दुसऱ्या डागाचे रहस्य - ५

आम्ही रस्त्यावर आलो आणि होम्स खुशीत येऊन जोरात हसत म्हणाला, "वॉटसन, आता लवकरच शेवटच्या अंकाचा पडदा उघडणार आहे. आता युद्ध वगैरे काही होणार नाही, मि. होप यांच्या उज्ज्वल कारकीर्दीला कलंक लागणार नाही, त्या उतावळ्या आणि पाचपोच नसलेल्या राज्यकर्त्याला कसलीही शिक्षा होणार नाही, पंतप्रधानांना कोणत्याही राजकीय आणीबाणीला तोंड द्यावे लागणार नाही आणि आपण थोडी अक्कलहुशारी वापरली तर युरोपच्या राजकारणातील एक काळी घटना म्हणून जी ओळखली गेली असती ती आपण टाळू शकू! "

माझं हृदय ह्या जगावेगळ्या माणसाबद्दल आदरानं भरून गेलं. मी जवळजवळ ओरडलोच, "म्हणजे, तुला ह्या केसचा उलगडा झाला सुद्धा?"

"असं म्हणायची घाई करू नकोस कारण अजून काही गोष्टी मलाही कळलेल्या नाहीत. पण जेवढं समजलंय त्याचा उपयोग करून आपण पुढे गेलो नाही तर आपल्यासारखे मूर्ख आपणच! असो. आता आपल्याला सरळ व्हाईटहॉल टेरेसमध्येच जायचं आहे." 

आम्ही युरोपियन सेक्रेटरीच्या घरी पोहोचलो. होम्सने ’आम्ही लेडी हिल्डांना भेटू शकतो का? ’ असे विचारल्यावर नोकराने आम्हाला मॉर्निंग रूममध्ये बसायला सांगितले.

काही मिनिटातच लेडी हिल्डा आल्या. आम्हाला पाहून त्यांचा चेहरा रागाने लाल झाला. त्या जवळजवळ ओरडल्याच, "तुमचं इथे येणं हे अयोग्य आणि अत्यंत अशोभनीय आहे. मी तुम्हाला तेव्हाच सांगितलं होतं की आपली भेट गुप्त ठेवली पाहिजे नाही तर माझ्या पतींना वाटेल की मी त्यांच्या कामात लूडबूड करत आहे. इथे येऊन तुम्ही मला अडचणीत टाकत आहात. तुम्ही मला भेटायला आलात हे पाहिल्यावर कोणालाही असेच वाटेल माझे तुमच्याशी काही व्यावसायिक संबंध आहेत. "

"बाईसाहेब, माझ्यापुढे दुसरा पर्यायच उरला नाही. एक अत्यंत महत्त्वाचे पत्र शोधून काढण्याची कामगिरी आपल्या पतींनी माझ्यावर सोपवली आहे. तेव्हा, बाईसाहेब, आपण कृपा करून ते पत्र मला द्या."

हे ऐकून लेडी हिल्डा एकदम उडाल्याच! त्यांचा सुंदर चेहरा काळवंडून गेला. त्या थरथर कापू लागल्या. मला तर वाटलं त्या आता बेशुद्ध पडतात की काय? पण काही क्षणातच त्या त्या धक्क्यातून बाहेर आल्या आणि त्यांनी स्वतःला सावरलं. आता त्यांच्या चेहऱ्यावर फक्त विस्मय आणि चीड एवढंच दिसत होतं.

"मि. होम्स, तुम्ही माझा अपमान करत आहात."

"बाईसाहेब, ह्या सगळ्याचा काही उपयोग नाही. तुम्ही मला ते पत्र द्या म्हणजे झालं."

"माझा नोकर तुम्हाला बाहेरचा रस्ता दाखवेल." असे म्हणून त्या नोकराला बोलावण्यासाठी घंटीकडे जाऊ लागल्या.

होम्स म्हणाला, "लेडी हिल्डा, कृपा करून नोकराला बोलवू नका. आपण तसे केलेत तर युरोपच्या राजकारणातील एक लाजिरवाणी घटना टाळण्यासाठी मी जे आटोकाट प्रयत्न करतोय ते सर्व फोल ठरतील. ते पत्र माझ्याकडे द्या आणि बघा, सर्व काही ठीक होईल. तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही ह्याची हमी मी तुम्हाला देतो. पण त्यासाठी तुम्ही मला सहकार्य दिलं पाहिजे. जर तुम्ही ते दिलं नाहीत तर मात्र मला नाईलाजाने तुमचं कृत्य उघडकीला आणावं लागेल."

