दुसऱ्या डागाचे रहस्य - १

शिशिरातल्या त्या मंगळवारची सकाळ अगदी अविस्मरणीय म्हणावी अशीच होती. आमच्या बेकर स्ट्रीट्वरच्या त्या छोट्याश्या घरात चक्क इंग्लंडचे पंतप्रधान लॉर्ड बेलिंजर आणि इंग्लंडचे युरोपियन घडामोडींचे सेक्रेटरी मि. ट्रेलॉनी होप यांनी आपली पायधूळ झाडली होती. दोघांचेही चेहरे चिंतित दिसत होते. काहीतरी अत्यंत महत्त्वाच्या कामाशिवाय ते आमच्या गरीबखान्यात आले नसते हे उघड होतं. पंतप्रधानांनी आपल्या हातात आपल्या छत्रीची हस्तिदंती मूठ घट्ट धरून ठेवली होती आणि त्यांची नजर आळीपाळीने माझा आणि होम्सचा चेहरा निरखीत होती. युरोपियन सेक्रेटरी उद्विग्नपणे मिशा उपटत होते आणि घड्याळाच्या साखळीशी नकळत चाळा करत होते.

युरोपियन सेक्रेटरी म्हणाले, "मि. होम्स, आज सकाळी आठ वाजता माझ्या लक्षात आलं की एक महत्त्वाचं पत्र माझ्या जवळून गहाळ झालं आहे. ताबडतोब मी साहेबांना ते सांगितलं आणि त्यांनीच सुचवलं की आम्ही तुम्हाला भेटावं. "

"पोलिसांत कळवलं का? "

"नाही! " पंतप्रधान ठामपणे म्हणाले आणि पुढे म्हणाले, "आम्ही पोलिसांत कळवलं नाही आणि कळवणारही नाही. पोलिसात कळवणं म्हणजे पर्यायाने सर्व जनतेला कळवण्यासारखंच आहे आणि तेच तर आम्हाला नको आहे. "

"असं का सर? "

"कारण सदरहू पत्र अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते जर उघड झालं तर त्याचे पडसाद सबंध युरोपभर उठतील. युद्धालासुद्धा तोंड फुटू शकेल. ते पत्र मिळवताना गुप्तता पाळली गेली नाही तर ते न मिळाल्यातच जमा आहे. कारण ज्यानं कोणी ते चोरलं आहे त्याचा उद्देश ते जनतेमध्ये उघड करणं हाच आहे. "

"बरं. मग मि. होप, आता तुम्ही मला हे पत्र कुठून गहाळ झालं, केव्हा गहाळ झालं वगैरे सर्व सविस्तर सांगा. "

"मि. होम्स, ते सांगायला फार वेळ लागणार नाही. सहा दिवसांपूर्वी युरोपातील एका राष्ट्राच्या राज्यकर्त्याकडून ते पत्र आलं होतं. ते इतकं महत्त्वाचं होतं की ते मी माझ्या कचेरीतील सेफमध्येही ठेवत नव्हतो. रोज संध्याकाळी मी ते माझ्या व्हाईटहॉल टेरेसमधील घरी घेऊन जात होतो आणि माझ्या शयनगृहातील एका पेटीत कुलपात ठेवत होतो. काल रात्रीही ते त्या पेटीत होतं. रात्री जेवायला जाण्यापूर्वी मी ती पेटी उघडली होती आणि पत्र त्यात होतं. आज सकाळी पाहतो तर ते गायब! ती पेटी नेहमीप्रमाणे रात्रभर आमच्या ड्रेसिंग टेबलावर होती. माझी आणि माझ्या पत्नीचीही झोप अगदी सावध आहे. रात्री कुणी आमच्या खोलीत आलं असतं तर आम्हाला नक्कीच कळलं असतं. सकाळी ते पत्र पेटीत नव्हतं हे मात्र मी अगदी शपथेवर सांगतो. " 

"आपण किती वाजता भोजन केलंत? "

"साडेसात. "

"झोपायला केव्हा गेलात? "

"माझी पत्नी एका नाटकाला गेली होती. ती परत येईपर्यंत मी थांबलो होतो. साडेअकरा वाजता आम्ही आमच्या शयनगृहात गेलो. "

"म्हणजे जवळजवळ चार तास त्या पेटीवर कोणाचाही पहारा नव्हता. "

