्पा मारणारे, मजा-मस्करी करणारे दादा वहिनी आज असे गप्पगप्प का? लवकर बोलणं आटोपून, त्याचा निरोप घेऊन घराकडे निघालो. जाताना गाडीत निरव शांतता होती. दोघंही 'काय? ' बोलायच याच विचारात. डोळ्यात परत परत जमा होणारे अश्रू मोठ्या मुष्किलीने परतवत गाडी चालवत होतो. तृप्तीचा चेहराच तिची मानसिक अवस्था सांगून जात होता. कसबसं घरी पोचलो... पलंगावर टेकताच दोघांचाही धरून ठेवलेला बांध फुटला आणि आम्ही एकमेकांच्या कुशीत अश्रूंना वाट करून देऊ लागलो. मनात असंख्य प्रश्न उफाळून वर येत होते... 'आपल्याच बाबतित का? ', 'का देव आपली अशी परिक्षा घेतोय? ', 'आपण काय कुणाच वाईट केलय? '... एक ना दोन अशा असंख्य विचारांचं काहूर मनात माजल. मी, तृप्ती आणि आमचं पिलू एकमेकांशी स्पर्शातून मूक संवाद साधत होतो. अश्रूंनातर कुठे विश्रामच नव्हता. घरात आम्ही दोघचं... बाबा नुकतेच नगरला काही दिवसांसाठी गेलेले. मन तर सावरायलाच तयार नाही. किती वेळ गेला ठाऊक नाही, पण आता कसबस आम्ही एकमेकांना समजवायला सुरुवात केली होती. थोडं मन शांत झालं होतं. मग आम्ही दुसऱ्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायच ठरवलं. लगेच त्यांना भेटलोही, पण सोनोग्राफी चाचणीतून दिसण्याऱ्या म्हणजे १००% तसच होणार अस काही नाही हा दिलासा मिळाला. पण जर अस काही असेल तर शस्त्रक्रिया करावी लागेल हे मात्र त्यांनीही मान्य केलं. कुठेतरी खोल जखम व्हावी आणि ती सारखी ठसठसत राहावी अस सगळ घडत होतं. सासर जवळच होत. आई-बाबांना या गोष्टीची कल्पना द्यावी म्हणून तिथं गेलो. आमच्या दोघांचे उतरलेले चेहेरे पाहूनच दोघांनाही कल्पना आली की काहीतरी बिनसलंय. कसेबसे शब्द गोळा करत दोघांनाही सगळं सांगितलं. दोघांनाही धक्का बसला, पण दोघांनीही आम्हाला खूप धीर दिला. आईंनीतर 'अस काही होणारच नाही' असा ठाम विश्वास प्रकट केला. त्या दोघांशी बोलल्यावर खुपच धीर आला आणि या प्रसंगाला तोंड देण्याच मानसिक बंळ मिळालं. रात्री उशिरा घरी आलो. अंथरुणावर पाठ टेकली, पण झोप लागणं शक्यच नव्हतं. तृप्तीपण बरीच अस्वस्थ होती. सकाळी उठून तयारी करू लागलो, पण मी कामावर जाताना तृप्तीला एकटं घरी सोडणं शक्यच नव्हत. मग तिला जाताजाता सासरीच सोडलं. कार्यालयात जाऊन दोनच तास झाले नसतील तोच तृप्तीचा फोन आला. काहीतरी वेगळं वाटतय म्हणून डॉक्टरांकडे आईबरोबर जाऊन येते म्हणाली. नंतर लगेच अर्ध्या तासात परत फोन की तू पण लगेच इस्पितळपळात ये. त्या दोघी तिथेच आहेत आणि डॉक्टरांनी ताबडतोब भरती व्हायला सांगितलेय. धावतपळत पोचलो तर प्रसूती शस्त्रक्रिया करून लगेच करावी लागेल अस समजल. डॉक्टरांना भेटलो, म्हणालो, 'आहो, आत्ताशी सहा महिने पूर्ण झालेत, बाळाची तीन