लाभले आम्हास भाग्य... (भाग १)

काही दिवसांपूर्वीच मी पुण्याच्या हिंजेवाडी आय टी पार्क मध्ये एका कंपनीत नोकरी धरली, आणि सुरुवातीचे काही दिवस एकटे घालवल्यावर हळू हळू नवीन ओळखी होऊन माझ्या नवीन मैत्रिणी  जमल्या... खरे पाहता कोणत्याही दोन व्यक्तींची मैत्री व्हायला मुळात त्यांची विचारसरणी साधारण सारखी असावी लागते.... म्हणजे सगळ्यांसाठी हे बरोबर असेल असे नाही पण माझी तरी साधारण आपल्यासारख्या, शक्यतो मराठी घरातल्या, आणि सर्वसामान्यपणे नॉर्मल विचार असलेल्या लोकांशी पटकन मैत्री होते... (नॉर्मल मध्ये येथे मी अगदीच - अतिश्रीमंती विचारांच्या, पैसा हेच आयुष्य जगण्याचे साधन असलेल्या, सरळमार्गी/मध्यमवर्गीय माणसांना आपल्या स्टँडर्ड चं न समजणाय्रा, असे नसलेल्या व्यक्तींना मी नॉर्मल म्हणत आहे)

तर असो...

माझी ऑफिसमधल्या  तिघी जणींशी ओळख झाली... आणि ओघानेच आम्ही चहा नाश्त्याला... जेवायला एकत्र जाऊ लागलो... आपसूकच वेगळ्यावेगळ्या विचारांची देवाणघेवाण होऊ लागली... आणि हळू हळू माझ्या लक्षात आले की आपण आणि ह्या - आपल्यात बराच फरक आहे... घटनांचे वर्णन करण्याआधी मी तुमची त्या चौघींशी ओळख करून देते...

(नावे वेगळी वापरू)

मंजुलीका : भूल भूलैया चित्रपटातली नव्हे.... माझ्या ऑफिसातली.... बंगाली मुलगी- अन्मॅरिड .... आई वडिलांच्या कृपेने श्रीमंतीत वाढलेली...

रीमा :  पहिले काही दिवस मी समजत होते की हिचे लग्न झाले आहे... वय सहज ३३-३५ वगैरे असेल.... पण ती सुद्धा अन्मॅरिड आहे.... पण हा सर्वस्वी तिचा वैयक्तिक प्रश्न आहे. मराठी.... मूळ मुंबईमधली....

ईशा : नागपूरची... लग्न झालेली... २ मुले... मुले आणि नवरा वेगळ्या शहरात राहतात , ही इथे राहते... करिअर साठी

 एके दिवशी सहज जेवताना... कोणाच्या घरी कोण कोण असतं वगैरे विषय निघाला.... प्रत्येकीने आपआपली माहिती दिली...

मंजुलीकाः आई, बाबा, २ कुत्रे.... हे सर्व कलकत्त्याजवळ राहतात.  मोठा भाऊ आणि त्याची गर्भवती बायको दिल्लीला राहतात... आणि ही नोकरीला लागली तशी २ वर्षे हैदराबाद.... २वर्षे बेंगलोर... आणि आता इथे पुण्यात भाड्याने राहते...

रीमा : ही सुद्धा साधारणपणे अश्याच प्रकारातली.... १२ वर्षे नोकरी करते आहे... (ह्यावरूनच मी तिच्या वयाचा अंदाज बांधला....  ) आणि बेंगलोर, हैदराबाद, चेन्नई अश्या शहरात ही वर्षे काढल्यावर आता पुण्यात भाड्याच्या घरात राहते...

ईशा :  मगाशी सांगितल्याप्रमाणे.... विखुरलेलं कुटुंबं आणि करिअर ह्याचा सार्थ अभिमान बाळगते.... ११ वर्षाच्या अनुभवात ही देखिल अशीच वेगळीवेगळी शहरे पादाक्रांत करून आली आहे..

ह्या सगळ्या गोष्टी ऐकून मलाच चौकट राजा मधील दिलीप प्रभावळकरांच्या भूमिकेमध्ये शिरल्यासारखं वाटायला लागलं... कारण मी वयाची २३ वर्षे आई वडिलांकडे डोंबिवलीमध्ये राहिले... त्या नंतर पुण्यातल्या मुलाशी लग्न करायचे ठरवल्यावर पुण्यात नोकरी पाहिली... आणि नोकरी लागल्यावर ७-८ महिन्यांनी लग्न करून सासरी... नवरा आणि सासूसासय्रांसोबत आनंदाने राहत आहे...