"मि. होम्स, आमच्या खोलीत प्रवेश करण्यास कोणालाही परवानगी नाही. त्यांना तशा कडक सूचनाच दिलेल्या आहेत. ह्याला अपवाद म्हणजे साफसफाई करणारी एक मोलकरीण. ती सकाळी एकदा येऊन जाते आणि दुसरी व्यक्ती म्हणजे माझा नोकर. दोघेही आमच्याकडे बरीच वर्षे काम करत आहेत आणि दोघेही अत्यंत विश्वासू आहेत. खेरीज त्या पेटीत साहेबांच्या नेहमीच्या कामाच्या कागदपत्रांव्यतिरिक्त विशेष महत्त्वाचं काही असेल ह्याची त्यांना कल्पना असण्याचंही काही कारण नाही. "

"त्या पत्राबद्दल आणखी कोणाला माहीत होतं? "

"घरातल्या कुणालाच नाही. "

"तुमच्या सौभाग्यवतींना नक्कीच माहीत असेल? "

"नाही. मी आज सकाळपर्यंत माझ्या पत्नीशी ह्या पत्राबद्दल एक अवाक्षरही बोललो नव्हतो. पत्र गहाळ झाल्याचं आढळल्यावर मात्र मी तिला ते सांगितलं. "

पंतप्रधानांनीही ह्याला दुजोरा दिला आणि मि. होप यांच्याकडे वळून म्हणाले, "तुमची कर्तव्यदक्षता आणि सचोटी मला माहीत आहे आणि त्याच्या पालनासाठी कोणत्याही नात्याचे पाश तुमच्या आड येणार नाहीत याचीही खात्री आहे. "

मि. होप यांनी आपल्यावर दाखवलेल्या ह्या विश्वासाचा मान लववून ह्या स्वीकार केला आणि म्हणाले, "सर, आपण अगदी बरोबर बोललात. आज सकाळपर्यंत माझ्या पत्नीला मी ह्याबद्दल काहीही बोललो नव्हतो. "

"पण त्यांना ह्याचा थोडाफार सुगावा तरी लागला असेल. "

"नाही मि. होम्स. तिला किंवा इतर कुणालाही ह्याबद्दल काहीच कळणं शक्य नाही. "

"ह्यापूर्वी तुमची कागदपत्रं कधी हरवली होती का? "

"कधीच नाही. "

"सबंध इंग्लंडमध्ये ह्या पत्राबद्दल कुणाकुणाला माहीत आहे? "

"कॅबिनेटच्या सर्व सदस्यांना ह्याबद्दल काल सांगितलं होतं आणि नेहमीच्या प्रथेनुसार बैठक सुरू होण्यापूर्वी प्रत्येकाकडून गुप्ततेची शपथ घेतली गेली होती. शिवाय ह्या पत्राचं महत्त्व लक्षात घेऊन पंतप्रधानांनी स्वत: गुप्तता पाळण्याच्या बाबतीत कडक सूचना दिल्या होत्या. ह्या बैठकीनंतर काही तासातच ते पत्र माझ्याकडून हरवावं ही किती शरमेची बाब आहे! "

युरोपियन सेक्रेटरींचा देखणा चेहरा हे बोलता बोलता निराशेने ग्रासला. ते स्वत:वरच चिडले होते आणि आपले केसही उपटत होते. क्षणभरच त्यांच्यातल्या निराश, उद्विग्न, चिडलेल्या अशा सामान्य माणसानं डोकं वर काढलं. दुसऱ्या क्षणाला त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा उच्चभ्रूपणाची झाक आणि त्याला साजेसा मृदू आवाज हे दोन्ही परत आलं.   ते पुढे म्हणाले, "कॅबिनेटच्या सदस्यांव्यतिरिक्त प्रशासनातील २/३ अधिकाऱ्यांना ह्याबद्दल माहीत असणार. पण एवढेच. ह्यांच्याशिवाय सबंध इंग्लंडमध्ये हे कोणालाही माहीत नाही. "

"आणि परदेशात? "

"परदेशातही ज्याने हे पत्र लिहिलं त्याच्याशिवाय कोणालाही माहीत नसणार. पत्र पाठवतानाही त्याने नेहमीच्या कार्यालयीन मार्गाने ते पाठवलेले नाही. "

होम्स थोडं थांबून म्हणाला, "आता मला हे सांगा की हे पत्र असे काय आहे की जे गहाळ होण्याचे इतके तात्काळ परिणाम होतील? "

