जाता पंढरीसी .. (६) [अंतिम भाग]

 इथं आमच्या दिंडीच्या संचालकांबद्दल सांगणं आवश्यक आहे. हरिभक्तपरायण
गोविंदमहाराज केंद्रे हे आमच्या दिंडीचे संचालक. दिंडीच्या जबाबदारीची धुरा
लीलया सांभाळतात. त्याहून विशेष म्हणजे अत्यंत निगर्वी व कोणताही बडेजाव
नसणारे! दिंडीतल्या प्रत्येक माणसाला 'आपला' समजून त्याप्रमाणे वागणारे.
रोज दोन्ही जेवणांच्या वेळी (दुपार व रात्र) जातीने उभे राहून काय हवं नको
ते संपूर्ण दोन-तीन पंगती उठेस्तो पाहत होते.

वाखरीच्या आधी जगप्रसिद्ध 'उभं रिंगण' असतं. ते पाहायला गेलो. प्रचंड
मोकळ्या माळावर दोन्ही बाजूंनी गर्दी असते; मधून माऊलीचा अश्व दौडत जातो
वगैरे ऐकलं होतं. म्हणून त्या अतिविस्तीर्ण माळावर जाऊ लागलो तो काय..

नुकताच पाऊस पडून गेल्याने सबंध शिवारातल्या भुसभुशीत मातीचा चिखल झाला
होता. या चिखलाची अडचण म्हणजे पायताणाला इतका चिखल लागतो की चालणंच काय पण
ठेवलेला पाय उचलणंही मुष्किल होतं. थोडा वेळ सर्कस केली [चिखलाने उंच
झालेल्या पायांनी चालायची  ] मग नाद
सोडला..

वाखरीच्या मुक्कामाचाही पावसाने बोऱ्या वाजवला.मग तसेच रात्री निघालो
[म्हणजे आमच्या तंबूतले दहा-पंधरा जण], नवमीच्या रात्रीच पंढरपुराला केंद्रे
महाराजांच्या मठात पोचलो. रात्रीचे साडेबारा वाजत होते.

दशमीची सकाळ उजाडली आणि पंढरपूर नावाच्या शहराच्या मर्यादा जाणवू
लागल्या. दिंडी वाहती असते. मुक्कामाच्या ठिकाणी एखाद-दोन दिवसच थांबते;
मुक्काम उठला की त्या जागेशी काहीही संबंध उरत नाही. पण पंढरीत मात्र किमान
पाच दिवस प्रचंड जनसमुदाय [७-८ लाख] सतत येत-जात असतो - राहत असतो. नागरी
सुविधांवर ताण पडला नाही तरच नवल. परिणामी देवळाचा भाग सोडता इतर सगळा भाग
बकाल दिसतो. तेथील मठ, शासन सगळे आपापल्या परीने गैरसोय कमीत कमी होईल
याकरता प्रयत्न करताना दिसतात; पण आधी म्हटल्याप्रमाणे लोकांचा प्रपात
इतक्या वेगाने येत असतो की त्यापुढे सगळया प्रयत्नांची 'लव्हाळी' होते.

दर्शनाची रांग हा तर मारुतीच्या शेपटाहून लांब प्रकार. मुख-दर्शन,
संपूर्ण दर्शन असे त्यातही प्रकार असतात. दिवस, रात्र, २४-३६... तास लोक
उभे असतात. केवळ कळसच पाहायचा असं मी आधीच ठरवलं होतं - रांगेचं दिव्य
व्यक्तिशः झेपत नाही आणि पटतही नाही.

अशीच आणखी एक न पटलेली गोष्ट म्हणजे दंडवत. दुसऱ्या वारकऱ्यास भेटताना/
निरोप घेताना समोरच्या व्यक्तीच्या पायावर डोकं टेकायचं; चरणस्पर्श करायचा
आणि त्यांचे पाय हाताने चेपून अल्पशी सेवा करायची. असं प्रत्येकजण करतो; वय
वगैरेचा काहीही मुलाहिजा बाळगायचा नाही. आता समोरच्या व्यक्तीस आदरपूर्वक
नमस्कार ठीक आहे, चरणस्पर्शही ठीक; पण प्रत्येकाच्या चरणी डोकं टेकणं वगैरे
काही पटत नाही. इतका नम्र भाव कुणाच्या बरं अंगी असतो? पण म्हणून उगाचच
डोकी टेकून नम्रता अंगी येईल अशी अपेक्षा का करायची? असो..

कळस पाहिला, मागे फिरलो, दशमीला रात्रीच घरी पोचलो. दुसऱ्या दिवशी T.V.
वरच विठोबाला पाहिलं. T.V. बंद केला - आरशात पाहिलं. विठोबानं त्याच्या
परिवारात सामील करून घेतल्याची पोच दिली होती - सूर्यनारायणाच्या
माध्यमातून आपल्या सावळ्या रंगात त्यानं मलाही रंगवलं होतं...

समाप्त.