केक करताना..

केक करणे हा माझ्या आनंदाचा भाग आहे, मी आजवर अनेक केकृ येथे दिल्या, अजूनही केकृ देणार आहे, हे काही निरोपाचे भाषण नाहीये.. :)
आणि त्यात काही शंका बऱ्याच लोकांनी बरेचदा विचारल्या असे लक्षात आले.
उदा- मला केक करणे कसे जमेल?
मायक्रोव्हेव मध्ये केक कसा करायचा?
आमच्याकडे अवन नाही..
आम्ही अंडी खात नाही..
वाटी/चमचा/कप.. असे प्रमाण नाही का देता येणार?
इ. इ. प्रश्न.. एक ना दोन..
प्रतिसादात त्या प्रश्नाचे उत्तर दिले तरी FAQ क्याटेगरीत काही प्रश्न येतच राहतात. म्हणून ही एकत्रित माहिती-
केक करताना काही बेसिक गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.

केक करताना घटक पदार्थांचे प्रमाण अतिशय करेक्ट घेणे आवश्यक असते, नाहीतर केक बसतो, जड होतो, फुगत नाही, पोरस होत नाही, खूपच टेंडर होतो, तुटतो, मध्ये फुगतो आणि बाजूने चपटा राहतो इ. इ. इ....
म्हणूनच केकचे प्रमाण देताना मी बरेचदा ग्राम मध्ये देते.
केकसाठी मुख्य घटक जे मी ग्राम मध्ये वापरते ते म्हणजे मैदा, साखर, बटर -
यांची वाटी ची प्रमाणे पुढीलप्रमाणे- (वाटी- आमटीची वाटी )
१ फ्लॅट वाटी मैदा- १०० ग्राम
१ फ्लॅट वाटी साखर- १५० ग्राम
१ फ्लॅट वाटी बटर- १२५ ग्राम
हे प्रमाण लक्षात घेऊन दिलेल्या केकृ करता येतील. (थोडे गणित करावे लागेल.Smile)

अंडी- अंडी उत्तम केक बाइंडर आहेत, तसेच केक फ्लफी, पोरस आणि हलका होण्यासाठी अंडी हा महत्त्वाचा घटक आहे.
शाकाहारी मंडळी अंडी खात नाहीत, खरं तर शाकाहारी अंडी बाजारात उपलब्ध असतातच, तरी ज्यांना बिनाअंड्याचा केक करायचा आहे त्यांनी एगलेस केकची ही कृती पाहावी. दुवा क्र. १
अंड्याला रिप्लेसमेंट म्हणून दही, कोक, कंडेन्स्ड मिल्क असे पर्याय आहेत. काही एगलेस केकृ देईन लवकरच.
पण त्सेंटा आजीच्या मते साधारण पणे अंड्याला पर्याय वापरायचाच असेल तर..
१ अंडे- १ टेबलस्पून कॉर्न स्टार्च + २ टेबल स्पून पाणी एकत्र करणे किवा १ अंडे- १ टेबलस्पून पोटॅटो स्टार्च+ २ टेबल स्पून पाणी एकत्र करून घेणे
दिलेल्या केकृ मध्ये अंड्याऐवजी हा पर्याय वापरून एगलेस केकृ करू शकता.

मोल्डमेकिंग करताना केक पॅनला सर्व बाजूंनी बटर लावणे अत्यंत आवश्यक आहे नाहीतर केक भांड्याला चिकटतो.
केकपॅन जरी टेफलॉन कोटेड/नॉनस्टिक असेल तरीही ग्रिसिंग करणे आवश्यक.
केकपॅन जर वर्तुळाकार असेल आणि मध्ये केक जास्त फुगत असेल तर केकचे मिश्रण पॅन मध्ये ओतताना कडेने जास्त व मध्ये कमी ओतावे म्हणजे केक बेक झाल्यावर इव्हनली फुगेल.

अवन नाही, पर्याय काय?
मायक्रोव्हेव -मायक्रोवेव + कनव्हेक्शन असेल तर कन्वेक्शन मोड वर ठेवून साध्या अवन प्रमाणे वापरणे. म्हणजेच साध्या अवन मध्ये जितका वेळ लागतो साधारण तितकाच वेळ त्यातही लागतो आणि केक उत्तम होतो.
साध्या मायक्रोवेव (बिना कन्व्हेक्शनचा) मध्ये जर केक केला तर त्याला ब्राऊनिंग येत नाही आणि कधी कधी केक आतून होतो पण बाहेरून सॉगी राहतो. (वाफ धरल्यामुळे)
साध्या मायक्रोव्हेव अवन मध्ये केक करताना साधारण ८०० वॅट वर ६ मिनिटे वेळ लागतो. वॅटेज कमीजास्त असेल त्या प्रमाणात वेळ ऍडजस्ट करावा लागेल.

केकपात्र- अवन नसेल तर केकपात्रात केक करता येतो. एका तव्यावर वाळू घालून त्यावर केकपात्र ठेवायचे आणि वरून दुसरा तवा ठेवायचा, त्यावरही वाळू घालायची.
केकपात्र नसेल तर ऍल्युमिनियमचे पसरट भांडे किवा कुकरचे भांडे ठेवता येते.
केक करताना आच मध्यम ठेवा.
(ऍल्युमिनियम हा उत्तम उष्णता वाहक असल्यामुळे त्याचा वापर केला जातो. )

कुकर-कुकर मध्ये एक ताटली उलटी ठेवायची, कुकरमध्ये पाणी घालायचे नाही. कुकरच्या भांड्यात केकचे मिश्रण घालायचे आणि शिट्टी/प्रेशर न लावता कुकर गॅसवर ठेवायचा, प्रथम ५ मिनिटे तेज आच, नंतर मध्यम आच.. साधारण १८-२० मिनिटात केक होतो. पण केकचा वास यायला लागला की चेक करणे आवश्यक. नाहीतर केक (आणि कुकर )जळेल.

केक झाल्यावर-
केक झाला की नाही ते विणायची सुई किवा सुरी खुपसून पाहा. मिश्रण न चिकटता सुई/सुरी बाहेर आली म्हणजे केक झाला.
अवनचे दार उघडून केक तेथे तसाच ५ मिनिटे राहू द्या.
नंतर बाहेर काढून अजून ५ मिनिटे तसाच ठेवा. आणि त्यानंतर जाळीवर काढून पूर्ण गार होऊ द्या.
केक नेहमी थंड झाल्यावर कापावा म्हणजे स्लाइस तुटत नाहीत.
केक कापल्यावर स्लाईस उघड्यावर ठेवायच्या नाहीत, त्या कोरड्या पडतात.

ह्या काही गोष्टी लक्षात घेऊन केक केला तर तो तुमच्या आनंदाचा भाग होईल.
शुभेच्छा!