जाता पंढरीसी.. (१)

सहा वर्षापूर्वी लेखक  ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत पंढरपूरच्या वारीस गेला होता, त्यावरील ही लेखमाला- आषाढी हे निमित्त..

----------------------------------------------------------------------------------------------------

पंढरपूरला जायचा निर्णय अचानक नव्हता. त्याबद्दल बरंच वाचलं, ऐकलं होतं. T.Y. झाल्यापासूनच जायचा मोका शोधत होतो, या वर्षी जमून आलं इतकंच. त्यावर लोकांच्या प्रतिक्रिया ऐकून मात्र बरंच मनोरंजन झालं - "सगळी घाण - चिकार गर्दी असते तिकडे, कशाला जातोस? "; " अरेरे! या वयात परमार्थाला लागला" पासून "प्रेमभंग वगैरे झाला का? " इथपर्यंत विचारणा झाल्या.

पहिल्याच वेळी एकदम २१ दिवस (संपूर्ण वारी) झेपेल की नाही याबद्दल साशंकता होती, शिवाय TATA MOTORS ची मुलाखतही होती. त्यामुळे फलटणला वारीत सामील व्हायचे ठरवले. फलटणपासून पुढे सहा दिवस - ११० कि. मी.

फलटणला बसमधून जातानाच विठोबाचा विचार चालू होता. उत्त्पत्ती - स्थिती - लय या त्रिकूटातील विठोबाची स्थितीशी जवळीक - विष्णूचा वारसदार - पालनकर्ता. पहिला धडा मिळाला की 'जीवनाला सामोरे जा'  , मजेत जा - LIFE IS BEAUTIFUL! जीवन ही जगायची गोष्ट आहे. थोडं 'ऍब्स्ट्रॅक्ट' झालं का? मला म्हणायचंय असं की, जी शक्ती पालनकर्ती आहे - जिला जग सांभाळायचं व चालवायचं आहे, तिचा बडिवार माजवल्याशिवाय तिच्यामागे कोण येईल? विठोबाची वर्णने वाचा - समृद्धी, ऐश्वर्य, आबादीआबाद !! कुठेही निराशेचं, नकारात्मक वर्णनाचं टिपूसही नाही [त्याचेच sister concern - खरं तर brother concern - तिरुपतीचे बालाजीपण तसेच - अक्षरशः सोन्यात लोळणारे ]

जगाची जाणीव होईपर्यंत माणूस स्वतःच्या कोशात निमग्न असतो. निसर्गाक्रमाविरुद्ध चिकार काळपर्यंत त्याचं   पालनपोषण परहस्ते होत असतं. स्वतः त्या लायक बनायला जर पहिली कुठली गोष्ट करावी लागत असेल तर ती आहे - स्वतःच्या कोशातून बाहेर येणे, विश्वाला सामोरं जाणं - विठ्ठलराव तेच बजावतात.

दुसरी गोष्ट - जुळवून घेणं. जगाला सामोरे गेलात की तुमच्या खूप दिवसांत कोशात साचलेल्या संकल्पना आणि समोर दिसणारं जग यात अंतर पडलेलं दिसतं - ते मिटवायची जबाबदारी तुमची. माझ्या तंबूतील सहकाऱ्यांच्या शब्दात सांगायचं तर " लाज सोडा". ही लाज असते स्वतःची, आपल्या आतापावेतो परखल्या न गेलेल्या क्षमतांची, बुद्धीची, भावभावनांची - त्यांचे बंध उलगडा. त्यांची झेप असेल तितक्याच त्या जातीलही पण झेप किती आहे हे 'लाज' सोडल्याशिवाय कसं कळणार? म्हणून विठोबा म्हणतो, 'जीवनाशी जुळवून घ्या ते स्वतःला ओळखण्यासाठी. प्रवाहाबरोबर वाहायचं का विरुद्ध हा पुढचा प्रश्न आहे.

विठोबाचे इतर बोल पुढे..

क्रमशः