महिने वाढ बाकी आहे. प्रसूती आत्ताच का करावी लागतेय? बाळाच्या पोटाच्या वाढीच काय? जन्मल्यावर बाळाची शस्त्रक्रिया करावी लागणार का? असंख्य प्रश्न... प्रश्न... आणि प्रश्न... पण घडायच असेल तर घडणांर टळत नाही अस म्हणतात. शेवटी प्रसूती शस्त्रक्रियेद्वारे करायच ठरलं. या सर्व धावपळीत तृप्तीला भेटलोच नव्हतो. तिला आधीच शस्त्रक्रियेच्या तयारीसाठी त्या विभागात नेलं होतं. तिला भेटायला आत गेलो. नजरेला नजर भिडताच डोळेच काय ते बोलून गेले. टचकन दोघांच्या डोळ्यांत अश्रू तराळले. कसबसं एकमेकांना सावरलं आणि आता दुसरा काही विचार करण्याऎवजी आल्या परिस्थितीला सामोरं जायचं ठरवलं. तिच्या पोटावर हात ठेवून आमच्या पिलाला म्हणालो, " बाळा... ये... तुझं स्वागत करायला आम्ही सगळे आलोय. " लवकरच शत्रक्रिया सुरू झाली. बाहेर मी, सासूबाई, आजेसासूबाई आणि धावत इस्पितळात पोचलेली काकू आणि सासरे पुढच्या वार्तेची वाट पाहू लागलो. थोडयाच वेळात डॉक्टरांनी सर्वांना आत बोलावल. आमचं 'चिमूकलं' या जगात आल होतं. काचेच्या पेटीत (इनक्यूबेटर) तो इवलासा जीव रडत होता. जणूकाही आपल्या आईपासून आपल्याला दूर केलय हे त्याला समजलं होत. डॉक्टरांनी जराही वेळ न दडवता सांगितलं की आपल्याला शंका होती ती पोटाची - अन्ननलिकेची समस्या नाहीये आणि शस्त्रक्रिया वगैरे काहीही करावं लागणार नाहीये. त्याक्षणी मणा-मणाचं ओझ डोक्यावरून उतरल्यासारखं वाटलं. बाळ सातव्या महिन्यात जन्मल्यामुळे अजून त्याची बरीचशी वाढ व्हायची होती. फुफ्फुसं अजून त्यांच्या क्षमतेप्रमाणे काम करत नव्हती. वजनही जेमतेम १ किलो होतं. त्यामुळे बाळाला लगेचच 'निओनेटल आय. सी. यू. - नवजात बालक अतिदक्षता विभाग' मध्ये हलवणं गरजेचं होतं. रुग्णवाहिका तयारच होती. क्षणाचाही वेळ न दडवता बाळाला ताबडतोब अतिदक्षता विभागात... मात्र दुसऱ्या इस्पितळात हलवलं. मनात द्रुढनिश्चय केला की आता ही लढाई लढायची आणि जिंकायची सुद्धा...! बाळाबरोबर जायची खुप इच्छा असूनही तृप्तीला भेटल्याशिवाय पाय निघत नव्हता. मग सासरे पटकन बाळाबरोबर गेले. आपलं बाळ जन्मला आलं म्हणून एकिकडे चेहऱ्यावर हसू आणि या सगळ्या प्रसंगातून जाव लागल्यामुळे डोळ्यात आसू अशी अवस्था होती. काकूने "अरे, आता तू बाबा झालास... अभिनंदन...! " हे एकतानाही डोळे मात्र जडावलेलेच होते. थोडयाच वेळात तृप्तीला खाजगी खोलीत हलवलं गेलं. ती अर्धवट गुंगीत होती. चेहऱ्यावर कष्ट स्पष्टपणे दिसत होते. एकमेकांचा हात हातात घेवून आमची नजरानजर झाली. तिला व्यवस्थित बघून, थोडा दिलासा देऊन तडक दुसऱ्या इस्पितळात निघालो. पिलू कसं असेल म्हणून मनाची उलाघाल सुरू होती. बालरुग्ण विभाग, एन. आय. सी. यू. पाशी पोचलो. डॉक्टरांना