दुसऱ्या डागाचे रहस्य - २

"ठीक आहे. मी तुम्हाला सगळं सांगतो. एक मात्र लक्षात घ्या. हे करताना मी तुमच्या आणि तुमच्या मित्राच्या प्रामाणिकपणावर आणि सचोटीवर  पूर्ण विश्वास ठेवत आहे. त्याचा तुम्ही भंग होऊ देऊ नका. "

"त्याबद्दल आपण निश्चिंत असा. "

"हे पत्र युरोपातील एका राष्ट्राच्या राज्यकर्त्याकडून आलेलं आहे. इंग्लंडने अलीकडे ज्या वसाहती स्थापन केल्या आहेत त्याबाबतीत हा राज्यकर्ता जरा नाखूष झाला आहे. ते पत्र त्याने अगदी घाईघाईत, थोड्या उतावळेपणेच लिहिलेले आहे. पत्रातील भाषा खूपच प्रक्षोभक आहे. हे पत्र प्रसिद्ध झालं तर हा प्रक्षोभ जनतेत पसरेल आणि तसं झालं तर ते आवरणं कठीण होईल. इतकं कठीण की त्याने युद्धाला सुद्धा तोंड फुटू शकेल. "

होम्सने एका कागदाच्या तुकड्यावर काही तरी लिहून तो कागद पंतप्रधानांना दिला.

"हो. तोच तो. मि. होम्स, हे त्याचं पत्र, जे उघड झालं तर जीवित आणि वित्ताची किती हानी होईल याची कल्पनाच करता येणार नाही, असं पत्र गहाळ झालं आहे. "

"तुम्ही त्या राज्यकर्त्याला हे कळवलं आहे का? "

"हो. त्याला सांकेतिक भाषेत तार केली आहे. "

"कदाचित त्यालाच हे पत्र उघड व्हावं असं वाटत असेल. "

"तसं अजिबात नाही. काही विश्वसनीय सूत्रांकडून आम्हाला कळलं आहे की आपली चूक त्याच्या लक्षात आली आहे. आपण अगदीच तारतम्य न बाळगता वागलो आहोत हेही त्याला समजलं आहे. खेरीज हे पत्र उघड झालं तर इंग्लंडपेक्षा त्याच्याच देशाचं जास्त नुकसान होणार आहे. "

"असं जर आहे तर ते पत्र उघडकीला येण्यानं कोणाचं हित साधणार आहे? "

"हम्म्म.. तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपल्याला आंतरराष्ट्रीय राजकारणात शिरावं लागेल. युरोपातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहा. युरोप म्हणजे एक युद्धाची छावणी झाली आहे. युरोपातील राष्ट्रे दोन गटात विभागली गेली आहेत.   त्यांचा समतोल केवळ ब्रिटनमुळे सांभाळला जातोय.   एका गटातील देशाशी ब्रिटनचं युद्ध सुरू झालं तर आपोआपच दुसरा गट वरचढ होतो. मग तो युद्धात भाग घेवो अथवा न घेवो. लक्षात येतंय का मी काय म्हणतोय ते? "

"येतंय नं. म्हणजे ज्या राज्यकर्त्याने हे पत्र लिहिलं आहे, त्याच्या शत्रूच्या दृष्टीने हे पत्र जनतेत उघड होणं फायद्याचं आहे. कारण त्यामुळे तो देश ब्रिटनच्या विरोधात आहे हे जाहीरच होईल आणि त्याची बाजू आपोआप कमकुवत होईल. "

"बरोब्बर! ’

"आणि जर हे शत्रूच्या हातात पडलं तर ते कोणाकडे धाडलं जाईल? "

"युरोपातील कोणत्याही मोठ्या देशाच्या प्रमुखाच्या कार्यालयात. आता त्याचा प्रवास त्याच दिशेने चालला असेल. "

मि. ट्रेलॉनी होप यांनी आपली मान खाली घातली आणि एक अत्यंत निराशाजनक उद्गार त्यांच्या तोंडून बाहेर पडला. पंतप्रधानांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, "तुम्ही स्वत:ला दोष देऊ नका. तुमच्याकडून कोणतीही हलगरज झाली नाही हे मला माहीत आहे. बरं, मि. होम्स, आता तुम्हाला सर्व केस कळली आहे, तर आपण आता काय कार्रवाई करायची? "

होम्सचा चेहराही चिंताक्रांत झाला. तो म्हणाला, "आपण म्हणता, पत्र सापडलं नाही तर युद्धाला तोंड फुटेल? "

"नक्कीच! "

"सर, मग युद्धाची तयारी करा! "

"मि. होम्स!! "

