मजला असे अनुज्ञा जरका - गाणे एक म्हणू मी?

मजला असे अनुज्ञा जरका - गाणे एक म्हणू मी?
घेउन भाग मेळ्यात तुझ्या - मन.. तुझे रमवू मी? ।ध्रु।

पाउले पडली तुझी - बोल माझे ऐकुनी
जागल्या द्विपदी मनी - रूप तुझे गं पाहुनी
मजला असे अनुज्ञा जरका - हेच पुढे नेऊ मी? ।१।
घेउन भाग मेळ्यात तुझ्या - मन.. तुझे रमवू मी? 

ह्या सुखद रात्रीमधे - चांदणे येई मनी
नाव कुणाचे घ्यायचे - गं तुझ्यासम ना कुणी
मजला असे अनुज्ञा जरका - नाव कुणी देऊ मी? ।२।
घेउन भाग मेळ्यात तुझ्या - मन.. तुझे रमवू मी?

टीपा :

१. मजला मिळे अनुज्ञा जरका... असे बरे वाटले तर तसे म्हणावे.

काही उच्चार - एऽक् भाऽग् मऽन् रूऽप्  हेऽच् नाऽव् असे उच्चार करावे.

हे गाणे मला जसे ऐकू आले आणि उमजले आणि त्याचे शब्द जसे जालावर मिळाले (आणि ते उमजले  ) त्याप्रमाणे मी भाषांतराचा प्रयत्न केलेला आहे.

चाल : मूळ गाण्याचीच! ध्रुवपदाची चाल वर आली आहे. क्डव्याची चाल
गाऽलगागा गाऽलगा - गाऽलगागा गाऽलगा अशी आहे. त्यात गाऽलगा ऐवजी गाललगा किंवा गागागा असे करणे पुष्कळ ठिकाणी टाळलेले आहे. अर्थात चालीत म्हणायला काही त्रास होत नाही. (मात्र त्यासाठी आधी गाणे ओळखावे लागेल  )

विनंती :

१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.
२. फक्त गाणे ओळखू नका.  (किंवा नुसते अभिनंदन करूनका  काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. )... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे  )

३. ध्रुवपदाचे भाषांतर सुचत असेल तर तेही सुचवा. यमक ..  ऊ मी  शी जमवा बरका!