जाता पंढरीसी.. (५)

एका परीनं हे महाराष्ट्रीय संमेलनच म्हणायचं. ओळख-पाळख काहीही लागत नाही. "काय माऊली कुठली म्हणायची? " इतकं पुरे. जळगाव, धुळे, औरंगाबाद, नागपूर पासून उस्मानाबाद, लातूर, कोल्हापूर, नगर, नाशिक, मुंबई.. सगळीकडले प्रतिनिधी असतात. वर्षानुवर्षे न बोलावता येतात, हक्कानं येतात, तीन आठवडे मांडीला मांडी लावून बसतात, सोबत चालतात. मी  महाडकडले तीन-चार संन्यस्तही पाहिले. दुपारच्या वेळी असाच (भोजनोत्तर) पडलेलो असताना त्यांचा वाद ऐकला. ते निर्गुणी संप्रदायातले/निवृत्तीमार्गी वाटत होते. मोठ्या हिरिरीने आपली मतं मांडत होते. नामसंकीर्तन, सगुणोपासना निरर्थक आहे, सगुण-साकार रुपाची आराधना काय कामाची; परमेश्वर तर निर्गुण, निराकार आहे असा काहीसा त्यांचा पक्ष होता. त्यावर मी त्यांना 'कॉपीबुक' उत्तर सुनावलं - 'दुसऱ्या दिवशी रांगोळी पुसायची असली म्हणून कुठलीही गृहिणी आजची रांगोळी कशीतरी काढत नाही; मेहनतीने सुबक, सुंदरच काढते'.. पण त्यांना काही विशेष पटलं नाही...

.. तरीही ते वारीसोबतच होते.

'जात नाही ती जात' म्हणतात ते खोटं  नसावं. पूर्वीच्या काळी प्रत्येक जातीची खाण्या-जेवण्याची व्यवस्था वेगळी-वेगळी असायची. आजमितीला असं काही दिसलं नाही; पण दुसऱ्या जातीच्या माणसाकडे पाहतानाचा 'आप-पर' भाव सहज ओळखता येतो. म्हणजे माझी ओळख करून देताना - 'हे चिंतामणी जोग; पहिल्यांदाच वारीला आले आहेत- ब्राह्मण समाजाचे आहेत... ' वारीला आल्याबद्दल कौतुक आहे, आपुलकीही आहे; पण थोडासा परकेपणाही आहे. पुढल्या गप्पांमध्ये सहजच तुकारामांचे उल्लेख येतात - त्यांचा ब्राह्मणांनी केलेला छळ, त्यांचे कट्टर विरोधक व नंतरचे निःस्सीम भक्त- रामेश्वरभट्ट.. मग विष्णूबुवा ब्रह्मचारींचा किस्सा येतो, मामासाहेब दांडेकर, त्यांचं अफाट कार्य - या सगळ्यातून कौतुकाची पावती मिळते पण का कोण जाणे वेगळेपणाचा धूप दरवळत राहतो खरा.

जातींची उच्चनीचता ही भानगड कधी उगवली ते ठाऊक नाही पण माणसाची 'वेगळे ओळखले जाण्याची ओढ' हे या संस्थेच्या फोफावण्याचे एक कारण असावे. संस्कृती रुजते ती सवयींमुळे. जितकं वैविध्य सवयींमध्ये तितकं त्या-त्या जातीतले वेगळेपण अधिक - आणि ते वेगळेपण जपण्याची इच्छाही तीव्र.

मात्र समर्थ रामदास आता परके नाहीत. रोज जेवायला बसल्यावर खणखणीत आवाजात 'सदा सर्वदा.. ' चा घोष व्हायचा.

'सुशिक्षितपणा'चा - सुशिक्षित असल्यामुळे आलेला हा एक वेगळा अनुभव - भंडी-शेगाव या गावी मुक्कामाला पोचलो. उतरायची व्यवस्था जिल्हा परिषदेच्या शाळेच्या पटांगणात होती. तंबू वगैरे ठोकून तयार होता; पण दुर्दैवाने दुपारपासून तिथं पाऊस लागला. तंबूभोवती चर वगैरे खणले नव्हते त्यामुळे पाणी आत शिरलं आणि झोपायचं कुठं हा प्रश्न आमच्यापुढे पडला. तंबू जागचा हलवून पुन्हा दुसरीकडे लावणं काही शक्य नव्हतं शाळेची इमारत एकमजलीच पण विस्तीर्ण होती. इतर काही दिंड्यांची व्यवस्था शाळेच्या वर्गांत (आधीपासून) ठरल्याप्रमाणे केली होती. दुपारी चार-साडेचारपासून व्हरांड्यातल्या मोकळ्या जागांवरही लोकांनी पथारी टाकण्यास सुरुवात केली. आमच्या तंबूत पर्यायी व्यवस्थेचा शोध सुरू असताना आमच्यातले दोघे-तिघे जिन्याच्या व भिंतीच्या मधील बोळकंडीत सगळ्यांच्या हातपिशव्या घेऊन बसले होते.

बहुधा ट्रकमध्ये आणि त्या बोळकंडीत झोपायला लागणार असा रंग दिसत असताना तिकडले एक गृहस्थ आम्हाला 'किती माणसे आहात' असं विचारू लागले. ते शाळेची व्यवस्था पाहणारेच होते. आमची परिस्थिती त्यांनी पाहिली. शाळेची बंद स्टाफरुम त्यांनी उघडून झाडून-बिडून आतल्या गाद्या-गिर्द्यांसह आम्हाला देऊ केली - का? तर केवळ आम्ही पुण्या-मुंबईकडचे सुशिक्षित लोक दिसतो - खोली दिली तर खराब करणार नाही म्हणून.. [अर्थातच त्यांचा हा विश्वास आम्ही सार्थ ठरवला] आंधळा मागतो एक डोळा आणि देवाने दिव्यदृष्टी द्यावी तशी आमची अवस्था झाली. आमची सोय झाल्याने आम्ही सामान-सुमान उचलतोय तोच कोणीतरी वारकऱ्यांनी त्या जिन्याच्या बोळकंडीची जागा आमच्याकरता ठेवा; आमची माणसं आणतो असा आग्रह धरला. त्यांनी त्या जागी त्यांच्या पथाऱ्या पसरल्या, आमचे आभार मानले पण मला मेल्याहून मेल्यासारखं झालं. स्टाफरूमपर्यंत जाईस्तो जागोजाग सगळ्या वयाचे बायका, पुरुष, मुलं व्हरांड्यात पथाऱ्या टाकून बसले होते... आणि आम्ही 'स्पेशल' खोलीत पंख्याखाली असलेल्या गाद्यांवर झोपायला चाललेलो - का? आम्ही 'सुशिक्षित' आहोत म्हणून.. त्या खोलीत गादीवर पडणे मला शक्यच नव्हते. बाजूला सतरंजीवर अंग टाकत मी विचार करत पडलो - म्हटलं तर साधी गोष्ट. आजूबाजूला शेकडो लोक कसेतरी पहुडलेत मग आपलेच हे 'लाड' का? की आपल्या तरुणाईच्या रक्तामुळे या गोष्टीचा त्रास होतोय?

क्रमशः