भेटलो. त्यांनी अगदी व्यवस्थित माहिती दिली. पण एन. आय. सी. यू. मध्ये जायची परवानगी नव्हती. त्यामुळे मन बेचैन होतं. एन. आय. सी. यू. मध्ये बाळ प्रथम आल्यानंतर त्याची ओळखखूण म्हणून त्याच्या पायांचे ठसे घेतात. फक्त तेव्हा साक्षीदार म्हणून मला एन. आय. सी. यू. त २-३ मिनिटे जायला परवानगी होती. एन. आय. सी. यू. त जायच्या कडक नियमांचे पालन करून, हातांची व्यवस्थित स्वच्छता करून, आत गेलो. बाळ दिसताच मला झालेला आनंद कोणत्या शब्दात व्यक्त करू? पण बिचारं आपल्या आईबाबांपासून दूर मलूल होवून कह्णत रडत होतं. त्याची फुफ्फुस अजून पूर्ण विकसित न झाल्याने त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता आणि म्हणूनच ते कह्णल्यासारखे रडत होतं. ऑक्सिजन हूड मधून ऑक्सिजन देणं सुरू होतं. एव्हाना बऱ्याच नळ्या त्याच्या अंगाला चिकटवल्या होत्या. या नळ्यांद्वारे वेगवेगळ्या गोष्टींवर यंत्राद्वारे निरिक्षण ठेवणे सुरू होतं. आपल्याच इवल्याश्या बाळाची ती अवस्था बघवत नव्हती. गलबललेल्या मनानेच त्याच्याशी संवाद साधला. तो गर्भात असताना जशा त्याच्याशी गप्पा मारायचो तशा गप्पा मारल्या. वेडी आशा की त्याला आपला बाबा जवळ आहे असे वाटेल. कुणास ठाऊक त्याला बाबाची हाक ऐकू आली असेल की नाही? एन. आय. सी. यू. मध्ये बाळांची काळजी घेणाऱ्या शशिकला सिस्टरनी खुप दिलासा दिला. तुमच्या बाळाची आम्ही व्यवस्थित काळजी घेवू म्हणाल्या. जड अंत:करणाने एन. आय. सी. यू. च्या बाहेर आलो. डॉक्टर, सिस्टर यांच्याशी बोलण्यातून विश्वास मिळाला की आपलं पिलू योग्य हातात आहे. ९ महिने गर्भारपणापेक्षा आधी जन्मलेल्या बाळांच्या फुफ्फुसाचे काम व्यवस्थित सुरू होणे श्वासोश्वासासाठी खुप महत्त्वाचे असते. यासाठी अशा बाळांना 'सरफेक्टंट' औषध जन्मल्यापासून लवकरात लवकर दिले जाते. हे खुप महाग औषध असल्यामुळे आणि फक्त अशा बाळांनाच दिले जात असल्यामुळे ते सहसा कुठल्या औषध दुकानात उपलब्ध नसते. पण आमची गरज लक्षात घेता इस्पितळातल्याच औषधालयाने झटपट हालचाली करून ते मिळवले आणि त्यामुळे ते वेळेवर बाळाला दिले गेले. याबरोबरच इतर औषधांची व्यवस्था करून, दाखल्याच्या कागदपत्रांची पूर्तता करून तृप्तीकडे परतलो. माझ्या बाळासारखाच मलूल, दमलेल्या चेहऱ्याने ती माझी आतूरतेने वाट पाहत होती. आपल्या बाळाची ख्यालीखुशाली समजून घ्यायला उत्सुक होती. बऱ्याच धावपळीनंतर तिच्याशेजारी शांतपणे बसलो. तिचा हात हातात घेवून तिला सगळं सांगितलं. मगच ती जरा शांत झाली. खरच... कसे काढले असतील हे ४-५ तास तिनं? आत्तापर्यंत माझे बाबापणं नगरहून पुण्यात पोचले होते. बिचारे तब्येत बरी नसताना आपल्या लेकसुनेसाठी आणि नातवासाठी धावतपळत आले होते.

