अल् विदा आम्रराज! (भाग १)

(आधी फक्त 'अल् विदा' असेच शीर्षक ठरवले होते. पण नंतर हा कुणा यवन शायराचा मृत्युलेख आहे अशी समजूत होऊन, तसा तो नाही हे कळल्यावर कोणाला 'हुश्श' वाटू नये, किंवा वाटले तरी त्याचे उत्तरदायित्व आपल्यावर येऊ नये यासाठी 'आम्रराज' या शब्दाचा समावेश शीर्षकात केला आहे.)

[आता कंसानेच सुरुवात झाल्याने कुणाकुणाचे भृकुटिकंस उंचावतील कदाचित, पण नाइलाज आहे.{शिवाय, परिच्छेदाची सुरुवात कंसाने होऊ नये असा काही नियम नाही. (असल्यास ठाउक नाही.)}]

असो. नमनालाच सगळे कंस खर्ची पडले तर पुढे कंस-टंचाई निर्माण व्हायची म्हणून पुन्हा असो. वर्ण्य विषय आंबा असल्याने तिथे वळू (किंवा पिळू).

आंब्यांचा मोसम संपत आला आहे. सर्वच आंब्यांचा नाही अर्थात. चित्रपटाच्या श्रेयनामावलीत प्रमुख नावे आधी ठळकपणे झळकल्यावर मग उरलेसुरले गटागटाने नंतर कितीतरीवेळ हजेरी लावत राहातात तसे मुंबई-पुण्यामध्ये हापूस, पायरी येऊन गेले की  मग उरलेले सगळे लंगडा,दशहरी,नीलम, तोतापुरी, राजापुरी आणि कुठले कुठले आंबे येत राहातात. केसर आंब्याने आता चिल्लरखुर्द्यामधून बंद्या रुपयापर्यंत पदोन्नती घेतली आहे. अर्थात गुजराती असल्यामुळे त्याने थोडक्या अवधीत बाजारात बस्तान बसविणे साहजिकच आहे.

तरीही अजून हापूस  आपली सद्दी टिकवून आहे. किती काळ तग धरतो ते बघायचे. कारण अलीकडे तो फारच बेभरवशाचा होत चाललाय. कितीही नावाजलेल्या बागेतून घ्या, काही नग तरी लासे असलेले निघणारच. तसे केसरच्या बाबतीत होत नाही. अगदी 'भय्या'कडून घेतला तरी तो चांगला निघतो‌‌. शिवाय फळे कृत्रिमरीत्या पिकवणाऱ्यांनी हापूसला लक्ष्य केले आहे. हापूस आणि केळे. भय्यांच्या भाषेत 'भट्टीमेसे निकालना'. त्यांचा मूळ धंदा कपड्यांना इस्त्री करण्याचा असल्यामुळे तीच परिभाषा इतरत्र रूढ होणे साहजिकच. त्यामुळे 'वीटभट्टी', 'चुनाभट्टी' अशी नावे जाऊन त्याजागी 'आंबेभट्टी','केळेभट्टी' ही नावे रूढ होऊ लागली आहेत. त्यामुळे 'भट्टी' या शब्दाचे देखील पुनरुज्जीवन होऊ घातले आहे, अशी खबर आहे. आता 'खुश' किंवा कसे ते ज्याने-त्याने ठरवावे.

आता शब्दावरच उतरलो आहोत, तर हापूस या कृषिउत्पादनाचे पेटंट घेतले आहे किंवा घ्यायचे चालले आहे ते मूळ 'आफ़ाँस' या नावाने की हापूस या नावाने? कारण 'आफ़ाँस' हा पोर्टुगीज 'Alphonso' आहे. अजूनही अस्सल आम्रप्रदेशी लोक हापूस न म्हणता आफूसच म्हणतात.आता याचा जर परकीय संस्कृतीशी संबंध असेल तर हे नाव बादच व्हायला हवे. मग काहीतरी 'अल्प हंस' या नावाने घ्यावे का पेटंट? [ इथे कोणी कोणी अल्प अल्प हसताहेत असे वाटतेय. हसा हसा. ('हंसा हंसा' नव्हे.नाही तर हंसांची कलकल/कळकळ कानी पडायची.)]

जर 'हापूस' शब्द परकीय मुळामुळे मुळी (त्रांगडेच आहे! ) बादच होत असेल तर 'केसर' आंब्याला पुढे करावे का? केसर अगदी 'इंडियन्  ऑरिजिन् ' च  आहे. अर्थात केसर ह्या शब्दाचा कैसर, सीझर, झार, शेर ह्यांच्याशी संबंध दाखवून त्याचेही मूळ दूर कुठेतरी कॉकेशस् मध्ये असल्याचे सिद्ध झाले तर मात्र पंचाईत.

तसाच दुसरा शब्द 'पायरी'. हा 'परैरा' पासून आलाय आणि आज प्रायः अस्तंगत आहे. (आंबा. शब्द नव्हे.)(बरे झाले एक साहेब जातोय ते!)पण मग आता रस कशाचा निघणार? हापूसचा? छे! ज्या ज़ाड घट्ट लगद्यात पुरी बुडता बुडत नाही किंवा जोरजबरदस्तीने बुडवावी लागते, तो कसला रस? पूर्ण पिकलेल्या लाल केशरी पायरी आंब्याच्या प्रवाही सुगंधी रसात बोटे पुरीसह कशी अलगद बुडतात. असे नेमके, योग्य, ऑप्टिमम विशिष्टगुरुत्वच  आपल्याला आवडते बुवा.