नातं (तीन)

इतक्या गहन आध्यात्मिक प्रक्रियेत आपण रिक्तहस्त राहिलो म्हणून सगळे शिबिरार्थी नाराज झाले होते, मोठ्या मिनतवारीनं मग त्यांनी विनीतला मध्ये घालून गुरुजींनी किमान तासभर तरी आमच्याशी बोलावं म्हणून विनंती केली. जेवायला अजून तासभर होता, गुरुजीही मोठेपणानं निरूपणाला राजी झाले. सगळे मुख्य सभागृहात जमा झाले आणि गुरुजींची वाट पाहत बसले, सभागृह पूर्ण रिकामं असावं अशी शांतता पसरली.

गुरुजी नक्की कशावर बोलत होते माझ्या लक्षात नाही पण निरूपणात जेव्हा प्रेम हा विषय आला तेव्हा मी हात वर केला.

‘येस! ’

‘गुरुजी प्रेम म्हणजे काय? ’

सगळे माझ्याकडे पाहायला लागले, ‘प्रेम म्हणजे काय’ हा मूर्खासारखा प्रश्न मी कसा विचारू शकतो याचं सगळ्यांना आश्चर्य वाटलं.

‘तुला प्रेम म्हणजे काय ते माहिती नाही? ’ गुरुजी म्हणाले.

‘नाही’ मी प्रामाणिकपणे कबूल केलं.

‘व्हॉट अ स्पेशी यू आर! ’

‘........... ’

‘तू तुझ्या आईवर कधी प्रेम केलं नाहीस? ’

‘नाही’

प्रश्न विचारल्यावर सगळे साधक विरुद्ध मी  अशी परिस्थिती होती, आता गुरुजी, त्यांचे सर्व स्वयंसेवक, आणि बाकी सर्व साधक विरुद्ध मी असा माहौल झाला. हे असं एकटं पडणं मला नवं नव्हतं पण इथे परिस्थिती एकदम हाताबाहेर जायला लागली कारण गुरुजी एकदम भडकले.

‘आईनं तुला जन्म दिला, लहानाचा मोठा केला, तुझ्यासाठी एवढं किती कष्ट उपसले याची तुला काही किंमत नाही’ गुरुजींचा आवाज कठोर झाला.

‘गुरुजी, धिस ऑल इज अ पार्ट ऑफ ह्युमन लाईफ, इट इज अ पार्ट ऑफ द फॅमिली सिस्टम दॅट मन्काइंड हॅज डिझाइन्ड टू सपोर्ट अ विकेस्ट बर्थ, द ह्युमन चाइल्ड. वी कॉल इट लव्ह बिकॉज वी वाँट द सिस्टम टू कंटिन्यू. आय एम ग्रेटफुल टू माय मदर, आय वील डू एनीथींग फॉर हर, बट दॅट इज नॉट लव्ह’

गुरुजी एकदम बेभान झाले, त्यांना उत्तर सुचेना, पण हा विषय संपायलाच हवा होता; त्यांनी मग त्यांचा अधिकार वापरून विषय संपवायचं ठरवलं.

‘तुला तिरस्कार म्हणजे काय ते तरी माहिती असेल’ गुरुजी म्हणाले

‘हो’ मी शांतपणे कबुली दिली.

‘मग प्रेम म्हणजे तिरस्काराचं विरुद्ध टोक आहे असं समज’ गुरुजींनी विषय संपवला.

‘ते तसं नाहीये’.... मी मनात म्हणालो आणि खाली बसलो.
___________________________________________

रवीनं माझ्या घराच्या वळणावर गाडी थांबवली, मी सगळ्यांचा निरोप घेतला आणि निघालो. थोडा पुढे गेलो असेन एवढ्यात रवीनं परत गाडी मागे आणली, गुरुजी मला म्हणाले ‘तू उद्या सकाळी मला ब्रेकफास्टला भेट’. शिबिर एक दिवस आधी संपल्यामुळे ते एका साधकाकडे दुसऱ्या दिवशी राहणार होते. मी होकार देऊन घरी निघालो.

सकाळी मी नेहमी सारखा लवकर उठलो आणि सात वाजता गुरुजींच्या मुक्कामावर हजर झालो. फडके नांवाचे ते गृहस्थ मला म्हणाले ‘ तुम्ही संजय का? गुरुजी तुमची वाट बघतायत’.

मी आत गेलो तर गुरुजी एकटे बसले होते. ते म्हणाले ‘तुझा नक्की प्रश्न काय आहे? ’

त्या शिबिरानं माझ्यात कमालीची अंतर्बाह्य एकरूपता आली होती. मी त्यांना म्हणालो, ‘गुरुजी, माझं आणि बायकोचं अजिबात पटत नाही, आमची रिलेशन्स हा माझ्या जीवनातला अत्यंत दुखरा भाग झाला आहे. मी माझं आयुष्य मला हवं तसं उभं केलं आहे, आज माझ्याकडे काहीही कमी नाही पण केवळ या एका प्रश्नामुळे सगळं असह्यं झालं आहे. मी तिला सोडू शकतो पण ती बिचारी कुठे जाईल आणि असं करणं म्हणजे माझ्या सुखासाठी तिला निराश्रय करण्यासारखं होईल. तिला ते समजत नसलं तरी मला ते मंजूर नाही, मला तिला घेऊन जगायचंय’.