"तुम्ही मला भीती दाखवताय! एखाद्या स्त्रीच्या घरी जाऊन तिला अशी भीती दाखवणं हे काही फार शौर्याचं काम नाही. तुम्ही म्हणता मी केलेलं कुठलंसं कृत्य तुम्हला माहीत आहे. ते काय आहे ते मला तरी ऐकू द्या."

"बाईसाहेब, तुम्ही इतक्या भावनाविवश झाला आहात की त्या भरात तुम्ही खाली पडाल आणि स्वतःला दुखापत करून घ्याल अशी भीती मला वाटतेय. तुम्ही खाली बसल्याशिवाय मी एक अक्षरही पुढे बोलणार नाही. हं, आता ठीक आहे."

"मि. होम्स, मी तुम्हाला पाच मिनिटं देते." 

"मला एक मिनिटसुद्धा पुरेल. तुम्ही लुकसला भेटायला त्याच्या घरी गेलात, ते पत्र त्याला दिलंत, काल तुम्ही पुन्हा तिथे गेलात आणि विलक्षण कल्पकता वापरून गालिच्याखाली लपवलेलं ते पत्र घेऊन आलात."

आता लेडी हिल्डांच्या रागाने परमावधी गाठली. भेदक नजरेने त्या होम्सकडे पाहत होत्या. पण त्यांच्या तोंडून शब्द फुटण्यापूर्वी त्यांना दोनदा आवंढा गिळावा लागला. त्यांच्या तोंडून एकदम वरच्या पट्टीत कसेबसे पुढील शब्द बाहेर पडले. "मि. होम्स तुमचं डोकं ठिकाणावर आहे का?"

होम्सने खिशातून कार्डबोर्डचा एक चौकोनी तुकडा बाहेर काढला. लेडी हिल्डा यांच्या पोर्ट्रेटमधून कापून काढलेला तो चेहरा होता. होम्स म्हणाला, "मी हे बरोबर घेऊन आलो कारण मला माहीत होतं की याचा उपयोग होईल. बाईसाहेब, हवालदाराने हा फोटो ओळखला आहे."

हे ऐकताच लेडी हिल्डांच्या तोंडून भीती आणि आश्चर्यमिश्रित आवाज बाहेर पडला आणि त्या मटकन खुर्चीत बसल्या.

"बाईसाहेब, आता विलंब लावू नका. पत्र माझ्याकडे द्या. अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये अशीच माझी इच्छा आहे. ते पत्र मी तुमच्या पतींकडे सुपूर्त केलं कि माझं काम संपलं. माझा सल्ला ऐका आणि ते पत्र मला द्या. ही शेवटची संधी आहे. "

त्या बाईजवळ कमालीचं धैर्य होतं. अजूनही ती आपला पराभव स्वीकारायला तयार नव्हती.

"मि. होम्स, तुम्ही कसल्यातरी वेडगळ कल्पनाविश्वात वावरत आहात."

"ठीक आहे." होम्स खुर्चीतून उठत म्हणाला, "लेडी हिल्डा, मला फार दुःख होतंय. तुम्हाला वाचवण्यासाठी मी केलेले सर्व प्रयत्न आता फुकट जाणार."

होम्सने घंटी वाजवून नोकराला बोलावले. नोकर आल्यावर त्याने विचारले, "मि. होप घरात आहेत का?"

"नाही, सर. ते पाऊण वाजेपर्यंत येतील."

"म्हणजे अजून पंधरा मिनिटं आहेत. ठीक आहे. मी इथेच त्यांची वाट पाहतो."

’ठीक आहे.’ असे म्हणून नोकर गेला. त्याने जाताना दरवाजा लावला न लावला तोच लेडी हिल्डांनी होम्सच्या पुढे गुडघे टेकले आणि दोन्ही हात पसरून त्या होम्सला विनवणी करू लागल्या, "मि. होम्स, असं करू  नका. काहीही झालं तरी हे माझ्या पतींना सांगू नका. माझं त्यांच्यावर नितांत प्रेम आहे. त्यांना कोणतंही दुःख कधी होऊ नये असंच मला अगदी मनापासून वाटतं. ह्या पत्राबद्दल त्यांना कळलं तर त्यांचं हृदय विदीर्ण होईल."

होम्सने हाताला धरून लेडी हिल्डांना उठवले आणि म्हणाला, "बाईसाहेब, उशीरा का होईना, तुम्हाला सुबुद्धी झाली हे फार बरं झालं. पण आता आपल्याला एक क्षणही दवडून चालणार नाही. पत्र कुठाय? "

लेडी हिल्डा टेबलाजवळ गेल्या. टेबलाच्या खणाचे कुलूप उघडून त्यांनी एक लांब, फिक्क्या निळ्या रंगाचा लिफाफा बाहेर काढला आणि म्हणाल्या, "हे घ्या."

