न सुटलेले कोडे

"का गं अंजूने सांगितलं की तू म्हणे अमेरिकेला जाऊन आलीस.. खरंय का ते? " ओळखीचे दोस्तीत रुपांतर सोडाच पण किमानपक्षी ओळखही कायम न राहू दिलेली एक. खरंय म्हणा.. बारावीच्या शिकवणीची वर्षाची ३००० फी ५०० रुपयाच्या हप्त्याने भरणारी व्यक्ती कोणी आणि कशाला लक्षात ठेवावी? अंजू आम्हा दोघींची दोस्त.
"हो." अचानक आलेल्या या कित्येक वर्ष जुन्या ओळखीच्या व्यक्तीच्या फोनमुळे काय बोलावे याबद्दल मी धावचित झालेले.
"कशी आहेस तू पण! जायच्या आधी सांगून नाही जायचंस का दोन शब्द? अगदी परकंच करून टाकलंस म्हण की. "
आता मात्र त्रिफळा! अचानक झालेल्या या हल्ल्याला कसे परतवावे तेच समजेना. बरं.. तिच्याप्रमाणे तटकतोड बोलणे सबळ कारण असल्याशिवाय मला रामजन्मी जमणे शक्य नव्हते.
"लक्षात नाही राहिलं. " असं म्हणून वेळ मारून नेली मी.

वरचा प्रसंग केवळ उदाहरणादाखल आहे. लोकांचे रंग सकारात्मक बदललेल्या रुपामुळे, नोकरीतल्या पदोन्नतीमुळे, सुधारलेल्या पतप्रतिष्ठेमुळे अथवा वर लिहिल्याप्रमाणे परदेशात चक्कर मारून आल्यामुळे पापणी लवत नाहीतो अंतर्बाह्य का बदललेले असतात? ह्या सर्व ऐहिक प्रगतीने ती व्यक्ती मूलतः बदललेली असते का? समजा जरी बदलली असेल तरी यश डोक्यात शिरल्याने नकारात्मक बदलण्याचीच शक्यता अधिक.. मग तरीही असे तोंडदेखले गुलूगुलू बोलून नक्की काय साध्य व्हायचे असते? 

खूप कष्टाने प्राप्त केलेले एखादे यश उगीच मागे लागलेले लचांड वाटायला लागते अशावेळी. कोण नक्की कसे आहे याची पारख जितक्या सहजतेने गरीबीत (गरीबी नुसती पैशाची नाही तर रंग, रुप, नोकरीतले पद यासम अर्थांनीही) करता येते तितकीच ती करणे मग अवघड होऊन बसते एखादे यश मिळाले की.

लहानपणी बाबांच्या पोथीतल्या एका गोष्टीत वाचले होते की बहिण गरीब असताना भरल्या ताटावरून उठवणारा भाऊ, तीच बहिण श्रीमंत झाल्यावर आदराने निमंत्रण वगैरे पाठवून तिला जेवायला बोलावतो! कोणाला बोलावले आहे हे पूर्णपणे जोखणारी बहिण एकेका खाद्यपदार्थावर एकेक दागिना काढून ठेवते, तेव्हा त्या कथेत तरी तो भाऊ तिची क्षमा मागतो. ती क्षमा करते की नाही ते आता लक्षात नाही पण अशी माणसं का बदलत असावीत हे मला अद्याप न सुटलेले कोडे आहे.