आता तृप्तीला खाजगी खोलीत हलवले होते. तिचा निरोप घेऊन, तिला तिच्या आईच्या ताब्यात देऊन, मी एन. आय. सी. यू. ला पोचलो. बाळ व्यवस्थित होतं. ज्याला जन्मल्याजन्मल्या आईच दूध मिळायला हव होत, ते मात्र सलाईनच्या सुयांमधून आणि नाळेमधून औषधं घेत होतं. काय गंमत आहे नाही? आता रात्रीचे ११ वाजत आले होते. मग एन. आय. सी. यू. पाशीच एक सतरंगीवर पाठ टेकली. शरीर आणि मन या सगळ्या धावपळीत अगदी शिणून गेलं होतं. पण डोळे मात्र मिटायचं नाव घेत नव्हते. कालपासूनचे सगळे प्रसंग डोळ्यासमोर तरळून जात होते. तिकडे तृप्तीचीही अवस्था याहून वेगळी नव्हती. रात्री पुन्हा एकदा औषधं आणावी लागली. ती सिस्टरकडे सुपूर्त करून परत झोपलो. कधीतरी मध्यरात्री डोळा लागला. मनात 'आता पुढे काय? ', 'किती दिवस एन. आय. सी. यू.? ', असे सगळे विचार घोंघावत होते. एकीकडे कान तल्लखपणे कुणी आपल्याला हाक मारतय का याकडे लक्ष ठेवून होते... कोण जाणे काही अचानक झालं तर?

दुसऱ्या दिवशी सकाळी ६. ३० वाजताच बालरोगतज्ञ आले. बाळाची तपासणी केली, पण लगेच काही सांगता येत नाही म्हणाले. 'ये लंबी लडाई होगी' असाच थोडक्यात संदेश त्यांनी दिला. आता बाळ एन. आय. सी. यू. मध्ये एका इस्पितळात आणि तृप्ती दुसऱ्या इस्पितळात... असा दोन्ही डगरींवर तोल सावरणं सुरू झालं. दुसरा दिवस तसा पटकन सरला. तृप्तीबरोबर त्या रात्री इस्पितळात राहिलो. तिची शस्त्रक्रिया होऊन फक्त एक दिवस झाला होता, वेदना होत होत्या, पण तरीही माझ्याशी बोलायचं होतं. बाळ कसं आहे?, कसं दिसतय?... सगळं सगळं जाणून घ्यायच होतं. दोन दिवस काय काय घडलय ते ऐकायच होत. मध्येच 'मला ने ना रे माझ्या बाळाला पहायला... ' अशा विनवण्याही सुरू होत्या. तिच्याशी बोलत होतो, तिला समजावत होतो, स्वत:चीही समजूत घालत होतो. अशातच पहाटे ६ वाजताच एन. आय. सी. यू. मधून फोन आला की लवकर या. तृप्तीला कसंबसं समजावून, तिच्या आईला फोन करून, तिची आई येईपर्यंत तिला एकटीलाच सोडून एन. आय. सी. यू. ला धावलो... आता काय समोर वाढून ठेवलय? हा प्रश्न मनात घेवून. ज्याची भीती होती असच काहीसं घडलं होत. अशा अपरिपुर्ण बाळांमध्ये ज्या तीन मोठ्या गुंतागुंती होऊ शकतात, त्यापैकी एक 'पलमनरी हॅमरेज' (फुफ्फुसाशी निगडीत) आमच्या बाळाला पहाटे ४ वाजता झालं होतं. क्षणभर त्याचा श्वास, हृदयाचे ठोके आणि नाडी थांबले होते. डॉक्टरांनी पटकन काही झटपट उपाययोजना केल्याने बाळ वाचलं होतं, पण आता ते स्वत:चा स्वत: श्वास घेऊ शकत नव्हत. त्यामुळे अपरिहार्य असं व्हेंटिलेटर त्याला लावल होत. हा खुप मोठा धक्का होता. ऐकून क्षणभर सुन्नच झालो. डॉक्टरांनी काय काय उपाय करून बाळाला वाचवलय ते कळाल्यावर तर पुढचा मार्ग किती खडतर आहे याचीही जाणिव झाली. यक्षप्रश्न असा होता की शस्त्रक्रियेनंतर सुधारण्याऱ्या तृप्तीला काय सांगायच? काहीच सुचत नव्हतं. त्यातच तृप्तीचा फोन आला, कसबस औषध हवी होती म्हणून बोलावल अस सांगून वेळ मारून नेली. पहाटे ६ ला निघालेलो थेट मध्यान्हीला तृप्तीपाशी पोचलो. ही सर्व हकिकत तिला सांगण... वा मला सांगता येणं शक्यच नव्हत. बराच धीर करून, बराचसा अभिनय करून, चेहऱ्यावरचे हावभाव ताब्यात ठेवून तिला समजावलं. थोडावेळ तिच्याबरोबर घालवून परत एन. आय. सी. यू. पाशी आलो. 'पुढे काय? ' काहीच सुचत नव्हत. मख्ख चेहऱ्याने जिन्याच्या पायऱ्यांवर कितीतरी वेळ बसून होतो. अशातच काही बालरूग्णांच्या पालकांशी ओळख झाली, एकेमेकांची व्यथा वाटली गेली... थोडं मन शांत व्हायला मदत झाली.

