तरी हुंदक्यांना गिळावे किती?
झणी झोत येती तुझ्या आठवांचे, सयेचे उमाळे छिपावे किती?
बळे रोखतो मी जरी आसवांना, तरी हुंदक्यांना गिळावे किती?
कधी चाललो मी तुझ्या पावलांनी, कधी बोट हातात होते
तुझे तशी सांज येणार परतून कैसी, मनी प्राक्तनाने झुरावे किती?
जरी देह-काया चिरंजीव नाही, तळे भावनांचे तरी साचते
जरी घालतो बांध मी या तळ्यांना, हृदय फ़ाटतांना तुणावे किती?
जगी जीव अब्जो जरी नांदताती, फ़ुलांच्या-फ़ळांच्या डहाळ्या दिसे
परी शोधताहे नजर का तुला बा! स्मृतींचे खुमारे भुलावे किती?
'अभय' विरह येतो नशीबी कुणाच्या, कुणाचेच दुर्भाग्य तैसे नसो
शिरी छत्रछाया अखंडीत लाभो, विधात्या तुला मी पुजावे किती?
गंगाधर मुटे
..........................................................