गोष्ट छोटीशी पण......

(पुढील लेख वाचण्यापूर्वी माझा कुत्र्यांवर काहीही राग नाही ही गोष्ट लक्षात घ्यावी.)

नुकताच माझा मुलगा बालवाडीत जायला लागला. काही दिवसांपूर्वी मी त्याला नेहमीप्रमाणे दुचाकीने शाळेत सोडायला गेले. माझी दुचाकी मी शाळेबाहेर लावत होते. त्या वेळेस मुलाला पादचारी मार्गावर उभे रहायला सांगितले. दुचाकी लावल्यावर लगेचच मी त्याला सोडायला शाळेत गेले. त्या वेळेस शाळा सुरू होऊन थोडेच दिवस झाल्याने शाळा फक्त अर्धा तासच असायची. त्यामुळे मी तिथे बाहेरच थांबायचे. शाळा सुटल्यावर  बघते तर काय! शाळेच्या पहिल्या दिवशी ही न रडणारे माझे पिल्लू त्या दिवशी चक्क हमसून हमसून रडत होते! त्याच्या पायात बूट आणि मोजे पण नाहीत! शिक्षिकांनी मला थांबायला सांगितले. त्या म्हणाल्या की त्याच्या  बुटाला घाण लागलेली असल्याने त्याचे बूट काढले होते.

बाहेर आल्यावर मी त्याला विचारले तेव्हा तो फक्त एव्हढेच सांगू शकला की पायाला शी शी लागली होती म्हणून बूट काढले. त्या दिवशी शाळेत तो बराच वेळ स्टूल वर रडत बसला होता असेही म्हणाला(वय वर्षे ३ पूर्ण ही नसल्याने त्याच्याकडून अधिक माहितीची अपेक्षा ही नाही ). मी त्याला कसेबसे समजावले की घरी जाऊन आधी मी तुझे बूट धुवून स्वच्छ करते. घरी आल्यावरही तो हुंदके देत होता. घरून निघताना तर त्याचे बूट स्वच्छ होते तर मग ही घाण त्याच्या पायाला कधी लागली? थोडा विचार केल्यावर मला कळले की शाळेबाहेर मी गाडी लावताना त्याला जेव्हा पादचारी मार्गावर उभे केले होते तेव्हा त्याचा पाय चुकून कुत्र्याच्या घाणित पडला होता. आणि शाळेत सोडताना मला ते कळलेच नाही. त्यामुळेच आजचा प्रसंग ओढवला होता तर! शाळेत फक्त त्यालाच बूट काढायला सांगितल्याने त्याला वेगळे वाटले असावे किंवा त्याचा अपमान तरी झाला असावा! दुसऱ्या दिवशी शाळेत जाताना त्याची थोडी रडारड चालू होती. बुटाला घाण नाही ना लागली असे सारखे तो बघत होता आणि विचारत ही होता. हि गोष्ट घडून आता बरेच दिवस झाल्याने आणि शाळा ही आवडत असल्याने आता तो पुन्हा न रडता शाळेत जातो. पण त्याच्या छोट्याशा मनावर हा आघात त्याची काहीच चूक नसताना झाला.

आमचा बंगला आहे. सकाळी बरेच लोक त्यांच्या कुत्र्यांना बाहेर फिरायला (? ) घेऊन जाताना दिसतात. त्या वेळेस सगळी कुत्री आपापले प्रातर्विधी उरकतात. मालकांनीही ह्याच गोष्टीसाठी कुत्र्याला फिरायला नेलेले असल्याने तेही खूष होतात. कित्तेकदा कुत्री बरोबर फाटकासमोर घाण करून ठेवतात. सकाळी घाई असल्याने दुचाकी बाहेर काढताना लक्षात न आल्याने त्याच्यात पाय पडून चिडचिड होते. तसेच पुन्हा घरात येउन चपला धुण्यात वेळ जातो आणि मनस्ताप होतो ते वेगळेच!

काही लोक तर कुत्र्याला स्वातंत्र्य हवे म्हणून साखळी बांधत नाहीत. अशा वेळेस कुत्रे मागे कोणाच्या तरी फ़ाटकात प्रातर्विधी उरकत असते किंवा बाकीच्या कुत्र्यांच्या अंगावर भुंकत असते. कधी कधी सकाळी फिरायला गेलेल्या मंडळींच्या अंगावर कुत्रे गेल्यास 'आमचा  मोती काहीही करत नाही. फक्त वास घेतो. मोती इकडे ये' असा त्या लोकांचा प्रतिसाद असतो. इकडे कुत्र्याला घाबरणाऱ्या मंडळींची मात्र तारांबळ उडते. आणि मालक मात्र मजा  अनुभवत असतो.

असे लोक मला दिसल्यास (सकाळच्या गडबडीच्या वेळेत ह्या कुत्र्यांना आणि त्यांच्या मालकांना पकडणे जरा कठीण च आहे तसे!) मी आता त्यांना कागद देऊन घाण साफ करण्यास तरी सांगणार आहे किंवा त्याच्यात पाय घालून कसे वाटतेय ते बघा असे सांगायचा निश्चय केला आहे. कुत्रे हे बिचारे मुके जनावर. त्याला ओरडून काही उपयोग ही नाही आणि त्याचे असे वागणे ही त्याच्या मालकाचीच चूक आहे असे मला तरी वाटते.

तर सकाळी कुत्र्यांना फिरावयास नेणाऱ्या  लोकांना माझे इतकेच सांगणे आहे की

१. सकाळी आपली कुत्री घराबाहेर फक्त फिरावयास न्यावी. प्रातर्विधी करण्यास नाही.

२. आपल्या कुत्र्याने घाण केल्यावर ते स्वच्छ करायची जबाबदारी ही घ्यावी. त्यासाठी कागद जवळ बाळगावा. (परदेशात लोक हा नियम पाळतात)

३. कुत्र्याला साखळी बांधूनच फिरायला न्यावे.

४. कुत्रा कोणावर विनाकारण भुंकत नाही ना ह्याची ही खबरदारी घ्यावी.

५. पादचारी मार्ग हे लोकांनी चालायची जागा असून कुत्र्यांना घाण करायची जागा नव्हे!

(अर्थात हे करून सुद्धा भटक्या कुत्र्यांचा प्रश्न सुटत नाहीच;))