पुढचा दिवस उजाडला पण माझ्या बाळाच्या आयुष्यात मात्र अजून उजेड दिसत नव्हता. शक्य होते ते सगळे उपाय चालू होते. त्याच व्हेंटिलेटर निघण आणि त्यान स्वत: श्वास घेण चालू करणं त्याच्या जगण्यासाठी आवश्यक होत. आता मी माहिती महाजालावर या सगळ्या गुंतागुंतींची माहिती मिळवायला, वाचायला सुरूवात केली. तेव्हा लक्षात आलं की आपल्यापेक्षा आपल्या पिलाला किती मोठा लढा द्यायचाय. मनात दृढनिश्चय तर होताच, पण त्याबरोबर ईश्वाराची प्रार्थनाही सुरू होती. २-३ दिवस सरले आणि आता तृप्ती इस्पितळातून घरी परतणार होती, पण घरी जाण्याआधी तिला बाळाला बघायच होत. हा एक मोठा बाका प्रसंग होता. बाळ तर साक्षात मृत्यूशी लढा देत होत. एवढ्याश्या त्या शरीरावर व्हेंटिलेटर, सलाइन, वेगवेगळ्या देखरेखीसाठीच्या नळ्या लागल्या होत्या. तान्ह्या बाळानां जन्मल्यानंतर २-३ दिवसात काविळ व्हायची शक्यता असते. ही शक्यता टाळण्यासाठी, म्हणजेच 'बिलीरूबीन' हा घटक नियंत्रणात ठेवण्यासाठी बाळांना निळ्या प्रकाशासाठी ठेवले जाते. आमच बाळही अशा प्रकाशात ठेवल होत. त्या प्रकाशाचा डोळ्यांवर परिणाम होऊ नये म्हणून त्याच्या डोळ्यांवर कापडी पट्टी ठेवली होती. ही पट्टी, व्हेंटिलेटर, ऑक्सिजनच्या नळ्या, तापमान नियंत्रक नळी या सगळ्यांमध्ये तो तळहाताएवढा जीव, त्याहून छोटासा त्याचा चेहरा, पार झाकून गेला होता. बाळ अशा अवस्थेत असताना तृप्तीला मात्र त्याला पहायला जायचं होतच. काय करणार... आईच हृदय ते! ती बिचारी आपल्या बाळाला पहायला तडफडत होती. पहिले तिने एन. आय. सी. यू. त जाऊ नये असाच आग्रह मी केला, पण शेवटी मनात एक विचार असाही आला की आई बाळाजवळ गेली तर तो गंध, ती संवेदना बाळापर्यंत पोचेलही. झाला तर बाळाला याचा आधारच मिळेल. मग मात्र तृप्तीला एन. आय. सी. यू. त न्यायचे ठरवले. शस्त्रक्रियेनंतर पाचव्या दिवशी तिला इस्पितळातून सोडण्यात आले. एन. आय. सी. यू. कडे निघण्यापूर्वी तिला शांतपणे बाळाची अवस्था समजावून सांगितली. पुन्हापुन्हा बजावलं की बाळ फक्त तुझ्यापासून दूर दुसऱ्या खोलीत नाही तर अतिदक्षता विभागात आहे. तिथे त्याला वेगवेगळ्या नळ्या, पट्ट्या, सलाइन, व्हेंटिलेटर वगैरे लावलेले असेल. असही विचारून पाहिल की बघ... जायचय का? पण ती ठाम होती. आम्ही एन. आय. सी. यू. पाशी पोचलो. जरी इतर कोणी एन. आय. सी. यू. मध्ये जायला परवानगी नसली, तरी बाळाची आई आत जाऊ शकते. तृप्ती आत गेली. इकडे बाहेर