भवचक्र आणि मारीया

पैसा हा साधारणतः जिव्हाळ्याचा विषय असतो. या विषयावरचे "माईंडफुलनेस अँड मनी - अ बुद्धीस्ट पाथ टू ऍबंडन्स" हे पुस्तक मला आवडलं होतं. त्यातील काही उताऱ्यांचे स्वैर भाषांतर म्हणा त्यातील उताऱ्यांवर आधारीत म्हणा हा लेख आहे.


स्रोत : दुवा क्र. १

वरील आकृतीचे नाव आहे भवचक्र. भवचक्र ही आकृती फार प्राचीन काळापासून बुद्ध धर्मीय कलांमध्ये प्रचलित आहे. महाकाय, अजस्र अशा राक्षसी प्राण्याने हे चक्र धरलेले असून या चक्रात अनंत घडामोडी चाललेल्या दिसून येतात. हा महाकाय , आ वासलेला प्राणी ज्याने हे चक्र आपल्या मुखामध्ये धरले आहे , हा प्राणी अन्य कोणीही नसून प्रत्यक्ष यमराज आहे. ४ वर्तुळांमध्ये हे भवचक्र विभाजित होते. पैकी मोठे बाह्यवर्तुळ ६ भागात विभागले आहे. प्रत्येक भाग हा एका विशिष्ट लोकाचा निदर्शक आहे.

सर्वात वरचा भाग देवलोक दर्शवितो. वरील चित्रात दर्शविल्याप्रमाणे देवलोकातील रहिवासी हे भोगविलास, सुरापान, गायनवादन आदी गोष्टींमध्ये रममाण झालेले दिसतात.

नंतरचा लोक येतो असुरलोक - हे देवांचे कट्टर शत्रू, मत्सरी आणि द्वेषी जीव येथे नांदतात.

मग येतो वन्यजीवलोक - चित्रात दाखविल्याप्रमाणे नाना श्वापदे ऊन खाणे, शिकार करणे आदी क्रीडांमध्ये मग्न झाली आहेत.

सर्वात तळाचा लोक जो देवलोकाच्या १८० अंशात आहे तो आहे नरकलोक - या लोकात पडलेल्या जीवांना, भयंकर राक्षस नरकयातना देत आहेत.

मग येतो भूतप्रेतलोक - अत्यंत अतृप्त आत्मे येथे घोटाळतात ज्यांची वखवख संपत नाही.

प्रेतलोकाला लागून येतो मनुष्यलोक - येथे मनुष्य प्राणी ज्ञानार्जन, अर्थार्जन, प्रपंच, परमार्थ आदी गोष्टींमध्ये व्यस्त आढळतो.

हे सहाही लोक आपण आपल्या जीवनात अनुभवतो. किंबहुना हे भवचक्र हे आरसा आहे. हे सहा लोक आपण आपल्या आर्थिक जीवनातही अनुभवत असतो. कधीकधी तर आपले आर्थिक जीवन या सहा लोकांतून एका दुपारी भ्रमण करून येते. कसे याचे उदाहरण घेऊ यात. -

मारीया ही एक संगणक अभियंता आहे. एका निवांत दुपारी तिच्या मानसिक अवस्था या साही लोकातून कशा भ्रमण करतात ते आपण पाहणार आहोत.

मारीयाने आता नुकताच तिच्या वेल्फर्निशड अपार्टमेंटच्या दारात प्रवेश केला आहे. तिच्या खांद्यावर एक पर्स आणि पाठीवर एक बॅग आहे. ती जीममधून नुकतीच घरी परतली आहे. जीममधून घरी परतल्याने तिला इतके बरे वाटत आहे की तिचा दिवसभराचा शीण नुकत्याच झालेल्या व्यायामामुळे कापरासारखा उडून गेला आहे. तिचा बॉयफ्रेंड आज टूरवर गेला आहे. मज्जा न काय. ही दुपार ती, पिझ्झा, बिअर आणि फक्त काँप्युटर. अहाहा! काय मस्त वाटत आहे तिला....................... (वन्यजीव मनस्थिती. आहार-निद्रा-भय-मैथुन या पलीकडे विचार नाही. )

