पोटातला तो चिमुकला जीव....

काही दिवसांपूर्वीच मी माझी नोकरी बदलली... आणि हिंजेवाडी च्या फेज २ च्या शेवटच्या टोकाला असलेल्या एका कंपनीत नोकरी धरली. ३ दिवसांनंतर मला कंपनीची बस सर्व्हिस मिळू लागली. बिबवेवाडी ला माझ्या घराजवळच्या एका ठिकाणाहून मी बस मध्ये चढते आणि ऑफिस नंतरही तिच बस मला त्याच स्टॉपवर आणून सोडते.

पहिल्या दिवसापासून मी पाहते आहे... एक मुलगी... लग्न झालेली... आणि ५ ते ६ महिन्यांनी गर्भवती असलेली... रोज माझ्या स्टॉप आधी साधारण अर्धा तास अलिकडे असलेल्या स्टॉप वरून बस मध्ये येते आणि रात्री माझ्या नंतर अर्ध्या तासाने पोहोचत असेल... इतकी पुढे राहते... (हे मला कळले कारण सही करायच्या मस्टर मध्ये तिचा/प्रत्येकाचा स्टॉप लिहीला आहे)(माझे घर ते हिंजेवाडी हायवे वरून ३७ किलोमीटर आहे... साधारण १ तस १५ मिनिटे लागतात.)

 ती गर्भवती असल्याने तिला ड्रायव्हर च्या मागे असलेल्या पहिल्याच सीट वर बसता यावे म्हणून ती जागा सगळेच जण रिकामी ठेवतात... आणि कोणी नवीन व्यक्ती तिथे बसली तरीही ड्रायव्हर लगेच सांगून ती जागा रिकामी करून घेतो... ह्यामागचे कारण असे की तिथे पाय पसरायला मोकळी जागा मिळते... नीत आरामात बसता येते... बस चे... खड्ड्यांचे धक्के कमी बसतात.... व बसमध्ये मागे जाण्यासाठी असलेल्या चिंचोळ्या रस्त्याचा वापर करायला लगू नये म्हणुन...

रोज बसमध्ये तिच्यासोबत १-२ मैत्रीणी असतात.... त्या तिच्या मागच्या सीटवर बसतात... आणि पूर्ण रस्ता ही मुलगी डावीकडे वळून तिची सीट व बाजुची सीट ह्यामधल्या भागात पात अवघडून ठेवून त्या मैत्रीणींशी गप्प मारते... मस्टर मध्ये सर्व मैत्रीणींच्या सह्या स्वतःच करते ...  सह्या करताना/गप्प मारताना वाकून बसते... किंबहुना ह्या गोष्टी करताना कोणालाही असेच बसावे लागेल....

मला रोज हा प्रकार पाहून खूप वाईट वाटते.... तिच्या पोटातल्या बाळाच्या मनात काहीसे असे विचार येत असावेत असं मला रोज वाटतं..

"आई, मला कळतय गं की हे सगळं तू माझ्यासाठीच करते आहेस... तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे... मी तुझ्या पोटात वाढायला लागलो हे कळाल्याक्षणी तुला खूप आनंद झाला होता... माझी नीट वाढ व्हावी... माझी त्वचा, केस, रंग, बुद्धी सगळं काही छान घडावं म्हणून तु डॉक्टरने सांगीतलेली कुठलीच गोष्ट चुकवत नाहीस...पौष्टिक खातेस... नसेल आवडत तरी काही गोष्टी माझ्यासाठी करतेस... पण.... तरीही मला थोडा त्रास होतोय ग...

खर सांगायच तर मला अस वाटतं की बाबांच्या पगारात आपण सुखात राहू शकतो... आपलं एकमेकांवरचं प्रेम आहे ना साथ द्यायला... पण तुझं सुद्धा बरोबर आहे... तुझं करीअर घडावं, तुझं शिक्षण वाया जाउ नये...आणि माझ्या भविष्यासाठी, शिक्षणासाठी कधीही पैसा ही अडचण असू नये .... असं तुला वाटणं सुद्धा सहाजिक आहे... म्हणून तर तु ऑफिस मध्ये कामात असताना, अनेक टेंशन्स हँडल करत असताना मी तुला अजिबात लाथा मारत नाही.. त्रास देत नाही... तुझ्याशी खेळावसं वाटलं तरी तुझं लक्ष माझ्याकडे वेधून घेत नाही....

पण मला वाटतं की ऑफिस मधून बाहेर पडलीस... आणि बस मध्ये बसलीस की तु सगळं लक्ष माझ्याकडे एकवटून डोळे मिटून शांतपणे मनातून माझ्याशी बोलावस.... मागे वळून वाकून त्या क्ष मावशीशी आणि ब मावशीशी गप्प मरू नयेत... सगळ्यांच्या सह्या करत बसू नयेस.... घरी जाउन पण तुला काम असतं ना गं... आजी आजोबा, बबा आणि माझ्यासाठीही खाउ बनवायचा असतो ना... मग बस मध्ये आराम का नाही करत तू..?   

खरं सांगू... तु इतका वेळ वाकून बसतेस.... मग रात्री तुझी कंबर तर दुखतेच पण मला पण खुप त्रास होतो .... अवघडून गेल्यासारख होत.... श्वास कोंडल्यासारख होतं... मग रात्रभर मी अस्वस्थ राहतो आणि तू पण माझ्यामुळे जागतेस.... बाबांनापण वाटतं की तुला खूप त्रास होतोय.... मी तसा मस्तीखोर आहेच पण तुला रात्रभर त्रास द्यायचा नसतो ग मला... आणि खूप महत्त्वाचं म्हणजे... रात्री तु दमून झोपतेस....थोडावेळ बाबा बोलतात माझ्याशी.... पण तुला सगळ्या कामांमधून वेळच मिळत नाही गं माझ्याशी बोलायला...

म्हणून म्हंटलं मी.... बसमध्ये बोलत जा ना माझ्याशी.... म्हणजे माझं सगळं लक्ष तुझ्याकडे लागेल... आणि तुझ्या मनातल्या दिवसभराच्या कामाच्या त्रासाचा... रस्त्यातल्या खड्ड्यांचा... घरी जाउन करायच्या कामाचा.... मानसीक ताणाचा ... कशाचाच माझ्यावर परिणाम होणार नाही.... कारण माझी आई रोज कमित कमी ३ तास माझ्याशी बोलेल.... फक्त मला वेळ देईल... देशिल ना ग आई  "

कदाचित मी खूप वाहवत गेले असेन लिहिताना.... पण मला खरंच वाटतं की तिच्या पोटातलं बाळ असा विचार करत असेल... माझ्यापुरतं मी ठरवलं आहे.... की आपल्या वेळेस शक्यतो नोकरी करायची नाही...केलीच तर जवळ... जमल्यास आणि परवडल्यास ड्रायव्हर ठेवायचा... आणि सर्व मोकळा वेळ मनात आपल्या पोटात असलेल्या चिमुकल्या जीवशी बोलण्यात घालवायचा...

तुम्हाला काय वाटतं? जर कोणी अनुभवी लोक इकडे असतील तर त्यांचं आणि ज्यांना अनुभव यायला माझ्याप्रमाणेच अजून खूप वेळ आहे त्यांनीही आपलं मत सांगावं.... करीअर... शिक्षण आणि जगातली स्पर्धा ह्यामुळे आपण आपलं पर्सनल आयुष्य गमावून बसलोय का???