कवडसे

साथ जन्माची नसे आता सभोती
सावली कोणी वसे आता सभोती


तो पहा अस्तास प्रीतीसूर्य गेला
शोधितो मी कवडसे आता सभोती


पैंजणांचे बोल झाले शांत सारे
राहिले नर्तनठसे आता सभोती


चेहरा उरला तिचा स्मरणात केवळ
का बिलोरी आरसे आता सभोती


एक वातीच्या दिव्याची ज्योत तेवे
त्या प्रकाशी ती असे आता सभोती


काळ दगडांच्या बिया पेरून गेला
रान भिंतींचे जसे आता सभोती


रे मना, तू एकटा उरलास अंती
फक्त परकी माणसे आता सभोती