"हं. आता हे परत कसं करायचं बरं? बाईसाहेब, ती कागदपत्रांची पेटी कुठाय?"

"आमच्या शयनगृहात आहे. "

"वा! दैव आपल्यावर खूश दिसतंय! बाईसाहेब, पटकन ती पेटी घेऊन या. लवकर, लवकर!!"

काही सेकंदातच त्या एक चपटीशी लाल पेटी घेऊन आल्या.

"मागच्या वेळी तुम्ही ती कशी उघडली होती? तुमच्याकडे डुप्लिकेट किल्ली आहे न? असणारच! उघडा बरं ती पेटी."

लेडी हिल्डांनी त्यांच्याजवळच्या किल्लीने पेटी उघडली. पेटीत कागदपत्रे ठासून भरली होती. होम्सने तो लिफाफा कागदपत्रांमध्ये आत खुपसून ठेवला, पेटी बंद केली, कुलूप लावलं आणि लेडी हिल्डांनी ती पेटी परत जागच्या जागी नेऊन ठेवली.

खुर्चीवर जरा आरामात बसत होम्स म्हणाला, "बाईसाहेब, आता तुमचे पती केव्हाही आले तरी हरकत नाही. आपल्याकडून तयारी आहे. पण त्यांना यायला अजून दहा मिनिटे आहेत. लेडी हिल्डा, तुम्हाला झाकण्यासाठी मला माझ्या तत्त्वांशी फार मोठी तडजोड करावी लागणार आहे आणि मी ती करणारही आहे पण त्या बदल्यात हे सगळं प्रकरण काय आहे ते तुम्ही मला सांगायला हवं. "

"मि. होम्स, मी तुम्हाला सगळं सांगते. माझं आणि माझ्या पतींचं एकमेकांवर अतिशय प्रेम आहे. त्यांच्या सुखासाठी वाटेल ते करायची माझी तयारी आहे. पण मला हेही माहीत आहे मी ज्या तऱ्हेने वागले  ते त्यांना कळलं तर ते मला कधीही क्षमा करणार नाहीत. ते स्वतः अतिशय सचोटीने आणि तत्त्वाने वागणारे आहेत त्यामुळे दुसऱ्या कोणाच्या वागण्यात याचा अभाव दिसला तर त्याला त्यांच्याकडून क्षमा नाही. मि. होम्स, मला वाचवा. माझं सुख, आमच्या दोघांचं सुख आता तुमच्या हाती आहे."

"बाईसाहेब, आपल्याजवळ फार वेळ नाही. नेमकं मुद्याचं तेवढं सांगा."

"ह्या सगळ्याला कारण एक पत्र आहे, प्रेमपत्र, जे मी लग्नापूर्वी लिहिलं होतं. किशोरवयात केलेला तो मूर्खपणा होता. ह्या गोष्टीला आता इतकी वर्षं झालीत की मी त्याबद्दल विसरूनही गेले होते. पण ते पत्र ह्या माणसाच्या, लुकसच्या हाती लागलं. ते माझ्या पतींना दाखवण्याची धमकी तो मला देऊ लागला. आणि हे व्हायला नको असेल तर माझ्या पतींकडे एक विशिष्ट लिफाफा आहे तो मी त्याला द्यायचा. त्या पत्राच्या बदल्यात तो मला माझं पत्र परत देणार होता. त्याला त्याच्या हेरांकडून माझ्या पतींच्या जवळील पत्राबद्दल कळलं होतं. मि. होम्स, तुम्ही माझ्या जागी आहात अशी कल्पना करा आणि सांगा मी काय करायला हवं होतं?"

"तुम्ही आपल्या पतींना विश्वासात घ्यायला हवं होतं. "

"ते शक्य नव्हतं. एका बाजूला माझा संसार उध्वस्त होण्याची चिन्ह दिसत होती. ते होऊ द्यायचं नसेल तर माझ्या पतीच्या कामाच्या कागदपत्रातील एक चोरणं हे दुसऱ्या बाजूला दिसत होतं. राजकारणात मी अगदीच अनभिज्ञ आहे. त्यामुळे ह्याने माझ्या पतीच्या राजकीय कारकीर्दीवर काय परिणाम होतील ह्याची मला काहीच कल्पना नव्हती पण हे न केल्यास मात्र माझ्या सुखी संसाराचा अंत होणार हे स्पष्ट दिसत होतं. म्हणून मी हे केलं. मी किल्लीचा ठसा घेतला आणि तो लुकसला दिला, त्याने मला डुप्लिकेट किल्ली बनवून दिली. मी पेटीतून तो लिफाफा काढला आणि १६, गोडोल्फीन स्ट्रीट्वर गेले."

