दुसऱ्या डागाचे रहस्य -४

थोड्याच वेळात आम्ही दोघेही घटनास्थळी पोहोचलो. गोडोल्फीन स्ट्रीटवरील त्या बंगल्याच्या खिडकीत उभं राहून लेस्ट्रेड आमची वाटच पाहत होता. एका हवालदाराने दार उघडून आम्हाला आत नेले. ज्या दालनात खून झाला होता तिथे आम्ही गेलो. तिथले सामानसुमान सर्व व्यवस्थित मांडलेले होते. एक गोष्ट सोडली तर तिथे खून झाला आहे याचा काही मागमूसही नव्हता आणि ती गोष्ट म्हणजे गालिच्यावरील रक्ताचा डाग! संपूर्ण जमिनीवर जुन्या पद्धतीचे, चकचकीत पॉलिश केलेले लाकडाचे  चौकोन होते आणि मध्यभागी एक चौकोनी गालिचा होता. भिंतीवरील शोभेच्या वस्तू, लिहिण्याचे टेबल आणि त्यावरील लेखनसाहित्य, इतर सामानसुमान ह्या सर्वातून तिथे राहाणाऱ्याची श्रीमंती दिसून येत होती.

लेस्ट्रेड म्हणाला, "पॅरिस न्यूज पाहिलीत? "

होम्सने होकारार्थी मान हलवली. लेस्ट्रेड पुढे म्हणाला, "आमच्या फ्रेंच मित्रांनी यावेळी बाजी मारली! ते म्हणतायेत ते बरोबर वाटतंय. हा लुकस दुहेरी आयुष्य जगत होता आणि ते ह्या कानाचं त्या कानाला माहीत नव्हतं. पण त्यादिवशी ह्या बाईने अचानक येऊन त्याला पकडलं. दोघात काहीतरी बोलाचाली झाली असावी. बोलाचालीच नव्हे तर आणखीही काही! कारण खुर्च्या वगैरे अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या. त्याच्या हातातही एक खुर्ची होती. नक्कीच ती त्याने बचावासाठी हातात धरलेली असणार. पण तरी तिने सुऱ्याचे वार त्याच्या छातीवर केले. सगळं कसं अगदी सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ आहे! "

"तरीही तुम्ही मला बोलावणं पाठवलंत? "    

"हं.  ते जरा वेगळं आहे.  आमच्या दृष्टीनं फारसं महत्त्वाचं नाही पण तुम्हाला त्यात रस वाटेल म्हणून बोलावलं.  म्हणजे त्याचं असं झालं,  आतापर्यंत आम्ही इथल्या सगळ्या गोष्टी जशाच्या तशा ठेवल्या होत्या.  आज चौकशी संपली,  सकाळी लुकसच्या मृतदेहाचा दफनविधीही झाला तेव्हा आम्ही विचार केला की इथलं सामान शक्य तेवढं नीट लावून ठेवावं.  ते करत असताना हा गालिचा उचलायची वेळ आली आणि आम्हाला आढळलं...  "

"काय आढळलं?" होम्सने लेस्ट्रेडला अडवून विचारले. त्याच्या चेहऱ्यावरची उत्सुकता आता उतावीळपणाकडे झुकत होती!

"मि. होम्स, आम्हाला काय आढळलं ते तुम्हाला शंभर वर्षात ओळखता येणार नाही. हा गालिच्यावरचा डाग पाहिलात? बरंच रक्त यातून खाली झिरपलं असणार नाही का? "

"नक्कीच. "

"म्हणजे खाली लाकडी जमिनीवर पण तसाच डाग असायला पाहिजे. "

"अर्थातच."

"आता गंमत बघा." असे म्हणून त्याने गालिच्याचा तो कोपरा उचलला. त्या खालच्या जमिनीवर डाग नव्हता.

"पण गालिच्याच्या खालच्या बाजूला तसाच डाग आहे, मग जमिनीवर कसा नाही? "

लेस्ट्रेड अगदी खुशीत आला होता कारण त्याने चक्क होम्सला कोड्यात टाकलं होतं.    "आता आणखी एक गंमत बघा." असे म्हणून त्याने गालिच्याचा दुसरा कोपरा उचलला.  तर त्याच्या खाली एक तशाच आकाराचा कालपट, लालसर रंगाचा डाग होता! 

"याचा अर्थ काय मि. होम्स? "

"अगदी सरळ आहे. कोणीतरी गालिचा हलवलेला आहे. गालिचा चौरसाकृती असल्याने तो फिरला गेला आहे हे हलवणाऱ्याच्या लक्षात आले नाही. "

"मि. होम्स, गालिचा नव्वद अंशातून फिरवला गेला आहे हे सांगायला इंग्लंडच्या पोलिसांना तुमची जरूर नाही! गालिचा परत उलटा फिरवला तर दोन्ही डाग बरोबर एकमेकांवर येतील. पण मुख्य मुद्दा हा आहे की गालिचा कुणी आणि का हलवला? "

होम्सच्या चेहऱ्यावरून मला कळलं की त्याच्या मेंदूत बरंच काही तरी घडतंय! तो उत्तेजित झाला आहे हे फक्त मलाच कळत होतं. होम्स लेस्ट्रेडला म्हणाला, "एक सांगा मला, तो व्हरांड्यातला हवालदार चोवीस तास ड्यूटीवर आहे का?"

"हो."

