दुसऱ्या डागाचे रहस्य - ३

श्रीमती हडसन ट्रेमध्ये एक कार्ड घेऊन आल्या. होम्सने ते माझ्याकडे दिले आणि श्रीमती हडसनना म्हणाला, " लेडी हिल्डा ट्रेलॉनी होप यांना सांगा की त्यांनी कृपया वर यावे. "

पंतप्रधान आणि युरोपियन सेक्रेटरी यांच्या आगमनाने आधीच सन्मानित झालेले आमचे घर लंडनमधील सर्वात रूपवान स्त्रियांमध्ये जिची गणना होईल अशा स्त्रीच्या आगमनाने अधिक सन्मानित झाले. बेलमिस्टरच्या ड्यूकच्या कन्येच्या सौंदर्याबद्दल मी खूप ऐकून होतो, तिची छायाचित्रेही पाहिली होती, पण आता जे पाहत होतो ते छायाचित्रांपेक्षाही अधिक सुंदर होते. पण तरीही आता त्या चेहऱ्याच्या सौंदर्यापेक्षा त्यावरील भीती आणि अस्वस्थता ह्या गोष्टीच पाहणाऱ्याचे लक्ष वेधून घेत होत्या.

"मि. होम्स, माझे पती इथे आले होते का? " तिने विचारले.

"होय बाईसाहेब. "

"मि. होम्स, मी इथे आले होते हे त्यांना कृपया कळू देऊ नका. "

"बाईसाहेब, आपण मला अडचणीत टाकत आहात. आपण इथे कशासाठी आला आहात, माझ्याकडून आपल्याला काय हवे आहे, हे कळल्याशिवाय मी आपल्याला असे काही वचन देऊ शकत नाही. " हे बोलत असतानाच होम्सने त्यांना बसण्याची विनंती केली.

तिने खोलीत सर्वत्र नजर फिरवली आणि खिडकीकडे पाठ असलेल्या खुर्चीवर ती बसली.

"मि. होम्स, मी तुमच्याशी अगदी मोकळेपणाने बोलणार आहे आणि त्याबदल्यात तुम्हीही माझ्याशी तशाच मोकळेपणाने बोलावं अशी माझी अपेक्षा आहे. माझे पती आणि मी- आमचा एकमेकांवर पूर्ण विश्वास आहे. आम्ही एकमेकांपासून काहीही लपवून ठेवत नाही. ह्याला अपवाद फक्त एकच. तो म्हणजे राजकारण. त्या बाबतीत माझे पती मला काहीही सांगत नाहीत. काल रात्री एक घटना घडली. एक महत्त्वाचे पत्र घरातून गहाळ झाले आहे. पण ह्या बाबतीत माझे पती मला काहीच सांगत नाहीत. मला त्या पत्राबद्दल कळणं अत्यंत आवश्यक आहे. मला ते कळायलाच हवं! मि. होम्स, राजकारणातील मंडळींव्यतिरिक्त फक्त तुम्हालाच त्या पत्राबद्दल माहीत आहे. ते पत्र काय होतं आणि ते हरवण्याचे काय परिणाम होतील हे मला कृपया सांगा. मला विश्वासात घेतल्याने तुम्ही माझ्या पतींना मदत केल्यासारखेच होणार आहे याची मी तुम्हाला खात्री देते. ते पत्र काय होतं? "

"तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत नाही. बाईसाहेब, तुमच्या पतींना जर असे वाटत असेल की हे तुम्हाला सांगू नये तर मी, ज्याने त्यांना ते गुप्त ठेवण्याचे वचन दिले आहे, तो ते कसे सांगू शकेल? असे करणे म्हणजे त्यांचा विश्वासघात करण्यासारखे आहे. माझ्याऐवजी तुम्ही ते त्यांनाच विचारलंत तर ते जास्त योग्य ठरेल. "

"मी त्यांना विचारलं होतं पण त्यांनी सांगितलं नाही. मी अगदी शेवटची आशा म्हणून तुमच्याकडे आले आहे. पण ठीक आहे. माझ्या पतीला दिलेल्या वचनाचा भंग न करता तुम्ही एक गोष्ट करू शकाल आणि त्यायोगे तुम्ही मला मोठी मदतही करू शकाल. "

"कोणती गोष्ट? "

"ह्या घटनेने माझ्या पतींच्या कामावर काही ठपका तर येणार नाही न? "

"बाईसाहेब, ते पत्र सापडलं नाही तर मि. होप ह्यांच्या कारकीर्दीवर गंभीर परिणाम होतील. " तिने जोराचा निश्वास सोडला. बहुतेक तिच्या शंकांचं निरसन झालं असावं.