आमची अवस्था बिकट होती. एन. आय. सी. यू. मधल्या डॉक्टर आणि सिस्टरना तृप्तीकडे लक्ष द्यायची विनंती केली. प्रत्येक मिनिट तासासारखा वाटत होता. थोड्यावेळाने बाहेर आली, डोळे पाणी लपवण्याचा प्रयत्न करत होते. चेहऱ्यावर संमिश्र भाव दाटून आले होते. बाळ पहायला मिळालं म्हणून खुषही होती आणि बाळाची अवस्था बघून व्यस्थितही होती. मग सगळे घरी गेलो. मी परत निघेपर्यंत तृप्ती व्यवस्थित होती. तिचा निरोप घेऊन परत इस्पितळात रात्री थांबण्यासाठी आलो. सकाळी घरी गेल्यावर कळाले की मी गेल्यावर रात्री तृप्ती खुप रडली. मला एकट्याला रात्री इस्पितळात रहायचे आहे आणि माझ्यासमोर रडली तर मलाही त्रास होईल म्हणून मी जाइपर्यंत भावना दाबून बसली होती. हे कळल्यावर मात्र अगदी गलबलून आलं.

मध्यंतरी वैद्यकिय उपायांबरोबर आम्ही आमच्या मनाला पटतील असे उपाय करत होतो. त्यापैकी एक म्हणजे जश्या आम्ही बाळ गर्भात असताना त्याच्याशी गप्पा मारायचो, तशा गप्पा भ्रमणध्वनी संचात साठवून त्या बाळाला ऐकवायची डॉक्टरांना विनंती केली. एक वेडी आशा की पिलू आवाज ऐकेल आणि त्याला आई-बाबा जवळ आहेत असे वाटेल.

येणारा प्रत्येक दिवस काही ना काही नवीन समस्या घेऊन येत होता. बाळाला एन. आय. सी. यू. त ठेवून आठ दिवस होऊन गेले होते. व्हेंटिलेटर चालूच होत. या बरोबरच फ्रेश फ्रोजन प्लाजमा (एफ. एफ. पी. ) हा रक्तातला घटक एकाच दिवसात दोनदा सलाइनद्वारे द्यावा लागला होता. पुढे पुन्हा सलग दोन दिवस एफ. एफ. पी द्यावा लागला. त्यासाठी रक्तपेढीमधून या सर्व गोष्टी उपलब्ध करून घ्याव्या लागल्या. पलमनरी हॅमरेज कमी की काय म्हणून जन्मल्यापासून पाचव्या दिवशी 'पेटंट डक्टस आर्टिरिओसिस' (पी. डी. ए) ही अपरिपूर्ण बाळांमध्ये आढळणारी गुंतागुंतही आमच्या बाळात आढळली. डोक्याच सुद्धा स्कॅन पार पडलं हे शोधायला की मेंदूला काही धोका नाही ना? पलमनरी हॅमरेज फुफ्फुसाचा, पी. डी. ए. हृदयाशी निगडित... बरं मेंदूची तपासणी व्यवस्थित पार पडली आणि काही दोष निघाला नाही. पण मध्यंतरी व्हेंटिलेटर आणि पर्यायाने ऑक्सिजनचा आधार वाढवावा लागला. बाळ स्वत: श्वास घेऊ शकत नव्हतं. साधारण आठ दिवसांनी अर्धा मिलीलीटर दूध बाळाला सुरू केलं... ते पण नाकातल्या नळीतून. आईच दूध स्वच्छ उकळून जंतूविरहीत केलेल्या डब्ब्यांमधून एन. आय. सी. यूला पोचवायच... तेही दर ३ तासांनी. मग ते बाळाला नळीवाटे दिलं जायचं. पण दूध पचवणे ही त्या छोट्याशा