जाता पंढरीसी.. (३)

आता वारीत येऊ इच्छिणाऱ्याला आलाच पाहिजे असा कळीचा शब्द - एकच - 'माऊली'!!!

सर्वाभूती परमात्मा पाहणे वगैरे आध्यात्मिक कल्पना ही कविकल्पनाच वाटते; पण applied आध्यात्म पाहायचं तर वारीत या! संबोधन विभक्तीचा एकच प्रत्यय असतो - माऊली!

अहो, अरे, अगं, साहेब, भाऊ, काका, मामा पासून ए पानवाल्या, चहावाल्या, हॉटेलवाल्या या सगळ्यांना एकच संबोधन पुरतं - माऊली.

माऊलीचा विषय निघालाच आहे तर सांगतो - विठोबा काय, ज्ञानोबा काय, इथला भक्ताचा देवाकरता भाव लेकराचा असतो. मागे म्हटलेल्या 'पालक' इमेजशी हे आई-मुलाचं नातं योग्य मेळ खातं. मातृप्रेम, वात्सल्य या गोष्टी ज्यांना अधिक प्रिय आहेत, अधिक भावतात, त्यांना वारीत अधिक बरे वाटते.

म्हणूनच की काय, व्यवहारी जगातल्या 'मायबाप' सरकारला वारकऱ्यांची चोख व्यवस्था ठेवायला लागते - आणि ते ठेवतातही! या वर्षी काय, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री - दोघे सोलापूरचे! मग काय म्हणून बडदास्त होती सांगू? बोला पुंडलीक वरदा हारी विठ्ठल!

वारीतला सर्वसाधारण दिनक्रम असाः पहाटे तीनच्या सुमारास उठणे; कारण आपण झोपतो ते तंबू व आपल्या सोबतचं बिछाना वगैरे सामान [ज्याला 'गबाळं' असं सुंदर नाव आहे] घेऊन पुढे जाणारे ट्रक दिंडी निघायच्या आधी किमान दोन तास रवाना करायचे असतात. ज्यामुळे ते वेळेत पोचून पुन्हा उस्कटायला मिळतात. तर तीनच्या सुमारास लाऊड-स्पीकरच खणखणायला लागतो. तोंड धुवायचं, तंबू आधी गुंडाळून ट्रकात टाकायचा. त्या दिवसाचे तेवढे कपडे व खायचे पदार्थ जवळच्या पिशवीत घेऊन ठेवायचे आणि बाकीचं गबाळं टेंपोत टाकायचं. परसाकडे जाऊन आलं तर फारच उत्तम; अंधार असतो, 'नागर' मनाला तेवढं बरं वाटतं! मग टँकरच्या नळाखाली 'आंघोळ' वगैरे पूर्णपणे ऐच्छिक! एक-दोन दिवस अशी आंघोळ केल्यानंतर कळलं की साबणाचं पौराणिक नाव 'उद्वर्तन' हे सर्वार्थाने योग्य आहे. पूजेत देवाला अभिषेक उर्फ आंघोळ घातल्यानंतर गंध, अत्तर आदींसारखाच सुगंधी द्रव्ये - 'उद्वर्तने' यांचा उल्लेख असतो. खऱ्या आंघोळीला स्वतः हाताने खसखसून साफ करण्यापरीस जास्त काही लागत नाही. बाकीच्या गोष्टी उपचार! आहे त्यास अधिक चांगले करण्यासाठी..

अशा आंघोळी-पांघोळी उरकल्या, कपडे धुतले की[कपड्यांच्या 'धुण्या'बद्दलही प्रत्येकाच्या कल्पनेला मुक्त वाव आहे; जसं की 'पाणी दाखवणे' पासून पुढे काहीही.. ] रोजचा 'नेम' करावा, म्हणजे तुम्ही देवाचं रोज जे काही म्हणत असाल ते.

साधारण सात-साडेसातच्या सुमारास दिंडी निघते. आपापल्या नंबरानुसार वारकरी सामील होतात. दिंडीत शिरताना जमिनीला - रस्त्याला नमस्कार करून प्रवेश करण्याची प्रथा आहे - रंगभूमीची आठवण आली; स्टेजवर जाताना हीच प्रथा असते.

