नातं (दोन)

आश्रम गिरीकंदरात, रस्त्यापासून बराच दूर आणि गर्द झाडीत होता; येण्याचा मार्ग म्हणजे धड चालता सुद्धा येणार नाही असा दगडगोट्यांचा रस्ता होता. प्रवेशद्वारापासून आत यायलाही लांबवर पाऊलवाट होती आणि तिथे वॉचमन उभा केला होता.  आमची पैशाची पाकिटं आणि घड्याळं सुरुवातीलाच काढून घेतली होती, सामान सगळ्यांचं एकत्र ठेवलेलं होतं. आता त्या पाऊल वाटेनं सगळ्यांची नजर चुकवत निघू म्हटलं तर वॉचमनला कुणालाही बाहेर न सोडण्याचा आदेश होता आणि बाहेर पडून मुख्य रस्त्याला लागेपर्यंतच जीव मेटाकुटीला आला असता. परत सामन आणि पैशाचं पाकीट त्यांच्याकडे त्यामुळे पूर्ण फकिरी आली होती. आता गुरुजी आणि त्यांचा ताफा जे सांगेल ते करणं भाग होतं. मला ग्रेसच्या ओळी आठवल्याः

हा कणकेचा दिवा घेऊन

मी असा दारात उभा

बाहेर जाईन तर कावळ्यांची भीती

आत येईन तर उंदराच भय!

मला या असल्या ओळी का आठवाव्या? काय असेल नियतीच्या मनात? 

बुद्धी केव्हा आणि कशी साथ देईल सांगता येत नाही, मी निवडलेल्या व्यक्तीला वही वाचून दाखवताना जे फारच गंभीर होतं ते शिताफीनं टाळून मी वही वाचन संपवलं. माझ्या पार्टनरनं जेव्हा वाचून दाखवलं तेव्हा माझा त्यात काही फारसा रस उरला नव्हता आणि आम्हालाही ‘प्रतिक्रिया न देता ऐका’ असंच सांगितलं होतं म्हणून तो प्रसंग यथावकाश निस्तरला.

असं सगळ्यांचं वाचून झाल्यावर मग परत सगळ्यांना एकत्र करण्यात आलं आणि सांगण्यात आलं की ‘दुसऱ्याचं ऐकून जर आता तुम्हाला काही आठवलं असेल तर रात्रीच्या प्रहरात लिहून काढा, नंतर  मात्र सगळ्यांची पेनं काढून घेतली जातील आणि तुम्हाला एक शब्दही लिहिता येणार नाही’.

माझं सारं आयुष्य माझ्या डोळ्यासमोरून सरकत गेलं, सगळे अपमान, काहीही चूक नसताना ओढवलेले बदनामीचे प्रसंग, ज्यांना आपलं म्हटलं होतं त्यांनी ऐनवेळी दिलेला दगा, दुसऱ्यांनी हातोहात केलेली फसवणूक, पार कडेलोटाच्या टोकाला आलेलं आयुष्य आणि आता सगळं संपवावं अशी झालेली परिस्थिती, क्वचित का असेना आपण कुणाचा घेतलेला बदला, असहाय वाटलेलं बालपण आणि सरते शेवटी देवावरचा उडालेला विश्वास! मला वाटलं आपण मात्र कधी कुणाशी डावपेच खेळलो नाही, आपल्याला दुखावणाऱ्यांशी आपण संबंध तोडले पण सगळं विसरत आपण जगत गेलो, खरंतर एवढं ओझं घेऊन जगणंच शक्य नव्हतं! आपण एकमेव पंगा घेतला तो फक्त हे असलं 'कधी काय होईल याचा नेम नसणारं' आयुष्य देणाऱ्या देवाशी आणि त्याच्या नियतीशी पण तरीही कधीही खोटं वागलो नाही.