"आणखी एक. हे पत्र गहाळ झाल्याचं कळल्यावर माझ्या पतींची जी पहिली प्रतिक्रिया झाली त्यावरून मला असं वाटतंय की ह्या घटनेचे जनतेत भयंकर परिणाम होण्याची शक्यता आहे. "

"बाईसाहेब, त्यांनी स्वत:च जर अशा प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त केली असेल तर ते नाकारणारा मी कोण? "

"कशा स्वरूपाचे परिणाम? "

"पुन्हा तुम्ही मला जवळजवळ अशक्य अशी गोष्ट करायला सांगताय. "

"ठीक आहे. मी आता तुमचा अधिक वेळ घेत नाही. काही गोष्टी सांगण्यास तुम्ही मला नकार दिला आहे पण मी त्याबद्दल तुम्हाला दोष देत नाही. तुमच्या परीने तुमचेही बरोबर असेल. माझ्याबद्दलही तुम्ही काही गैरसमज करून घेऊ नये. माझ्या पतींवर आलेल्या संकटात त्यांची साथ द्यावी आणि त्यांना शक्य तेवढी मदत करावी हीच माझी इच्छा आहे. जाता जाता मी तुम्हाला पुन्हा एकदा कळकळीची विनंती करते की मी इथे येऊन गेल्याचे माझ्या पतींना कळू देऊ नका. "

असे म्हणून ती निघून गेली. जिना उतरताना होणारी झग्याची लयबद्ध सळसळ थांबली आणि पाठोपाठ दरवाजा बंद झाल्याचाही आवाज आला तेव्हा होम्स मला म्हणाला, "वॉटसन, ’महिला’ हा तुझा विभाग आहे! मग सांग, ह्या बाईचा इथे येण्याचा खरा उद्देश काय आहे? "

"तिनं सांगितलं ते सर्व अगदी स्पष्ट आहे आणि तिला अशी अस्वथता येणं हेही स्वाभाविकच आहे. "

"हम्म! नीट विचार कर. तिची बेचैनी, प्रश्न विचारतानाची तिची चिकाटी, आपल्या चेहऱ्यावरचे भाव कळू नयेत म्हणून तिचं उजेडाकडे पाठ करून बसणं, ही भेट आपल्या पतीला कळू नये ह्यासाठी तिची चालेली धडपड आणि हे सर्व त्यांच्याच भल्यासाठी आहे हे पटवून देण्याचा तिचा प्रयत्न! वॉटसन, बायकांच्या बाबतीत काही सांगता येत नाही. त्यांच्या बाबतीत केसातील एखादा आकडा किंवा रिबन अशा क्षुल्लक गोष्टींवरही बरेच काही अवलंबून असते.  असो. मी आता चाललो बाहेर. "

"आता? "

"हो. गोडोल्फीन स्ट्रीटवरील कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या आपल्या दोस्तांबरोबार थोडा वेळ घालवीन म्हणतो. लुकसचा ह्या केसशी संबंध असणार असा माझा कयास आहे. पण अपुऱ्या माहितीच्या आधारावर काही निष्कर्ष काढणं यासारखी दुसरी चूक नाही. बरं, तू सावधपणे राहा. मी शक्य झालं तर जेवायच्या वेळेपर्यंत घरी येईन. "

तो दिवस आणि पुढचे दोन्ही दिवस होम्स जरा विचित्र मूडमध्ये होता. घरी केव्हा यायचा, केव्हा जायचा याचा काही नेम नव्हता. कधी कधी किती तरी वेळ नुसता पाईप ओढत बसायचा. कधी व्हायलीन वाजवायचा. कधी आपल्या विचारात गढून जायचा. लहर आली तर सँडविचेस खाऊन भूक भागवायचा आणि माझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर द्यायचा नाही! ह्या सर्वांवरून माझ्या लक्षात आलं होतं की केसच्या बाबतीत फारशी प्रगती होत नसावी. तो माझ्याशी त्याबद्दल काही बोलतच नसे. मला केसबद्दल कळायचं ते वर्तमानपत्रातून. मी वाचलं होतं की लुकसच्या नोकराला संशयित म्हणून अटक केली होती पण पुरेश्या पुराव्याअभावी त्याला सोडूनही दिलं होतं. घरातील कोणतीही मौल्यवान वस्तू चोरीला गेली नव्हती. कागदपत्रांनाही कोणी हात लावल्याचे दिसत नव्हते. मात्र कागदपत्रांवरून काही गोष्टी लक्षात येत होत्या. लुकसला आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये बराच रस होता. निरनिराळ्या राष्ट्रातील राजकारणी मंडळींमध्ये त्याची उठबस होती. त्याला अनेक भाषा येत होत्या. स्त्रियांमध्ये तो लोकप्रिय होता पण कोणाशी फारशी जवळीक नव्हती.  

