दर्शन एका वास्तुचे! (की जी स्वा. सावरकरांच्या लंडनमधील वास्तव्याने पवित्र झालेली आहे.)

लंडनला जायचा योग आला आणि आठवण झाली मुकुंद सोनपाटकी यांच्या ’कुछ याद उन्हे भी कर लो’ या लेखाची. ६५, क्रॉमवेल ऍव्हेन्यू, हायगेट, लंडन या वास्तूवर ८ जून १९८५ या दिवशी एक स्मॄतिलेख लिहिला गेला. ही वास्तूही त्या योग्यतेची! तिचे दर्शन आपण घ्यायचेच असे ठरवले. पण पत्ता एवढाच! प्रचंड लंडनमध्ये याचा शोध सोपा केला जावयाने दिलेल्या नकाशाग्रंथामुळे. त्यात चार क्रॉमवेल ऍव्हेन्यू निघाले. खूप प्रयत्न केल्यावर नॉर्दन लाइनच्या आर्चवे या अंड्ररग्राउंड स्टेशनपासून हा रस्ता १ किमी अंतरावर असावा असे दिसले. ३ ऑगस्ट ०७ या दिवशी लंडन व्हिक्टोरिया स्टेशनला गेलो. तेथून अंडरग्राउंड रेल्वेने आर्चवे स्टेशनला गेलो. स्टेशनमधून बाहेर आलो. दुपारचे चार वाजलेले. हवा छान! ऊन पडलेले! थंड वारा नाही. वातावरण उत्साह वाढवणारे! समोरच बसस्टॉप होता. एक बस आली. तिच्या ड्रायव्हरने जवळचाच दुसरा बसस्टॉप दाखवून २१० नंबरच्या बसने जा व दुसरा स्टॉप आला की उतरा असे नीट मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे केले आणि क्रॉमवेल ऍव्हेन्यू सुरू होतो तेथेच उतरलो. त्या रस्त्याने घरक्रमांक पाहात एका बाजूने निघालो. ६५ नंबर सापडेना. शेवटी रस्ता संपला. रस्त्यावर विचारायचे तर चिटपाखरू नाही. सर्वत्र दोन्ही बाजूने कार्स. घरातून कोणी आलाच तर गाडीत बसणार कि भुरकन निघून जाणार. इतक्या दूर येऊन तसेच परतावे लागणार की काय अशी दुष्ट शंका मनात यायला लागली. तितक्यात एक गोरा देवदूतासारखा भेटला. त्याने दुसरी बाजू पकडली, आणि सांगितले की एका बाजूला सम व दुसरीकडे विषम क्रमांक आहेत. तसे विरुद्ध बाजूला जाऊन पाहिले, आणि झाडीत लपलेल्या ६५ क्रमांकाच्या गेटशी उभा राहिलो. माझी नजर स्मॄतिलेखाचा शोध घेत होती. वर पाहिले आणि धन्य वाटले!