साधारण तास-सव्वा तासाने पहिली विश्रांती होते. थोडंफार खाल्लं की थोड्याश्या विश्रांतीनंतर पुन्हा सुरुवात. मग मुक्काम थेट जेवायच्या ठिकाणी. साधारण साडेअकराच्या सुमारास हा मुक्काम येतो. जेवण झालं की सरळ एखाद्या झाडाची सावली बघायची आणि आडवं व्हायचं - जेवल्यानंतर लगेच चालायचं नाही. दिंडीचा मार्ग जिथून जातो त्या सोलापूर, सातारा व पुणे जिल्ह्यातलं भर दुपारचं ऊन झाडाखाली बसून नव्हे तर झोपून पाहण्यातच मजा आहे.

दोनच्या आसपास परत वाटचाल सुरू होते. चार वाजायच्या पुढे-मागे एक 'ब्रेक' - त्या लहानश्या ब्रेकनंतर शेवटला टप्पा - पुढला मुक्काम. यातील सगळ्या वेळी नंबरांची रांग विस्कटते व परत सांधली जाते पण दर वेळी चालताना आहे तोच क्रम राखला जातो ही फार मौजेची बाब आहे!

मुक्कामास पोचल्यावर तिथे ठोकलेले आपापले तंबू शोधून आपापली गबाळी टेंपोतून काढून नव्या मुक्कामी स्थिरस्थावर व्हायचं; आजूबाजूच्या परिसराची व विशेषतः 'परसा'ची ओळख करून घ्यायची.

तोवर 'सत्संगा'ची वेळ होते. सात-साडेसातला उपस्थितांपैकी कोणी ना कोणी अधिकारी व्यक्ती तासभर निरुपण करते. भाषा अतिशय साधी व सोपी असते; परिणाम करणारी असते. उदा. पैशामुळे माणसाचं समाजातलं स्थान कसं ठरतं वा बदलतं यावर सांगितलेल्या एका अशाच गोष्टीची catchline आठवतेय - "पैसा तेरे तीन नाम, पर्श्या, परशू, परशुराम! " - एका पर्श्या नावाच्या गरीब माणसाकडे जसा पैसा येत जातो, त्यासरशी लोक त्याला परशू व अखेर मोठा 'शेठ' बनल्यावर परशुराम म्हणायला लागतात, असा काहीसा मासला होता. पर्श्या, परशू व परशुराम या तीन संबोधनातला फरक 'नाम'धारी व्यक्तीकडील पैसा, पत यावर ठरतो हे इंगित!

साधारण साडेआठपर्यंत जेवणाच्या पंगती बसतात. इतक्या अजस्त्र पंगती मी आजवर बघितल्या नव्हत्या. मुक्कामाची जागा बहुधा एखादा मोकळा माळ, शेत, एखाद्या साखर कारखान्याचे आवार अशी असते. त्यावर जेवायला बसलेल्या लांबच्या लांब रांगा, त्यांच्याकरता रांधलेलं अन्न आणि 'वाढ' करणारे 'अनवाणी' बहाद्दर - साराच धन्य प्रकार! जेवायला सुरुवात होण्यापूर्वी जेवणाची  व्यवस्था करणऱ्यांचा [म्हणजे त्या दिवशीच्या जेवणाकरता ज्यांनी आर्थिक/प्रत्यक्ष मदत दिली आहे] उच्चार व उपलब्ध असल्यास सत्कार होतो. वाढपाचं काम वारकऱ्यांत तंबूनिहाय विभागून दिलेलं असतं. लाऊडस्पीकरवरून वाढणाऱ्यांना सतत मार्गदर्शन सुरू असतं.

मग कधी-कधी भजन असतं [मुक्काम एकाहून जास्त दिवस असतो तेव्हा] अन्यथा मंडळी तंबूत परततात. प्रत्येक तंबूत हरिपाठ होतो आणि गुडघ्यांना तेल चोळत मंडळी पथारीवर पाठ टेकतात..

क्रमशः