जीवासाठी एक मोठी क्रिया होती. त्यामुळे दोनच दिवसात एडिमा (पोट सुजणे) दिसून आला. अशा बाळांमध्ये दिसणारी तिसरी गुंतागुंत आतड्याशी संबंधित असते. पोट आणि हातापायावर सूज पाहून आता आम्हाला याला आतडयाची गुंतागुंत होते की काय अशी धास्ती वाटली. पण नशिबाने तसं काही झालं नाही. या दरम्यान त्याला दोनदा रक्तातील तांबडया पेशी कमी झाल्यामुळे बाहेरून रक्त द्यावे लागले. त्यात गंमत म्हणजे आमच्या पिलाचा रक्तगटही सर्वात दुर्मिळ... ओ निगेटिव्ह...! त्यामुळे रक्त मिळायलाही खुप धावपळ करावी लागली. पण सुदैवाने जेव्हा हवे तेव्हा रक्तदाते मिळाले! मी खरोखरच अशा रक्तदात्यांचा खुप ऋणी आहे.

यावर कुरघडी म्हणून की काय तर रक्त घट्ट करणारा घटक 'प्लेटलेट' ज्या रक्तात कमीत कमी दीड लाख इतक्या हव्या, त्या बाळात १७, ००० पर्यंत खाली आल्या. प्लेटलेट रक्तात कमी झाल्या तर अंतर्गत रक्तस्त्राव होऊ शकतो. असा रक्तस्त्राव मेंदूत होवून जीवपण जाऊ शकतो. यामुळे सलग तीन दिवस बाळाला बाहेरून प्लेटलेट द्याव्या लागल्या. यासर्वांमध्ये आता १०-१२ दिवस होऊन गेले होते. प्रत्येक दिवस हा एक लढाई होता आणि आम्ही आपले लढाईचा शेवट काय या विवंचनेत होतो. तृप्तीपण आता शस्त्रक्रियेनंतर सावरली होती. त्यामुळे ती पण आता एन. आय. सी. यू. मध्ये जाऊ लागली. ती आत जाऊन बाळाशी बोलायची, त्याच्याशी खुप गप्पा मारायची. वैद्यकिय उपचारांचा परिणाम की आई जवळ असण्याचा परिणाम... पण आता बाळाला परत दूध चालू केलं होतं आणि आता ते व्यवस्थित पचतही होतं. आता त्याला एन. आय. सी. यू. मध्ये ठेवून साधारण वीस दिवस होत आले होते. गेल्या ३-४ दिवसात बाळ सुधारणा दाखवत होतं. आणि आम्ही ज्या गोष्टीची आतूरतेने वाट पाहत होतो ते त्याचे व्हेंटिलेटर शेवटी २१ दिवसांच्या प्रदिर्घ प्रतीक्षेनंतर निघाले. पिलू स्वत: श्वास घेऊ शकत होत. फक्त थोडासा ऑक्सिजन आधार म्हणून द्यावा लागत होता. जेव्हा त्याच व्हेंटिलेटर काढल तो दिवस आमच्यासाठी एका सणाहूनही मोठा होता. पण... अजूनही धोका पूर्णपणे टळला नव्हता. आधी उद्भवलेल्या गुंतागुंती अजून पूर्ण बऱ्या झाल्या नव्हत्या. त्यातच बाळाचे हिमोग्लोबीन खुप कमी झालं होतं. त्यामुळे दोनदा रक्त द्याव लागल. बाळ एवढ छोटस होत की त्याचा अख्खा हात माझ्या बोटाच्या एका पेराएवढाच होता. एवढ्याश्या शरीराला आत्तापर्यंत कितीतरी वेळा रक्त, एफ. एफ. पी., प्लेटलेट हे बाहेरून द्याव लागलं होत.