मला सॉक्रेटीस आठवला त्याला विषाचा प्याला दिल्यावर राजा म्हणाला तू फक्त सत्य बोलायचं थांबव, तुझा देहदंड मी रद्द करतो, यावर सॉक्रेटीस म्हणाला ‘खरं बोलणं माझ्या सौंदर्यदृष्टीचा भाग आहे, मला स्वतःला मग मी फसवल्यासारखं होईल, मला स्वतःची किंमत राहणार नाही, तुम्ही शिक्षा जारी करा. मला वाटायला लागलं या गोष्टी माझ्या वाचनात का आल्या? इतकं भेदक वाचन मी का आपलंसं केलं? की नियतीनं पुन्हा सॉक्रेटीस माझ्यातून जन्माला घातला?

या असल्या विचारातून मी एकदम भानावर आलो, उठलो आणि माझं पेन तिथल्या स्वयंसेवकाकडे दिलं. तो म्हणाला ‘आता हे परत मिळणार नाही’. मी म्हणालो ‘आता मला त्याची गरज नाही’. रात्र फारच गहिरी झाली होती, मला झोप यायला लागली तसा मनानं नवा विचार मांडला, ‘या वहीचं आता काय होणार? ’  आता मला विचार देखील पुढे नेता येईना, वही उशीखाली ठेवून मी झोपून गेलो.

तिसऱ्या दिवशी पहाटे आम्हाला उठवलं तेव्हा भजनांनी सुरुवात झाली, मग फिटनेससाठीचे व्यायाम आणि प्राणायाम शिकवला गेला. पूर्ण शांततेत आम्हाला आश्रमाच्या आवारात इकडे तिकडे फिरायची परवानगी दिली गेली. मग जेवण, दुपारची विश्रांती आणि चहा झाला. उन्हं उतरायला लागली, गुरुजी सकाळपासून दिसले नाहीत. शिबिराचा मुख्य विषय बाजूला पडला असं वाटत होतं तरी प्रत्येक जण आपली वही मात्र जपत होता.

आता संध्याकाळ झाली होती, माइक पुन्हा गुरुजींच्या हातात होता. हा माणूस सायकॉलॉजी कोळून प्यायला होता, ते म्हणाले ‘आता आपण शेवटाकडे येतोय, तुमच्यातल्या प्रत्येकानं इथे यायचं आणि मी सांगतो त्याला तुमची वही द्यायची. मी सांगतो तशीच वह्यांची अदला बदली होईल, कुणीही चकार शब्द बोलणार नाही.

मला वाटायला लागलं आपण उगीच नसतं धाडस केलं, ती वही आता माझा आत्मा झाली होती, कुणाच्या हातात जाणार हे माझं इतकं उघडं पडलेलं आयुष्य? गुरुजींनी मला वही रवीला द्यायला लावली. माझी आणि रवीची ओळख आम्ही निघालो तेव्हाच झाली होती पण तो पुण्याचा होता, त्याची वही माझ्या हातात आली आणि आम्ही एकमेकांच्या वह्या वाचायला निवांत जागा शोधली, वही कसली? दुसऱ्यापासून, नाही- नाही स्वतःपासून देखील लपवलेलं स्वतःचं आख्खं आयुष्य! मी रवीची वही उघडली, कँटीनमध्ये केलेली किरकोळ चोरी, कधी मधी केलेला खोटेपणा या शिवाय त्यात काही विशेष नव्हतं, मग मला संपूर्ण भीतीनं घेरलं, माझी वही रवी अत्यंत निमग्नतेनं वाचत होता, मी एकदम हताश झालो, काही बोलायची पण बंदी होती. रवीनं माझी वही संपूर्ण वाचून काढली आणि तो माझ्याकडे बघत राहिला.

मी म्हणालो ‘काय झालं? ’

तो म्हणाला, ‘परत नवी वही मिळेल का रे लिहायला? मी स्वतःशी प्रतारणा केली असं वाटतंय’

‘आता नवी वही कशी मिळेल?’ मी म्हणालो

‘आयला, आम्ही काही जगलोच नाही रे,... आणि समजा आता जरी नवी वही मिळाली तरी जगायला परत नवं आयुष्य कुठून आणणार? रवी पूर्ण खंतावला.

