असे का ...?

बासरीच्या फुंकरीने वादळे उठतात का?

आसवांच्या पाझराने माणसे बुडतात का?
     उंबरा होता मुका अन बंद होते दार ही
     साद कोणाचीच नाही, पावले अडतात का?
घातले आहेस कुंपण तू मनाच्या भोवती
नाग माझ्या आठवांचे एवढे डसतात का?
     बाग बहरातील तेंव्हा सोडुनी गेलीस तू
     आज सुकलेल्या फुलांचे गंध ते स्मरतात का?
हासले कोणी जरासे, चालले दो पावले
ह्या क्षणांच्या सोबतीने माणसे कळतात का?
     आर्जवे केली तुझी मी, हात माझे जोडले
     माणसांवर, सांग म्रृत्यो, हे असे रुसतात का?
राहू दे, उरलो जरासा, मी तुझ्या हृ्दयांत ग
सांग काटे, पाकळ्यांना, आपुल्या सलतात का?
     कोणत्या अतृप्त इच्छा राहिल्या मागे 'मिलन'?
     पिंड सजलेला तुझा हे कावळे बुजतात का?