तीन दिवस लुकसच्या खुनाचे गूढ तसेच राहिले होते. होम्सला काही कळले असले तरी त्याने मला काही सांगितले नव्हते. फक्त एवढेच मला कळले होते की स्कॉटलंड यार्डमधील इन्स्पेक्टर लेस्ट्रेड याने होम्सला विश्वासात घेतले होते आणि ते दोघे एकमेकांच्या संपर्कात होते.

चौथ्या दिवशी पॅरिसहून एक तार आली. तिच्यातील मजकुराचा सारांश असा :

पॅरिसच्या पोलिसखात्याकडून असे कळते की पॅरिसमधील एक महिला मादाम फोर्ने ही एका भयंकर मानसिक विकृतीने पीडित आहे. ती मंगळवारी लंडनहून परत पॅरिसला आली असे तपासाअंती पोलिसांना कळले आहे. तिच्या जवळच्या फोटोवरून खात्री झाली आहे की तिचा नवरा व एडवर्डो लुकस ही एकच व्यक्ती आहे. लुकस लंडन आणि पॅरिस ह्या ठिकाणी दुहेरी आयुष्य जगत होता. मादाम फोर्ने यांचा स्वभाव अत्यंत संशयी होता असे आजूबाजूचे लोक म्हणतात. ह्या संशयाच्या भरातच त्यांनी लुकसचा खून केला असण्याची शक्यता आहे. सोमवारी रात्री काही लोकांनी गोडोल्फीन स्ट्रीटवर मादाम फोर्ने  ह्यांच्या वर्णनाशी मिळत्याजुळत्या चेहऱ्याच्या बाईला पाहिले होते.

"होम्स, ह्याचा अर्थ काय? " मी तार वाचून झाल्यावर विचारलं.

"वॉटसन, तुला वाटेल की मी गेल्या तीन दिवसात तुला काही सांगितलं नाही. पण सांगण्यासारखं काहीच घडलं नाही. पॅरिसहून आलेल्या ह्या तारेचाही आपल्याला फारसा उपयोग नाही. "

"पण खुनाचा उलगडा तर झाला न! "

"लुकसचा खून ही आपल्या मुख्य कामाच्या दृष्टीने एक किरकोळ घटना आहे. आपलं मुख्य काम आहे ते पत्र शोधून काढणं आणि युरोपला एका संकटातून वाचवणं. गेल्या तीन दिवसात एकच महत्त्वाची आणि चांगली गोष्ट घडली आहे. ती म्हणजे तीन दिवसात काहीच घडलं नाही! मला तासातासाला सरकारी सूत्रांकडून बातम्या मिळत असतात. अजूनपर्यंत युरोपात कुठेच काही अप्रिय घटना, जनतेचा उठाव वगैरे झाले नाही. याचा अर्थ हे पत्र अजून उघड झालेलं नाही. पण उघड झालेलं नाही तर ते कुठे आहे? कुणाकडे आहे? त्या व्यक्तीने ते उघड का केले नाही? वॉटसन, हे प्रश्न माझ्या डोक्यात घणाचे घाव घालत आहेत! ज्या दिवशी पत्र गहाळ झालं त्याच दिवशी लुकसचा मृत्यू होणं हा केवळ योगायोग आहे की आणखी काही? ते पत्र त्याच्याकडे पोहोचलं का? तसं असेल तर ते त्याच्या कागदपत्रात का सापडलं नाही? त्याच्या त्या वेडसर बायकोने तर ते बरोबर नेलं नसेल? तसं असेल तर आपण तिच्यापर्यंत कसं पोहोचायचं? ते करायचं म्हटलं तर त्याची कुणकुण फ्रान्सच्या पोलिसखात्याला लागणार. ही केस अशी आहे की गुन्हेगारांना जशी कायद्याची भीती असते तशीच आता आपल्यालाही आहे. पण तरीही ही केस सुटली तर तो माझ्या कारकीर्दीतला अत्युच्च बिंदूच ठरेल. अरे! पण हे काय? "

नोकराने आणून दिलेली चिठ्ठी वाचता वाचता तो एकदम उत्तेजित झाला आणि म्हणाला, "वॉटसन, तुझी हॅट चढव आणि नीघ. आपल्याला आताच्या आता वेस्टमिन्स्टरला जायचेय. लेस्ट्रेडला तिथे काही तरी इंटरेस्टिंग मिळालंय! "

(क्रमश:)