एवढ सगळ चालू असताना आमच्या प्रार्थना चालू होत्या. मन कणखर होत, निश्चय दृढ होता. बाळाचही आता हळूहळू दूध पिण वाढत होत... पण अजूनही नळीद्वारेच दूध दिल जात होत. शेवटी व्हेंटिलेटर काढल्यानंतर १० दिवसांनी बाळाचा बाहेरूनचा ऑक्सिजन पुरवठा बंद केला गेला. आता बाळाला श्वासही व्यवस्थित घेता येत होता आणि शरीराला श्वासावाटे योग्य ऑक्सिजनही मिळत होता. याशिवाय आता बाळाच वजनही दिवसाला २० ग्रॅम याप्रमाणात वाढत होत. शेवटी जन्मल्यानंतर १ महिना ४ दिवसांनी बाळाला देण्यात येणारी सर्व औषध बंद करण्यात आली. थोडथोड दूध नाकातील नळीतून तर थोडथोड तोंडाने देण सुरू झाल. अंगावर फक्त एक नळी चिकटवली होती जी बाळाच्या शरीराच तापमान नियंत्रणासाठी होती. आता सर्व गुंतागुंती दूर झाल्या होत्या. फक्त वजन हा एकच महत्त्वाचा मुद्दा राहिला होता ज्यासाठी बाळाला एन. आय. सी. यू. मध्ये ठेवल होत. शेवटी ४९ दिवसाच्या एन. आय. सी. यु. तल्या प्रदीर्घ वास्तवानंतर, वजन १६०० ग्रॅम झाल्यावर, सर्व गुंतागुंतीचा यशस्वी सामना करून, त्यांच्यावर मात करून आमच चिमुकल बाहेर आलं. यानंतर दोन दिवस तृप्ती इस्तितळात खाजगी खोलीत जाऊन राहिली. बाळ एन. आय. सी. यू. जवळच या खोलीत बाकी वातावरणाला कस स्थिरावतय हे पाहिल गेलं. शेवटी ५१ दिवस इस्पितळात काढल्यावर आमच्या हृदयाचा तुकडा... आमचा 'राजकुमार' घरी आला...! जन्मल्याजन्मल्याच एक खुप मोठी जीवनाची लढाई लढून... जिंकून आला...!!!

या सर्वात बालरोगतज्ञ डॉ. नंदकुमार कानडे यांनी बाळाची खुप व्यवस्थित देखरेख केली. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच सर्व उपचार सुरू होते. याचबरोबर सह्याद्री इस्पितळाच्या सर्व डॉक्टरांनी बाळाची एन. आय. सी. यु. मध्ये खुप व्यवस्थित काळजी घेतली. डॉक्टर शलाका, सचिन, अमर, आशिष, मांडके, सबनिस, सिस्टर शशिकला, शेरीन, वनिता, निशा, ललिता तसेच सर्व कर्मचारी वर्ग यांचा मी शतश: ऋणी आहे. या सर्वांच्या अथक प्रयत्नांमुळेच आम्ही आमचे बाळ सुखरूप पाहू शकलो. या सगळ्या अनुभवानंतर काही गोष्टी प्रकर्षाने नमूद कराव्याशा वाटतात. त्या म्हणजे सर्वप्रथम... कितीही मोठे संकट आले तरी 'विश्वास' कधीच सोडू नका. याच बरोबर स्व:ताच्या कुटूंबाचा विमा जरुर उतरवा. आपत्काल सांगून येत नाही. विम्यासाठी केलेली अल्पशी वार्षिक गुंतवणूक तुम्हाला गरजेच्या वेळी जरुर उपयोगी पडेल. आणि हो... जमेल तेव्हा 'रक्तदान' जरुर करा. तुमच्यामुळे एखादयाचा बहूमुल्य जीव वाचू शकेल.

आवडल्यास माझ्या ब्लॉगला जरूर भेट दया