"मग माझं ऐका. त्याला चांगलं फैलावर घ्या. त्याला सरळ सांगा की त्यानं कुणाला तरी आत येऊ दिलं होतं हे तुम्हाला कळलं आहे. त्याच्याकडून याची कबुली वदवून घ्या. आम्ही इथेच थांबतो."

"असं असेल तर मी आता बघतोच त्याच्याकडे!" असे म्हणत लेस्ट्रेड खोलीतून बाहेर गेला. तिथून त्याचा दरडावणीचा सूर आम्हाला स्पष्ट ऐकू येत होता.

होम्सच्या अंगात कसला तरी संचार झाल्यासारखं तो मला म्हणाला, "चल, लवकर, लवकर." असं म्हणत त्याने पटकन गालिच्याचा एक कोपरा उचलला. त्याच्या खालच्या लाकडी चौकोनाच्या कडेला नखं घालून तो चौकोन उघडला. त्याच्याखाली थोडी खोलवर पेटीसारखी रिकामी जागा होती. पण त्यात काहीच नव्हते!!

"हात्तिच्या!" होम्सच्या तोंडून राग आणि निराशा दर्शवणारा उद्गार बाहेर पडला.

आम्ही पटकन गालिचा पहिल्यासारखा केला. तेवढ्यात लेस्ट्रेड आलाच. तो म्हणाला, "माफ करा हं. तुम्हाला ताटकळत थांबावं लागलं. पण त्याने सर्व कबुली दिली. ये रे इकडे. यांना पण सगळं सांग. तुझं बेशिस्त वागणं त्यांनाही कळू दे."

तो हवालदार भीत भीत पुढे आला. "सर, काल संध्याकाळी एक तरुण बाई इथे आली. ती कुठलं तरी घर शोधत होती पण पत्ता चुकल्यामुळे ती इथे पोचली होती. मग म्हणाली, ’परवा ह्याच घरात खून झालाय नं? मी पेपरमध्ये वाचलं होतं. मी जरा आत डोकावून बघू का?’ सर, मला त्यात काहीच वावगं वाटलं नाही. ती बाई चांगली घरंदाज वाटत होती. पण गालिच्यावरचा रक्ताचा डाग तिने पाहिला मात्र, आणि ती बेशुद्ध पडली. मी पाणी आणलं आणि तिच्या तोंडावर शिंपडलं पण ती शुद्धीवर आली नाही. मग मी बाहेर त्या कोपऱ्यापर्यंत जाऊन ब्रॅंडी घेऊन आलो. पण मी येईपर्यंत ती शुद्धीवर आली होती. ती कशीबशी उठली आणि जरा ओशाळेपणेच माझ्याकडे बघत निघून गेली. "

"गालिचा पहिल्यासारखाच होता का? "

"नाही सर. जरा विस्कटला होता. ती त्याच्यावरच पडली होती नं! मी नंतर तो सारखा केला. "

लेस्ट्रेड हवालदाराला म्हणाला, "आता लक्षात ठेव. माझ्यापासून काही लपवण्याचा प्रयत्नसुद्धा कधी करू नकोस. तुला वाटलं असेल हे खपून जाईल पण गालिच्याकडे एकच नजर टाकल्यावर माझ्या लक्षात आलं होतं की नक्की कोणी तरी येऊन गेलंय. बरंय मि. होम्स, तुम्हाला मी विनाकारण त्रास दिला. पण मला वाटलं की हे डागाचं प्रकरण तुमच्या प्रांतातलं आहे, तुम्हाला त्यात रस वाटेल."

"हो.   हो.   नक्कीच."  पुढे तो हवालदाराला म्हणाला,   "ही बाई किती वेळा इथे येऊन गेली?"

"सर, फक्त एकदाच."

"कोण होती ती?"

"सर, ते मला माहीत नाही. ती म्हणाली की टंकलेखिका हवी आहे अशी जाहिरात वाचून ती आली होती पण तिचा पत्ता चुकला. सर, ती खूप चांगली बाई वाटत होती."

"दिसायला कशी होती? सुंदर?"

"हो सर, खूपच सुंदर होती. शिवाय चांगल्या घरातील वाटत होती. मला अगदी आर्जवाने म्हणत होती, ’द्या ना मला परवानगी. मी फक्त आत डोकावून येते.’  मलाही वाटलं तिला आत जाऊ द्यायला हरकत नाही."

"तिचे कपडे कसे होते?"

"साधेच होते.  एक लांब झगा तिने घातला होता."

"काय वेळ असेल ती?"

"नुकताच अंधार पडायला लागला होता. मी ब्रॅंडी आणायला गेलो तेव्हा रस्त्यावरचे दिवे लागायला सुरुवात झाली होती."

"ठीक आहे. चल वॉटसन, आपल्याला दुसरी महत्त्वाची कामं आहेत."

आम्ही घरातून निघालो. लेस्ट्रेड काही कामासाठी आतच थांबला. तो हवालदार मात्र दरवाजा उघडण्यासाठी आमच्याबरोबर आला होता. होम्सने एकदम मागे वळून कोटाच्या खिशातून काही तरी काढले आणि हवालदाराला दाखवले.

"हो सर, बरोबर!" हवालदार विस्मयचकित चेहऱ्याने म्हणाला. तो आणखी काही बोलणार तेवढ्यात होम्सने त्याला गप्प राहण्याची खूण केली.

(क्रमश:)