"पुढे काय झालं? "

"ठरल्याप्रमाणे मी दारावर टकटक केलं. लुकसने दार उघडलं. त्याने मला त्याच्या पाठोपाठ एका दालनात यायला सांगितलं. मी दरवाजा जरा किलकिलाच ठेवला कारण मला त्या माणसाबरोबर एकटं रहायची भीती वाटत होती. मी आले तेव्हा रस्त्यावर एक बाई घोटाळत होती. आमची देवाणघेवाण झाली. माझं पत्र त्याने मला दिलं, मीही त्याला तो निळा लिफाफा दिला. तेवढ्यात बाहेर दरवाज्याचा आवाज आला आणि पाठोपाठ पावलांचा! लुकसने चपळाईने गालिच्याचा एक कोपरा उचलून त्याच्या खाली कुठेतरी तो लिफाफा लपवून ठेवला.

"त्यानंतर जे घडलं ते फारच भयंकर होतं. बाहेर जी बाई घोटाळत होती ती आत आली आणि जोरजोरात फ्रेंचमध्ये बोलू लागली, ’मी इतके दिवस वाट पाहिली ती वाया गेली नाही. आज मी तुला तिच्याबरोबर पकडलंच! ’ त्या दोघांमध्ये आता मारामारी होणार हे दिसत होतं. त्या बाईच्या हातात सुरा होता, लुकसने आपल्या बचावासाठी एक खुर्ची दोन्ही हातात धरून ठेवली होती. मी जीव मुठीत धरून तिथून पळत सुटले ती थेट घरी. त्या रात्री मी अगदी शांत झोपले. पुढे काय वाढून ठेवलंय याची मला काहीच कल्पना नव्हती.

"दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर माझ्या लक्षात आलं की एका आपत्तीतून सुटून मी दुसऱ्या आपत्तीत सापडले आहे. पत्र पेटीत नाही हे पाहिल्यावर माझ्या पतीची जी अवस्था झाली ती मला पाहवेना. हजार वेळा मनात आलं की त्यांना सर्व सांगून टाकावं, पण ते करण्याचा मला धीर झाला नाही. कारण ते करणं म्हणजे पूर्वीच्या चुकीची कबुली देणं. त्या दिवशी सकाळी मी तुमच्याकडे आले ती केवळ यासाठीच की माझ्या ह्या कृत्याचे परिणाम किती गंभीर होतील ते जाणून घ्यावं. जेव्हा मला ते कळलं तेव्हापासून एकच विचार माझ्या मनात चालला होता. ते पत्र परत कसं आणायचं? मला खात्री होती की ते तिथेच गालिच्याखाली असणार. पण त्या घरात प्रवेश कसा मिळवायचा? दोन दिवसात त्या घराचं दार मला कधीच उघडं दिसलं नाही. काल संध्याकाळी मात्र मला ती संधी मिळाली. त्यानंतर काय झालं ते सर्व तुम्हाला माहीतच आहे. पण तो लिफाफा मिळाला तरी तो माझ्या पतींना माझ्या गुन्ह्याची कबुली न देता परत कसा करायचा ते मला कळेना. पण अरे देवा! हा त्यांचाच आवाज जिन्यावर येतोय."

युरोपियन सेक्रेटरी एकदम उत्साहाने खोलीत आले आणि म्हणाले, "मि. होम्स, काही तरी प्रगती झालेली दिसतेय!"

"हो, मला तसं वाटतंय खरं!"

"वा! फारच छान." होप यांचा चेहरा उजळला आणि ते पुढे म्हणाले, "पंतप्रधान आज जेवायला माझ्याबरोबर आहेत. त्यांनाही ही बातमी सांगूया. ते खूप खंबीर मनाचे आहेत पण मला माहीत आहे की ह्या घटनेपासून त्यांची झोप उडाली आहे." पुढे ते नोकराला म्हणाले, "साहेबांना वर यायला सांग आणि हिल्डा, आम्हाला जरा कामाचं बोलायचं आहे. मी थोड्याच वेळात जेवायला येतो." ते ऐकून लेडी हिल्डा खोलीतून निघून गेल्या.