मारीया आता अपार्टमेंटचे दार लावते आणि बॅगमधून नवीन विकत घेतलेला चपलांचा जोड काढते. पण हे काय हा या महिन्यातला तिसरा नवा जोड? तोदेखील ९५ डॉलर्स चा? मग तिला आनंद का बरं होत नाही आहे? जेव्हा थोड्या वेळापूर्वी ती त्या दुकानात शिरली तेव्हा काहीही करून तिला तो उन्हाळी चपलांचा जोड हवाच्च होता. पण आता ती अशी आनंद मावळल्यासारखी का बघते आहे त्याच्याकडे? ह्म्म आजकाल ती इतकी सतत खरेदी करते की नव्याची नवलाई वाटतच नाही तिला........... (भूतप्रेतलोक. व-ख-व-ख)

मारीया विचार करते हेच ९५ डॉलर्स जर तिने त्या फूटपाथवरच्या भिकाऱ्याला दिले असते तर???? तर??? ह्म्म्म तिचं मन तिला खूप खात आहे आता. गुन्हेगारीची भावना तिचं हृदय विदीर्ण करते आहे. तिला खरं तर स्वतःची घृणा येते कधी कधी........ (नरकलोक.... यातना)

तिने वैतागून जीमचे कपडे तसेच बोळा टाकले आणि ती पहिली ईमेल पाहू लागली. मारीयाला पैसे तसे ठीकच मिळत. शिवाय पूर्वी मध्ये कॉफी ब्रेकदेखील मिळे. पण सध्या काम जरा जास्तच वाढलं होतं. तिच्यावरचा कामाचा ताण वाढला होता. आताशा कोणाशी बोलायला वेळ मिळत नव्हता की कॉफी ब्रेक मिळत नव्हता. तिने आजच टोनीकडे तिच्या गटप्रमुखाकडे पैसे वाढवून मागितले होते. टोनीची मेल आली होती- रोखठोक - पैसे वाढवून मिळणार नाहीत उलट जास्त काम वाढण्याची शक्यता आहे. आता मात्र मारीयाला संताप अनावर झाला, तिच्या मुठी आवळल्या गेल्या, कपाळाची शीर ताडताड उडू लागली. तिने आदळाअपटीला सुरुवात केली. "टोनी समजतो काय? अजून काम कशी करू शकते ती इतक्या कमी पैशात. आताच कुणाशी बोलायला वेळ नसतो. ते काही नाही ती या नोकरीवर लाथ मारणार. इतकच नाही तर ती स्वतःची वेबसाईट काढणार. आणि त्या साईटद्वारा तिच्यासारख्या इतर गरीब लोकांना छळणार, पिळणार. ती एकटी शोषीत नाही तर अनेक शोषीत बनणार. दॅटस इट"........... (असुर लोक, मत्सर, वाईट प्रवृत्ती)

ती दाणकन दार लावून तिरमिरीत घराबाहेर पडली. खांदे खाली पाडून, डोके खाली घालून, बागेच्या दिशेने बराच वेळ चालल्यानंतर ती भानावर आली आणि आजूबाजूच्या गर्द हिरवाईने, स्वच्छ सूर्यप्रकाशाने तिचे मनही निरभ्र होऊ लागले. कुठे तिला आकाशात झेप घेणारा पांढरा शुभ्र सीगल दिसू लागला तर कुठे मुला माणसांची उत्साही लगबग. मगासचे वाईट विचार कुठल्या कुठे पळून गेले. एका अनामिक समाधानाने तिचे मन भरून गेले. सूडाची भावना निष्फळ आहे हे तिच्या लक्षात आले. तिने ठरवले - "ती चित्रे विकेल तिच्या वेबसाईटवरती. होय ती चित्रच विकणार होती. तिच्या बऱ्याच वर्षात न भेटलेल्या मैत्रिणींना भेटून त्यांची चित्रं गोळा करून ती तिच्या साईटवर ठेवणार होती. ती आपल्या प्रिय मैत्रिणींना एक संधी उपलब्ध करून देणार होती. तिला लवकर घरी जायचं होतं मैत्रिणींना ही गोष्ट सांगायला............ (मनुष्य लोक..... प्रयत्न, सुख, दु:ख)