जुने पेच ते पेश होती नव्याने..
पुन्हा खालती पाहिले त्या दिव्याने!!
विसंबू नको ना दिव्यांचा भरवसा..
दिलासा दिला हा मला काजव्याने!!
असे मृत्यूचा शाप ह्या मीलनाला..
तरी का जळाले पतंगे थव्याने??
मला एकही शब्द सुचला न तेव्हा..
कसे व्यक्त केलेस तू हुंदक्याने?
बरे ताट माझे रिकामेच होते..
किती दुःख हे वाढले वाढप्याने!!
जिथे पिंड असती.. तिथे कावळेही..
तिथे का घुमावे उगा पारव्याने?
बहर येत होते, बहर जात होते..
फुलांनाच नाकारले ताटव्याने!!
टिप - : गझलेचा मतला श्री. बेफिकीर ह्यांस विनयपूर्वक सादर. त्यांनीच मी लिहीलेल्या एका गझलेच्या प्रतिसादात मतल्याची पहिली ओळ सहज लिहीली होती. तोच दुवा पकडून मतला सुचला त्यामुळे बेफिकीर ह्यांच्या निदर्शनास आणून देणे मी महत्त्वाचं समजतो. टिप लांबल्यावद्दल क्षमस्व!