अल् विदा आम्रराज! (भाग २)

तर हापूस पायरीने काढता पाय घेतला की मग लंगडा,दशहरी,केसर, नीलम, तोतापुरी, राजापुरी यांना पदपथ मोकळे होतात. राजापुरी आंब्याचं नाव राजापुरी, येतो मात्र सुरत-वलसाडहून. आश्चर्य आहे, सुरत, वलसाड, वापी या पट्ट्यात एव्हढं  मोठं शहरीकरण,औद्योगीकरण, प्रदूषण वगैरे सर्व असूनही उत्तम आंबे, उत्तम भातपीक, (चिवडा व्यावसायिकांना चिवड्यासाठी लागणारे पोहे सुरतेहून येतात.)उत्तम भाज्या कश्या काय पैदा होतात? आणि इकडे कोकणात मात्र कशातच काय नाय आणि सदाच फाटक्यात पाय!

पण हे लंगडा, दशहरी वगैरे बाजारात येईपर्यंत आकाशात ढग जमू लागलेले असतात‌. सूर्य तळपत असेपर्यंत आंबे खाऊन घ्या या न्यायाने आंबे खाऊन खाऊन  भागलेले आणि खूपसे गवत गोळा केलेले लोक पावसाळ्यात आंबे खायला नाखुश असतात. सगळेच घोडे काही बारा टक्के नसतात, सारखे आपले खा खा (आंब्याची पेटी) आणि खा खा (आंब्याचा खोका) !

तरी पण पावसातल्या लंगड्याला बादशहा समजणारे लोक आहेतच. विशेषतः उत्तरप्रदेशी. वासरांत लंगडी गाय शहाणी, तसं  पावसात लंगडा आंबा बादशहा(णा), असं म्हणता येईल. पण वाराणसीवाल्यांना हे कधीच पटायचं नाही. भूतपूर्व वाराणसीकर आणि सध्याचे महाराष्ट्रवासी सुप्रसिद्ध खगोलतज्ञ श्री जयंत नारळीकर यांना एकदा हापूस आणि लंगडा यांच्या तर-तमतेविषयी (त्यांचा वाराणसीनिवास लक्षात घेऊन) विचारलं असता ते म्हणाले होते, सर्वसाधारण हापूसपेक्षा सर्वसाधारण लंगडा केव्हाही चांगला असला तरी सर्वोत्कृष्ट लंगड्यापेक्षा सर्वोत्कृष्ट हापूस सदैव चांगला असतो! यावर वाराणसीकरांनी उत्तर दिलं होतं म्हणतात की सर्वसाधारण लंगडा हा बहुधा उत्कृष्टच असतो पण उत्तम हापूस हा क्वचितच उत्कृष्ट असतो! जाउ दे. आपल्याला एकंदरीत सरासरीत गती नाही. गणिती की गत गणितीही जाने. (आयुष्यभर गणिताने घायाळ झाल्यामुळे मीरेचं हे वचन आठवलं असावं).

आणखी एक खुशखबर काही महिन्यांपूर्वी वाचली होती की जुन्नर येथे जातिवंत आंब्यांची पैदास होते आहे. बाजारात खूप शोधलं पण काही पत्ता लागला नाही. वाटलं की एकदा सगळ्या ट्रेक्करांना घेऊन जुन्नरवर चढाई करावी. आम के आम आणि शिवनेरी का भी काम. बाय द वे, ह्या गडामुळेच जातिवंत आंबे पैदा होत असतील का? (उदा. देवगड!) नंतर तर्क केला की ते बहुधा निर्यात होत असतील. कारण, 'जे जे उत्तम वेचीव आणिक महन्मधुर ते, ते;  अक्सिर मिळते दुबई शार्जा एले एन्वाय येथे'. तर आपण दुबई फेस्टिवल ला जाऊन जुन्नर आंबे खाऊ. जुन्नर व्हाया दुबई. एरव्हीही आम्ही गोरेगाव व्हाया राजीव गांधी समुद्र सेतू किंवा पुणे स्टेशन व्हाया बावधन पाषाण, विद्यापीठ, शिवाजीनगर असे जातोच. दुबई म्हंजे समुद्राचं थोडं एक्स्टेंशन, बास.

तर आंबे अगदी पोटभर खाल्ले, कोपरंही चाटून पुसून घेतली. (कोपरं घशात घालायची हे दात घशात घालण्याइतकं सोपं काम नाहीय. ते एक आसन आहे. आम्रकोपराशन! करून बघा! )

आता निरोपाची वेळ आलीय. बाजारात अजूनही आंबे आहेत, अजूनही त्यांना भाव आहे. उलट सरत्या मोसमात तो वाढतोच आहे. शिवाय जुनागढ,वलसाड,बिलिमोरा,अलिबाग, हातखांबा, लांजे इथून उरले सुरले मागस आंबे उत्तरेतल्या मोठ्या शहरांच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत. पण आता काही खरं नाही. पाऊसही त्यांच्याबरोबरीनेच मार्गक्रमण करतोय. कधीही कोसळेल. महाराष्ट्रात तर धुवांधार कोसळलाच. आता साचलेल्या पाण्यात रिकाम्या पेट्या, गवत, साली, कोयी हे सर्व एक होऊन तरंगताहेत. 'डबक्यात पसरले बाठे पेट्या साली' अशी खिन्नता मागे ठेवून एक रसमयी मैफल संपते आहे. अल् विदा, आम्रराज!