"सर, तुम्ही परिस्थितीचा बारकाईने विचार करा. रात्री साडेअकरापासून सकाळपर्यंत मि. होप आणि त्यांच्या पत्नी त्यांच्या शयनगृहातच होते. तेव्हा ते पत्र रात्री साडेअकरानंतर चोरीला गेलेलं असणं शक्य नाही. याचा अर्थ ते संध्याकाळी साडेसात ते रात्री साडेअकरा ह्या वेळातच नाहीसं झालेलं आहे. चोरणाऱ्याने पाळत ठेवली असेल आणि खोलीत कोणी नाही हे पाहिल्यावर लगेच ते पेटीतून काढून घेतलं असेल. म्हणजे साधारण साडेसात-आठच्या आसपास हे घडले असणार. ह्यावेळी हस्तगत केलेले पत्र आता कुठे असणार? ते चोरणाऱ्याने स्वत:जवळ ठेवण्यासाठी नक्कीच चोरलेले नाही. ज्यांना ते हवं असेल त्यांच्याकडे ते एव्हाना पोहोचलेही असेल किंवा त्या मार्गावर नक्कीच बरेच पुढे गेलेले असेल. आणि असे असेल तर आपण ते मिळवणार तरी कसे? "

पंतप्रधान खुर्चीवरून उठत म्हणाले, "तुमचा युक्तिवाद बिनचूक आहे. आता मामला आपल्या हाताबाहेर गेला आहे. "

"घटकाभर आपण असं समजू की ते मि. होप यांचा नोकर किंवा मोलकरीण यांच्यापैकी कुणीतरी घेतलं आहे. तर.. "

"ते शक्य नाही. दोघेही जुने आणि विश्वासू नोकर आहेत. "  होम्सला अडवत मि. होप म्हणाले.

"तुमचे शयनगृह दुसऱ्या मजल्यावर आहे न? त्यामुळे तिथे जाणारा माणूस कोणाच्या नजरेस न पडता जाऊच शकणार नाही. म्हणजे हे काम घरातल्याच कुणाचं तरी आहे. बरं, ज्यानं हे पत्र चोरलंय तो ते कुणाकडे देईल? जे जगभरात गुप्तहेर, सीक्रेट एजंट म्हणून काम करतात त्यांच्याकडेच. माझ्या व्यवसायामुळे मला त्यांच्यापैकी बऱ्याच जणांची नावं आणि ठावठिकाणा माहीत आहे. त्यांच्या यादीत सर्वात वर ज्यांच्या क्रमांक लागतो त्या तिघांकडे मी एक एक करून जाईन. त्यांच्यापैकी एखादा फरारी असेल तर त्याच्याकडे ते पत्र गेलं असण्याची बरीच शक्यता आहे.

"तो फरारी असेल असं तुम्हाला का वाटतं? तो सरळ लंडनमधल्या एम्बसीकडे जाईल असा माझा तर्क आहे. " युरोपियन सेक्रेटरी म्हणाले. "

"मला नाही तसं वाटत. ही हेरमंडळी स्वतंत्रपणे काम करतात आणि एम्बस्यांशी त्यांचे संबंध फारसे सलोख्याचे नसतात. "

पंतप्रधानांनी होम्सच्या म्हणण्याला पुष्टी दिली. पुढे म्हणाले, "एवढं महत्त्वाचं पत्र तो स्वत: नेऊन देईल. बरंय, मि. होम्स. तुम्ही सुचवलेला मार्ग ठीक वाटतोय. असो. ही घटना कितीही गंभीर असली तरी आमच्या दैनंदिन कामांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मि. होम्स, तुमचा तपास पुढे सरकला तर आम्हाला कळवा. आमच्याकडे ह्या बाबतीत नवीन काही घडलं तर आम्हीही तुम्हाला कळवू. " असे म्हणून दोघे बाहेर पडले.     

त्यानंतर होम्सने शांतपणे आपला पाईप शिलगावला आणि विचारात गढून गेला. मी सकाळी आलेले वर्तमानपत्र गुन्हेगारीच्या बातम्यांचे पान उघडून वाचायला सुरुवात केली. तेवढ्यात होम्स एकदम उठला, पाईप ठेवून दिला आणि म्हणाला, "ही केस सोडवण्याचा एकच मार्ग आहे. केस सोडवणे कठीण असले तरी अशक्य नक्कीच नाही. त्या तीन एजंटांपैकी कोणाकडे ते पत्र आहे हे समजलं की आपण पुढील कार्रवाई करू शकतो. एवढ्यात ते पत्र त्यांच्या हातून पुढे गेलं नसावं. ह्या लोकांना फक्त पैशात स्वारस्य असते आणि माझ्या पाठीशी तर इंग्लंडचा संपूर्ण खजिना आहे! ते पत्र ’विकाऊ’ असेल तर मी नक्कीच ते विकत घेईन. असंही होऊ शकेल की तो आधी इथे काय भाव मिळतोय ते पाहील आणि मग परदेशात किती पैसे मिळतायत याचा अंदाज घेऊन कोणता सौदा जास्त फायद्याचा हे बघेल. एवढं धाडस करणारे फक्त तिघे आहेत. ते म्हणजे ओबर्स्टाइन, ला रोथिए आणि एडवर्डो लुकस. मी त्या एकेकाला भेटीन. "

