नातं (एक)

मी सत्य शोधत होतो तेव्हाची गोष्ट आहे. गुरुजी, मी, गुरुजींचा एक जवळचा शिष्य विनीत, शिबिरात सहभागी होणारा रवी आणि त्याची अर्धांगींनी असे आम्ही पाच लोक एका अत्यंत सखोल आध्यात्मिक प्रक्रियेसाठी एका दूरवरच्या आश्रमात निघालो होतो. विनीत शिबीर घेणार होता, गुरुजी स्वतः हजर राहणार असल्यामुळे आणखी सत्तर साधक वेगवेगळ्या ठिकाणाहून येणार होते. रवीनं खास गुरुजींच्या आग्रहामुळे बायकोला बरोबर घेतलं होतं, तो गाडी चालवत होता, बायको त्याच्या शेजारी आणि आम्ही तिघं मागे असा प्रवास सुरू झाला.

आध्यात्मिक प्रक्रिया काय असणार हे खुद्दं विनीतला सुद्धा माहिती नव्हतं. स्त्रिया आणि पुरूष असा एकत्रित ग्रुप होता. आम्ही आश्रमात पोहोचल्यावर चहापाना नंतर आम्हा प्रत्येकाला दोनशे पानी वह्या देण्यात आल्या आणि अत्यंत गंभीरपणे सांगण्यात आलं की तुम्ही तुम्हाला स्मरेल तशी तुमची जीवनगाथा, विशेषतः तुमच्या मनावर ज्यांचा खोलवर परिणाम झाला आहे असे प्रसंग सविस्तर लिहायचे आहेत, कुणीही कुणाशी या चार दिवसात आता काही बोलणार नाही, तुम्ही सर्वस्वी एकटे आहात असं वागायचं आहे.

शांतता इतकी निरवं होती की खरोखरच आपण एकटे आहोत असं वाटायला लागलं, प्रत्येकजण स्वतःच्या मनात उतरायला लागला. नको नको त्या आठवणी, नाही नाही ते प्रसंग वहीत उतरवले जायला लागले. चहा आणि अगदी साधं जेवण सोडता बाकी काही चर्चा नाही फक्त आठवेल तसं, आठवेल त्या क्रमानं लिहीत राहायचं. एकमेकाशी काहीही न बोलता इकडेतिकडे पाय मोकळे करायला फिरता येत होतं पण साधारण दोन तासांनी सगळ्यांना सभागृहात बोलावलं जायचं आणि मनात आणखी आणखी खोल उतरायला सांगितलं जायचं. संध्याकाळपर्यंत माझी वही म्हणजे शक्यतो कुणाच्या हाती लागू नये अशी वस्तू झाली.

संध्याकाळच्या जेवणानंतर परत सगळ्यांना एकत्र करून सांगण्यात आलं की आता रात्रीच्या शांततेत तुम्ही कधीही ज्यात परत डोकावण्याचं धाडस केलं नाही आणि जे तुम्ही कितीही जवळच्या माणसाला सांगणार नाही ते प्रसंग लिहायचे आहेत. तुम्हाला जर शिबिराच फायदा व्हावा असं वाटत असेल तर तुम्ही मनाचा निग्रह करून आठवा आणि लिहा, आमच्या निरीक्षणावरून आतापर्यंतचे तुमचे प्रयत्न वरवरचे वाटतायत. रात्रीच्या अनिर्बंध वेळेत आम्ही पुन्हा मनाच्या खोल डोहात उतरायला लागलो, माझी वही तर मला जवळ ठेवू तर पंचाईत आणि कुणाच्या हाती लागली तर त्याहून पंचाईत अशी व्हायला लागली.

भल्या पहाटे स्वतः गुरुजींनी माइक हातात घेतला आणि म्हणाले, ‘ज्या अपेक्षेनं मी इथे हजर झालो होतो ती फलद्रुप होईल असं वाटत नाही, तुमचे चेहरे मला सांगतायत की तुम्ही अजून पूर्णपणे सत्यात उतरला नाहीत. तुम्ही जर ही प्रक्रिया पूर्ण सहकार्यानं केली नाही तर तिचे परिणाम तुम्हाला उर्वरित आयुष्यात भोगावे लागतील. महावीरानं वस्त्र त्यागली हा केवळ दैहिक भाग झाला, तुम्हाला मानसिक विवस्त्रता साधायची आहे, आणखी खोल उतरा, आपल्याकडे वेळ कमी आहे’.

आता बऱ्याच जणांना आपण झक मारली आणि इथे आलो असं वाटायला लागलं पण परतीचा मार्ग बंद होता कारण शिबिरात सामील होतानाच आम्ही ते पूर्ण करू अशी हमी प्रत्येकाकडून लिहून घेण्यात आली होती आणि गुरुजींशी पंगा घेणं कुणालाच शक्य नव्हतं.

मला मात्र मजा वाटायला लागली, मी पुन्हा सर्व प्रयत्नांनिशी लिहायला लागलो. आता मी आणि वही एवढंच माझं जग उरलं. माझी वही इतकी स्फोटक व्हायला लागली की मधूनमधून आपण वेडेपणा तर करत नाही ना अशी शंका मला यायला लागली, पण मी लिहीत राहिलो.

नाश्ता झाल्यावर त्यांच्यातल्या कुणी तरी भजन म्हटलं, मग परत शांतता की मग पुन्हा आम्हाला सांगण्यात आलं की आता तुम्ही शेवटचा प्रयत्न करा, काहीही बाकी ठेवू नका, जर ही संधी हुकली तर पुढचे अनेक जन्म अशी संधी येईल किंवा नाही सांगता येत नाही.

मला बाकीच्यांचं काही कळेना पण मी एकदम बेभान होऊन जे काय उरलं सुरलं होतं ते वहीत उतरवलं आणि मला वाटायला लागलं आता ही वही म्हणजे आपला प्राण आहे. मी सर्वस्वी त्या प्रक्रियेच्या काह्यात गेलो, आता पुढे काय होणार, काय असेल ही आध्यात्मिक प्रक्रिया? माझी अवस्था इतकी दोलायमान झाली की इथून पळून जावं तर उत्सुकता आणि टिकून राहावं तर अनाकलनीयता.

संध्याकाळी सर्वांना परत एकत्र बोलावण्यात आलं आणि अत्यंत आकस्मिक घटना घडली. विनीतला बाजूला करून गुरुजींनी माइक हातात घेतला आणि ते म्हणाले ‘तुम्ही प्रत्येकानं कोणतीही एक अनोळखी व्यक्ती निवडायची आहे आणि तिला तुमची संपूर्ण वही वाचून दाखवायची आहे, नंतर मग ऐकणाऱ्यानं त्याची वही त्याच्या पार्टनरला वाचून दाखवायची आहे. तुम्ही प्रत्येकानं आपला पार्टनर आणि एकांताच्या जागा निवडा’.

तो दुसरा दिवस होता, अजून दोन दिवस तिथे काढायचे होते आणि आता हा प्रसंग म्हणजे कहर झाला. मला वाटत होतं आता वही आणि आपण एवढ्यातच काय ती गुह्यता आहे पण मानसिक विवस्त्रता असला पैलू घेईल याचा कुणाला जाम अंदाज आला नाही. आता मनात नको नको ते असभ्य शब्द उमटायला लागले पण एकूण माहौलच असा होता की परतीचे सगळे मार्ग बंद होते आणि पुढे जाण्याशिवाय पर्याय नव्हता.

संजय