ह्या तिघींसाठी माझे हे आयुष्य म्हणजे पृथ्वी वर परग्रहमानव अवतरल्यासारखे होते.... एकतर मी सासूसासय्रांसोबत राहते ह्याचे त्यांना नवल वाटले.... एवढेच नव्हे तर ते कसे त्रासदायक असते ह्यावर त्यांचे काही काळ संभाषण झाले... मग मला एक प्रश्न विचारला गेला... "तुम कहां रहती हो???" 

मी :  ( मनात : पत्ता विचारत असेल बहुतेक ) मी आपला साधारण एरिया वगैरे सांगितला.... आणि म्हटले.... की अश्या नावाच्या बिल्डिंग मध्ये राहतो आम्ही....

मंजुलिका : तुम अभीभी फ्लॅट मे रहती हो??? घर मे नही??

मीः   (माझ्या मते तरी आपण ज्या वास्तूत राहतो त्याला आपलं घर मानतो.... मग तो फ्लॅट असो... बंगला असो.... किंवा गरीबासाठी त्याची झोपडी असो....) हां वोही हमारा घर है....

तिघीः एकमेकींकडे पाहून... गप्प

ह्या प्रसंगाचे मला राहून राहून आश्चर्य वाटते.... वास्तविक पाहता ह्या तिघीही विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर ह्याउक्तीनुसार सतत घरे आणि शहरे बदलत फिरत आहेत... स्वाभाविकपणे भाड्याच्या घरात राहत आहेत... आई वडिलांनी बंगले करून ठेवले आहेत... (कलकत्त्याजवळच खेडेगावात, नागपूर जवळच्या खेडेगावात....)म्हणून फ्लॅट मध्ये राहणाय्रांना कफल्लक समजण्यात आणि त्यांच्याकडे त्या दृष्टीने पाहण्यात कोणते शहाणपण ह्यांना दिसते कोणास ठाऊक...

ह्या दिवसानंतर मी जरी त्यांच्या सोबत जेवायला खायला जात असले तरी मुद्दामच जरा बाजूला राहू लागले.. मला अश्या हलक्या विचाराच्या लोकांची चीड आहे... 

प्रसंग क्र. दोन

एके दिवशी त्या तिघी कँटिन मध्ये गप्प मारत बसल्या होत्या.... आणि मी तिथे जाऊन पोहोचले...

ईशा : ये आ गई....जानेदो... ये पूने वाली है... इसको नही पसंद आयेगा...

मी : क्षणभर गप्प... पण मग न राहवून मी विचारले.... क्या हुवा?

ईशाः नाही ग... आम्ही जरा पुण्यावरून बोलत होतो....

मी :  हो का.... मग कुठली जागा वगैरे शोधत आहात का?

मंजुलिका : हम कह रहे थे के यहा पूने मे कुछ नही रखा...

मी :   का? काय झालं?

मंजुलिका : यहा तो रात को ढंग से कुछ खानेको भी नही मिलता...

मी :    काय??  पुण्यात रात्री नीट खायला मिळत नाही??

ईशाः हो ना... बेंगलोर ला कस.... अबकडईफ़

मंजुलिका : हैदराबादला तर मी जिथे राहत होते ना.....

मी : बरोबर आहे... कसं मिळणार??? तुम्ही पुण्यात राहतच नाही ना....

तिघी : ------

मी :  तुम्ही वाकड ब्रिज च्या बाजूला राहता... त्याला पुणं नाही म्हणत.... तुम्ही खरं पुणं पाहिलंच नाहीये... आठवडाभर ऑफिस आणि शनिवारी - रविवारी झोप महत्त्वाची असते... गेल्या ३ महिन्यात इथे आल्यापासून तुम्ही कधी लक्ष्मी रोड, डेक्कन, एफ् सी रोड, कँप, कोरेगाव पार्क ह्यापैकी एकही जागा पाहिली नाहीये... मग तुम्हाला कसं कळणार पुणं काय आहे ते.... जरा आपल्या खुराड्यांमधून बाहेर या आणि पाहा.... पिंपरी चिंचवडचं बिग बाजार आणि मोर म्हणजे पुणं नाही ... बेंगलोर, हैदराबाद ह्या शहरांच्या झगझगाटाला बाजूला ठेवा.... ह्यांपलीकडे जाऊन पाहा.... तुम्हाला पुणं काय आहे ते कळेल.... आणि महत्त्वाचं म्हणजे.... महाराष्ट्रात काय आहे ते दिसेल.... 

(क्रमशः)