सूर्यास्त

पाहता पाहता काजळू लागला
सूर्य माध्याह्निचा मावळू लागला

कंपने वाढली, चाल मंदावली
भार संवत्सरांचा कळू लागला
 
पाखरे पांगली दूर देशांतरी
वृक्ष होता तिथे उन्मळू लागला
 
देह एका तिरी, नेत्र दुसर्‍या तिरी
पूल दोघांतला कोसळू लागला
 
कावळे पिंड सोडून गेले कुठे ?
प्राण मधल्या मध्ये घुटमळू लागला