घराचा पहिला मजला संपतो त्या वरच्या भागावर निळ्या वर्तुळात इंग्रजीत लिहिलेले होते -
                                ग्रेटर लंडन कौन्सिल ( म्हणजे कॉर्पोरेशन)
                                विनायक दामोदर सावरकर
                                १८८३-१९६६
                                इंडियन पॅट्रियट  ऍंड फिलॉसॉफर  लिव्हड हियर.
                                (म्हणजे भारतीय देशभक्त आणि तत्ववेत्ता येथे राहात होता)
        ज्या इंग्रजीसत्तेविरुद्ध सावरकरांनी लढा उभा केला त्यांनीदेखील देशभक्त असा सावरकरांचा गौरव करावा आणि ज्या सावरकर कुटुंबाने स्वातंत्र्यलढ्यात सर्वस्वाची आहुती दिली, त्यांच्या वाट्याला भारतात मात्र उपेक्षा आणि अवहेलना यावी? काय संबंध सावरकरांचा आणि त्या घराचा? हेच ते ’इंडिया हाऊस’ की जेथे सावरकरांचे वास्तव्य १९०६ ते १९१० या काळात होते. पं श्यामजी कृष्ण वर्मा यांनी ठेवलेली  शिवाजी शिष्यवृत्ती घेऊन सावरकर इग्लंडला गेले. बॅरीस्टरीच्या अभ्यासाबरोबरच त्यांनी केलेल्या अद्वितीय कार्याची साक्षीदार असलेली हि वास्तू! १९०५ मध्ये श्यामजींनी शिक्षणासाठी येणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या राहाण्याजेवणाची सोय व्हावी म्हणून इंडिया हाऊस स्थापन केले. सावरकरांचा वर्माजींवर एवढा प्रभाव पडला की त्यांनी इंडिया हाऊसचा कारभारच त्यांचेकडे सोपवला. सावरकरांच्या जोसेफ मॅझिनीचे चरित्र, शिखांचा इतिहास, आणि  सर्वात गाजलेला १८५७चे स्वातंत्र्यसमर हे सर्व ग्रंथ याच वास्तूत साकारले. येथूनच त्यांनी भारतीय सैनिकांना स्वातंत्र्यासाठी लढायला प्रवृत्त करणारी आणि संस्थानिकाना इशारेवजा पत्रे लिहिली. बॉंंबविद्या शिकायला सेनापती बापटांना युरोपात पाठवले. बॉंब तयार करण्याचे प्रयोगही येथेच केले. ही विद्या तसेच बंदी घातलेले साहित्यही अनेक युक्त्या लढवून भारतात पाठवले. रशिया व फ्रांस येथील क्रांतिकारकांशी संधान बांधले. याच ठिकाणी मे १९०८ मध्ये १८५७च्या स्वातंत्र्यसमराचा ५०वा स्मृतिदिन, तसेच लंडनमधील पहिला शिवजन्मोत्सव साजरा झाला. येथे भारतीय राजकारण व समाजकारणावर गंभीर चर्चा होत. ज्यावेळी सावरकर ’स्वातंत्र्यवीर’ आणि गांधीजी ’महात्मा’ नव्हते त्या वेळी याच ठिकाणी त्या दोघांमध्ये अनेकदा चर्चा आणि एकत्र सभा झाल्या होत्या. त्याही वेळी त्यांच्यात स्वातंत्र्यप्राप्तीच्यासाठी वापरायच्या मार्गाबाबत तात्वीक मतभेद होतेच. १९०७ पासून इंडिया हाऊसमधील घडामोडींचा पत्ता ब्रिटिशांना लागला. इंडिया हाऊस हे इंग्रजांना वचक बसवणारे रहस्यागार बनले. सुमारे शतकापूर्वी ज्या वास्तूत श्यामजी, मादाम कामा, लाला हरदयाल, भाई परमानंद, वीरेंद्रनाथ चटोपाध्याय, निरंजन पाल, व्ही. व्ही. एस अय्यर, ग्यानचंद वर्मा, एम पी टी आचार्य, सिकंदर  हयातखान, असफ अली, सेनापती बापट, गांधीजी आणि मदनलाल धिंग्रा असे एकापेक्षा एक देशभक्त वावरले त्या वास्तूचे दर्शन घेण्याचे भाग्य आपल्याला लाभले ही जाणीव होताच अंगावर रोमांच उभे राहिले.
               एका शतकापूर्वी देशभक्तीने भारलेल्या तरुणांनी गजबजलेली ही वास्तू आज कुटुंबवत्सल लोकांचे वसतिस्थान दिसत होती. तेव्हढ्यात एक तिशीच्या वयाची गोरी स्त्री दोन लहानग्यांना घेऊन तेथे आली व आत जाण्यासाठी थांबली. तिचा काही गैरसमज होण्यापूर्वीच मी येण्याचे कारण सांगितले. त्यावर ती म्हणाली, ’ओह, सावारकर! इंडिया हाऊस! ’. म्हणजे तिला त्या घराचे पूर्वीचे नाव माहित होते तर! पुढे तिने सांगितले की नुकतेच अमेरिकेतील मियामी येथून अशाच कारणाकरिता कोणी येऊन गेले. माझ्यासारखा वेडेपणा करणारा आणखी कोणी आहे हे ऎकून बरे वाटले. फोटो काढण्याची अनुमती घेतली आणि जमले तसे फोटो काढून त्या पवित्र वास्तूला वंदन करून परतलो!


प्रिय वाचक,

मनोगत वर लिहिण्याचा आरंभ मी या लेखाने करीत आहे. लेख निदान वाचून पाहावा ही विनंति.

प्रिय वाचक
मनोगतवर
मी प्रथमच येतोय. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्मरणार्थ लंडनमध्ये
सावरकरांचे नावाचा स्मृतिलेख तेथील महापालिकेने श्यामजी कृष्ण वर्मा
यांच्या इंडिया हाऊसवर नोंदलेला आहे हे कित्येकांना माहीत नाही. ही माहिती
मिळाल्यावर आणि लंडनला जाण्याचा योग आला तर माझ्याप्रमाणे काहीजणांना तरी
तेथे जाऊन येण्याची आस निर्माण होईल अशी मला खात्री वाटते. यासाठी "दर्शन
एका वास्तूचे! " या माझ्या लेखाने मी श्रीगणेशा करू इच्छितो.

दर्शन एका वास्तूचे!

============