‘लग्न म्हणजे बायकोशी तिच्या कलानं वागावं लागतं, गुरुजी म्हणाले, आपल्याला पटत नसलं तरी तिची स्तुती करावी लागते. या साडीत तू छान दिसतेयस, आज तू केलेली इडली म्हणजे क्या बात है! अशी इडली कुठे मिळायची नाही असं म्हणावं लागतं, गुरुजी म्हणाले.

मी सर्दच झालो. मला चर्चेत रस वाटेना. बायकोला मी एक वेळ शिव्या घालीन पण ज्या वेळी मी तिला‘ तू सुरेख दिसतेस’ म्हणीन त्या वेळी मला ती खरंच लावण्यवती वाटलेली असेल. मला दुहेरी जगता येणार नाही.

मी न बोलता ब्रेकफास्ट संपवला, चहा घेतला आणि त्यांना म्हणालो ‘तुमचं पुण्यात काही काम आहे का? ते म्हणाले ‘हो, अशी अशी कामं आहेत’. मी म्हणालो ‘चला, मी गाडी आणली आहे, तुमची सगळी कामं संपवू आणि मी तुम्हाला परत इथे आणून सोडतो. त्यांची सगळी कामं आम्ही संपवली, त्यांना मी परत फडक्यांकडे सोडलं, निरोप घेतला आणि निघालो.

मी आता परत त्यांना भेटणार नाही हे मला माहिती होतं.

प्रेम म्हणजे काय हा माझा प्रश्न घेऊन आता मी एकटाच निघालो होतो.
__________________________________________

घरी यायला मला संध्याकाळ झाली तशी बायको वाट पाहतं होती.

‘काय म्हणाले गुरुजी? ’ तिनी विचारलं.

’ते म्हणाले बायकोची मनात नसताना स्तुती करायला हवी’

‘मग तुम्ही काय म्हणालात? ’

‘काय बोलणार? गप्प बसलो. पण मी तुला एक सांगतो, सुधीर मोघ्यांचं एक गाणं आहे ‘घर दोघांचे घरकुल पाखरांचे’ त्यात मोघे लिहितात :

कधी भांडलोही थोडे, थोडे दुरावलोही
पण खूण त्या क्षणाची जपली मनात नाही,
जुळले अतूट नाते दोन्ही मना मनांचे... घर दोघांचे

‘तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? ती म्हणाली

‘आपली कितीही भांडणं होवोत, मतभेद होवोत पण एकमेकांशी अबोला धरायचा नाही, संवाद तुटला की नातं संपतं!' मी म्हणालो.

मग त्या नंतर आम्ही कितीही भांडलो, पार वाट्टेल त्या थराला वाद गेले तरी एकानं हात पुढे केला की दुसऱ्यानं तो बेशर्त हातात घ्यायचाच असं कायमचं झालं.

आमचं नातं मोघ्यांच्या कवितेसारखं झालं!... ‘पण खूण त्या क्षणाची जपली मनात नाही’.
_______________________________________________

अशी अनेक वर्ष गेली असतील एक दिवस आम्ही दोघात एक भेळ घेऊन डेक्कनवर भटकत होतो, अचानक बाजूच्या दुकानातून रवी बाहेर पडला,

‘काय रे तू नंतर आलाच नाहीस? ’ तो म्हणाला

‘माझा प्रश्न मी स्वतःच सोडवला, मी म्हणालो, .....‘बाय द वे काय विशेष? ’

‘तुला नाही का कळलं? ’ त्यानं विचारलं

‘काय? ’

‘गुरुजींनी बावीस की तेवीस वर्षाच्या एका अत्यंत देखण्या साधीकेशी दुसरं लग्न केलंय! ’  तो म्हणाला.

‘ रवी, मला नित्शेचं एक अप्रतिम वाक्य आठवतंय, तो म्हणतो, दुसऱ्याला न वापरणं ही मानवी संबंधातली सर्वोच्च नीतिमत्ता आहे, ....नॉट टू यूज द अदर इज दी हायेस्ट मोरॅलिटी'. मी म्हणालो.

‘मग प्रेम म्हणजे काय आहे? ’ रवी विसरला नव्हता.

‘सर्व नाती ही माणसाची कल्पना आहे त्यामुळे प्रेम हा काही दोन व्यक्तीतला संबंध नाही, संबंधातली संपूर्ण पारदर्शकता म्हणजे प्रेम ’ मी म्हणालो. प्रेम हे व्यक्तीसापेक्ष नाहीये, प्रेम ही  तुम्ही कोणत्याही संबंधात आणलेली पारदर्शकता आहे, तो संबंध नाही, ती दोन संबंधात असलेली स्थिती आहे'.

तो माझ्या बायकोकडे पाहत होता, ती माझ्याकडे बघत होती, तिच्या नजरेत मी जे म्हणतोय त्याची सत्यता तो बघत होता आणि  ज्या एकसंधतेनं ती माझ्याकडे बघत होती त्यावरून त्याला बहुदा माझ्या म्हणण्याची प्रचिती आली होती. मी जे सांगत होतो ते आमच्या दोघात घडलं होतं.

‘तुझा फोन नंबर दे’ रवी म्हणाला.

 मी त्याला नंबर दिला.

 ‘तुला साधारण केव्हा फोन करायचा? ’ त्यानं विचारलं.

‘केव्हाही कर, पण आता तुला फोन करावा लागणार नाही, तू फक्त सगळ्या संबंधात संपूर्ण पारदर्शकता आण तुला एकही प्रश्न राहणार नाही’ मी म्हणालो.
 
संजय