पंतप्रधान आणि युरोपियन सेक्रेटरी यांची काहीतरी नेत्रपल्लवी झाली आणि पंतप्रधान जरा अनिच्छेनेच सांगू लागले, "तो एक लांबट, फिक्क्या निळ्या रंगाचा लिफाफा आहे. त्यावर लाखेचं सील केलेलं आहे. सिलावर सिंहाचं चित्र आहे. मोठ्या, ठळक अक्षरात पत्ता लिहिलेला आहे. आणि.. "

होम्स त्यांना थांबवत म्हणाला, "सर, आपण सांगत आहात ती माहिती रंजक तर आहेच शिवाय तपासाच्या कामातही तिचा उपयोग होऊ शकेल. पण तरीही ह्या प्रकरणाचा छडा लावायचा असेल तर त्याच्या मुळाशी जायला पाहिजे. सर, ते पत्र काय होतं? "  

"ते एक अत्यंत महत्त्वाचं राजकीय गुपित आहे. त्याबद्दल तुम्हाला सांगणे आवश्यक आहे असे मला वाटत नाही. तुमच्या हुशारीच्या बद्दल आम्ही बरंच ऐकलं आहे. ते जर खरं असेल तर ती हुशारी वापरून आता वर्णन केलेला लिफाफा तुम्ही शोधून द्या. आपल्या देशासाठी तुम्ही केलेल्या ह्या कृत्याबद्दल तुम्हाला मोठ्यात मोठे पारितोषिक आम्ही नक्कीच देऊ. "

होम्स हसत खुर्चीवरून उठला आणि म्हणाला, "सर, आपण दोघे इंग्लंडमधील अत्यंत व्यस्त अशा व्यक्तींपैकी आहात आणि मलाही माझी काही छोटी छोटी कामं आहेत. ह्या प्रकरणात मी आपल्याला काही मदत करू शकेन असे मला वाटत नाही. आपण आणखी बोलत राहणं हा वेळाचा अपव्यय होईल. "

पंतप्रधानांची भेदक नजर कॅबिनेटमध्ये प्रसिद्ध होती. सर्व लोक त्यापुढे थरथर कापत असत. खुर्चीवरून उठत त्याच नजरेने होम्सकडे पाहात त्यांनी बोलायला सुरुवात केली. "माझ्यापुढे असलं बोलायचं धाडस कोणी करत नाही. "  पण एवढंच बोलून ते जरा थांबले, आपला राग आवरला आणि पुन्हा खुर्चीवर बसले. त्यानंतर साधारण मिनिटभर टाचणी पडली तरी आवाज येईल एवढी शांतता तिथे होती. तिचा भंग पंतप्रधानांनीच केला. नाईलाज झाल्यासारखे त्यांनी आपले खांदे उडवले आणि म्हणाले, "ठीक आहे. तुमचं म्हणणं आम्हाला मान्य केलंच पाहिजे. एका परीने ते बरोबरही आहे. तुम्हाला पूर्ण माहिती दिल्याशिवाय तुमच्याकडून कामाची अपेक्षा करणं योग्य नाही. "

मि. होप म्हणाले, "मलाही तसंच वाटतं. "

(क्रमश:)


शेरलॉक होम्सच्या  The adventure of the second
stain  ह्या कथेचा हा स्वैर अनुवाद.
मला सर्वच होम्सकथा आवडतात, काही
कथा अधिक आवडतात! ही कथा मला अधिक आवडणाऱ्या कथांपैकी एक आहे. कार्यकारणभाव
पाहून अचूक अनुमान काढणे हे होम्सचे मुख्य वैशिष्ट्य आहे. त्याच्या ह्या
वैशिष्ट्याचे दर्शन ह्या कथेत तितके होत नाही जितके ते  Silver Blaze
किंवा  Naval Treaty ह्यासारख्या कथांमध्ये होते. पण तरीही ही कथा मला
आवडते कारण त्यातील नाट्य! वाचकांनाही ती आवडेल अशी आशा.

होम्सकथांची भाषा हेही त्यांचे एक वैशिष्ट्य आहे. चपखल
शब्दयोजना, संवादांमधील शाब्दिक चकमक, भाषेतील एकूणच क्रिस्पनेस ह्यामुळे
ह्या कथा पुन्हा पुन्हा वाचाव्याश्या वाटतात. ही भाषेतील गंमत मला
भाषांतरात आणता आली नाही, येणारही नाही याची प्रांजळ कबुली येथे देत आहे.