जाता पंढरीसी.. (४)

अर्थात आधी म्हटल्याप्रमाणं हा सर्वसाधारण दिनक्रम आहे. वारकऱ्यांना चालणे सुरू करण्यास वा थांबण्यास पूर्ण मोकळीक असते. पहाटे तिनाला तंबू आवरणं व रात्रीच्या मुक्कामाला वेळेत पोचणं इतकं पाळलं की झालं.

वारीचा चालण्याचा वेग काय असतो हे कुतूहल मला होतं. वारीला स्वतःची गती असते पण तिला कोणताही बांधीव वेग/नियम नसतो. एखाद्या दिंडीचं एखादं भजन रंगलं तर मागला प्रवाह थांबतो; मग भजन संपलं की दिंडी आपल्या पुढे असलेल्या मंडळींना गाठायला जवळजवळ धावू लागतात - त्यांच्या मागून सारा प्रवाहही.. आणि एकदा का पुढली मंडळी भेटली की पायांना करकचून ब्रेक लागतात - सगळ्यांच्याच. दिंडीबरोबर चालायचं तंत्र जमायला थोडा वेळ लागतो. NCC किंवा तत्सम कवायतीत चालल्यासारखंच असतं. फक्त क्षणाक्षणाला adjust करावं लागतं. नाही म्हणजे मागच्या-पुढच्याला पाय लागतात.

विठोबाचा पुढला धडा : हर घडी adjustment! प्रवाहाचा भाग बनल्यानंतर प्रति क्षण त्याच्या कलाने राहावं लागतं; वेगळ्या भाषेत 'प्रवाहाची नस पकडली की स्वतःच्या हालचालींकडे निराळं लक्ष द्यावं लागत नाही.

रंगलेल्या मैफलीचा आस्वाद घ्यायला दर वेळी बैठक लागत नाही. वारीतली मैफल प्रवाही असते; मनुष्यास  एकाच वेळी तिच्यात भागही घेता येतो व तिचा आनंदही. वारीत गायली जाणारी भजनं हाच वारीचा आत्मा म्हणता येईल. चाली तर इतक्या निरनिराळ्या की एक संपून दुसरं भजन/अभंग चालू झाला की मागचा विसरायला होतो. बरं इथली म्हणायची पद्धतही निराळी.

उदा. ज्ञानियांचा राजा गुरू महाराव । म्हणती ज्ञानदेव तुम्हां ऐसे ॥१॥

मज पामरा हे काय थोरपण । पायीची वहाण पायी बरी ॥२॥

ब्रह्मादिक जेथे तुम्हा वोळगणे । इतर तुळणे काय पुरे ॥३॥

तुका म्हणे नेणे युक्तीची ते खोली । म्हणोनि ठेविली पायी डोई ॥४॥

हा अभंग म्हणायला घेतला तर ध्रुवपद असणार : मज पामरा हे काय थोरपण

तिसऱ्या चरणापर्यंत त्याच चालीत म्हणणार व 'तुका म्हणे.. ॥४॥ ला एकदम निराळी चाल आणि त्याच चालीत समेवर येणार ते 'मज पामरा .. ' यावर!

मृदंग या प्रकाराची बातच काही न्यारी. त्याच्यावर थाप पडली की त्या ठेक्याची नशा चढायला अजिबात वेळ लागत नाही. या माहोलात आलेल्या नास्तिकातल्या नास्तिक मराठी मनाला त्याची भूल पडणारच.

इथे लोकप्रिय चालींच्या उलटसुलट प्रवासाबद्दल सांगायला हवं. असं म्हणतात की रामचंद्र चितळकर [तथा सी. रामचंद्र] चाली सुचत नसल्या की वारीत एक चक्कर टाकून येत.. [उदा. दत्ता दिगंबरा या हो, स्वामी मला भेट द्या हो --- कितना बदल गया इन्सान   वगैरे ]

हिंदी, मराठी चित्रपटसृष्टी व त्या आधीची नाटकं यांतील संगीत यांचं माझ्या मते दुहेरी नातं आहे. दिंडीत चाललेली भजनं ऐकून त्यावर आधारित प्रसिद्ध नाट्यगीतं/ भावगीतं/ चित्रपटगीतं शोधून काढणं हा न संपणारा खेळ आहे. अर्थात याला दुसरा पदरही आहे. 'हिट' झालेली चित्रपटगीतं अभंगांचा, भजनांचा साज बनतात! पण दिंडीतले सत्तरी ओलांडलेले वारकरी कालच्या गाण्यांची नक्कल करतील का लहानपणापासून ऐकत आलेल्या चाली म्हणतील हा प्रश्न मी स्वतःला विचारला आणि या चालींचा एक गमतीदार प्रवास बघायला मिळाला -

इथल्या मूळच्या चालींना प्रमाण मानून कोणी प्रतिभाशाली संगीतकार संगीतरचना करतो. ती रचना अतिशय लोकप्रिय होते - इतकी की त्यावर आधारित देवस्तुती/आरत्या/भजनं यांच्या कॅसेट्स आसमंत दुमदुमून टाकतात. वारीत कधी कधी या 'पिढी'चं अंतर असलेल्या चालींची भेट घडतेच!!

'जगाला फुलवायचं, चालवायचं सामर्थ्य आहे खरं!'

क्रमशः