पंतप्रधान आले. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्सुकता दिसत होती. "मि. होम्स, तुम्ही काही तरी बातमी घेऊन आला आहात असं कळलं! "

"बातमी आहे पण ती नकारार्थी. जिथे जिथे ते पत्र असण्याची शक्यता होती तिथे तिथे मी कसून चौकशी केली पण ते कुठेच मिळालं नाही. म्हणजे तुम्हाला जो संभाव्य धोका वाटत होता तो आता राहिला नाही असं मला वाटतं."

"पण ते पुरेसं नाही. अशी डोक्यावर सतत टांगती तलवार ठेवणं आपल्याला परवडणार नाही. काही तरी निश्चित कळायला हवं."

"सर, ते पत्र मिळण्याची मला पूर्ण आशा आहे, म्हणूनच मी इथे आलो आहे. जो जो मी ह्या घटनेचा विचार करतोय तो तो माझी खात्री पटत चाललीय की ते पत्र ह्या घराच्या बाहेर गेलेलंच नाही."

"मि. होम्स!!" पंतप्रधान जरा आवाज चढवून म्हणाले.

"सर, ते जर घराबाहेर गेलं असतं तर आतापर्यंत ती गोष्ट सगळ्यांच्या तोंडी झाली असती."

"पण पत्र चोरल्यावर कोणी ते घरात कशाला ठेवेल?"

"ते पत्र चोरीला गेलंय यावर माझा विश्वास नाही."

"मग ते त्या पेटीतून नाहीसं कसं झालं?"

"ते पेटीतून नाहीसं झालंय यावरही माझा विश्वास नाही. "

"होम्स, तुमचा हा विनोद अस्थानी आहे. मी अगदी खात्रीने सांगतो की पत्र पेटीत नाही."

"तुम्ही मंगळवारनंतर पुन्हा ती पेटी पाहिली आहे का?"

"मला त्याची काही आवश्यकता वाटली नाही."

"नजरचुकीने असं कधी कधी होतं."

" हे अशक्य आहे."

"सर, मला नाही तसं वाटत. अशा गोष्टी घडलेल्या मी पाहिल्या आहेत. बरीच कागदपत्रं असतात. काही कागद एकमेकांना चिकटतात."

"ते पत्र सर्वात वर होतं."

"पेटी उचलताना ती हलली असेल आणि कागद खालीवर झाले असतील."

"छे, छे, असं होणार नाही. मी सगळे कागद बाहेर काढून पाहिले होते."

आता पंतप्रधानांनी तोंड उघडलं. ते म्हणाले, "होप, ते म्हणताहेत तर पेटीत बघायला काय हरकत आहे?"

मि. होप यांनी नोकराला पेटी आणायला सांगितली. पेटी येईपर्यंत ते पुटपुटत होते, ’हा सगळा फार्स आहे. पण तुम्हाला ते हवंय ना, मग करा.’ पेटी आल्यावर त्यांनी स्वत:जवळच्या किल्लीने ती उघडली आणि एकेक कागद बघायला सुरुवात केली. "हे लॉर्ड मेरोचं पत्र, हा चार्ल्स हार्डीचा रिपोर्ट, ही रुसो-जर्मन ग्रेन टॅक्स संबंधीची नोट, आणि हे.. हे  काय? लॉर्ड बेलिंजरना आलेलं.. "

पंतप्रधानांनी होपच्या हातून तो लिफाफा ओढूनच घेतला आणि म्हणाले, "हेच ते पत्र. जसंच्या तसं आहे! होप, मी तुमचं अभिनंदन करतो."

"थॅंक्यू, थॅंक्यू. माझ्या मनावरचं केवढं तरी ओझं उतरलं! पण हे कसं शक्य आहे? मि. होम्स, तुम्ही काय जादूगार आहात की काय? तुम्हाला असं का वाटलं की पत्र पेटीतच आहे."

"कारण मला माहीत होतं की ते दुसरीकडे कुठे नाही!"

"छे. मला हे खरंच वाटत नाही. माझी पत्नी कुठाय? तिला हे सांगितलंच पाहिजे." असं म्हणत आणि ’हिल्डा, हिल्डा’ अशा हाका मारत ते खोलीच्या बाहेर पडले.

मग पंतप्रधान होम्सच्या जवळ आले. त्यांच्या डोळ्यात एक मिष्किल चमक होती आणि चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होते. ते हसत म्हणाले, "होम्स, ही काय भानगड आहे? काही तरी पाणी मुरतंय हे नक्की! पत्र पेटीत परत कसं गेलं?"

होम्स तशाच मिष्किलपणे हसत म्हणाला, "आमचीही काही राजकीय गुपितं असतात!"

========================समाप्त====================