‘रवी, प्रॉबब्ली यू आर लकी’ मी म्हणालो.

‘कसलं आलंय लक, आमच्या इतक्या मिळमिळीत आयुष्याला काय जगलो म्हणायचं?

एवढ्यात वेळ संपली आणि आम्हाला परत सभागृहात बोलावलं.

शिबिराचा आजचा तिसरा दिवस होता,  संध्याकाळ उलटून गेली होती आणि अंधार दाटायला लागला होता. आपण काय करतोय? आता पुढे काय वाढून ठेवलंय? आपलं आयुष्य माहिती झालेल्या या माणसाला आता आपल्याविषयी काय वाटत असेल? मी पुरता चक्रावून गेलो. माइक पुन्हा गुरुजींच्या हातात होता. एकदम निरवं शांतता आणि त्यांचं एकेकाकडे भेदक बघणं यानी वातावरणाला कमालीची अनिश्चितता आणली होती.

अत्यंत गंभीरपणे ते म्हणाले, ‘आता तुमच्यापैकी इथं येऊन कोण स्वतःची वही वाचून दाखवेल? ’

वातावरण असं काही सुन्न झालं की प्रत्येकाला गुरुजींकडे बघावं, ज्यानं आपली वही वाचली त्याच्या नजरेचा वेध घ्यावा की सरळ खाली बघावं काही कळेना.

मी शांतपणे उठून उभा राहिलो, सरळ गुरुजींकडे पाहिलं आणि म्हणालो, ‘गुरुजी मी वाचतो माझी वही’. त्यांनी ताबडतोप मला माइक जवळ बोलावलं.

नियतीनं माझ्याशी काय डाव खेळायचं ठरवलं आहे मला कळेना, का स्वीकारलं मी हे असलं जीवघेणं आव्हान? थोडं थांबायला काय हरकत होती मला? पण आता वेळ संपली होती, सत्तर साधकात मी एकटा मूर्ख ठरलो होतो. असं एकटं पडण्याचे आजवर शेकडो प्रसंग आले होते पण आज मात्र मला मृत्यू सुद्धा फिका वाटायला लागला. तो तरी काय करू शकणार होता? माझी वही आणि मी आता सर्वांसमोर होतो. मला स्वतःचं काय करावं कळेना, माझा देह संपूर्णपणे भावनेनं थिजून गेला, कंठ शीशाचा झाला, मला शब्द फुटेना, पण आहे त्या परिस्थितीत आता मला वाचण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. माझ्या नजरेत करुणा, दुःखं, असहायता, पाणी सगळं एकावेळी दाटून आलं, मी वही उघडली, माइक हातात घेतला आणि कुणाकडेही न बघता वाचायला सुरुवात करणार एवढ्यात गुरुजींनी मला थांबवलं.

गुरुजी म्हणाले ‘तुला काहीही वाचायची गरज नाही आणि मग सर्वांकडे  बघून म्हणाले, ‘मूर्ख साधकांनो या शिबिराचा उपयोग फक्त एका माणसाला झालाय आणि तो तुमच्यासमोर उभा आहे. तुम्ही प्रत्येकानं आता तुमच्या वह्या बाहेर पेटवलेल्या होमकुंडात टाका’, मग अचानक त्यांनी शिबिर संपल्याची घोषणा केली आणि माइक बंद करून टाकला. माझ्या देहाचं फुलपाखरू झालं होतं.

चार दिवस चालणारं शिबिर तिसऱ्या दिवशी संध्याकाळीच संपन्न झालं होतं, हाती आलेली उत्तम संधी दवडली म्हणून सगळे साधक निराश झाले होते. तुम्ही या प्रक्रियेत अर्धे उतरू नका, तुम्हाला उर्वरित आयुष्य जड जाईल, पुन्हा कोणत्या जन्मी अशी संधी येईल सांगता येत नाही, या सगळ्या आधी नुसत्या पोकळ धमक्या वाटल्या होत्या, आता सगळ्या साधकांना त्याची यथार्थता समजली.  रात्रीचं जेवण करून आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघणार होतो.

संजय