मी वर्तमानपत्रावर नजर टाकली आणि विचारलं, "गोडोल्फिन स्ट्रीटवरचा एडवर्डो लुकस? "

"हो. तोच. "

"मग तू त्याला भेटू शकणार नाहीस! "

"का? "

"कारण काल रात्री त्याच्या घरातच त्याचा खून झाला! "

आजपर्यंत माझ्या मित्राने मला आश्चर्याचे अनेक धक्के दिले होते. पण आज मी त्याला तसा धक्का दिला. मला थोडा आनंदही झाला! त्याने माझ्या हातातून वर्तमानपत्र ओढून घेतले. त्यात आलेल्या बातमीचा गोषवारा असा:

 वेस्टमिन्स्टरमध्ये खून

१६, गोडोल्फिन स्ट्रीट वरील एका जुन्या बंगल्यात काल रात्री तिथे राहणाऱ्या व्यक्तीचा खून झाला. ह्या बंगल्यात गेली काही वर्षे एक एडवर्डो लुकस नावाचे गृहस्थ राहत होते. आकर्षक व्यक्तिमत्त्व व गोड गळा ह्यामुळे ते उच्चभ्रू समाजात सर्वांना परिचित होते. लुकस यांचे वय चौतीसच्या आसपास असावे. ते अविवाहित असून घरात घराची व्यवस्था बघणारी एक बाई श्रीमती प्रिंगल आणि एक नोकर मि. मिटन एवढेच होते. त्यादिवशी नोकराची सुट्टी होती आणि प्रिंगल बाई काम संपवून आपल्या खोलीत झोपल्या होत्या. रात्री पावणेबाराच्या सुमारास एका पोलिस हवालदाराला बंगल्याचा दरवाजा उघडा दिसला म्हणून तो आत बघायला गेला तर सर्व फर्निचर अस्ताव्यस्त पसरलेले होते आणि एका खुर्चीचा पाय धरून दुर्दैवी लुकसचा मृत देह पडला होता. त्याच्या छातीवर वार झालेले होते. खुनाचा हेतू चोरी हा नक्कीच नव्हता कारण एकही मौल्यवान वस्तू नाहीशी झालेली नव्हती.  लुकस हे समाजाच्या वरच्या वर्तुळात सुपरिचित होते. त्यांच्या अशा गूढ मृत्यूमुळे जनतेत चांगलीच खळबळ माजणार आहे.

"तर वॉटसन, ह्याचा अर्थ काय? " बऱ्याच वेळानंतर होम्स म्हणाला.

"हा विलक्षण योगायोग आहे. "

"योगायोग? आपल्या नाटकातल्या प्रमुख पात्रांपैकी एकाचा असा गूढ मृत्यू होतो, तोही नेमकं हे नाटक घडत असताना! हा तुला योगायोग वाटतोय? नाही वॉटसन, ह्या दोन घटनांना जोडणारा काही तरी दुवा आहे आणि तो शोधून काढणं हे आपलं काम आहे."

"पण आता तर पोलिसांना सर्व कळेल! "

"असंच काही नाही. त्यांना फक्त गोडोल्फीन स्ट्रीटवर काय घडलंय ते माहीत आहे. व्हाईटहॉल टेरेसमधील घटना त्यांना माहीत नाही. आपल्याला ह्या दोन्ही गोष्टी माहीत आहेत. त्यामुळे आपण त्यातील संबंध  शोधून काढू शकू. माझा संशय लुकसवर होताच कारण गोडोल्फीन स्ट्रीटपासून व्हाईटहॉल टेरेस अगदी चालत जाता येईल इतक्या जवळ आहे. बाकीचे दोघे लंडनच्या दुसऱ्या टोकाला राहतात. त्यामुळे लुकसला सेक्रेटरींच्या घरातील नोकराचाकरांशी संधान बांधणं सोपं आहे, जे बाकीच्या दोघांना जमणार नाही. पण हे काय जिन्यावर पावलं वाजत आहेत! कोण आलं असेल? "  

(क्रमश:)