गर्दूल्ल

देव विकले
दाराच्या कड्या विकल्या
जमतील त्या तिजोऱ्या फोडल्या
एका नशील्या पुडीसाठी

काय होते त्या पुडीत?
भविष्य. नशिब, पैसा?
सारं गेलं चुलीत
जगण्याचे काही श्वास होते त्या पुडीत

काय झाले असे अचानक?
ज्यामुळे आयुष्य बनले भयानक
एक विफल दुःखी कथानक

पैसाही एकेकाळी मिळवला होता
बहुतेक किनारा सापडत नव्हता

सगळा मुर्खपणा,
जग होते बेवड्यांचे
सिगारेटीत भरून फुकणाऱ्यांचे

बेभान जगणे, निरर्थक, निरुद्देश, असहाय
गर्दुल्ल्यांचे जग, ना जमिनीवर पाय

गावातून धिंड, जेलमध्ये मार
नात्यातून बाद, पोरी फरार
खिसा रिकामा, पोटात खिंडार
चुकले सारे, ऊशीर झाला फार

परतायची हिम्मत नव्हती
पायात शक्ती नव्हती
मेंदुत धमक नव्हती
साली, पावडरची पुडी मिळत नव्हती

फोडली कबर एका गर्दुल्ल्याची
कबरीत एक पुडी होती आवडती त्याची
गाणी स्तुतीची गायली त्याची
मेल्यावरही त्याने साथ सोडली नव्हती

असह्य झाले सारे, आग लावली स्वतःला
जग नाहीतरी सांगतच होते विझून जायला
पावडरसहित पेटलो, रडलो नाही
मरताना एका झुरक्यासाठी तळमळलो नाही

एक टॅलेण्ट खाक झाले
बघताबघता राख झाले

त्या राखेतून आजही आवाज येतो
'आन्या, मला जगायचे होते रे!
आईला सुखात ठेवायचे होते रे!
पण फसलो रे!
नको रडू माझ्यासाठी,
आता तुझ्यातच मी मला पाहतो रे!